অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

उत्सर्जन ( Excretion )

शरीरातील अतिरिक्त  पाणी, नको असलेले पदार्थ, तसेच घातक पदार्थ बाहेर टाकण्याची प्रक्रिया. सर्व सजीवांमध्ये उत्सर्जन घडून येत असते. एकपेशीय सजीवांमध्ये टाकाऊ पदार्थ पेशीच्या पृष्ठभागापासून थेट विसर्जित होतात, तर बहुपेशीय सजीवांमध्ये उत्सर्जनाची प्रक्रिया गुंतागुंतीची असते. वनस्पती त्यांच्या पानांवर असलेल्या छिद्रांतून (पर्णरंध्रे) नको असलेले वायू बाहेर टाकतात. वनस्पतींमध्ये टाकाऊ वा विषारी पदार्थ पानांमध्ये साठविले जातात आणि ती पाने नंतर गळून पडतात. अशा प्रकारे वनस्पतीची पाने प्रकाशसंश्लेषणाबरोबरच उत्सर्जनाचेही कार्य करतात.

 

 

 

 

 

 

मानवी शरीरातील काही उत्सर्जक

प्राण्यांमध्ये कर्बोदके व मेद यांच्या अपचयाद्वारे कार्बन डाय-ऑक्साइड आणि पाणी तयार होते. या पदार्थांच्या निचर्‍यासाठी स्वतंत्र क्रियेची वा शरीरसंस्थेची गरज भासत नाही. परंतु प्रथिनांच्या अपचयाद्वारे बनलेले नत्रयुक्त पदार्थ विषारी असल्याने ते तात्काळ बाहेर फेकण्याची आवश्यकता असते आणि त्यासाठी खास इंद्रिये असतात. नत्रयुक्त पदार्थांच्या विघटनामुळे विषारी अमोनिया वायू तयार होतो. या अमोनियाचे उत्सर्जन हे सजीवांची जाती व सजीवांमध्ये पर्यावरणाच्या दृष्टीने घडून आलेले अनुकूल यांनुसार ठरते. काही प्राणी सरळ अमोनिया वायूच उत्सर्जित करतात. अशा प्राण्यांना अमोनियात्यागी प्राणी म्हणतात. इतर सजीवांमध्ये अमोनियाचे रूपांतर कमी घातक यूरिया अथवा यूरिक आम्लात होते आणि ते उत्सर्जित केले जाते. अशा प्राण्यांना अनुक्रमे यूरियोत्यागी आणि यूरिकोत्यागी म्हटले जाते.

बहुतांशी जलचर प्राणी अमोनियात्यागी आहेत. या प्राण्यांत अमोनिया हा वायू स्वरूपातच शरीराबाहेर टाकला जातो, कारण त्यांना अमोनिया विरघळण्यासाठी मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध असते. अनेक भूचर प्राणी यूरियोत्यागी आहेत. या प्राण्यांमध्ये पाणी मर्यादित प्रमाणात उपलब्ध असल्याने अमोनियाचे रूपांतर यूरिया अथवा यूरिक आम्ल यांत करण्याची प्रक्रिया विकसित झालेली आहे. सस्तन प्राणी, उभयचर प्राणी तसेच काही समुद्री मासे मूत्राच्या स्वरूपात यूरियाचे उत्सर्जन करतात. पक्षी, कीटक व अनेक सरपटणार्‍या प्राण्यांद्वारे मात्र यूरिक आम्ल उत्सर्जित केले जाते.

यूरिक आम्ल पाण्यात विद्राव्य नसल्यामुळे ते विष्ठेच्या स्वरूपात शरीराबाहेर टाकले जाते. यूरिक आम्लाच्या स्वरूपातील हे उत्सर्जन पाण्याचे प्रमाण कायम राखण्यासाठी मदत करते. सजीव जी अंडी घालतात त्यांचे कवच जवळजवळ अपार्य असते. अंड्यांमध्येही चयापचय क्रिया चालू असते व त्यांपासून निर्माण झालेले विषारी नत्रयुक्त पदार्थ स्थायू स्वरूपातील यूरिक आम्लाच्या स्वरूपात अंडयांमध्ये सुरक्षितपणे साठविले जाऊ शकतात. हे पदार्थ जर यूरिया किंवा अमोनियाच्या स्वरूपात अंड्यात राहिले तर त्यातील जीवास विषबाधा होते. सस्तन प्राण्यांमध्ये मातेच्या गर्भात निर्माण झालेला यूरिया मातेच्या उत्सर्जन संस्थेद्वारे बाहेर टाकला जातो.

मानवी शरीरात अपशिष्ट बाहेर टाकण्याचे कार्य फुप्फुसे, वृक्क (मूत्रपिंड) आणि त्वचा यांद्वारे होते. कार्बन डाय-ऑक्साइड आणि पाण्याची वाफ हे पदार्थ मानवी शरीरातून श्वसनक्रियेद्वारे बाहेर टाकले जातात. सामान्यपणे, प्रौढ व्यक्तीच्या शरीरातून प्रतिमिनिटाला सु. २०० ग्रॅम कार्बन डाय-ऑक्साइड वायू बाहेर पडतो. वृक्काद्वारे, दिवसाला सु. १.५ लि. मूत्र बाहेर टाकले जाते. यात, प्रामुख्याने पाणी, मिठासारखे क्षार आणि प्रथिनांपासून निर्माण झालेल्या यूरियाचा समावेश असतो. काही वेळेस, सोडियम फॉस्फेट आणि सोडियम बायकार्बोनेट हे क्षारही मूत्रातून बाहेर पडतात. त्वचेद्वारे घामावाटे दररोज सु. १ लि. पाणी आणि १.५ मिग्रॅ. क्षार उत्सर्जित होतात.

शरीरातील विष्ठा बाहेर टाकणे आणि उत्सर्जन या दोन्ही भिन्न क्रिया आहेत. कारण विष्ठा हे चयापचयित अपशिष्ट नसून ते न पचलेले अन्न असते.


लेखक - वीणा सागर

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate