आमच्या दवाखान्यात यशोदा इतकी वर्षे अंगदुखीसाठी म्हणून येते,पण ही साधी कष्टाची अंगदुखी नसून दारूडया नव-याची मारहाण आहे हे कळायला उशीरच झाला खरा. तिच्या कोपरावर खरचटलेले आणि गालावर वळ पाहिल्यावरच मला शंका आली. खोदून विचारल्यावर तिने खरी कहाणी सांगितली. गेली वीस वर्षे हा छळ जवळजवळ रोज संध्याकाळी चालू आहे, आणि तिच्या चार लेकी हे सर्व भरल्या डोळयांनी पहातपहातच लहानाच्या मोठया झाल्या आहेत. आता ही सवय मोडणे अवघड आहे, सुरुवातीसच काही उपाय केला असता तर हा छळ कदाचित थांबू शकला असता. शेकडा सुमारे चाळीस घरांमध्ये स्त्रियांना मारहाण होते. त्यात मुख्य प्रकार म्हणजे नव-याने बायकोला मारणे, याशिवाय सास-याने सुनेला मारणे, भावांनी बहिणीला मारणे, क्वचित मुलांनी आईला मारणे हेही प्रकार घडतात. शिवीगाळ, लाथा, थपडा, डोके आपटणे आणि काठी चपलांनी मारहाण, कधी कधी चक्क खूनसुध्दा! एवढे होऊन तक्रार क्वचितच होते. बाईचा जन्म म्हणून या सर्व गोष्टी खपून जातात.
लेखक : डॉ. श्याम अष्टेकर
(MBBS, MD community Medicine)
संदर्भ : आरोग्यविद्या
अंतिम सुधारित : 10/7/2020