অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

अवयवदान दिन- 29 ऑगस्ट

अवयवदान दिन- 29 ऑगस्ट

ध्यानं परं कृतयुगे त्रेतयां ज्ञानमुच्यते

दवापरे यज्ञमेवाहू: दानमेव कलौयुगे

कृत युगात ध्यान, त्रेता युगात ज्ञान, द्वापार युगात यज्ञ आणि कलयुगात दान हे साधन असल्याचा उल्लेख कुर्म पुराणात आढळतो. कलयुगात दानाला महत्व दिले असल्याने भुदान, गोदान, संपत्तीचे दान, अन्नदान, वस्त्रदान या स्वरूपाचे दान केल्याचे आढळून येते. पौराणिक कथांमध्ये दधिची ऋषींनी वृत्तसुराला मारण्यासाठी आपल्या अस्थींचे इंद्राला दान दिले होते, शिबी राजाने कबुतराचे प्राण वाचविण्यासाठी आपल्या अंगावरचे मासं दान दिले तर कर्णाने जन्मत:च शरीराचा एक भाग म्हणून लाभलेले कवच कुंडल दान केले. अशा पौराणिक कथा ऐकल्यानंतर वाटत की, पुराण काळापासूनच अवयव दानाची संकल्पना रूढ आहे. त्यावरूनच पुराण काळापासून भारतीय संस्कृतीत “दाना”चे अनन्यसाधारण महत्व असल्याचे लक्षात येते. ऑगस्ट 2016 पासून राज्यात अवयवदानाविषयी विविध उपक्रम राबवले जात आहेत. या पार्श्वभूमीवर वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीष महाजन यांनी 29 ऑगस्ट हा अवयवदान दिन म्हणून साजरा करण्याची घोषणा केली.

सर्वच माध्यमातून अवयवदान करण्याबाबत जनजागृती होत असून दिवसेंदिवस अवयवदानाच्या मोहिमेला समाजातून प्रतिसाद मिळत आहे. परंतू तो प्रत्यक्षात अंमलात आणणाऱ्यांची संख्या त्यामानाने कमी आहे. अवयवदान करणाऱ्या व्यक्तिंपेक्षा गरजू व्यक्तिंची यादी मोठी आहे. त्यामुळे अवयवदान करण्यासाठी प्रत्येकाने आपला सहभाग नोंदविणे आश्यक आहे. वैद्यकिय क्षेत्रात झालेल्या प्रगतीमुळे अवयवदान करण्याची प्रक्रिया काही प्रमाणात सोपी झाली आहे.

अवयवदान हे दोन प्रकारे करता येते- 1) जिवंतपणी करता येणारे अवयव दान 2) मरणोत्तर करण्यात येणारे अवयव दान.

जिवंतपणी अवयवदान करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या प्रादेशिक प्रत्यारोपण समन्वयक केंद्र या अधिकृत संस्थेची परवानगी असते. अवयवदानानंतर दात्याच्या प्रकृतीवर दुष्परिणाम होणार नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतरच ही परवानगी दिली जाते. त्यामुळे जिवंतपणी किडनी व यकृताचे काही प्रमाणात दान करता येते. तसेच रक्त हे देखील मानवी शरीराचा अविभाज्य भाग आहे. मानवी शरीराचे संतुलन राखण्यासाठी रक्ताची निर्मिती होत असते. त्यामुळे ठराविक कालावधीमध्ये रक्तदान करणे हे आरोग्यासाठी चांगले असल्याचे सांगण्यात येते. मृत्यूनंतर अवयवदान करण्यासाठी मृत्यू कोणत्या कारणाने झाला हे तपासले जाते.

त्याअंतर्गत हृदय बंद पडून होणारा मृत्यू जसे वृद्धापकाळाने किंवा नैसर्गिक मृत्यू असतो. नैसर्गिक मृत्यूनंतर आपण फक्त नेत्रदान, त्वचादान आणि हृदयाच्या झडपा दान करू शकतो. मेंदू बंद पडून होणारा मृत्यू म्हणजे ज्याला Brain Death संबोधले जाते. यामध्ये मेंदूला इजा झाल्याने माणसाचा मृत्यू होतो. अशा मृत्यूमध्ये माणसाचा फक्त मेंदू मृत पावलेला असला तरीही हृदय, यकृत, मूत्रपिंड, फुफ्फुस हे सर्व अवयव चालू स्थितीत असल्याने त्यांचे दान करता येते.

मेंदूमृत व्यक्ती व कोमामध्ये गेलेली व्यक्ती यामध्ये बराचसा फरक आहे. कोमामध्ये असलेल्या व्यक्तिच्या मेंदूचे कार्य चालू असते आणि त्यामुळे कोमामध्ये गेलेली व्यक्ती शुद्धीवर येण्याची शक्यता असते. परंतु मेंदूमृत झालेली व्यक्ती कधीही परत जिवंत होऊ शकत नाही. म्हणून मेंदूमृत व्यक्ती मृत्युसमयी दवाखान्यात आयसीयुमध्ये असेल व मृत्यूपूर्वी अवयवदान करण्याचे संबंधित व्यक्तीने जाहीर केले असेल तरच अवयवदान करता येऊ शकते. असे करण्यासाठी कमीत कमी चार डॉक्टरांच्या समितीने त्या व्यक्तीची तपासणी करून त्यास मेंदूमृत घोषित करणे कायद्याने बंधनकारक आहे.

मृत्यूनंतर नेत्र, मेंदू, ह्रदय, त्वचा अशा विविध अवयवांचे दान करून एक व्यक्ति दोन-तीन व्यक्तिंच्या रूपाने जिवंत राहू शकते. श्रीलंकेसारखा छोटासा देश नेत्र निर्यातीत जगात पहिल्या स्थानावर आहे. अनेक देशात मृत व्यक्तिने मरण्याआधी आपले अवयवदान करू नये, असे स्पष्ट जाहीर केले असेल तरच त्या व्यक्तिचे अवयवदान केले जात नाही. अन्यथा प्रत्येक व्यक्तिची अवयवदानाला मान्यता आहे, असे मानून त्याबाबत त्वरीत कार्यकाही करण्यात येते. आज अवयवदानाविषयी सर्वस्तरावर जनजागृती करणे आवश्यक झाले आहे. अवयवदान व देहदान या दोन्हीमध्ये फरक आहे. अवयवदान हे जिवंतपणी व मरणानंतर ही करता येते. मृत्यूपश्चात करण्यात येणाऱ्या अवयवदानानंतर मृत शरीर हे नातेवाईकांच्या ताब्यात देताना ते व्यवस्थित प्रक्रिया करून दिले जाते. ज्यामुळे एखादा अवयव काढून घेतल्याच्या कोणत्याही खुणा दर्शनी भागावर दिसून येत नाहीत. त्यामुळे अवयवदान केल्यानंतर धार्मिक विधी करण्यासाठी कोणतीही अडचण येत नाही. अवयवदान करताना शरीरातील ठराविक अवयवच दान केले जातात. परंतू देहदान हे फक्त मरणानंतरच एखाद्या वैद्यकीय महाविद्यालयात डॉक्टरांना मानवी शरीराच्या अभ्यास, प्रात्यक्षिक व संशोधन करण्यासाठी दिले जाते. देहादानानंतर असे मृत शरीर धार्मिक विधी करण्यासाठी नातेवाईंकांकडे दिले जात नाही तर ते फक्त संशोधनासाठीच वापरले जाते.

कोणत्याही स्वरूपाचे दान असो ते गरजू व्यक्तिंना केले तर त्याला अधिक महत्व प्राप्त होते. आपल्याकडील संपत्ती ही गरजूंना दान केल्यास ईश्वरभाव प्राप्त होतो, असे म्हणतात. त्याअनुषंगाने नाशवंत मानवी शरीर मातीत विलीन करण्यापेक्षा आपली देहरूपी संपत्ती मरणोत्तर दान केली तर अनेकांचे प्राण वाचविल्याचे पुण्य प्राप्त होईल. असे अवयवदान करणाऱ्या दात्यांसाठी मरणानंतर ही जीवन जगते असे म्हणता येईल.

लेखिका: अर्चना देशमुख

माहिती स्रोत: महान्युज

अंतिम सुधारित : 8/20/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate