অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

रुग्णांचा आधारवड श्री गाडगे महाराज मिशन धर्मशाळा ट्रस्ट

रुग्णांचा आधारवड श्री गाडगे महाराज मिशन धर्मशाळा ट्रस्ट

  1. प्रस्तावना
  2. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त देण्यात येणारा 'डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज उत्थान पुरस्कार' प्रदान करण्यात आला. याबाबत आपल्या काय भावना आहेत?
  3. रुग्णांचा आधारवड म्हणून मुंबईतील श्री गाडगेबाबा महाराज मिशन धर्मशाळा ट्रस्ट चालविली जाते. या धर्मशाळेविषयी काय सांगाल?
  4. ही धर्मशाळा सुरू करण्यामागची नेमकी संकल्पना काय आहे? याविषयी सविस्तर सांगा.
  5. ह्या धर्मशाळेत कोणत्या प्रकारच्या रुग्णांना राहण्यास मदत केली जाते?
  6. राज्यभरातील रूग्ण आपल्या धर्मशाळेत येतात. यादरम्यान आपल्याला आलेला एखादा अनुभव सांगा ?
  7. धर्मशाळेची आर्थिक गरज कशी भागविला जाते. राज्य शासनाकडून मदत करण्यात येते का?
  8. संत गाडगेबाबांचा खरा वारसा आपण चालवित आहात. मुलाखतीच्या माध्यमातून आपण काय आवाहन कराल?

प्रस्तावना

मुंबईत येणाऱ्या रुग्णांचा आधारवड म्हणून संत गाडगेबाबा महाराज मिशन धर्मशाळा ट्रस्ट ओळखली जाते. मुंबईत येणाऱ्या रुग्णांना या धर्मशाळेत राहण्याची व्यवस्था केली जाते. रुग्णांचा मोठा आधार म्हणून ह्या संस्थेची ओळख आहे. या ट्रस्टच्या कार्याची दखल घेत त्यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक उत्थान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांचे समाजकार्य, रुग्णसेवा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवावी यासाठी या ट्रस्टचे व्यवस्थापक प्रशांत देशमुख यांनी ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात सविस्तर माहिती दिली आहे.

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त देण्यात येणारा 'डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज उत्थान पुरस्कार' प्रदान करण्यात आला. याबाबत आपल्या काय भावना आहेत?

उत्तर – महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. महाराष्ट्राला संत ज्ञानेश्वर संत तुकाराम संत सावता माळी अशा संतांची परंपरा लाभली आहे. संत गाडगे महाराजांनी १०० वर्षांपूर्वी सर्वांना मानवसेवेचा संदेश दिला. मानवसेवा हीच ईश्वरसेवा मानून गाडगेबाबांनी सेवेचा महायज्ञ चालू केला. याच सेवेचा वारसा जपण्याचे काम या संस्थेमार्फत करत आहोत. संत गाडगेबाबा आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजाला सेवेचा संदेश दिला आहे आणि त्याच नावाने ‘डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज उत्थान पुरस्कार' मिळाल्याने हा स्वर्ग प्राप्तीचा योग आहे. असे मानून समाजाची सेवा करण्यासाठी अधिक प्रोत्साहन आणि बळ मिळाले आहे.

रुग्णांचा आधारवड म्हणून मुंबईतील श्री गाडगेबाबा महाराज मिशन धर्मशाळा ट्रस्ट चालविली जाते. या धर्मशाळेविषयी काय सांगाल?

उत्तर – तंत्रज्ञान जरी समृद्ध होत असले तरी घरोघरी रुग्णांची संख्या वाढत आहे. आज-काल आपण पाहतो एक वर्षाच्या बालकालाही हृदयविकार, कर्करोगासारखे भयंकर आजार होतात. या आजारांवर उपचार करण्यासाठी असंख्य रोग मुंबईत येतात. त्यातही ग्रामीण भागातून मुंबईत येणाऱ्यांचे प्रमाण अधिक असते. मुंबई या महानगरीत महाराष्ट्रासहीत महाराष्ट्राबाहेरीलही अनेक रुग्ण येत असतात. मात्र अनेक वेळा मुंबईत कोणी नातेवाईक-ओळखीचे लोक नसल्याने रुग्ण व रुग्णांच्या नातेवाईकांना राहण्याची अडचण निर्माण होते. हीच अडचण गाडगेबाबांनी १९५० मध्ये जाणली. मुंबईत धर्मशाळेची गरज आहे हे समजून त्यांनी मुंबईत धर्मशाळा बांधली. या धर्मशाळेत रुग्ण व रुग्णांच्या नातेवाईकांची राहण्याची, जेवणाची सोय करण्यात येते. कोणत्याही रुग्णाला राहण्याच्या सोयी अभावी परत जावे लागू नये म्हणून सेवाभावीवृत्तीने श्री गाडगे महाराज मिशन धर्मशाळा ट्रस्ट कार्यरत आहे.

ही धर्मशाळा सुरू करण्यामागची नेमकी संकल्पना काय आहे? याविषयी सविस्तर सांगा.

उत्तर – गाडगे बाबांनी सर्वाना स्वच्छतेचा संदेश दिला आहे. याची प्रथम सुरवात त्यांनी स्वत:पासून केली आहे. सन १९३०–३५ च्या दरम्यान गाडगेबाबांना काही रुग्णांचे नातेवाईक फुटपाथवर झोपलेले दिसले. बाबांनी विचारपूस केली असता, त्या रुग्णांच्या नातेवाईकांचे कोणीही ओळखीचे असे मुंबईत नसल्याने ते फुटपाथवर झोपले असल्याचे समजले. तेव्हाच गाडगेबाबांनी मुंबईत उपचारांसाठी येणाऱ्या लोकांकरता धर्मशाळा असावी असा निर्धार केला. यासंबंधी त्यांनी तेव्हा मुख्यमंत्री पदावर असणाऱ्या डी.जी.खैर यांना मुंबईत धर्मशाळा असावी अशी विनंती केली. गाडगेबाबांचे आणि खैर साहेबांचे स्नेहाचे सबंध असल्याने खैर साहेबांनी जे.जे हॉस्पिटलच्या प्रांगणात धर्मशाळेसाठी जागा उपलब्ध करून दिली. त्यानंतर मुंबईतील अनेक दानशूर लोकांनी पुढे येऊन या धर्मशाळेला मदत केली.

ह्या धर्मशाळेत कोणत्या प्रकारच्या रुग्णांना राहण्यास मदत केली जाते?

उत्तर – आजार हा कोणालाही होऊ शकतो. त्यामुळे सर्व प्रकारच्या रुग्णांना ह्या धर्मशाळेत मदत केली जाते. तरीही हृदयरोग, कर्करोग, मेंदूरोग यासारख्या खर्चिक आजारांमुळे रुग्ण मुंबईत येत असतात. केईम रुग्णालयात अनेक गंभीर रोगांवर उपचार होतात. या हॉस्पिटलच्या बाजूला धर्मशाळा आहे. गाडगेबाबांनी स्वतः भायखळा येथे धर्मशाळा निर्माण आहे. दादर येथे कर्करोग ग्रस्तांसाठी धर्मशाळा उभारली आहे. तर सेंट जॉर्ज हॉस्पिटलच्या आवारात चौथी धर्मशाळा आहे. अशा प्रकारे मुंबईतील मुख्य दवाखान्याच्या शेजारी गंभीर आजारांवर उपचार होत असलेल्या ठिकाणी धर्मशाळा उभारण्यात आल्या आहे. आणि याठिकाणी सर्व रुग्णांच्या राहण्याची सोय केली जाते.

राज्यभरातील रूग्ण आपल्या धर्मशाळेत येतात. यादरम्यान आपल्याला आलेला एखादा अनुभव सांगा ?

उत्तर – राज्यभरातून शेकडो रुग्ण धर्मशाळेत येत असतात. आलेल्या प्रत्येक रुग्णाशी आमचे स्नेहाचे संबंध निर्माण होतात. आणि काही वेळा गंभीर आजाराने ग्रस्त रुग्ण जेव्हा बरा होऊन भेटायला येतो तेव्हा मन भरून येते. जयपूर मधील ६ वर्षाचा एक रुग्ण होता. त्याला १९९० मध्ये रक्ताच्या कर्करोगाने ग्रासले होते. १९९० मध्ये हा रुग्ण दादर येथील गाडगे बाबा मिशन ट्रस्ट येथे आला होता आता हा मुलगा व्यवस्थित बरा होऊन बजाज कंपनीत चांगल्या पदावर नोकरीला आहे. छत्तीसगडमधील एका लहान मुलीला कर्करोगाने ग्रासले होते. लहानपणीच तिला धर्मशाळेत आणले होते. उपचाराने ती पूर्णपणे बरी झाली असून सध्या ती नृत्य शिक्षिका म्हणून कार्यरत आहे. अशा प्रकारे रुग्ण बरे होऊन पुन्हा भेटण्यासाठी येतात असे अनेक अनुभव येत असतात.

धर्मशाळेची आर्थिक गरज कशी भागविला जाते. राज्य शासनाकडून मदत करण्यात येते का?

उत्तर – सध्या महाराष्ट्रात अनेक सामाजिक संस्था कार्यरत आहे. धर्मशाळेची आर्थिक गरज भागविताना समाजातील अनेक दानशूर व्यक्तींची मोलाची मदत होत असते. गाडगे महाराज मिशन ट्रस्ट दादर या धर्मशाळेत रोज ३० ते ४० लोक येत असतात. अशावेळी या लोकांची राहण्याची, जेवणाची सोय दानशूर व्यक्तींनी केलेल्या देणगीतून होत असते. आमच्या संस्थेला शासकीय अनुदान नसले तरी शासन आमच्या प्रती सकारात्मक आहे. आम्ही शासनाला अर्ज केला आहे की एखादी जागा धर्मशाळेसाठी उपलब्ध करून द्यावी, शासनाच्या अनेक योजनांमधून राज्य शासन सहयोग करत असते.

संत गाडगेबाबांचा खरा वारसा आपण चालवित आहात. मुलाखतीच्या माध्यमातून आपण काय आवाहन कराल?

उत्तर – संत गाडगेबाबा यांनी भुकेल्याला जेवण आणि तहानलेल्याला पाणी, हा संदेश सर्वाना दिला आहे. आम्ही त्यांचे तंतोतंत पालन करत आहोत. गाडगेबाबा मिशन ट्रस्टमध्ये रोज ९०० ते १००० लोक अन्नदानाचा लाभ घेतात. सकाळचा नाश्ता, दुपारचे जेवण, संध्याकाळी मसाले दूध, फळे असा पौष्टिक आहार ह्या धर्मशाळेच्या माध्यमातून दिला जातो. मुंबई महानगरीतील अनेक दानशूर लोकं मोठ्या प्रमाणात आम्हाला सहाय्य करीत असतात. फक्त महाराष्ट्रातून नाही तर देशभरातून उपचारासाठी लोक येत असतात. कोणालाही परत जावे लागू नये. सर्वांची राहण्याची सोय करता यावी आणि गाडगेबाबांनी जी शिकवण दिली. त्याचे आचरण करून गाडगेबाबांचा खरा वारसा चालविण्याचे काम आम्ही करीत आहोत.

- अमृता आनप

माहिती स्रोत: महान्युज

महान्युज

अंतिम सुधारित : 1/29/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate