অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

ऐच्छिक रक्तदान जनजागरण अभियान

ऐच्छिक रक्तदान जनजागरण अभियान

'महाराष्ट्र राज्य रक्त संक्रमण परिषदे'तर्फे दरवर्षी संपूर्ण महाराष्ट्र राज्यात आरोग्य विभागातर्फे १ ऑक्टोबर रोजी ऐच्छिक रक्तदान दिन साजरा करण्यात येतो. रक्तदानाबाबत समाजात आजही बरेच गैरसमज आहेत. युवा पिढीला ऐच्छिक रक्तदानाकरीता प्रवृत्त करण्यासाठी व रक्तदान ही एक चळवळ म्हणून उभारण्यासाठी दरवर्षी १  ऑक्टोबर रोजी जनजागरण अभियानाचे आयोजन करण्यात येते.

सध्याच्या लोकसंख्येच्या २ टक्के प्रमाणात जरी इच्छेने रक्तदान केले तर रक्तपेढीत कधीच रक्ताचा तुटवडा जाणवणार नाही किंवा रक्ताच्या एका थेंबावाचून कुणाचे प्राण जाणार नाहीत. मानवाने आधुनिक विज्ञान व तंत्रज्ञानाच्या सहाय्याने कितीही प्रगती केली तरी कृत्रिमपणे रक्त तयार करता येत नाही. मानवाला फक्त मानवाचेच रक्त चालते, म्हणून रक्तदा ही अमूल्य सेवा आहे.

मानवी शरीरात ५ लिटर रक्त असते. ऐच्छिक रक्तदानातून फक्त २५० मि.ली. रक्तदान केले जाते की जे काही तासातच शरीर भरुन काढते. त्यामुळे रक्तदान केल्याने कसलाही अशक्तपणा येत नाही. उलट जुने रक्ताची जागा नवीन शुद्ध रक्ताने भरली जाते. रक्तदानापूर्वी ऐच्छिक रक्तदात्याची संपूर्ण शारीरिक तपासणी केली जाते. रक्तदात्याचे वजन, हिमोग्लोबीनचे प्रमाण, रक्तगट तपासणी, रक्तदाब आदी तपासण्यानंतरच रक्तदात्याचे रक्तदान करुन घेतले जाते. रुग्णाला रक्त संक्रमण देण्यापूर्वी त्या रक्त युनीटवर मलेरिया, गुप्तरोग, काविळ आणि एचआयव्हीबाबतच्या तपासण्या केल्या जातात. त्यामुळे खरे तर रक्तदानामुळे ऐच्छिक रक्तदात्याची सखोल शारीरिक तपासणीच होवून जाते. रक्तदानाचा हा एक मोठा फायदा आहे.

ऐच्छिक रक्तदानातून गोळा झालेले रक्तपेढीतील रक्त इमर्जन्सी, अपघात, रक्तस्त्रावाचे रुग्ण, अॅनिमिया, रक्तअल्पता, सिकलसेल, मलेरिया, थॅलेसिमीया, प्रसूती रुग्ण, ऑपरेशन, ब्लड कॅन्सर आदी रुग्णां साठी वापरण्यात येते.अशा  रक्तदानामुळे जीवनदान मिळते.

|| आटत नसतो रक्ताचा झरा,

दर तीन महिन्याला रक्तदान करा ||

युवकांनी वयाची १८ वर्षे पूर्ण झाले की ऐच्छिक रक्तदानाला सुरुवात करावे. कुठलाही निरोगी युवक दर तीन महिन्याला रक्तदान करु शकतो. आजकाल ऐच्छिक रक्तदानाने वाढदिवस साजरा करण्याची जीवनशैली बरेचसे युवक अंगीकार करीत आहेत. मित्रमंडळीसमवेत शासकीय रक्तपेढीत जावून रक्तदानाने म्हणजेच जीवनदान देवून वाढदिवस साजरा होत आहे. रक्तपेढीत ‘बर्थ डे डोनर्स क्लब'ची संकल्पना रुजवत आहे.

गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर आदी भागात सिकलसेल या आजाराची रुग्ण संख्या खूपच जास्त आहे. सिकलसेल रुग्णांना वारंवार रक्त संक्रमण (ब्लड ट्रान्सफ्युजन) करावे लागते. म्हणून ऐच्छिक रक्तदात्यांतर्फे सिकल बालकांना दत्तक घेवून त्यांना आजीवन मोफत सुरक्षित रक्तदान देवून जीवनदान देण्याचा संकल्प करण्यात येत आहे. गर्भवती महिलांमध्ये आजकाल रक्त अल्पतेचे प्रमाण वाढले आहे. म्हणून सुरक्षित मातृत्वासाठी रक्त संक्रमणाची गरज वाढली आहे. शस्त्रक्रियेने होणाऱ्या सिझेरियन प्रसूतीचे प्रमाणही वाढले आहे, त्यामुळे शस्त्रक्रियेदरम्यान देखील रक्ताची मागणी वाढली आहे. म्हणून ऐच्छिक रक्तदानामुळे बाळ व बाळंतिणीचे प्राण वाचविले जात आहे.

केवळ १५ मिनिटाच्या कालावधीत होवून जाणाऱ्या ऐच्छिक रक्तदानामुळे एकाचवेळी ३ ते ४ इमरजन्सी रुग्णांचे बहुमूल्य प्राण वाचविण्यास मदत होते. कारण एका रक्त युनीटपासून लाल रक्तपेशी, प्लेटलेट्स, प्लाजमा, क्लॉटींग फॅक्टर्स आदी रक्तघटकांचे  विलगीकरण करुन वेगवेगळ्या रुग्णांना एकाच रक्तदात्यामुळे तत्काळ जीवनदान मिळू शकते.

राज्य रक्त संक्रमण परिषदेतर्फे संपूर्ण महाराष्ट्रात गावपातळीपर्यंत ऐच्छिक रक्तदानाबाबत व्यापक पातळीवर जनजागरण अभियान राबविण्यात येत आहे. महाविद्यालयीन युवकांची रॅली, निबंध स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, पोष्टर स्पर्धा, स्लोगन स्पर्धा, आरोग्य प्रदर्शनी, ऐच्छिक रक्तदात्यांचा सत्कार आदी विविध उपक्रम शासकीय रक्तपेढीतर्फे आयोजित केले जातात.

चला तर युवकांनो...ऐच्छिक रक्तदानाचा संकल्प करुया...जीवनदान देवूया ||

लेखिका: डॉ.सुवर्णा हुबेकर, वैद्यकीय अधिकारी

माहिती स्रोत: महान्युज

अंतिम सुधारित : 4/16/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate