অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

रक्ताभिसरण तंत्र

रक्ताभिसरण तंत्र

रक्ताभिसरण तंत्र : रक्त शरीराच्या सर्व भागांत वाहून नेणाऱ्या व ऊतकांकडून  ( समान रचना व कार्य असलेल्या कोशिकांच्या-पेशींच्या-समूहांकडून) परत   हृदया कडे वाहून आणणाऱ्या अवयवांच्या समुच्चयाने जे तंत्र  ( संस्था) बनले आहे त्याला ‘रक्ताभिसरण तंत्र ’ म्हणतात. या तंत्राचे दोन प्रमुख भाग आहेत  : ( १) हृदय आणि  ( २) रक्तवाहिन्या. रक्ताभिसरण तंत्राचा उल्लेख ‘हृद्-वाहिनी तंत्र ’ किंवा ‘रक्त-वाहिनी तंत्र ’ असाही करतात. नाव जरी रक्ताभिसरण तंत्र असले ,  तरी या तंत्राद्वारे पोषक पदार्थ ,  हॉर्मोने  ( उत्तेजक स्राव) ,  एंझाइमे  ( जीवरासायनिक विक्रिया घडवून आणण्यास मदत करणारी प्रथिने) ,  ऑक्सिजन ,  लवणे ,  खनिजे इ. जीवनावश्यक पदार्थ वाहून नेले जाऊन ऊतक-कोशिकांना पुरवले जातात. या तंत्राद्वारे  यकृत आणि वृक्क  ( मूत्रपिंड) या महत्त्वाच्या अवयवांतून रक्त फिरविले जाऊन चयापचयजन्य  ( शरीरात सतत होणाऱ्या भौतिक व रासायनिक घडामोडींमुळे तयार होणारे) टाकाऊ पदार्थांचे उत्सर्जन किंवा उदासिनीकरण केले जाते. हे पदार्थ शरीरात साठत गेल्यास चिरकारी  ( दीर्घकालीन) आजार किंवा मृत्यूही संभवतो.  रोगप्रतिकारक्षमते करिता आवश्यक ते प्रतिपिंड व भक्षक कार्य करणाऱ्या कोशिका योग्य त्या ठिकाणी वाहून नेण्याचे कार्य रक्तभिसरणाद्वारेच केले जाते. थोडक्यात ,  रक्ताची सर्व कार्ये या तंत्रावर अवलंबून असतात.

इ. स. १६२८ मध्ये विल्यम हार्वी या इंग्रज शास्त्रज्ञांनी रक्त शरीरातून अभिसरित होते ,  हे प्रथम दाखविले . Exercitation anatomica de motu cordis et sanguinis in animalibus  ( इं. शी. ॲनॅटॉमिकल एक्झरसाइझ ऑन द मोशन ऑफ द हार्ट अँड ब्लड इन ॲनिमल्स) हा महत्त्वाचा ग्रंथ हार्वी यांनी त्या काळातील प्रचलित लॅटिन भाषेत लिहिला. तत्पूर्वी दुसऱ्या शतकातील ग्रीक वैद्य गेलेन यांचे शरीरविज्ञानासंबंधीचे विचार सर्वमान्य होते. हृदयातील रक्त नीलांतून फक्त अवयवापर्यंत वाहून नेले जाऊन परत त्याच मार्गाने हृदयात आणले जाते, तसेच रोहिण्यांतून फक्त हवा खेळते असा समज दृढ होता. बारीकसारीक निरीक्षणे व सोपे प्रयोग यांच्या मदतीने हार्वी यांनी आजचा रक्ताभिसरणाचा निश्चित मार्ग सिद्ध केला. हृदयातील झडपांची रचना स्पष्ट करून रक्त फक्त एकाच दिशेने वाहते ,  हे दाखविले. एका अवयवातील नीला बंधनाने आवळल्यास त्यातील रक्त फक्त बंधाच्या पलीकडील भागातच साचते ,  हे त्यांनी दाखविले. हे स्पष्ट करणारे त्यांच्या वरील ग्रंथातील चित्र आ. १ मध्ये दिले आह

आ. १. विल्यम हार्वी यांचा प्रयोग : (अ) बंध आवळण्यापूर्वी; (आ) बंध आवळल्यानंतर

क्रमविकास ( उत्क्रांती)

प्रत्येक जीवाचे आपले पूर्णत्व कायम टिकवण्याकरिता परिसरातून योग्य पदार्थ घेणे व नको ते त्याज्य पदार्थ बाहेर टाकणे हे वैशिष्ट्य आहे. हे पदार्थ जीवाच्या शरीरात वाहतात किंवा वाहून नेले जातात. जीवाच्या जटिलतेप्रमाणे ते विशिष्ट ठिकाणी जरूरीप्रमाणे पोहोचवले जातात किंवा तेथून उत्सर्जित केले जातात. अतिसूक्ष्म जीवामध्ये फक्त ‘प्रसरण’ ही क्रिया या कार्याकरिता पुरते. मोठ्या आकारमानाच्या जीवात हे पदार्थ द्रवाद्वारे शरीरात फिरविले जातात व त्याकरिता द्रव अभिसरित होतो. अधिक जटिल रचना असलेल्या जीवातून द्रव विशिष्ट वाहिन्यांतून अभिसरित होतो व त्यांना ‘रक्तवाहिन्या’ म्हणतात. ज्या विशिष्ट यंत्रणेद्वारे हा द्रव ढकलला जातो तिला हृदय म्हणतात.


आ. २. रक्ताभिसरणाचे प्रकार : (अ) माशातील एकमंडलीय रक्ताभिसरण : (१) क्लोमांतील केशवाहिन्या, (२) शरीरातील केशवाहिन्या, (३) निलय (शुद्ध रक्ताचा कप्पा), (४) अलिंद (अशुद्ध रक्ताचा कप्पा); (आ) पक्षी व सस्तन प्राणी यांतील द्विमंडलीय रक्ताभिसरण : (१) शरीरातील केशवाहिन्या, (२) फुप्फुसातील केशवाहिन्या, (३) डावे निलाय, (४) डावे अलिंद, (५) उजवे निलय, (६) उजवे अलिंद. एककोशिकीय  ( ज्यांचे शरीर एकाच कोशिकेचे बनलेले आहे अशा) प्राण्यांत त्यांच्या जीवद्रव्याच्या  ( प्रथिने व पाणी यांसारख्या कार्बनी व अकार्बनी पदार्थाच्या सुसंघटित जटिल मिश्रणाच्या) प्रवाहासारख्या हालचाली  ( ज्यांना ‘भ्रमण’ म्हणतात) पुरेशा असतात. बहुकोशिकीय  ( ज्यांचे शरीर अनेक कोशिकांचे बनलेले आहे अशा) प्राण्यांतही काही कोशिकांमध्ये भ्रमण उपयुक्त असते. बहुकोशिकीय प्राण्यांपैकी जलचर प्राणी त्यांची ऑक्सिजनाची गरज पाण्यात विद्रुत  ( विरघळलेल्या) असलेल्या ऑक्सिजनातून भागवतात. त्यांचा क्लोम  ( पाण्यातील श्वासोच्छ् ‌वा साचे अंग ,  कल्ले) हा भाग ज्या वेळी ऑक्सिजन मिळवीत असतो ,  त्याच वेळी पाण्यात तरंगणारे अनेक कार्बनी पदार्थांचे कणही प्राण्याच्या आंत्रमार्गात  ( आतड्यांनी बनलेल्या अन्नमार्गात) निस्यंदित होत  ( गाळले जात) असतात. शरीराच्या आतील भागांना ऑक्सिजन व पोषक पदार्थ पोचवणारी अभिसरण यंत्रणा असावीच लागते. स्पंज व आंतरगुही प्राणी  ( सीलेंटेरेटा) यांमध्ये पाणी ,  शरीर परिवाहकातून स्नायू आकुंचनामुळे किंवा पुष्कळ वेळा पक्ष्माभिकांमुळे किंवा कशाभिकांमुळे नेले जाते. आंतरगुही प्राण्यांची शरीर भित्ती दोन निरनिराळ्या कोशिका थरांची बनलेली असते. वरिष्ठ वर्गातील प्राण्याचे शरीर तीन कोशिका थरांचे असते. त्यांपैकी मध्यस्तरापासून द्रवमय पोकळी  ( जिला ‘देहगुहा’ म्हणतात) निर्माण होते. देहगुहेतील द्रव शरीराच्या हालचाली किंवा पक्ष्माभिकांच्या हालाचालींमुळे हलवले जाऊन अभिसरणाची गरज भागवली जाऊ शकते. आणखी वरच्या वर्गाच्या प्राण्यांत चयापचयात्मक गरजा एवढ्याने पुऱ्या होत नाहीत व म्हणून वाहिनी-अभिसरणाची गरज निर्माण होते.

अभिसरण यंत्रणा दोन प्रकारची असू शकते

( १) विवृत अथवा खुली व  ( २) आवृत अथवा बंदिस्त. रक्त जेव्हा कोशिकाबाह्य अवकाशात फिरून ऊतकाशी प्रत्यक्ष संपर्कित असते तेव्हा त्या यंत्रणेला ‘खुले अभिसरण ’ म्हणतात. रक्त जेव्हा पूर्णपणे स्वतंत्र शरीरभागात इतर शरीरभागापासून अलग असते तेव्हा त्याला ‘बंदिस्त अभिसरण ’ म्हणतात. आर्थ्रोपॉड अथवा संधिपाद प्राणी व मॉलस्क अथवा मृदुकाय प्राणी यांमध्ये विवृत अभिसरण यंत्रणा असते. देहगुहेतच रक्त असून त्यांचे सर्व अवयव त्याच्याशी संपर्कित असतात. देहगुहा रुधिरगुहाच असते. बहुतेक संधिपाद प्राण्यांमध्ये रुधिरगुहेतील रक्त  ( रुधिर-लसिका) ऊतक-कोशिकांना पुरवठा करून तेथेच परत येते.

प्राण्यातील रक्ताभिसरणाकरिता पंपाची आवश्यकता असते. ही पंपशक्ती रक्त पुढे ढकलण्याकरिता जरूरीची असते. पंप व नलिका मिळून ‘रक्ताभिसरण तंत्र ’ तयार होते. पहिल्या रक्तवाहिन्या कृतीमध्ये आढळतात. काही कृमींमध्ये वाहिनीवरील फुगवटा रक्त ढकलण्याचे कार्य करतो. हा फुगवटा म्हणजेच आदिम हृदय होय. खेकडा व शेवंडा या प्राण्यांत अधिक प्रगत हृदय असते ,  रोहिण्या असतात ;  परंतु नीला नसतात. हृदयाची रचना निरनिराळी असू शकते. माशामध्ये रक्ताभिसरण एक मंडलीय असते. रक्त हृदयातून बाहेर पडून हळूहळू क्लोम भागात जाते व तेथे ऑक्सिडीभवन  ( ऑक्सिजनाशी संयोग) होऊन परत हृदयात येते. भूचर पृष्ठवंशी  ( पाठीचा कणा असलेल्या) प्राण्यांत रक्ताभिसरण बंदिस्त असून दूरच्या शरीरभागांना रक्त पोहोचण्याकरिता विशिष्ट दाबाची गरज असते. तसेच फुप्फुसातील नाजूक केशवाहिन्यांतून  ( अतिसूक्ष्म रक्तवाहिन्यांतून) अल्प रक्तदाबातच अभिसरण होण्याकरिता निराळी यंत्रणा आवश्यक असते. म्हणून मानवासहित सर्व भूचर प्राण्यांत द्विमंडलीय रक्ताभिसरण असते.

आ. ३. (अ) शार्क माशातील रक्ताभिसरण : (१) क्लोम, (२) हृदय, (३) यकृत, (४) आंत्र, (५) वृक्क; (आ) उंदरातील रक्ताभिसरण : (१) फुप्फुस, (२) हृदय, (३) यकृत, (४) आंत्र, (५) वृक्क, (६) जठर. सरीसृप  ( सरपटणाऱ्या) प्राण्यांत अल्पविकसित चार कप्प्यांचे हृदय असते. पक्षी व सस्तन प्राणी यांना नेहमी योग्य शरीर तापमान ठेवण्याकरिता ऑक्सिडीभूत रक्त व ऑक्सिजनरहित रक्त निरनिराळे ठेवावे लागते. म्हणून चार कप्प्यांचे हृदय ,  रोहिण्या व नीला अशी यंत्रणा आवश्यक असते.

मानवी रक्ताभिसरण तंत्राचे भ्रूणविज्ञान

गर्भधारणेनंतरच्या पहिल्या तीन आठवड्यांपर्यंत गर्भ व त्यावरील आच्छादनांचे पोषण गर्भाशय पोकळीतील गर्भाशय ग्रंथींच्या श्लेष्मल  ( बुळबुळीत) स्रावापासून होते. हा स्राव ग्लायकोजेन समृद्ध असतो. गर्भ आरोपणानंतर त्याचे पोषण मातेच्या रक्तापासून होते. बीजपोषक आणि गर्भवेष्ट  ( भ्रूणाभोवतीचे अतिशय वाहिनीयुक्त बाह्य पटल) रसांकुरांची वाढ होण्यापूर्वी भ्रूणाचे पोषण ‘भ्रूणपोषणातील’ विसरणक्षम  ( परस्परात मिसळण्याची क्षमता असलेल्या) पदार्थांपासून होते. गर्भाशय अंतःस्तर कोशिकांवर स्राव परिणाम झाल्यानंतर उरलेले भाग ,  परिस्रवणजन्य रक्त  ( केशवाहिन्यांतून बाहेर पडलेले रक्त) आणि गर्भआरोपणात काम करणाऱ्या ग्रंथींचा स्राव मिळून भणपोष बनलेला असतो. गर्भाची पुढील वाढ मातेच्या रक्तापासून होते. सुरुवातीस अगदी साधे व सरळ असे असलेले रक्ताभिसरण तंत्र गर्भवाढीबरोबर सतत बदलत असतानाही कार्यक्षम असते.

भ्रूणाच्या मध्यस्तरापासून अंतःस्तर कोशिकांचे रज्जू जागजागी तयार होतात. या रज्जूंमध्ये नंतर अवकाशिका  ( पोकळ्या) तयार होऊन एकमेकींस जोडलेल्या नलिकांचे जाळे तयार होते. या ऊतकसमुच्चयाला ‘वाहिकाप्रसू’ ऊतक म्हणतात. पीतककोशातील  ( पोषक द्रव ्य युक्त पिशवीसारख्या रचनेतील) या ऊतक भागापासून कोशाच्या भित्तीतील  ( व भावी आंत्रमार्ग भित्तीतील) वाहिका तयार होतात. कायवृंत  ( ज्यात नाळेतील वाहिन्या असतात असा मध्यस्तरीय रज्जू) व गर्भवेष्ट या ठिकाणांच्या नलिका नाळेतील वाहिन्या बनतात. कायवृंतामध्ये त्या अपरापोषिकेच्या  ( भ्रूणाभोवतीच्या बाह्य पटलांपैकी मधल्या पटलाच्या) सान्निध्यात वाढतात. प्रत्यक्ष भ्रूणातील साधे वाहिनी तंत्र वरील वाहिन्यांपेक्षा मंद गतीने तयार होते ,  तरीदेखील दोन निरनिराळी वाहिनी तंत्रे तयार होतात  : ( १) प्रमुख नीला आणि  ( २) महारोहिणी ,  चाप व तिच्या शाखा. ही दोन्ही तंत्रे हृद्जनक क्षेत्रातील वाहिन्यांशी जोडलेली असतात.

पीतककोशाच्या भित्ती आणि कायवृंत यांतील वाहिकाप्रसू ऊतकापासून रक्तद्वीपे  ( मध्यस्तर कोशिकांचे छोटेछोटे समुच्चय) बनतात आणि त्यांपासून वाहिन्या व रक्त तयार होतात. रज्जू अवस्थेतील मध्यवर्ती कोशिकांपासून रक्तकोशिका व रक्तद्वीप कोशिकांपासून रक्तद्रव तयार होतात.

आ. ४. आद्य रक्ताभिसरण तंत्र : (१) रोहिणी कांड अथवा महारोहिणी कोश, (२) महारोहिणी चाप, (३) हृद्नलिका (परिहृद् गुहेत), (४) पृष्ठीय महारोहिणी, (५) नाभी रोहिणी, (६) पीतक रोहिण्या, (७) पीतककोश, (८) नाभी नीला, (९) समाईक नीलाकोटर, (१०) समाईक प्रमुख नीला.भ्रूण मध्यस्तर खंडांच्या अथवा कायखंडाच्या निर्मितीबरोबरच रक्ताभिसरण तंत्रही निर्माण होते आणि कायखंड पूर्व अवस्थेतील वाहिका जाळ्याचा उपयोग करू लागते. या तंत्राचे दोन भाग पाडता येतात  : ( १) भ्रूणांतर्गत वाहिनी तंत्र  आणि  ( २) भ्रूणबाह्य वाहिनी तंत्र.

( १) भ्रूणांतर्गत तंत्रामध्ये पुढील गोष्टींचा समावेश होतो  : ( अ) हृद्जनक वाहिन्या  :  मध्यस्तरापासून तयार झालेल्या दोन अंतःस्तरीय नलिकांवर मध्यस्तर कोशिकांचा थर  ( भित्ती) जमतो व तेथे लयबद्ध संकोचशीलता उत्पन्न होते आणि या भागाला आता हृद्नलिका म्हणतात. महारोहिणी व प्रमुख नीला यांच्याशी हृद्नलिका जोडलेली असते.  ( आ) महारोहिण्या  :  दोन नलिकांचे हे युग्म पृष्ठस्थ असल्यामुळे त्यांना पृष्ठीय महारोहिण्या म्हणतात.  ( इ) प्रमुख नीला  :  या वाहिन्या कायभित्तीतील रक्त व भ्रूणांतर्गत नाभी वाहिनीच्या भागातील रक्त तसेच पीतककोश भित्तीतील वाहिन्यांतील रक्त हृद्नलिकेकडे वाहून नेतात आणि तिला तिच्या पुच्छीय  ( शेपटाकडच्या) टोकाशी जोडल्या जातात.  ( ई) नाभी वाहिन्या व पीतककोश भित्तीतील वाहिन्यांचे शेवटचे भाग हृद  नलिकेच्या पुच्छीय टोकाशी जोडलेले असतात.

( २) भ्रूणबाह्य वाहिनी तंत्र  : ( अ) पीतककोश भित्तीतील वाहिनीजालापासून वाहिनीयुग्म बनते. पृष्ठीय महारोहिण्यांच्या शाखा या युग्माला येऊन मिळतात व रोहिणी तंत्र बनते. भित्तीतील नीला हृद्नलिकेच्या पुच्छीय टोकाला जोडल्या जाऊन अभिसरण चक्र पूर्ण होते.  ( आ) नाभी वाहिन्या  :  कायवृंतातील वाहिन्या अपरापोषिका वाहिन्या म्हणून पुढे भ्रूणवेष्टात जातात. या पृष्ठीय महारोहिण्यांच्या शाखा असतात. नाभी नीला हृद्नलिकेच्या पुच्छीय टोकास जोडल्या जाऊन हे चक्र पूर्ण होते. पृष्ठीय महारोहिण्यांपासून आद्य रोहिण्या  ( ज्यांना नंतर नाळ रोहिण्या म्हणतात) तयार होतात.

कायखंड तयार झालेल्या भ्रूणातील रक्ताभिसरण असे असते  : ( १) आद्य रोहिणी तंत्र  : रोहिणीकांड अथवा महारोहिणी कोश या प्रमुख भागापासून पुढील भाग बनतात  : ( अ) महारोहिणी चाप  :  या एकूण सहा वाहिनीयुग्म असून रोहिणी कांडापासून पृष्ठीय महारोहिण्या युग्माला जोडलेल्या असतात.  ( आ) पृष्ठीय महारोहिण्या युग्म भ्रूणाच्या सर्व भागांना आणि नाभी रोहिण्यांद्वारे गर्भवेष्टाला रक्त पुरवतात.  ( २) आद्य नीला तंत्र  : ( अ) नाभी नीलांद्वारे कायवृंतामधून रक्त हृद्नलिके च्या पुच्छीय भागात आणले जाते. (आ) या नीला हृद्‌नलिकेस  जोडण्यापूर्वी पीतककोशातील वाहिन्यांतील रक्त मिसळले जाऊन समाईक नीलाकोटर बनते.  ( इ) भ्रूणाच्या इतर भागांतील रक्त दोन समाईक प्रमुख नीलांद्वारे नीलाकोटरात येते.

हृद्नलिकेच्या शिरोभागाकडील भागातून निघणारे रक्त तिच्या पुच्छीय भागात परत येऊन रक्ताभिसरण चक्र पूर्ण होते.

आ. ५. महारोहिणी चापांचे परिवर्तन व रचनांतरण : (१) पहिला चाप, (२) दुसरा चाप, (३) तिसरा चाप, (४) चौथा चाप, (५) पाचवा चाप, (६) सहावा चाप, (७) फुप्फुस कबंध, (८) डावी पृष्ठीय महारोहिणी, (९) पृष्ठीय रोहिणी, (१०) आरोही महारोहिणी, (११) बाह्य ग्रीवा रोहिणी, (१२) अंतःस्थ ग्रीवा रोहिणी. (नाहीसे होणारे भाग टिंबानी व्यापलेले दाखविले आहेत).

रोहिण्यांची निर्मिती

वर उल्लेखिल्याप्रमाणे अंतःस्तरीय नलिकांच्या मीलनातून रक्तवाहिन्या तयार होतात व त्या ऊतकांच्या गरजेप्रमाणेबदलतात. काही मोठ्या होतात ,  तर काही लहानच राहतात किंवा उपयोग नसल्यास पूर्णपणे नाहीशा होतात. ज्या रक्तवाहिन्या टिकतात त्यांच्याभोवती अरेखित  ( अनैच्छिक) स्नायू व संयोजी  ( जोडण्याचे कार्य करणारे) ऊतक यांचे थर जमून त्या अधिक टिकाऊ बनतात.

रोहिण्यांमार्फत रक्त फुप्फुसांपर्यंत व शरीरातील इतर उरलेल्या ऊतकांपर्यंत पोहोचवणारे दोन विभाग आहेत. सुरुवातीस दोन्ही विभागांची वाढ एकत्रच होते. पृष्ठीय महारोहिण्या एकमेकींस जुळतात व अवरोही महारोहिणी बनते. महारोहिणी कोश अथवा रोहिणी कांड विभागून ‘फुप्फुस प्रकांड ’ व ‘सार्वदेहिक प्रकांड ’ बनतात. महारोहिणी चापांची पहिली पाच युग्मे  ( जोड्या) सार्वदेहिक प्रकांडापासून तयार होतात व सहावे युग्म फुप्फुस प्रकांडापासून तयार होते. चौथ्या आठवड्याच्या शेवटास सर्व चाप तयार होतात व पुढील दोन आठवड्यांत त्यातील परिवर्तन व रचनांतरण पूर्ण होते.

आ. ६. हातातील रोहिण्यांच्या वाढीतील टप्पे : (अ) (१) भुज रोहिणी, (२) अंतःप्रकोष्ठिका रोहिणी, (३) मध्य रोहिणी, (४) अंतरास्थी रोहिणी; (आ) (१) भुज रोहिणी, (२) अंतःप्रकोष्ठिका रोहिणी, (३) बाह्यास्थी (अरीय) रोहिणी, (४) मध्य रोहिणी, (५) अंतरास्थी रोहिणी; (इ) (१) अधोजत्रुक रोहिणी, (२) कक्षस्थ रोहिणी, (३) भुज रोहिणी, (४) बाह्यास्थी रोहिणी, (५) मध्य रोहिणी, (६) अंतरास्थी रोहिणी, (७) अंतःप्रकोष्ठिका रोहिणी, (८) पृष्ठस्थ करतल चाप, (९) अंतःस्थ करतल चाप. (अक्ष रोहिणी तुटक रेषेने दाखविली आहे). पहिला व दुसरा महारोहिणी चाप आकारमानाने हळूहळू लहान होत जाऊन शेवटी नाहीसे होतात. तिसरा महारोहिणी चाप टिकून त्यापासून समाईक ग्रीवा  ( मानेतील) रोहिण्या बनतात. चापाच्या मध्यभागातून बाह्य ग्रीवा रोहिण्या सुरू होतात. चौथा महारोहिणी चाप  ( डावा) तसाच टिकून अंतिम महारोहिणी चाप बनतो. उजव्या चापापासून बाहुशीर्ष रोहिणी बनते व उजव्या अधोजत्रुक  ( गळपट्टी खालील) रोहिणीचा काही भाग तयार होतो. भ्रूणात पाचवा चाप आढळत नाही. सहाव्या महारोहिणी चापापासून उजवी व डावी फुप्फुस रोहिणी ह्या बनतात.

कायखंडाकडे जाणाऱ्या रोहिण्यांना आंतरखंडीय रोहिण्या म्हणतात. त्या कायखंडात तयार होणाऱ्या सर्व भागांना रक्त पुरवठा करतात. या रोहिण्यांपैकी ज्या हात व पाय यांच्या आद्यांगाजवळ असतात ,  त्या हाताच्या किंवा पायाच्या प्रमुख रोहिण्या बनतात. अकराव्या उजव्या व डाव्या आंतरखंडीय रोहिण्या अनुक्रमे उजव्या व डाव्या अधोजत्रुक रोहिण्या बनतात आणि त्या हातांच्या प्रमुख रोहिण्या असतात.

पायातील रोहिण्यांची निर्मिती अधिक जटिल असते. प्रथम समाईक श्रोणिरोहिणी  ( धडाचा खालचा भाग व पायांचा वरचा भाग यांना जोडणाऱ्या खोलगट भागातील रोहिणी) तयार होते. प्रत्येक समाईक श्रोणिरोहिणीच्या दोन शाखा बनून पायांकडे जातात. सुरुवातीस एक शाखा  ( नितंब शाखा) प्रमुख असते. कालांतराने तिची जागा ऊरुरोहिणी  ( मांडीतील रोहिणी) घेते.

गर्भातील  रक्ताभिसरण

जन्मापूर्वी रक्ताभिसरण तंत्राचे विकसन प्रसवपूर्व अवस्थेतील सर्व गरजा पुऱ्या करण्यास समर्थ तर असतेच ;  परंतु जन्मानंतर प्रसवपश्च बदलांना योग्य व प्रसवपश्च गरजा पुरवण्यास समर्थ असेच झालेले असते.

गर्भावस्थेच्या शेवटच्या तिमाहीत सर्व प्रमुख रक्तवाहिन्या प्रौढातील संरचनेप्रमाणे तयार असतात. हृदयातील प्रौढातील चार कप्प्यांची रचना तयार करण्याची तयारी चालू असते. प्रसूतीनंतरच्या जीवनातील विभाजित रक्ताभिसरणाची गर्भ जीवनात आवश्यकता नसते.

आ. ७. पायातील रोहिण्यांच्या वाढीतील टप्पे : (अ) (१) नाभी रोहिणी, (२) महारोहिणी, (३) ऊरुरोहिणी, (४) आसनास्थी रोहिणी; (आ) (१) ऊरुरोहिणी, (२) आसनास्थी रोहिणी, (३) जानुपश्च रोहिणी, (४) पश्च अंतर्जंघ रोहिणी; (इ) (१) अंतःस्थ अथवा खोल ऊरुरोहिणी, (२) जानुपश्च रोहिणी, (३) अग्र अंतर्जंघ रोहिणी, (४) पश्च अंतर्जंघ रोहिणी, (५) अनुर्जंघास्थी रोहिणी, (६) पार्श्व पदतल रोहिणी, (७) अभिमध्य पदतल रोहिणी; (ई) (१) महारोहिणी, (२) उजवी समाईक श्रोणिरोहिणी, (३) आसनास्थी रोहिणी, (४) ऊरुरोहिणी, (५) जानुपश्च रोहिणी, (६) पश्च अंतर्जंघ रोहिणी, (७) अग्र अंतर्जंघ रोहिणी, (८) पार्श्व पदतल रोहिणी, (९) अभिमध्य पदतल रोहिणी. (अक्ष रोहिणी तुटक रेषेने दाखविली आहे). पुष्कळ प्रमाणात ऑक्सिडीभवन झालेले रक्त मातेच्या वारेतून नाभी नीलेतून गर्भाच्या शरीरात प्रवेश करते व त्याचा काही भाग यकृत कोटरिकांत  ( रक्त वाहून नेणाऱ्या यकृत-ऊतकातील सूक्ष्म मार्गांत) शिरतो ;  परंतु पुष्कळशा भागाला प्रवेशिका नीलेतील रक्त येऊन मिळते. यकृतपूर्व अधःस्थ महानीला व यकृत नीला यांमधील रक्त यकृतपश्च अधःस्थ महानीलेद्वारे उजव्या अलिंदात जाते. यापैकी रक्ताचा तीन चतुर्थांश भाग अंडाकृती रंध्रातून डाव्या अलिंदात जातो. या ठिकाणी फुप्फुस नीलांतून आलेले अल्पसे रक्त त्यात मिसळले जाते. अधःस्थ महानीलेतून आलेल्या रक्ताचा काही भाग अंडाकृती रंध्रातून न जाता ऊर्ध्वस्थ महानीलेतून आलेल्या रक्ताबरोबर उजव्या अलिंद-निलय रंध्रातून उजव्या निलयात जातो. उजव्या निलयातून रक्त फुप्फुस प्रकांडाद्वारे फुप्फुसाकडे जाते. डाव्या अलिंदातून रक्त डाव्या निलयात व तेथून महारोहिणीत जाते. महारोहिणीच्या शाखांद्वारे पुष्कळसा भाग हृदयाला पुरवला जातो , तसेच डोके व बाहू यांना पुरवला जातो. अल्पसा भाग अवरोही महारोहिणीच्या शाखांद्वारे उदरातील अंतस्त्यांना  ( इंद्रियांना) ,  श्रोणीतील भागांना व पायांना पुरवला जातो. पुष्कळसा भाग नाभी रोहिण्यांतून वारेत नेला जातो.  ( आ. ८).

जन्मानंतर  रक्ताभिसरण  तंत्रात  होणारे  बदल

जन्माबरोबर श्वसनक्रिया सुरू होते व फुप्फुस प्रकांडातून फुप्फुसांना अधिक रक्त पुरवले जाते आणि त्याच प्रमाणात फुप्फुस नीलांतून रक्त डाव्या अलिंदात येते. नाळ बांधल्याबरोबर अधःस्थ महानीलेतील रक्तदाब कमी होतो. दोन्ही अलिंदांतील  ( डाव्या व उजव्या) रक्तदाब सारखा होतो. अंडाकृती रंध्रावरील झडप बंद होते. वारेकडून येणारा रक्तप्रवाह बंद होताच नाभी नीलेमध्ये अंतर्क्लथन होते  ( आतील बाजूस रक्ताची गुठळी तयार होते) व हळूहळू तिचे तंतुमय बंधात रूपांतर होते. नाभीपासून सुरू झालेल्या व यकृतात गेलेल्या या बंधाला गोल बंध म्हणतात. नाळेतील वाहिन्यांच्या भित्ती जाड स्नायुथराच्या असल्या ,  तरी त्यांच्या उदरबाह्य भागात तंत्रिका  ( मज्जा) नसतात. हाताळणे ,  ताणणे ,  रक्तातील ऑक्सिजन व कार्बन डाय-ऑक्साइड यांच्या प्रमाणातील बदल यांना त्या संवेदनशील असतात व सहज आकुंचन पावतात. नाभी नीलेचा यकृतात गेलेला व अधःस्थ महानीलेस जोडण्यापूर्वीचा भागही  ( ज्याला नीला वाहिनी म्हणतात) बंद होतो आणि त्याच्या उरलेल्या तंतुमय भागाला नीला यकृत बंध म्हणतात. डावी फुप्फुस रोहिणी आणि अवरोही महारोहिणी यांना जोडणारी रोहिणी वाहिनी प्रथम जलद बंद होऊ लागते. जन्मानंतर एक दोन आठवडे अधूनमधून तीमधून रक्तप्रवाह चालू असतो. हळूहळू काही महिन्यांनंतर त्यातील अंतःस्तर कोशिकांची वाढ होते व रोहिणी वाहिनी पूर्णपणे बंद होते. कालांतराने त्या जागी तंतुमय रज्जू बनतो व तो डावी फुप्फुस रोहिणी व महारोहिणी चाप यांना जोडलेला असतो.

प्रौढातील रक्ताभिसरण

सर्व पृष्ठवंशी प्राण्यांप्रमाणे मानवातील रक्ताभिसरण बंदिस्त असते. हृदयापासून निघून ,  रक्तवाहिन्यांतून अभिसरित होऊन परत हृदयात रक्त आणणाऱ्या तंत्राला रक्ताभिसरण तंत्र म्हणतात. अशी त्याची सोपी व्याख्या करता येते. हृदयाशिवाय रोहिण्या ,  नीला व केशवाहिन्या असे या तंत्राचे भाग आहेत. उजव्या निलयापासून निघून परत त्याच ठिकाणी येणाऱ्या रक्ताचा प्रवाहमार्ग पुढीलप्रमाणे आहे. उजवे निलय आकुंचन पावताच रक्त फुप्फुस प्रकांडात जाते. या प्रकांडाच्या दोन शाखा होतात व त्या प्रत्येक फुप्फुसांत रक्त नेतात. तेथे ऑक्सिजन व कार्बन डाय-ऑक्साइड यांची देवाणघेवाण झाल्यानंतर चार फुप्फुसनीलांमार्फत ऑक्सिडीभूत रक्त हृदयाच्या डाव्या अलिंदात येते. डाव्या अलिंदातून डाव्या निलयात व तेथून महारोहिणीत ढकलले जाते. महारोहिणीच्या शाखांमार्फत सर्व शरीरभर रक्त नेले जाते. अगदी छोट्या रोहिणिकेतून केशवाहिन्यांत व तेथून नीलांत जाते. या प्रवासात कोशिका चयापचयजन्य त्याज्य पदार्थ रक्तात येतात. शरीराच्या सर्व भागांतील नीलांतील रक्त ऊर्ध्वस्थ व अधःस्थ महानीलांमार्फत उजव्या अलिंदात आणले जाते व तेथून परत उजव्या निलयात येते. अशा प्रकारे एक फेरी पूर्ण करण्यास जवळजवळ एक मिनिट पुरते व शारीरिक श्रमांच्या वेळी यापेक्षाही कमी काळ लागतो.

आ. ८. गर्भातील रक्ताभिसरण : (१) मेंदूकडे व मेंदूकडून परत, (२) महारोहिणी चाप, (३) रोहिणी वाहिनी, (४) फुप्फुस प्रकांड, (५) डावे फुप्फुस, (६) डावे अलिंद, (७) डावे निलय, (८) उजवे निलय, (९) यकृताचा डावा खंड, (१०) अधःस्थ महानीला, (११) महारोहिणी, (१२) मूत्राशय, (१३) पायाकडे व पायाकडून परत, (१४) अपरा अथवा वार (लहान प्रमाणात दाखविली आहे), (१५) डावी नाभी रोहिणी, (१६) नाभी नीला, (१७) डावी नाभी नीला (दीर्घस्थायी), (१८) प्रवेशिका नीला, (१९) यकृताचा उजवा खंड, (२०) उजवे अलिंद, (२१) उजवे फुप्फुस, (२२) ऊर्ध्वस्थ महानीला (बाण रक्ताच्या प्रवाहाची दिशा दर्शवितात). रक्ताभिसरण तंत्राचे प्रमुख भाग : रक्ताभिसरण तंत्राच्या हृदय ,  रोहिण्या ,  नीला व केशवाहिन्या या प्रमुख भागांवर स्वतंत्र नोंदी आहेत. तथापि येथे  ( १) रोहिण्या , ( २) नीला व  ( ३) केशवाहिन्या यांविषयी थोडक्यात माहिती दिली आहे. शरीरातील एकूण रक्तवाहिन्यांचे जाळे उलगडून त्या एकापुढे एक जोडल्यास त्यांची लांबी १ , ६० , ००० किमी. भरेल.

रोहिण्या

( आ. १०). हृदयापासून ऊतकाकडे रक्त वाहून नेणाऱ्या रक्तवाहिनीस रोहिणी म्हणतात. फुप्फुस रोहिणी वगळता त्या सर्व ऑक्सिडीभूत रक्त वाहून नेतात. आकारमानाने लहान असल्यास तिला रोहिणिका म्हणतात. रोहिणिका व केशवाहिनी यांमधील वाहिनीला पश्च-रोहिणिका म्हणतात. सर्वांत मोठी रोहिणी महारोहिणी असून डाव्या निलयातून रक्त बाहेर पडण्याचा तो एकमेव मार्ग आहे. उजव्या निलयातील रक्त फुप्फुस प्रकांड या मोठ्या वाहिनीत जाते. मानवात या मोठ्या वाहिन्यांचा व्यास २·५४ सेंमी. पेक्षा जास्त असतो. झाडाच्या फांदीच्या शाखांप्रमाणे अनेक शाखा व उपशाखा या मोठ्या रोहिण्यांची विभागणी करतात. महारोहिणीचा अवरोही भाग चौथ्या कटिकशेरुकाजवळ  ( कमरेपासच्या चौथ्या मणक्याजवळ) विभागून उजव्या व डाव्या समाईक श्रोणिरोहिण्या बनतात. प्रत्येक समाईक श्रोणिरोहिणी विभागून बाह्य व अंतःस्थ श्रोणिरोहिण्या बनतात. बाह्य श्रोणिरोहिणी पायाला रक्तपुरवठा करते व ती मांडीत येताच तिला ऊरुरोहिणी म्हणतात. अंतस्थ श्रोणिरोहिणी श्रोणिभागाला रक्तपुरवठा करते.

वक्षीय व उदरगुहीय रोहिण्या महारोहिणीच्या त्या भागातून जाणाऱ्या भागापासून निघतात. हृदयापासून निघाल्यानंतर महारोहिणीचा जो मोठा वक्र भाग असतो त्याला महारोहिणी चाप म्हणतात व त्यापासून तीन मोठ्या रोहिण्या निघतात  : ( १) डावी समाईक ग्रीवा रोहिणी , ( २) डावी अधोजत्रुक रोहिणी आणि  ( ३) अनामिका रोहिणी. अनामिका आखूड असून तिच्या उजवी समाईक ग्रीवा रोहिणी व उजवी अधोजत्रुक रोहिणी अशा शाखा होतात.

निलयापासून निघून वर जाणाऱ्या महारोहिणीच्या सु. ५ सेंमी. लांब भागाला आरोही महारोहिणी म्हणतात. या भागाच्या सुरुवातीस तीन लहान फुगवटे असतात व त्यांना महारोहिणी कोटरे म्हणतात. या कोटरांपासून उजवी व डावी हृद्-रोहिणी या शाखा निघतात व त्या हृदयाला रक्तपुरवठा करतात. .

आ. ९. गर्भातील, नवजातातील व प्रौढातील रक्ताभिसरणांमधील फरक : (अ) गर्भातील रक्ताभिसरण : (१) अपरा अथवा वार, (२) हृदयाचा डावा भाग, (३) हृदयाचा उजवा भाग, (४) फुप्फुस, (५) काया अथवा शरीर, (६) महारोहिणी, (७) प्रमुख नीला, (८) रोहिणी वाहिनी, (९) अंडाकृती रंध्र; (आ) नवजातातील रक्ताभिसरण : (१) काया अथवा शरीर, (२) हृदयाचा डावा भाग, (३) हृदयाचा उजवा भाग, (४) फुप्फुस (उजवीकडून डावीकडे जाणारा प्रवाह नंतर डावीकडून उजवीकडे वळतो); (इ) प्रौढातील रक्ताभिसरण : (१) काया अथवा शरीर, (२) हृदयाचा डावा भाग, (३) हृदयाचा उजवा भाग, (४) फुप्फुस. समाईक ग्रीवा रोहिणी  ( डावी आणि उजवी) व तिच्या सर्व शाखा डोक्याच्या सर्व भागांना रक्तपुरवठा करतात. प्रत्येक समाईक ग्रीवा रोहिणी गळ्यातील अवटू उपास्थीच्या वरच्या कडेजवळ दोन भागांत विभागते  : ( १) बाह्य आणि ( २) अंतःस्थ ग्रीवा रोहिणी. अंतःस्थ ग्रीवा रोहिणी कवटीच्या अंतर्भागात शिरते व तिच्या शाखा मेंदूस रक्तपुरवठा करतात. अधोजत्रुक रोहिण्या बाहूंना रक्त पुरवतात. त्यांच्या बगलेतील भागाला कक्षस्थ रोहिणी व भुज भागाला भुज रोहिणी म्हणतात. तिच्या शाखा बाहूतील सर्व भागांना रक्तपुरवठा करतात. बहुतेक सर्व प्रमुख रोहिण्यांचा उल्लेख येथे आला आहे. रोहिणी रचनेविषयी माहिती खाली दिली आहे.

रोहिणी-भित्ती जाड आणि मजबूत असतात. त्यांत स्थितिस्थापक  ( ताण काढून घेतल्यावर मूळ स्थिती प्राप्त होणाऱ्या) ऊतकाचा अधिक भरणा असून काही अरेखित स्नायू असतात. आतील भाग अंतःकला कोशिका थराने आच्छादिलेला असतो आणि त्याला अंतःस्तर म्हणतात. मधला थर स्नायूचा असतो आणि त्याला मध्यस्तर आणि बाहेरच्या संयोजी ऊतक थराला बाह्य स्तर म्हणतात. स्थितिस्थापक ऊतक व स्नायू यांचे प्रमाण रोहिणीच्या आकारमानावर अवलंबून असते. महारोहिणी व फुप्फुस प्रकांड यांसारख्या मोठ्या रोहिण्यांत अधिक स्थितिस्थापक ऊतक असते. मध्यम व लहान रोहिण्यांत अरेखित स्नायू अधिक असतात. १ मिमी. पेक्षा कमी व्यासाच्या सर्व रोहिण्या वगळता प्रत्यक्ष रोहिण्यांनाच रक्तपुरवठा करणाऱ्या सूक्ष्म वाहिन्या असतात व त्यांना वाहिनी-वाहिन्या म्हणतात. लहा न रोहिण्या व वाहिनी-वाहिन्यांना तंत्रिकापुरवठा असतो व त्यामुळे त्यांच्या अवकाशिकेवर नियंत्रण ठेवता येते. रोहिणिकांचा व्यास सु. ०·२ मिमी. असतो व त्या साध्या दृष्टी ला दिसू शकतात.  त्यांच्या भित्ती अरेखित स्नायूंची वलये रचून बनलेल्या असतात. त्यांच्याही अवकाशिका तंत्रिकांद्वारे नियंत्रित होतात. या यंत्रणेद्वारे रक्ताभिसरण तंत्रातील या भागाला रक्तघनफळावर नियंत्रण ठेवता येते. रोहिणीपश्च वाहिनी रोहिणिका आणि केशवाहिनी यांमधील भाग असून तीत अत्यल्प स्नायू असतात.

नीला

( आ. १०). रोहिण्यांप्रमाणेच नीलांच्या भित्ती तीन थरांच्या बनलेल्या असतात ;  परंतु समान आकारमानाच्या रोहिणीपेक्षा नीलेच्या भित्तीतील मध्यस्तर अत्यल्प विकसित असतो. उदरगुहेतील मोठ्या नीलांमध्ये व पायांतील नीलांमध्ये झडपा असतात आणि त्या रक्त ज्या दिशेकडे वाहते तिकडे उघडतात.

केशवाहिन्यांतील रक्त ज्या सूक्ष्म नीलांत प्रथम शिरते त्यांना नीलिका म्हणतात. दोन्हींमध्ये फारसा फरक नसतो. नीलिका एकमेकींस जोडल्या जाऊन लहान नीला बनतात. लहान नीला एकत्र येऊन मोठी नीला बनते म्हणून या लहान नीलांना पोषक शाखा म्हणतात.

महारोहिणीपासून केशवाहिन्यांकडे जाताना एकूण अनुप्रस्थ  ( आडवे) छेद क्षेत्र शतपटींनी वाढत जाते आणि रक्तप्रवाहाचा वेग अनुप्रस्थ छेद क्षेत्राशी व्यस्त प्रमाणात संबंधित असल्यामुळे केशवाहिन्यांतील प्रवाह वेग एकदम मंदावतो. नेमकी याउलट परिस्थिती नीलांतील प्रवाहाची असते. नीलांतील रक्त जसजसे हृदयाजवळ येत जाते तसतसा त्याचा वेग वाढतो.

शरीराच्या हालचालीबरोबर होणारी स्नायूंची हालचाल नीलांतील रक्त प्रवाहित ठेवण्यास मदत करते. स्नायू आकुंचनाबरोबर पातळ भित्तीच्या नीलांवर दाब पडून रक्त ढकलले जाते. श्वसनक्रियेच्या हालचालीही मदत करतात. अंतःश्वसनाबरोबर वक्षीय घनफळ वाढते व मोठ्या नीलांतील रक्तदाब कमी होतो व त्यामुळे केशवाहिन्यांतील रक्त नीलिकांत जाण्यास मदत होते.

केशवाहिन्या

रक्ताभिसरण तंत्राचा सर्वांत महत्त्वाचा भाग म्हणजे शरीरभर पसरलेले दहा हजार अब्ज केशवाहिन्यांचे जाळे. केशवाहिन्या ०·४ ते १·० मिमी. लांब व ७ ते ८ मायक्रॉन अंतर्गत व्यासाच्या असतात. त्यांच्या भित्ती चपट्या अंतःकला कोशिकांच्या एकाच  ( एककोशिकीय) थराच्या बनलेल्या असून त्या अतिशय पातळ असतात आणि त्यांतून रक्त व ऊतकद्रव यांतील पदार्थांची देवाणघेवाण होते. पाणी व स्फटिकाभ पदार्थ त्यांतून सहज ये-जा करू शकतात ;  परंतु रक्तद्रव प्रथिने मात्र अत्यल्प प्रमाणात पारगम्य असतात.

स्थलानुरूप केशवाहिन्यांच्या आकारमानात बदल होतात. उदा. ,  शरीरातील इतर भागांपेक्षा फुप्फुसांतील केशवाहिन्यांची अवकाशिका अधिक रुंद असते. काही अगदी अरुंद असतात व त्यांमधून एकच तांबडी कोशिका कशीबशी जाऊ शकते. परिस्थितीप्रमाणे आकारमान बदलण्याची क्षमता के शवा हिन्यांमध्ये असते.

एककोशिकीय भित्ती रक्तप्रवाह दाबाने ताणली जाऊ शकत असल्यामुळे व्यास मोठा होऊ शकतो. केशवाहिनीच्या पातळ भित्ती ,  अतिसूक्ष्म अवकाशिका ,  मोठी संख्या म्हणून मोठे क्षेत्र व रक्तप्रवाहाचा अती मंद वेग या गोष्टी रक्त व ऊतक द्रव यांमधील देवाणघेवाणीस पोषक असतात.  ( आ. १२ व १३)..

आ. १०. शरीरातील प्रमुख रोहिण्या व नीला : (अ) रोहिण्या : (१) पृष्ठस्थ शंख रोहिणी, (२) आनन (चेहरा) रोहिणी, (३) उजवी समाईक ग्रीवा रोहिणी, (४) अधोजत्रुक रोहिणी, (५) महारोहिणी चाप, (६) महारोहिणीचा आरोही भाग, (७) उजवी फुप्फुस रोहिणी, (८) भुज रोहिणी, (९) उदरगुहीय रोहिणी, (१०) यकृत रोहिणी, (११) वृक्क रोहिणी, (१२) बृहदांत्र रोहिणी, (१३) अंतःप्रकोष्ठिका रोहिणी, (१४) बाह्यास्थी रोहिणी, (१५) श्रोणिरोहिणी, (१६) ऊरुरोहिणी, (१७) अग्र अंतर्जंघ रोहिणी, (१८) पश्च अंतर्जंघ रोहिणी, (१९) पद-अभिपृष्ठ रोहिणी; (आ) नीला : (१) पृष्ठस्थ शंख नीला, (२) अग्र आनन नीला, (३) डावी ग्रीवा नीला, (४) अधोजत्रुक नीला, (५) डावी फुप्फुस नीला, (६) ऊर्ध्वस्थ महानीला, (७) अधस्थ महानीला, (८) यकृत नीला, (९) वृक्क नीला, (१०) प्रवेशिका नीला, (११) अंतःप्रकोष्ठिका नीला, (१२) बाह्यास्थी नीला, (१३) श्रोणिनीला, (१४) ऊरुनीला, (१५)अधःशाखा नीला, (१६) जानुपश्च नीला, (१७) पद-अभिपृष्ठ नीला चाप.

रक्ताभिसरण तंत्राची वैशिष्ट्ये

( १) केशवाहिन्यांतील रक्ताभिसरण : वर उल्लेखिलेल्या गोष्टींशिवाय केशवाहिन्यांतील रक्ताभिसरणाची काही खास वैशिष्ट्ये आहेत. केशवाहिन्यांचा शोध मार्चेल्लो मालपीगी या इटालियन जीववैज्ञानिकांनी लावला. सूक्ष्मदर्शकीय अभ्यासानंतर केशवाहिनी क्षेत्रातील रचनेबद्दल अधिक माहिती मिळाली. रोहिणीपश्च वाहिनी प्रमुख असून तिच्यापासून अनेक शाखा निघतात व त्यांची अनेक वलये मिळून एक जाळे निर्माण होते. या जाळ्यात रक्त फिरून ते रोहिणीपश्च वाहिनीच्या नीला भागाकडेच्या तोंडाशी आणले जाते. रोहिणीपश्च वाहिन्या त्यांच्या अरेखित स्नायूंमुळे आणि वाहिनी-आकुंचक व वाहिनी-विस्फारक तंत्रिकांमुळे रक्तघनफळावर नियंत्रण ठेवतात. ऊतक क्रियाशीलतेप्रमाणे क्षेत्रातील रक्तप्रवाहात बदल होतात. स्नायू अक्रिय असताना केशवाहिन्या जवळजवळ बंद असतात व तो सक्रिय असताना अधिक शाखा उघडून जादा रक्त पुरवले जाते. काही रासायनिक पदार्थही केशवाहिन्यांच्या अवकाशिकेवर परिणाम करतात. कार्बन डाय-ऑक्साइड व लॅक्टिक अम्ल  ( ऊतक चयापचयजन्य पदार्थ) रोहिणीपश्च वाहिनीचा व्यास मोठा करतात. आयोडीन ,  युरिथेन ,  सिल्व्हर नायट्रेट व हिस्टामीन हे असाच परिणाम करतात. याउलट ॲड्रेनॅलीन व पिट्य  ट्रीन अवकाशिका आकुंचित करतात.

( २) फुप्फुसांतील रक्ताभिसरण हृदयाच्या उजव्या भागातील रक्त डाव्या भागात जाण्यापूर्वी फुप्फुसात अभिसरित होऊनच जाते ;  किंबहुना हृदयाची डावा व उजवा भाग अशी विभागणी ऑक्सिडीभूत रक्त व ऑक्सिजनरहित रक्त पूर्णपणे वेगळे ठेवण्याकरिताच केलेली आहे. वैद्यकात पुष्कळ वेळा डावे व उजवे हृदय असा शब्दप्रयोग करतात. जेवढे रक्त उजव्या बाजूकडून बाहेर पडते तेवढेच डाव्या बाजूकडून बाहेर ढकलले जाते म्हणजेच दर मिनिटास जेवढे रक्त फुप्फुसातून जाते तेवढेच सार्वदेहिक अभिसरणातून जाते. फुप्फुस अभिसरण चक्रामध्ये रोहिण्या ,  रोहिणिका ,  केशवाहिन्या आणि नीला आहेत. रोहिण्या ऑक्सिजनरहित रक्त फुप्फुसाकडे आणतात ,  तर नीला ऑक्सिडीभूत रक्त फुप्फुसांकडून हृदयाकडे नेतात. या रक्त वाहिन्यांना अनुकंपी तंत्रिका व प्राणेशा तंत्रिका पुरवठा करतात .  प्रत्यक्षात फुप्फुस ऊतकाचा व श्वासनलिकांचा रक्तपुरवठा अवरोही महारोहिणीच्या शाखा करतात. फुप्फुसांतील केशवाहिन्या अतिशय नाजूक असल्यामुळे त्यांतून रक्त अत्यल्प दाबाखालीच प्रवाहित होणे जरूरीचे असते.

( ३) यकृतातील रक्ताभिसरण : याचे वर्णन ‘यकृत’ या नोंदीत विस्तारपूर्वक दिलेले आहे.

( ४) वृक्कातील रक्ताभिसरण : ( आ. १४). वृक्कातील रक्तवाहिन्यांची रचना अतिशय गुंतागुंतीची असून ती वृक्कभागाप्रमाणे निरनिराळीही असते. या विषयावर अनेक संशोधनपर निबंध ,  तसेच ग्रंथ प्रसिद्ध झाले आहेत.

आ. ११. रोहिणी व नीला : (अ) लहान रोहिणी व लहान नीला यांचा रचनादर्शक आडवा छेद : (१) लहान रोहिणी, (२) बाह्यस्तर, (३) मध्यस्तर, (४) अंतःस्तर, (५) स्थितिस्थापक तंतू, (६) लहान नीला, नीला आकारमानाने मोठी असूनही तिची भित्ती रोहिणीच्या भित्तीपेक्षा पुष्कळच कमी जाड आहे; (आ) रोहिणी व नीला यांच्या भित्तिरचनेतील फरक : (१) बाह्यस्तर, (२) मध्यस्तर, (३) अंतःस्तर. वृक्काला रक्तपुरवठा वृक्क रोहिणीमार्फत होतो. उदरगुहीय अवरोही महारोहिणीची एक आखूड व जाड शाखा प्रत्येक बाजूच्या वृक्क नाभीमधून आत शिरते. रक्ताचा अल्पसा भाग वृक्क संपुटास व संयोजी ऊतकास  पुरवठा करतो ;  परंतु अधिक भाग कोशिकागुच्छ  ( जवळजवळ पन्नास स्वतंत्र केशवाहिन्यांच्या वेटोळ्यांनी बनलेल्या) भागातून जातो. ७० किग्रॅ. वजनाच्या पुरुषाच्या दोन्ही वृक्कांमधून दर मिनिटास १ , २०० मिल . रक्त प्रवाहित होते. रक्त ज्या रोहिणिकेद्वारे कोशिकागुच्छात शिरते तिला अभिवाही रोहिणिका व जिच्यातून बाहेर पडते तिला अपवाही रोहिणिका म्हणतात. या दोन्ही वाहिन्यांच्या आकारमानात बराच फरक असतो आणि अपवाही बरीच लहान असते. या फरकामुळे केशवाहिन्यांतील रक्तदाब काहीसा वाढलेला राहतो. याशिवाय दोन्ही वाहिन्यांच्या व्यासात फरक करता येऊन रक्तदाबात बदल करता येतो. अपवाही रोहिणिकेच्या शाखा होतात व त्यांच्या केशवाहिन्यांचे एक जाळेच बनते. या जाळ्यातील रक्तवाहिन्यांतील रक्तदाब पुष्कळच कमी  ( गुच्छातील दाबापेक्षा) असतो. जाळ्यातील रक्त छोट्या नलिकांमार्फत चापाकार नीलेत व तेथून प्रमुख वृक्क नीलेत जाते.

आ. १२. केशवाहिनीची रचना : (१) अंतःकला कोशिकांची एककोशिकीय भित्ती, (२) अवकाशिकेतील तांबड्या कोशिका.आ. १२. केशवाहिनीची रचना : (१) अंतःकला कोशिकांची एककोशिकीय भित्ती, (२) अवकाशिकेतील तांबड्या कोशिका.( ५) मस्तिष्क रक्ताभिसरण : मेंदूला रक्तपुरवठा करणाऱ्या  ( १) अंतःस्थ ग्रीवा रोहिणी आणि  ( २) कशेरुक रोहिणी या दोन मुख्य रोहिण्या आहेत. मेंदूतील अशुद्ध रक्त अंतःस्थ ग्रीवा नीलांद्वारे अधोजत्रुक नीलांत व तेथून ऊर्ध्वस्थ महानीलेत जाते. कशेरुक रोहिणी मानेतील कशेरुकांच्या अनुप्रस्थ प्रवर्धाच्या रंध्रातून वर जाऊन कवटीच्या तळभागातील बृहद् ‌रं ध्रातून आत शिरते. या सर्व रोहिण्यांच्या शाखा मिळून मेंदूच्या तळभागी जे रोहिण्यांचे वलय बनते त्याला ‘ वि लिस रोहिणी वलय ’ म्हणतात.

मेंदू ,  रक्त व मस्तिष्क मेरुद्रव  ( मेंदू व मेरुरज्जू यांना यांत्रिक आधार देणारा द्रव) हाडांच्या एका दृढ पेटीत बंद असल्यामुळे त्यांच्या घनफळात अत्यल्प बदल शक्य असतात. मेंदूत जादा रक्त सामावून घ् यावयाचे असल्यास तेवढाच मस्तिष्क मेरुद्रव कवटीबाहेर जाणे आवश्यक असते. मेंदूतील रक्तघनफळ फारसे बदलत नसले ,  तरी रक्तप्रवाहाच्या वेगात मात्र विविधता असते. सार्वदेहिक रक्तदाब प्रवाहाच्या वेगावर परिणाम करतो. महारोहिणीतील रक्तदाब वाढल्यास मेंदूतील रक्तप्रवाहाचा वेग वाढतो व तो कमी झाल्यास कमी होतो. उभ्या अवस्थेत ग्रीवा कोटर  ( समाईक ग्रीवा रोहिणीच्या विभाजनापूर्वीचा फुगीर भाग ;  ज्यामध्ये दाब ग्राहक असतात) आणि महारोहिणी भित्तीतील तंत्रिका ग्राहक कार्यशील बनून मेंदूकडे जाणाऱ्या रोहिण्यांतील रक्तदाबावरील गुरुत्वाकर्षणाचा परिणाम टाळण्याकरिता व रक्तदाब कायम ठेवण्यास मदत होते. मेंदूतील रक्तप्रवाह रक्तदाबाच्या चढ-उतारावर अवलंबून असतो. अंतःस्थ ग्रीवा नीलांतील रक्तदाब वाढला ,  तर रक्तप्रवाह कमी होतो.

मेंदूतील रक्तप्रवाह सार्वदेहिक रक्तदाबाव्यतिरिक्त कमीजास्त होऊ शकतो. या रक्तवाहिन्यांना वाहिनी प्रेरक यंत्रणेच्या तंत्रिकांचा पुरवठा असल्याचे सर्वमान्य झाले आहे. वाहिनी विस्फारक तंत्रिका मेंदूतील रक्तप्रवाह वाढवतात व वाहिनी आकुंचन तंत्रिका तो कमी करतात. आनन तंत्रिकेद्वारे पहिल्या प्रकारचे तंत्रिका तंतू व अनुकंपी तंत्रिकांद्वारे दुसऱ्या प्रकारचे तंत्रिका तंतू रक्तवाहिन्यांच्या भित्तीपर्यंत जातात.

मेंदूतील केशवाहिन्यांभोवती तारकाकृती कोशिकांचे आवरण असते. त्यामुळे चयापचयजन्य पदार्थ रक्तातून सहज बाहेर पडू शकत नाहीत आणि तंत्रिका कोशिकांना संरक्षण मिळते. या यंत्रणेला रक्तमस्तिष्क रोध म्हणतात व ती तंत्रिका कोशिकांची समस्थिती कायम ठेवण्याचे महत्त्वाचे कार्य करते.

मेंदूचा रक्तपुरवठा अखंडित चालू असणे फार महत्त्वाचे असते. रक्तातून येणारा ऑक्सिजन व ग्लुकोज पुरवठा बंद पडल्यास केवळ ८ ते १० सेकंदांतच बेशुद्धी येते.

शारीरिक व्यायाम व रक्ताभिसरण तंत्र

स्नायूंची हालचाल होते वेळी रक्ताभिसरण तंत्रातील सर्व भाग कार्यशील असतात. या मागे दोन प्रमुख उद्देश असतात  : ( १) क्रियाशील स्नायूंना ऑक्सिजनाचा पुरवठा करणे व  ( २) उत्पन्न होणारे टाकाऊ पदार्थ शक्य तेवढ्या लवकर काढून नेणे. अती जोरदार व्यायामाच्या वेळी संपूर्ण यंत्रणा कार्यरत असूनही अपुरी पडते ;  परंतु स्नायूंमध्ये त्याज्य पदार्थ प्रमाणापेक्षा जास्त साठवण्याची क्षमता असते आणि स्नायूसहित इतर अवयवांमध्ये पाहिजे तेवढा ऑक्सिजन न मिळूनही काही काळ कार्य करीत राहण्याचीही क्षमता असते. थोडक्यात ,  स्नायू ऑक्सिजनापुरते कर्जबाजारी राहू शकतात ;  परंतु ऑक्सिजनन्यूनता केव्हा तरी भरून काढावीच लागते किंवा कार्यच थांबवावे लागते.

आ. १३. केशवाहिनी क्षेत्रातील रचना : (१) रोहिणिका, (२) रोहिणिका-पश्च वाहिनी, (३) केशवाहिन्या, (४) मध्यवर्ती परिवाह, (५) केशवाहिन्या, (६) नीलिका.व्यायामाच्या वेळी स्नायूतील रक्तपुरवठा वाहिनी विस्फारणामुळे व रक्तदाब वाढीमुळे वाढतो. अक्रिय स्नायूतील बंद केशवाहिन्या भराभर उघडतात. सक्रिय स्नायूत अक्रिय स्नायूपेक्षा दसपट अधिक उघड्या केशवाहिन्या असतात आणि त्यांचा ऑक्सिजन वापर ३३ ते ९०% पर्यंत वाढू शकतो. वाहिनी विस्फारणाशिवाय स्थानिक रासायनिक बदलही परिणाम करतात.

हृद क्षेपित रक्ताचे प्रमाण विश्रांतीच्या वेळी दर मिनिटास ४ ते ५ लि. असते. जोरदार व्यायामाच्या वेळी हे प्रमाण ३५ लि.पर्यंत वाढू शकते. हृद् ‌ गतीतील वाढ व्यायामाची तीव्रता ,  वय ,  प्रशिक्षण ,  परिसरीय तापमान इत्यादींवर अवलंबून असते. वाढत्या वयाबरोबर उच्चतम हृद् ‌ गती कमी होते. १८ ते २५ वयोगटात १९० ते २१० ,  पन्नाशीत १६० ते १७० आणि सत्तरीत १५० पेक्षा जास्त वाढत नाही. आकुंचक रक्तदाब व्यायाम सुरू करताच वाढू लागतो.

सारांश ,  व्यायाम करताना होणारी रक्तप्रवाह वाढ पुढील कारणांमुळे होते  : ( १) वक्षीय हालचालींची वाढ , ( २) आकुंचनाबरोबर होणारी स्नायूंची पंपासारखी कृती , ( ३) अभिसरित रक्तप्रवाहाच्या घनफळातील वाढ आणि  ( ४) वाहिन्यांतील एकूण प्रतिरोधाची कमतरता. यांशिवाय आंतस्त्यिक रक्त क्षेत्रातील आकुंचन  ( शरीरातील काही अवयवांतील रक्तवाहिन्यांचे आकुंचन) व स्नायूतील रक्तवाहिन्यांचे विस्फारण या वाढीस मदत करतात.

रोग

रक्ताभिसरण तंत्राच्या रोगांचे दोन प्रमुख वर्ग पाडता येतात  : ( १) हृदयाचे रोग आणि  ( २) रक्तवाहिन्यांचे रोग. यांपैकी हृदयाच्या रोगांसंबंधीची माहिती ‘हृदयविकार’ या नोंदीत दिली आहे. याखेरीज ‘उरःशूल’ आणि ‘हृद् ‌रो हिणी विकार ’ या नोंदीही पहाव्यात.

रक्तवाहिन्यांच्या रोगांची विभागणी  : ( १) रोहिण्यांचे रोग आणि  ( २) नीलांचे रोग अशी करता येते.

रोहिण्यांचे रोग : रोहिण्यांच्या रोगांचे वर्गीकरण  ( अ) अपकर्षजन्य , ( आ) शोथजन्य  ( दाहयुक्त सूज आल्यामुळे) आणि  ( इ) वाहिकाकर्षी असे करतात.

( अ) अपकर्षजन्य रोग : ( १) रोहिणी-काठिण्य  :  संपूर्ण रक्ताभिसरण तंत्रातील रोहिण्यांच्या भित्तींवर वयोपरत्वे होणाऱ्या बदलांना रोहिणी-काठिण्य म्हणतात. मध्यम आकारमानाच्या रोहिण्यांच्या मध्यस्तरात कॅल्शियमाचा संचय होऊन त्या कठीण बनतात. वयस्कर व्यक्तीमध्ये आढळणाऱ्या या रोगाला जे. जी. माँकबर्ग या जर्मन विकृतिवैज्ञानिकांच्या नावावरून माँकबर्ग रोहिणी-काठिण्य म्हणतात. रोहिण्यांच्या अवकाशिकेवर परिणाम होत नसल्यामुळे बहुधा ही विकृती लक्षणविरहित असते.

रोहिणी-काठिण्य ही विकृती अमेरिकेत नेहमी आढळणारी विकृती आहे. लठ्ठपणा ,  आनुवंशिकता ,  मधुमेह ,  अती वसासेवन  ( स्निग्ध पदार्थाचे सेवन) व रक्तातील कोलेस्टेरॉलात अधिक वाढ ही प्रवृत्तिकर कारणे आहेत. या रोगासंबंधी बरेचसे संशोधन झाले असूनही त्याचे निश्चित कारण अजून अज्ञात आहे. मानसिक ताण ,  योग्य व्यायामाचा अभाव ,  स्त्रीमदजन  ( इस्ट्रोजेन हॉर्मोन) व अवटू ग्रंथीची हॉर्मोने यांची न्यूनता आणि सिगारेट धूम्रपान यांमुळे रोगाचे प्रमाण व तीव्रता यांत वाढ होते.

महारोहिणीसारख्या मोठ्या व अधिक स्थितिस्थापक ऊतक असलेल्या रोहिण्यांमध्ये अपकर्षजन्य फरक अंतःस्तरात आढळतात. कालांतराने मध्यस्तरावरही परिणाम होतो व भित्ती कमजोर बनून रोहिणीचा विस्फार होतो. मध्यम आकारमानाच्या रोहिण्यांत मध्यस्तरावर दुष्परिणाम होतो. हृदय व मेंदू यांच्या रोहिण्यांवर अपकर्षजन्य रोहिणी-काठिण्यामुळे रक्तपुरवठ्यात व्यत्यय येऊन हृद्स्नायू अभिकोथ  ( ऊतकमृत्यू) व मस्तिष्क अभिकोथ उद्‌भवतात. वृक्क ,  आंत्रमार्ग ,  हात व पाय यांच्या रोहिण्यांतही रोहिणी-काठिण्य उद्‌भवू शकते.

आ. १४. वृक्कातील रक्ताभिसरण : (१) वृक्करोहिणीची शाखा, (२) कोशिकागुच्छ, (३) अभिवाही रोहिणिका, (४) अपवाही रोहिणिका, (५) केशवाहिन्यांचे जाळे, (६) चापाकार नीला, (७) वृक्क नीलेची पोषक शाखा.

( २) रोहिणीविलेपी विकार  :  रोहिणीच्या अंतःस्तराची जाडी वाढून जागजागी वसा संचय होणाऱ्या विकृतीला रोहिणीविलेपी विकार म्हणतात.   या संचयांना वसा-चकत्या महणतात. या चकत्यांमध्ये कोलेस्टेरॉलाचे प्रमाण अधिक असते. काही काळानंतर चकत्या कॅल्शियमाच्या संचयाने कठीण बनतात. महारोहिणी ,  हृद् ‌रो हिणी ,  मस्तिष्क रोहिण्या यांमध्ये वाढत्या वयाबरोबर अधिक प्रमाणावर आढळणारा हा विकार अतिरक्तदाब ,  प्रमाणापेक्षा जादा कोलेस्टेरॉलाची वाढ ,  सिगारेट धूम्रपान ,  मधुमेह व मेदोवृद्धी असलेल्या व्यक्तींना धोकादायक असतो.

वाहिनी आकुंचन ,  अंतर्क्लथन ,  रोहिणीविकार व कधीकधी अंतर्कीलन  ( रक्ताची गुठळी वा इतर बाह्य पदार्थ रोहिणीत अकस्मात अडकून रक्तप्रवाह बंद पडणे) हा विकार लक्षणविरहित असतो.

मधुमेही रोग्यामध्ये पायातील रोहिण्यांमध्ये हा उद्‌भवण्याचा धोका असतो. अशा वेळी त्याला अवरोधी रोहिणीविलेपी विकार म्हणतात. गंभीर उपद्रवामध्ये कोथ  ( ऊतकमृत्यू) उद्‌भवण्याचा संभव असतो.

महारोहिणीच्या रोहिणीविलेपी विकारात रोहिणी विकार होण्याचा व त्यामुळे अकस्मात मृत्यूचाही संभव असतो.

( आ) शोथजन्य रोग  : यांमध्ये पुढील विकृतींचा समावेश होतो  : ( १) उपदंशजन्य महारोहिणीशोथ , ( २) पर्विल बहुरोहिणीशोथ , ( ३) अवरोधी वाहिनी क्लथन शोथ , ( ४) टाकायासू लक्षणसमूह  ( मिचिशिगी टाकायासू या जपानी वैद्यांच्या नावावरून ओळखण्यात येणारा).

( १) उपदंशावरील गुणकारी उपायांमुळे या रोगाचे प्रमाण अत्यल्प झाले आहे. उपचार न केलेल्या रुग्णांपैकी ७० ते ८०% रुग्णांमध्ये हा रोग आढळतो ;  परंतु तो बहुधा लक्षणविरहित असून मरणोत्तर तपासणीत दिसून येतो.

( २) मध्यम आकारमानाच्या रोहिण्यांच्या बाह्यस्तरात व मध्यस्तरात शोथ व ऊतकमृत्यू जागजागी उत्पन्न होतात. चाळीशी ते पन्नाशीच्या दरम्यान उद्‌भवणाऱ्या या विकृतीचे संभाव्य कारण अधिहृषता  ( ॲलर्जी) प्रतिक्रिया असे सांगितले जात असले ,  तरी निश्चित कारण अज्ञात आहे. फलानुमान  ( रोगाच्या संभाव्य परिणामासंबंधीचे अनुमान) अतिशय गंभीर असून उपचाररहित रुग्णांपैकी ८८% पाच वर्षांत मृत्यूमुखी पडतात.  .

( ३) लिओ बर्गर या अमेरिकन वैद्यांच्या नावावरून या विकृतीला बर्गर रोग असेही म्हणतात आणि ती मध्यम व लहान रोहिण्यांत तसेच नीलांतही आढळते. रोगवाहिनी भोवती शोथ व त्या भागात वाहिनीक्लथन  ( रक्तवाहिनीत रक्त गोठून तयार होणाऱ्या गुठळ्या) निर्माण होतात. प्रामुख्याने विशी व चाळिशीच्या दरम्यान सिगारेट धूम्रपान करणाऱ्या पुरुषांत ही विकृती आढळते. निश्चित कारण अज्ञात असले ,  तरी धूम्रपानाचा संबंध सिद्ध झाला आहे. वाहिन्यांच्या बाह्यस्तरात जादा तंतुमय ऊतक निर्माण झाल्यामुळे जवळच्या नीला व तंत्रिका त्यात अडकण्याचा संभव असतो.

( ४) या रोगाला नाडीरहित रोग किंवा महारोहिणी चाप लक्षणसमूह अशीही नावे आहेत. विशेषेकरून जपानमधील काही जमातींच्या तरुण स्त्रियांत ही विकृती आढळते. रोगप्रतिकारक्षमतेशी संबंधित असलेल्या या विकृतीत महारोहिणी चापाचा शोथ उद्‌भवून तेथून निघणाऱ्या शाखा अरुंद बनतात. दोन्ही मनगटांवरील नाडी अतिशय अस्पष्ट किंवा अजिबात लागत नाही. फलानुमान गंभीर असते.

नीलांचे रोग

नीलासंबंधीच्या रोगांपैकी ‘अपस्फीत-नीला’ व ‘नीलाशोथ’ हे रोग महत्त्वाचे असून त्यांवर स्वतंत्र नोंदी आहेत.

आधुनिक संशोधन व प्रगती

विख्यात जर्मन विकृतिवैज्ञानिक रूडोल्फ फिरखो यांनी अर्बुदाच्या  ( कोशिकांच्या अत्यधिक वाढीमुळे निर्माण होणाऱ्या गाठीच्या) वाढीकरिता रक्ताची व ते पुरविणाऱ्या रक्तवाहिन्यांची गरज असते हे एकोणिसाव्या शतकातच दाखविले होते. भ्रूणावस्थेत गर्भवाढीकरिता रक्तवाहिन्यांच्या नवनिर्मितीची जरूरी असते ,  हे कित्येक शतकापूर्वी ज्ञात झाले होते. जखम बरी होण्याकरिता केशवहिन्यांची नवनिर्मिती आवश्यक असते. अर्बुदाच्या वाढीस आवश्यक त्या रक्तवाहिन्यांची नवनिर्मिती सतत चालू असते व या क्रियेला रक्तवाहिनीनिर्मिती म्हणतात. अलीकडील संशोधनानुसार याला अर्बुदातून स्त्रवणारा अर्बुद रक्तवाहिनी-जनक नावाचा पदार्थ कारणीभूत असतो. अधिक संशोधनानंतर हा पदार्थ फक्त अर्बुदेच उत्पन्न करीत नसून शरीरातील इतर काही भागही तो तयार करीत असल्याचे समजले. पुढे या पदार्थाचा फक्त रक्तवाहिनी-जनक असा उल्लेख करण्यात येऊ लागला.

हा पदार्थ प्रथिन असल्याचे समजले असून ह्याची मोठ्या प्रमाणावर कृत्रिम रीतीने निर्मिती करणेही शक्य होणार आहे. तसेच रक्तवाहिनी-जनक रोधक पदार्थाविषयीही संशोधन चालू आहे. या सर्व संशोधनामुळे काही रोगोपचारांमध्ये प्रगतीची शक्यता निर्माण झाली आहे. बऱ्या न होणाऱ्या जखमा रक्तवाहिनी-जनक वापरून लवकर बऱ्या होतील. कर्करोगांवरील उपचारात रोधक वापरून नवनिर्मिती थांबवून रोगाची वाढच थांबविता येईल.

 

संदर्भ  : 1. Abrahamson, D. I., Ed., Blood Vessels and Lymphatics, New York, 1962.

2. Allan, F. D. Essentials of Human Embryology, New York, 1960.

3. Best. C. H.; Taylor, N. B. The Living Body, Bombay, 1961.

4. Grollman, S. The Human Body, London, 1964.

5. Guyton, A. C. Textbook of Medical Physiology, Tokyo, 1976.

6. Shah, S. J. and others, Ed., A. P. I. Textbook of Medicine, Bombay, 1986.

7. Warwick, R.; Williams, P., Ed., Gray’s Anatomy. Edinburgh, 1973.

8. Weatherall, D. J. and others, Ed., Oxford Textbook of Medicine, Oxford, 1984.

9. Williams. P. L.; Wendell-Smith, C. P.; Tredgold, Sylvia, Basic Human Embryology,   London, 1969.

लेखक - य. त्र्यं. भालेराव

स्त्रोत - मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate