‘प्रत्येक क्षय रुग्णांपर्यंत पोहचूयात, मिळून सगळे एकत्र... निदान उपचार आणि काळजी हेच सर्व क्षयरुग्णांना बरे करण्याचे सूत्र’ हे जागतिक आरोग्य संघटनेचे घोषवाक्य आहे. शास्त्रज्ञ डॉ. रॉबर्ट कॉक यांनी 24 मार्च 1882 रोजी क्षयरोगाच्या जंतूचा शोध लावला. क्षयरोग हा मायक्रोबॅक्टेरियम ट्यूबरक्युलोसिस नावाच्या जिवाणूंमुळे होणारा मुख्यतः फुफ्फुसावर परिणाम करणारा संसर्गजन्य असा रोग. भारतात दर दीड मिनीटाला एक जण क्षयरोगामुळे मृत्यृमुखी पडतो. प्रत्येक वर्षी जवळ जवळ 20 लाख क्षयरोगी निर्माण होतात, 5 लाख रुग्ण क्षयरोगाने मृत्यू पावतात. सुमारे 33 ते 40 टक्के लोकांना क्षयरोगाचा जंतूचा संसर्ग झालेला आहे. यावरुनच या रोगाचे महाभयंकर स्वरुप आपणाला लक्षात येते. निदान, उपचार व काळजी घेतल्यास हा रोगही हमखास बरा होतोच.
दोन आठवड्यांपेक्षा जास्त दिवस येणारा खोकला व ताप, थुंकीतून रक्त पडणे, भूक मंदावणे, छातीत दुखणे, वजनात अचानक घट होणे ही या रोगाची प्रारंभिक लक्षणे आहेत. क्षयरोगाचे महाभंयकर स्वरूप लक्षात घेता देशातील युवापिढी या रोगाला बळी पडली तर त्याचा गंभीर परिणाम देशाच्या मनुष्यबळावर, सामाजिक स्थितीवर व आर्थिक स्थितीवर होऊन देशाच्या विकासामध्ये अडसर निर्माण होण्याची भीती आहे. ही परिस्थिती लक्षात घेता स्वयंसेवी संघटना, प्रसिद्धी माध्यम आणि लोकप्रतिनिधी यांची एक सामाजिक बांधिलकी म्हणून त्यांनी एकत्रितपणे समन्वयाने क्षयरोग निर्मूलनाचे कार्य करण्याची आजच्या काळाची गरज आहे. तरच आपण क्षयरोगावर निश्चितच मात करु शकू.
क्षयरोगावर नियंत्रण मिळविण्यासाठी केंद्र सरकारने 1962 साली राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम भारतात कार्यान्वित केला. 30 वर्ष हा कार्यक्रम राबवून अपेक्षित यश न मिळाल्याने जागतिक बँकेच्या सहकार्याने 1992 पासून सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम टप्प्याटप्याने कार्यान्वित करण्यात आलेला आहे.
सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्रात चौथ्या फेरीत वर्धा जिल्ह्याचा समावेश करण्यात आलेला आहे. त्यानुसार वर्धा जिल्ह्यात 22 जुलै 2002 पासून डॉट्स कार्यक्रम राबविण्यात येतो आहे. कार्यक्रम यशस्वी होण्याच्या दृष्टीने जिल्ह्यात 5 लाख लोकसंख्येमागे 1 याप्रमाणे 3 ट्यूबरक्यूलोसिस युनीट वर्धा, हिंगणघाट आणि आर्वी येथे स्थापन करण्यात आलेली आहेत. त्याअंतर्गत संपूर्ण वर्धा जिल्ह्यात एकूण 17 सूक्ष्मदर्शक केंद्रांची स्थापनाही करण्यात आलेली आहे.
शोधलेल्या क्षयरुग्णास कमी कालावधीचा डॉट्स उपचार गावांतच डॉट्स प्रोव्हायडरमार्फत प्रत्यक्ष निरीक्षणाखाली दिल्या जातो. हीच डॉटस् उपचारपद्धती. जागतिक आरोग्य संघटनेनेही पद्धत सुरु केली आहे. त्यानुसार महाराष्ट्रात डॉटस् उपचार पद्धती राबविण्यात येते आहे. वर्धा जिल्ह्यातील सर्वच शासकीय रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रांवर क्षयरोग निदान व उपचार मोफत केल्या जातो. क्षयरोगांविषयी लक्षणे, निदान व उपचारांसंबंधी सर्व केंद्रांवर उपचार, माहिती व मार्गदर्शन केले जाते. जनजागृतीच्या दृष्टीने सर्वच आरोग्य संस्था, ग्रामपंचायत कार्यालय व प्रमुख ठिकाणी क्षयरोगांसंबंधी मार्गदर्शक फलके, पोस्टर्स लावण्यात येतात. या कार्यक्रमामध्ये सर्व गावकऱ्यांना सामावून घेतले जाते.
वर्धा जिल्ह्यात मार्च 2007 पासून डॉट्स प्लस कार्यक्रम एमडीआर क्षयरूग्णांकरिता सुरु करण्यात आलेला आहे. त्यामध्ये आतापर्यंत 1 हजार 982 रुग्णांची थुंकी नमुने तपासण्याकरिता नॅशनल ट्यूबरक्यूलोसिस इन्स्टिट्यूट, बंगळरू व राज्य क्षयरोग नियंत्रण व प्रशिक्षण केंद्र, नागपूर येथे पाठविण्यात आलेली होती. त्यात 132 क्षयरुग्ण एमडीआर क्षयरुग्ण आढळून आली आहेत. एक रुग्ण एक्सडीआर क्षयरुग्ण म्हणून आढळून आला आहे. त्याला औषधोपचारावर ठेवण्यात आले आहे. त्यातील 24 एमडीआर रुग्ण पूर्णपणे बरे झालेले आहेत. उर्वरीत क्षयरुग्ण रोगमुक्त होण्याच्या मार्गावर असल्याचे येथील क्षयरोग अधिकारी डॉ. अजय डवले यांनी सांगितले.
वर्धा जिल्ह्यामधे 42 खाजगी वैद्यकीय व्यावसायिक व गांधी मेमोरिअल लेप्रेसी फाऊंडेशन व उत्कर्ष जनकल्याण शिक्षण संस्था यांचा सहभाग सुराक्षनिका कार्यक्रमात घेण्यात आलेला आहे. त्यांच्याकडे क्षयरुग्ण डॉट्स उपचार घेत आहेत. तसेच रेल्वे हॉस्पिटल व ईएसआयएस, हिंगणघाट यांचाही या कार्यक्रमात सहभाग घेण्यात येतो आहे. या कार्यक्रमामध्ये स्थानिक लोकप्रतिनिधी, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील, स्वयंसेवी, महिला मडंळे इत्यादींचा सहभाग घेतल्या जातो.
सुराक्षनिका कार्यक्रमांतर्गत सन 2014-15 मध्ये एकूण नवीन थुंकी दूषित रुग्ण 359, एकूण नवीन अदूषित रुग्ण 250, एकूण फुप्फुसेत्तर रुग्ण 269, एकूण रिलॅप्स, फेलीवर, डिफॉल्टर रुग्ण 301, एकूण डॉट्स उपचार घेणारे रुग्ण 1 हजार 179, डॉट्स औषधोपचाराने बरे झालेले रुग्ण 90.48 टक्के आहेत.
दोन आठवड्याहून अधिक काळ असलेला खोकला क्षयरोग असू शकतो. दोन थुंकी नमुन्यांची तपासणी हीच क्षयरोग निदानाची अचूक पद्धती आहे. डॉट्स औषधोपचाराने क्षयरोग हमखास बरा होतो. डॉट्स प्लस औषधी सर्वत्र मोफत उपलब्ध असते. निर्धारित कालखंडात पूर्णपणे उपचार घेणे गरजेचे आहे. क्षयरोग हा सामाजिक कलंक नाही. क्षयरोग हा ससंर्गजन्य रोग आहे. क्षयरोगी व्यक्तीस वेळीस डॉट्स औषधोपचार देऊन क्षयरोग मुक्त करावे. तसेच कुटुंबातील व्यक्तींचाही क्षयरोगापासून बचाव करावा.
क्षयरोग हा हमखास बरा होतो. त्याकरीता दोन आठवडेपेक्षा सतत ताप व खोकला असेल तर दोन वेळा थुंकी तपासून घ्यावी. नियमित औषधोपचार व संपूर्ण कालावधीची सहा ते आठ महिने औषधी घेणे अत्यंत आवश्यक आहे. आपल्या पासून आपल्या कुटुंबियास व इतरांस क्षयरोग होऊ नये म्हणून आवश्यक ती काळजी घेणे व संपूर्ण औषधोपचार घेणे महत्त्वाचे आहे.
- श्याम टरके
वर्धा
माहिती स्रोत: महान्यूज
मंगळवार, २४ मार्च, २०१५.
अंतिम सुधारित : 10/7/2020
न्यूमोनिया किंवा क्षयरोग यात फुप्फुसांचा जंतुदोष ह...
हि चित्रफित दूरदर्शन सह्यादी वाहिनीने तयार केली आह...
लहान मुलांच्या क्षयरोगाच्या प्रकारात शरीराचा जंतूं...
क्षयरोग (टीबी) हा संसर्गजन्य रोग असुन तो मायक्रोबॅ...