অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

ग्रीन कॉरिडॉर

ग्रीन कॉरिडॉर हा शब्द आपण खुपदा ऐकला आहे, उच्चारात सुद्धा हा शब्द आढळतो. सगळे हा शब्द अगदी सहज वापरतात पण कोणाला याचा खरा अर्थ माहित आहे का? आम्ही शब्दश: अर्थाबद्दल बोलत नाही, या दोन शब्दांचा एकत्रित अर्थ काय आहे हे विचारत आहोत.

आपण शहराच्या वाहतूक व्यवस्थेबद्दल नेहमीच बोलतो. खूप वाहतूक कोंडी आहे म्हणून नेहमी कलह करतो. पण ही सर्व वाहतूक पोलीस जेव्हा एकत्र येऊन काही निराळेच करतात तेव्हा आपल्याला त्यांचा सार्थ अभिमान वाटतो. ते म्हणजे मिशन ग्रीन कॉरिडॉर.

ग्रीन कॉरिडॉर ही एक युरोपियन संकल्पना आहे. ज्या वाहनांचा मार्ग लांब आणि वेळ घेणारा असतो तिथे ही संकल्पना वापरली जाते जेणेकरून ऊर्जा आणि पर्यावरण दोघांचाही दुरुपयोग होत नाही.

ग्रीन कॉरिडॉर

ग्रीन कॉरिडॉर हा एक खास वाहतूक मार्ग आहे ज्या मध्ये सर्व सिग्नल मॅन्युअल मोडद्वारे वापरले जातात आणि गरजेनुसार वाहतूक वळवितात.

महाराष्ट्रात पहिल्यांदा

महाराष्ट्रात पहिल्यांदा ग्रीन कॉरिडॉरचा वापर पुणे ते मुंबई दरम्यान करण्यात आला. मुलुंडच्या फोर्टिस हॉस्पिटलमधील एका २२ वर्षाच्या तरुणाला हृदय रोपणाची गरज होती. पुण्याच्या जहांगीर हॉस्पिटलमधील एका महिलेने आपले हृदय दान केले. त्यांचा मेंदू निष्क्रिय झाला होता म्हणजेच ब्रेन डेड. त्यानंतर त्यांच्या परिवाराकडून हृदय दानाचा निर्णय घेण्यात आला. मग सुरू झाले मिशन ग्रीन कॉरिडॉर, जीव वाचवण्याची एक वेगळी आणि अभूतपूर्व कवायत. पुणे ते मुंबई हे अंतर एकूण १५० किलोमीटर इतके आहे आणि ते गाठायला २.३५ तास लागतात, जर तुम्ही मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवे घेतला तर, हेच अंतर ६० मिनिटात गाठायचे ठरविण्यात आले.लक्ष्य लांब होते पण निश्चय दृढ होता आणि आपल्या महाराष्ट्रातील वाहतूक पोलिसांनी हे शिव धनुष्य उचलले. प्रश्न होता एका हृदय रोपणाचा आणि नवीन आयुष्याचा. या रस्त्याकडे सर्व देशाचे डोळे लागले होते.

सर्वजण वाहतूक पोलिसांना शुभेच्छा देत होते आणि मनोमन त्यांच्या यशाची कामना करीत होते.त्या दाता स्त्रीने मृत्युच्या खूप अगोदरच आपल्या अंग दानाची प्रतिज्ञा घेतली होती आणि त्यांच्या मृत्यूनंतर ती पूर्ण करण्यात आली. दोन ग्रीन कॉरिडॉर तयार करण्यात आले. पहिला जहांगीर हॉस्पिटल ते पुणे विमानतळ आणि दुसरा मुंबई विमानतळ ते फोर्टिस हॉस्पिटल मुलुंड. पुणे वाहतूक पोलिसांनी जहांगीर रुग्णालय ते पुणे विमानतळ हे अंतर अवघ्या ०७ मिनिटात सर केले. आता हृदय मुंबई विमानतळावरून मुलुंड रुग्णालय पर्यंत लवकरात लवकर न्यायचे होते. हे अंतर २० किलोमीटर एवढे होते आणि त्यात १५ सिग्नल होते.हा पूर्ण रस्ता १५० पोलीस कर्मचाऱ्यांनी सांभाळला, सर्व १५ सिग्नल पोलिसांनी मॅन्युअल मोडने सांभाळले आणि १८ मिनिटात हृदय मुलुंडच्या रुग्णालयात पोहचवले. सर्वसधारण दिवशी हे अंतर कापायला ४० ते ४५ मिनिटे लागतात.

हे महारष्ट्रातील पहिले हृदयरोपण आणि ग्रीन कॉरिडॉर मिशन होते. दोन्ही गोष्टी वेळेत आणि व्यवस्थित पार पाडण्यात वाहतूक पोलिसांना यश आले. मानवाच्या मृत्यूनंतर हृदय हे ४ ते ५ तासच जोपासता येते. भारतात चेन्नई शहरामध्ये पहिल्यांदा ग्रीन कॉरिडॉर हृदय रोपानासाठीच करण्यात आले.

दुसऱ्यांदा मुंबईत ग्रीन कॉरिडॉर वाशी ते मुलुंडमध्ये पाहण्यात आले. वाशी ते मुलुंड हे अंतर १४ मिनिटात सर करण्यात आले आणि आणखी एक मौल्यवान जीव वाचविण्यात यश आले. हृदय रोपन हे हृदय स्नायू विकृतीने ग्रस्त लोकांसाठी नवीन जीवन आहे. त्याने त्यांना जीवदान मिळते. हृदय स्नायू विकृतीमध्ये हृदय स्नायूमध्ये बिघाड होतो. हृदयाच्या स्नायू मोठे, जाड, अथवा कडक होतात. त्यामुळे हृदय कमकुवत होते. आपले नित्य काम हृदय करू शकत नाही. त्यामुळे रक्त शुद्ध होत नाही आणि माणूस आजारी पडतो. अशा वेळी रुग्णाकडे हृदय रोपण हा पर्याय उरतो.मुंबई वाहतूक विभाग आणि वैद्यकीय पथक यांचे मोठे यश या दोन्ही प्रसंगी दिसून आले. रुग्णांना नवीन जीवनदान देऊन त्यांनी एक नवीन अध्याय रचला आहे. या सर्व वीरांना आमचा मनाचा मुजरा.

लेखिका - सुजाता चंद्रकांत

स्त्रोत : महान्युज

 

 

अंतिम सुधारित : 7/20/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate