অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

चपटकृमी

चपटकृमी

चपटकृमी

अपृष्ठवंशी प्राण्यांचा एक संघ. या संघात सुमारे १३,००० जाती आहेत. त्यांचे शरीर लांब, अधरीय पृष्ठ बाजूंनी चपटे व द्विपाश्र्वसममित असते. प्राणिसृष्टीत बहुपेशीय प्राण्यांत तीन स्तरांचे शरीर पहिल्यांदा याच संघात निर्माण झाले. हे तीन स्तर म्हणजे बाह्य, मध्य आणि अंत:स्तर. हे प्राणी देहगुहाहीन असून शरीरातील इंद्रियांभोवतीच्या जागा मूलोतीने व्यापलेल्या असतात. खारे पाणी, गोडे पाणी, जमीन तसेच इतर प्राण्यांची शरीरे यात हे राहतात. काही मुक्तजीवी असून बहुतेक अंत:परजीवी असतात. शरीराच्या लांबीमध्ये विविधता असते. काही आकाराने अगदी सूक्ष्म (कॉनव्होल्युटा, २ मिमी.) ते तर काही लांब (पट्टकृमी, सु. ५१ मी.) असतात. संपूर्ण शरीरावर मजबूत बाह्य संरक्षक अभिस्तर असते. त्यामुळे अंत:परजीवीवर पोशिंद्याच्या आतड्यातील विकरांचा परिणाम होत नाही. पोशिंद्याच्या शरीराला चिकटून राहण्यासाठी आकडे, कंटक, चूषके असतात तर काही प्राण्यांत चिकट स्राव स्रवले जातात.

चपटकृमीचपटकृमींमध्ये पचनसंस्था संपूर्णपणे विकसित झालेली नसते. अन्न घेण्यासाठी आणि न पचलेले अन्न बाहेर टाकण्यासाठी शरीराला एकच द्वार असते. काहींमध्ये पचनसंस्थाच नसते, कारण परजीवी चपटकृमी पोशिंद्याच्या आतड्यात राहतात. तेथे पचन झालेले अन्न मुबलक प्रमाणात असते आणि असे अन्न विसरणाने त्यांच्या शरीरात शोषले जाते. या प्राण्यांत स्वतंत्र श्वसनसंस्था आणि रक्ताभिसरण संस्था नसते. या प्राण्यात विनॉक्सिश्वसन घडते. उत्सर्जनासाठी ज्योत पेशी असतात. चेतासंस्थेत चेतागुच्छिका, चेतारज्जू आणि चेतातंतू असतात.

सर्व चपटकृमी उभयलिंगी असतात. एकाच प्राण्याच्या शरीरात नर आणि मादी अशा दोन्ही प्रकारच्या जनन ग्रंथी असतात. या प्राण्यांचे जीवनचक्र किंवा वाढ एक, दोन किंवा अनेक पोशिंद्यात पूर्ण होते. जीवनचक्रात अंडे आणि अनेक डिंभांची क्रममाला असते. अंडी लाखांच्या संख्येत घातली जातात.

या संघात चार वर्ग आहेत, ते पुढीलप्रमाणे :

१. टरबेलॅरिया : या वर्गातील प्राणी मुक्तजीवी व मांसाहारी असून जमिनीवर, गोड्या अथवा खाऱ्या पाण्यात राहतात. या प्राण्यांमध्ये पुनरुद्भवन क्षमता असते. उदा. पर्णकृमी (प्लॅनेरिया), कॉनव्होल्युटा.

२. ट्रिमॅटोडा : या वर्गातील प्राणी बाह्य अथवा अंत:परजीवी असतात. यकृत पर्णकृमीचे जीवनचक्र मेंढी आणि शंखाच्या गोगलगायीत पूर्ण होते. उदा. यकृत पर्णकृमी (लिव्हरफ्ल्युक), रक्तकृमी (ब्लडफ्ल्युक).

३. सिस्टोडा : या वर्गातील सर्व प्राण्यांना पट्टकृमी किंवा फीतकृमी म्हणतात. हे प्राणी अंत:परजीवी असतात. पट्टकृमींच्या जवळपास सर्व जातींचे

(सु. ३,४००) जीवनचक्र पृष्ठवंशी प्राण्यांच्या शरीरात पूर्ण होते (मासे, मांजर, कुत्रा, डुक्कर, मनुष्य). यांचे शरीर चपटे, फीतीप्रमाणे व अनेक देहखंडांचे बनलेले असते. रंग बहुधा पांढरा किंवा पिवळसर असतो. शरीराची लांबी १ मिमी.पासून काही मी. असते. फितीच्या एका टोकाला लहानसे डोके ‘फीतकृमिशीर्ष’ असते. शीर्षालगत पाठीमागच्या भागाला ग्रीवा (मान) म्हणतात. फीतकृमिशीर्षाला चूषक व अंकुश असतात. त्याद्वारे हे पट्टकृमी पोशिंद्याच्या आतड्याला चिकटून राहतात. या कृमींना तोंड तसेच अन्नमार्ग नसतो. संपूर्ण शरीरावर संरक्षक पटल असते. याच पटलाद्वारे पट्टकृमी पोशिंद्यापासून कर्बोदके आणि अॅमिनो आम्ले मिळवितात. कर्बोदकांचा तुटवडा पडल्यास पट्टकृमींची वाढ खुंटते आणि ते मरतात.

बहुतांशी पट्टकृमींमध्ये ग्रीवेपासून खंडीभवनाने नवीन देहखंड तयार होतात. त्यामुळे सर्वांत प्रौढ देहखंड फीतकृमिशीrर्षापासून दूर असतो. टिनिया सॅजिनाटा या पट्टकृमीचा पोशिंदा मनुष्य आहे. हे पट्टकृमी २० मी.पर्यंत लांब वाढू शकतात. प्रत्येक देहखंडात पुं व स्त्री जननेंद्रिये असतात. पोशिंद्याच्या आतड्यात दोन किंवा अधिक पट्टकृमी असतील तर त्यांच्यात फलन घडून येते; अन्यथा एकाच कृमीच्या देहखंडातही फलन होऊ शकते. अंडयांची वाढ पूर्ण झाल्यावर देहखंड वेगळा होतो आणि पोशिद्यांपासून उत्सर्जित होतो.

टिनिया प्रजातीतील विविध कृमी मनुष्य, मांजर, कुत्रा इत्यादी प्राण्यांच्या आतड्यात राहतात. या प्रजातीचे नवजात कृमी पाळीव गुरे, डुक्कर किंवा ससे यांसारख्या प्राण्यांचा मध्यस्थ पोशिंदा म्हणून वापर करतात. कृमींच्या उत्सर्जित झालेल्या देहखंडातून अंडी बाहेर टाकली जातात, ती गवताच्या पानांना चिकटतात. शाकाहारी प्राण्यांनी असे गवत खाल्ले की अंडी फुटतात. अंड्यातील डिंभ शाकाहारी प्राण्यांच्या स्नायूपर्यंत पोहोचतात आणि त्यांचे रूपांतरण होऊन सु. १० मिमी. लांबीचा अंडाकार कृमी तयार होतो. या कृमीचे शीर्ष आतल्या बाजूला असते. जेव्हा अंतिम पोशिंदा (मनुष्य) मध्यस्त पोशिंद्याचे अस्वच्छ, कच्चे किंवा अर्धवट शिजलेले मांस खातो तेव्हा कृमीचे शीर्ष बाहेरच्या दिशेने वळते, आतड्याला चिकटते आणि नवीन देहखंडाची वाढ सुरू होते. अशा प्रकारे या कृमीचे जीवनचक्र सुरू होते.

४. मोनोजेनिया : या वर्गातील प्राणी बाह्यजीवी असतात. सामान्यपणे सस्तन प्राण्यांना त्यांची बाधा होते.

 

रणदिवे, किरण

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate