অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

आजारी माणसाशी वागताना

आजारी माणसाशी वागताना

आधुनिक वैद्यकाचा जनक हिप्पोक्रॅटीस याने डॉक्टरांनी पाळायच्या सूचना लिहून ठेवल्या आहेत. डॉक्टरांनी या शपथेचे पालन करायचे असते. आपणही आजाऱ्यांशी वागतांना काही गोष्टी पाळल्या पाहिजेत. सर्व लहानथोर गरीब-श्रीमंत व्यक्ती समान आहेत, त्यात जाती-धर्म यांचा भेदाभेद येता कामा नये. आपले ज्ञान व कौशल्य वापरून येईल त्यांचे हित करणे हे आपले कर्तव्य आहे. त्या व्यक्तीचे कोठल्याही प्रकारे अहित होणार नाही याची काळजी घ्या.

आपल्याला येत नसेल तर अज्ञानापोटी चुकीचे काही करू नका. योग्य उपचारासाठी प्रमाणित तज्ज्ञाकडे पाठवणे व मार्गदर्शन करणे हे आपले कर्तव्य आहे. वैद्यक हा व्यवसाय आहे, धंदा नाही. योग्य मोबदला घेणे हे न्यायाचे असले तरी कोणालाही केवळ पैशाच्या कारणावरून विन्मुख पाठवणे हे वैद्यकीय नीतिमत्तेत बसत नाही. बरे करणे, ठाऊक आहे ते समजावून देणे हे आपले पवित्र कर्तव्य आहे. लोकांना लाचार न करता मदत करणे हीच आपली पध्दत असायला हवी. औषधगोळया देणे शक्य नसले तरी धीर देणे, मार्गदर्शन करणे हे डॉक्टरांचे काम आहे.

सहानुभूती, ममत्व ठेवा, पण शास्त्रीय अभ्यासाला थोडी अलिप्तताही लागते. लोकांबद्दल सहानुभूती असावी. पण शरीरदु:खांबद्दल अलिप्त शास्त्रीय दृष्टिकोन ठेवावा. आपल्या आजारांबद्दल काहीजणांना इतरत्र बोललेले आवडत नाही. खरेतर आजारी माणूस सांगतो ते आपण पोटात किंवा जवळच्या नातेवाईकांत ठेवले पाहिजे. विशेष करून लिंगसांसर्गिक आजार आणि कमीपणा वाटतील असे आजार याबद्दल गुप्तता असावी. रागावणे, रागावून बोलणे इ. गोष्टी या कामात शोभत नाहीत.

कितीतरी वेळा अज्ञानाने,आळसाने, गैरसमजाने लोक काही चुका करतात किंवा अपेक्षेप्रमाणे वागत नाहीत. याबद्दल राग न बाळगता सहनशक्ती दाखवून न दुखवता व्यवहार करणे जमले पाहिजे. रागीटपणा हा अशा कामात कमीपणा आणतो. काटेकोर स्वच्छता पाळा, पण हात न लावता बरे करणे जवळपास अशक्य असते. शब्दांनी जो दिलासा मिळत नाही तो स्पर्शाने मिळतो. पण स्पर्शाचा योग्य तो उपयोग करावा, अतिरेक किंवा गैरवापर टाळावा. एकूणच या कामात संयम कामी येतो.

  • स्त्रियांशी वागतांना पुरुषांनी आदर व पुरेसा विनय ठेवला पाहिजे. समोरची व्यक्ती तुमच्याकडे दु:ख घेऊन आलेली असते. त्या भावनेचे पावित्र्य जपले पाहिजे. कोणालाही तुमच्याकडे असुरक्षित वाटणार नाही याची काळजी घ्या.
  • व्यंगाचा उल्लेख वाईट वाटेल अशा रीतीने करू नका. वरून दाखवले नाही तरी माणसांना आतून त्याबद्दल दु:ख वाटत असते याची सहृदय आठवण ठेवा.
  • आजारी माणूस केवळ एखादे दुखणे घेऊन आला असला तरी केवळ त्याचा आजार/ अवयव एवढेच लक्ष्य ठेवू नका. ब-याच लोकांना आपली सुखदु:खे तुम्हांला सांगावीशी वाटतात. त्यांना मनमोकळे होऊ द्या. शक्य असल्यास त्यात सहभागी व्हा. नुसत्या आजाराचे नाही तर जीवनाचे भान ठेवा.
  • आपल्या कामाची जाहिरात करणे हे वैद्यकीय नीतिमत्तेत बसत नाही. तुमचे ज्ञान आणि हातगुण चांगला असेल तर हळूहळू लोकांना ते कळेल. कोठल्याही प्रकारे जाहिरात करू नका.
  • औषध-गोळया ही बरी करायची साधने आहेत. त्याबद्दल योग्य मोबदला घ्यावा पण त्याचा व्यापार करू नका. मनात एकदा व्यापारवृत्ती शिरली की प्रत्येक रूग्णाकडे बघण्याची नजर दूषित होईल.
  • काही लोक कधी इतरांकडून औषधोपचार करून घेतील, अडचणीच्या वेळीच तुमच्याकडे येतील. असे असले तरी याबद्दल मन स्वच्छ ठेवा. पूर्वग्रह बाळगू नका. इतर डॉक्टर-वैद्य वगैरेंशी स्पर्धा, असूया बाळगू नका. त्यांच्याबद्दल कोणी बरेवाईट सांगू लागले तर दुर्लक्ष करा किंवा विषय बदला. अशा बोलण्यात आपण मनानेही भाग घेऊ नये, शब्दाने तर नाहीच.
  • लेखक : डॉ. श्याम अष्टेकर

    (MBBS, MD community Medicine)

    संदर्भ : आरोग्याविद्या

    अंतिम सुधारित : 6/3/2020



    © C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
    English to Hindi Transliterate