অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

रेड इंडियन : रेडक्रॉस

 

जगातील बहुतेक सर्व देशांमधील नागरिकांचा सहभाग असलेली मानवहितवादी, सेवाभावी व स्वयंसेवी संघटना. युद्धात जखमी झालेल्या व आजारी सैनिकांची देखभाल व शुश्रूषा करण्याच्या मूळ उद्देशाने ही स्थापण्यात आली. तथापि नंतर हिची उद्दिष्टे व्यापक होत जाऊन मानवी हालअपेष्टा, कष्ट, यातना टाळणे अथवा त्यांची तीव्रता कमी करण्याचे प्रयत्न करणे; तसेच नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्तींमध्ये सापडलेल्या दुःखितांना व पीडितांना मदत करणे, त्याची सेवा करणे ही कामे संघटना करू लागली.युद्धात जखमी झालेल्यांची शुश्रूषा करण्यासाठी रोम येथील सेंट पीटर्स चर्चमध्ये काही धर्मगुरूंनी १५८६ साली एक संघटना (फादर्स ऑफ द गुड क्रॉस) स्थापली होती व त्यांनी प्रत्यक्ष युद्धक्षेत्रात जाऊन तसे कामही केले होते. याच सुमारास फ्रान्सचे सत्ताधीश चौथे लूई यांनी शत्रूच्या जखमी सैनिकांनाही स्वदेशी सैनिकांप्रमाणे वागविण्याचा आदेश दिला होता. या काळात मुलकी वा असैनिकी लोक आपण होऊन जखमी सैनिकांच्या मदतीसाठी युद्धक्षेत्रावर जात असत. तदनंतर शुश्रूषा केंद्रे व रूग्णालये यांच्यावर हल्ले न करण्याचा संकेत रूढ झाला. रेडक्रॉस संघटनेचा उदय होण्याच्या थोडाच काळ आधी ⇨फ्लॉरेन्स नाइटिंगेल (१८२०-१९१०) यांनी प्रत्यक्ष युद्धक्षेत्रांत जाऊनही आजारी आणि जखमी सैनिकांची सेवा केली होती. अशा तऱ्हेने युध्दाच्या दुष्परिणामांची तीव्रता कमी करण्याचे प्रयत्न पुष्कळांनी केले होते. मात्र स्विस मानवतावादी झां आंरी द्यूनां (१८२८–१९१०) यांनी या प्रयत्नांना संघटित स्वरूप व स्थैर्य प्राप्त करून दिले व म्हणून त्यांना रेडक्रॉस चळवळीचे जनक मानता

फ्रेंच व इटालियन यांची ऑस्ट्रियनांशी २४ जून १८५९ रोजी सॉलफेरीनो येथे लढाई झाली. दुसऱ्या दिवशी द्यूनां तेथे गेले तेव्हा त्यांना तेथे ४० हजाराहून अधिक मृत व जखमी सैनिक आढळले त्यांच्या हालअपेष्टा, त्यांच्याकडे होणारे दुर्लक्ष ,औषधे व उपचारांचा अभाव, मृतांविषयीची अनास्था वगैरे पाहून द्यूनां व्यथित झाले. कास्तील्योने या जवळच्या गावी चर्चमध्ये त्यांनी तात्पुरते रूग्णालय उभारून स्थानिक रहिवाशांच्या मदतीने तिन्ही देशांतील जखमी व आजारी सैनिकांना जमेल तेवढी मदत केली व उपचार केले.जिनिव्हाला परतल्यावर द्यूनां यांनी या लढाईच्या दुष्परिणामांविषयीचे आपले अनुभव १८६२ साली Souvenir de Solferino (सॉल फेरीनोच्या आठवणी) या पुस्तकाद्वारे प्रसिद्ध केले. यापुस्तकात पुढील प्रश्न विचारून त्यांनी रेडक्रॉस संघटनेचे सूतोवाच केले होते. ‘नागरिकत्वाचा विचार न करता युध्दातील जखमी लोकांना मदत देतील अशा स्वयंसेवकांच्या कायमच्या संस्था सर्व सुसंस्कृत देशांत स्थापन करता येणार नाहीत का?’ दोन्ही बाजूकडील अशा जखमी व आजारी सैनिकांना मदत करण्यासाठी या संस्थांनी सदैव सज्ज रहावे असेही त्यांनी सुचविले होते. त्यांनी आपल्या या कल्पनेचा यूरोपात प्रसारही केला. या कल्पनेला व्यापक प्रमाणात सक्रिय प्रतिसादही मिळाला.

यातून १८६३ साली जखमी सैनिकांच्या साहाय्यासाठी असलेल्या सार्वजनिक कल्याणकारी संस्थेचे पाच स्विस नागरिक (जनरल द्युफर, द्यूनां, ल्वी आपप्या, ग्युस्ताव्ह मोइन्ये व तेओदॉर मून्ये) असलेल्या आंतरराष्ट्रीय समितीची बैठक जिनीव्हा येथे भरली. हिलाच १८८० पासून रेडक्रॉसची आंतरराष्ट्रीय समिती (द इंटरनॅशनल कमिटी ऑफ रेडक्रॉस) असे संबोधण्यात येऊ लागले. या समितीने २६ ते २९ ऑक्टोबर १८६३ च्या दरम्यान जिनीव्हा येथे एक बैठक घेतली. चौदा देश व अनेक धर्मादाय संस्था यांचे प्रतिनिधी या बैठकीला हजर होते. या बैठकीत रेडक्रॉसची मूलभूत तत्वे व बोधचिन्हे निश्चित करण्यात आली. ८ ते २२ ऑगस्ट १८६४ च्या दरम्यान जिनीव्हा येथे एका राजकीय परिषदेत पहिले ⇨जिनीव्हा युद्धसंकेत निश्चित करण्यात आले. त्यानुसार या जिनिव्हा करारावर सही करणाऱ्या देशांवर युध्दात जखमी झालेल्या दोन्ही बाजूंच्या सैनिकांची देखभाल तटस्थपणे करण्याची जबाबदारी टाकण्यात आली. नंतर वेळोवेळी या संकेतामध्ये सुधारणा करून त्यांची फेरमांडणी करण्यात आली. अशा तऱ्हेने या संकेतामध्ये १९०७ साली सागरी युध्दातील सैनिकांचा, १९२९ साली जखमी युद्धकैद्यांचा आणि १२ ऑगस्ट १९४९ रोजी बिगरलष्करी वा असैनिकी नागरिकांचाही अंतर्भाव करण्यात आला [⟶ जिनीव्हा युद्धसंकेत]. शांततेच्या काळातील रेडक्रॉसच्याकामतही आता ही संघटना युद्धकाळाप्रमाणेच शांततेच्या काळातील आपत्तीतही लोकांच्या मदतीला धावून जाते.

रेडक्रॉसचे संस्थापक द्यूनां यांना शांततेचे पहिले नोबेल पारितोषिक १९०१ मध्ये देण्यात आले.

मूलभूत तत्वे

मानवता: मानवी हालअपेष्टा, दुःख थोपविणे व कमी करणे; मानवी जीवित व आरोग्याचे रक्षण करणे आणि मानवाविषयीची आदरभावना दृढ करणे. परस्परांतील सामंजस्य, मैत्री, सहकार्याची भावना व टिकाऊ शांतता वाढविण्यास चालना देणे.

निःपक्षपातीपणा

देश, वंश, धर्म, श्रध्दा, वर्ग, लिंग, जात वा राजकीय मतप्रणाली यांनुसार भेदभाव न करणे. सर्वात दुखःद बाबींना आग्रक्रम देऊन हालअपेष्टा कमी करण्या हातभार लावणे.

तटस्थता

संघर्षाच्या वा शत्रुत्वाच्या वेळी कोणा एकाची बाजू न घेणे. तसेच कोणत्याही राजकीय, वांशिक, धार्मिक अथवा मतप्रणाली विषयक वादग्रस्त बाबतीत स्वतःला गुंतवून न घेणे.

स्वातंत्र्य

स्वायत्तता अबाधित राखणे यामुळे त्या त्या देशातील कायद्यांच्या मर्यादेत राहून रेडक्रॉसच्या तत्वांबरहूकुम नेहमी काम करणे शक्य होते.

स्वयंस्फूर्त सेवा

ही संघटना स्वयंस्फूर्तपणे मदत करणारी असल्याने कोठल्याही प्रकारच्या लाभाची अपेक्षा न ठेवता काम करणे.

एकता

(अद्वितीयता). एका देशात एकच रेडक्रॉस संस्था असू शकते. ती त्या देशातील सर्वांना खुली असते आणि तिने संपूर्ण देशभर आपले मानवहितवादी कार्य केले पाहिजे.

सर्वव्यापी स्वरूप

ही जगङ्व्याळ संघटना असून तिच्यात सर्व समाजांना समान दर्जा असतो आणि परस्परांना मदत करताना समान जबाबदारी व कर्तव्ये पार पाडावी लागतात.

कनिष्ठ (ज्यूनिअर) रेडक्रॉसची तत्वे

(अ) आरोग्य : स्वतःच्या व इतरांच्या आरोग्याची काळजी घेणे; (आ) मानवतावादी सेवा: रेडक्रॉसच्या तत्वांनुसार सर्व गरजू लोकांना मदत करणे आणि (इ) मैत्री: विविध कार्यक्रम व इतर अनौपचारिक मार्गानी जगभरच्या मुलांमध्ये मित्रत्वाची भावना वाढविणे.

बोधचिन्ह : पांढऱ्या शुभ्र पार्श्वभूमीवर अधिक चिन्हासारखी तांबडी फुली हे या संघटनेचे बोधचिन्ह असून त्यावरूनच संघटनेचे ‘रेडक्रॉस’ हे नाव पडले आहे. द्यूनां हे स्वत्झर्लंडचे नागरिक असल्याने त्या देशाच्या सन्मानार्थ त्याच्या तांबड्या पार्श्वभूमीवरील पांढरी फुली असलेल्या राष्ट्रध्वजावरच्या रंगांची अदलाबदल करून हे चिन्ह तयार करण्यात आलेले आहे. इस्लामी राष्ट्रांत तांबड्या फुलीऐवजी पांढऱ्या पार्श्वभूमीवर चंद्रकोर (रेडक्रेसेंट) तर इराणमध्ये तांबडा (उगवता) सूर्य व सिंह (रेड लायन अँड सन) आणि इझ्राएलमध्ये तांबडा ‘डेव्हिडचा तारा’ असा या बोधचिन्हात बदल केलेला आहे.

हे बोधचिन्ह असलेली वाहने, इमारती तसेच ते धारण करणाऱ्या व्यक्ती यांच्यावर गोळीबार, बॉबफेक अथवा हल्ला करून नये असेही ठरविण्यात आलेले आहे. अर्थात अशा वाहनांत वा इमारतींत युद्धसाहित्य अथवा सैनिक असता कामा नये. अशा प्रकारे संरक्षण योग्य ठिकाणे व व्यक्ती ओळखू येण्यासाठी हे चिन्ह वापरतात. आता तर हे चिन्ह वैद्यकीय व्यवसायाचेही निदर्शक झाले आहे.

जागतिक रेडक्रॉस चळवळ : (अ) रेडक्रॉसची आंतरराष्ट्रीय समिती, (आ) राष्ट्रीय रेडक्रॉस संस्थांचा संघ (द लीग ऑफ रेडक्रॉस सोसायटीज) आणि (इ) राष्ट्रीय रेडक्रॉस संस्था (नॅशनल रेडक्रॉस सोसायटीज) हे या चळवळीचे प्रमुख घटक आहेत. यांशिवाय आंतरराष्ट्रीय रेडक्रॉस परिषद (इंटरनॅशनल रेडक्रॉस कॉन्फरन्स) ही या चळवळीमधला महत्वाचा दुवा आहे.

आंतरराष्ट्रीय रेडक्रॉस परिषद : रेडक्रॉसविषयक सर्व गटांचा समावेश असणाऱ्या उपक्रमाला आंतरराष्ट्रीय (द इंटरनॅशनल) रेडक्रॉस म्हणतात. सदर परिषदेचा पुरस्कार या उपक्रमाद्वारे केला जातो. ही परिषद म्हणजे या चळवळीतील सर्वोच्च अधिकार असणारी मार्गदर्शक व धोरण ठरविणारी संघटना आहे. वरील तिन्ही घटकांशिवाय जिनीव्हा युद्धसंकेतांवर सह्या करणारे देश हिचे सभासद असतात. सामान्यपणे दर चार (क्वचित सहा) वर्षांनी ही परिषद भरते. परिषदेत रेडक्रॉस चळवळीपुढील चालू समस्यांवर चर्चा होऊन त्यांवरचे उपाय योजण्यात येतात. तसेच धोरणात्मक निर्णयही गरजेनुरूप घेण्यात येतात. १९६३ सालापर्यंत हिची १९ अधिवेशने भरली होती. परिषदेचे पहिले अधिवेशन १८६७ साली पॅरिसला, १९६२ सालचे दिल्लीला व चळवळीच्या शताब्दीनिमित्तचे अधिवेशन जिनीव्हाला भरले होते. दैनंदिन काम पाहण्यासाठी परिषदेची स्थायी समिती (आयोग) असून ती वरील तिन्ही घटकांशी संपर्क ठेवून असते.

रेडक्रॉसची आंतरराष्ट्रीय समिती : १८६९ साली स्थापन झालेले हे २५ स्विस नागरिकांचे स्वायत्त मंडळ असून जिनीव्हा येथे याचे मुख्य कार्यालय आहे. स्वतंत्र, अशासकीय ,तटस्थ, तसेच राजकीय मतप्रणाली व धर्म यांपासून अलिप्त अशी ही समिती आहे. सभासदांची व इतर वर्गणी, देणग्या तसेच शासकीय अनुदाने यांतून हिचा खर्च चालतो. नवीन राष्ट्रीय रेडक्रॉस संस्था व त्यांच्या घटना यांना मान्यता देणे हे हिचे एक महत्वाचे काम आहे. यासाठी समिती अशा संस्थेचे स्वरूप व उद्दिष्टे तपासून पाहून खात्री करून घेते. युद्धकाळातील हिचे मुख्य काम युध्दातील जखमी व आजारी सैनिकांची देखभाव व शुश्रूषा करणे, हे असते. मात्र युध्दाच्या बदलत्या परिस्थितीनुसार हिच्या कामांतही बरेच बदल होत गेले असून आता ही समिती पुढील प्रकारची कामे करते: युद्धकैद्यांच्या छावण्यांना भेटी देऊन तेथील परिस्थिती योग्य आहे की नाही ते पहाणे; गरज वाटल्यास युद्धकैद्यांची एकांतात भेट घेऊन अहवाल तयार करणे आणि त्यांची स्थिती सुधारण्यासाठी योग्य त्या सूचना करणे; युद्धकैद्यांना मदत पुरविणे; त्यांचे कुशल त्यांच्या कुटुंबियांना व देशाला कळविणे आणि त्यांच्या पत्रव्यवहाराची व्यवस्था पहाणे; जखमी युद्धकैद्यांच्या अदलाबदलीची व्यवस्था करणे; मृतांचा अंत्यविधी योग्य रीतीने करणे वगैरे.

युद्धात गुंतलेल्या शत्रु-राष्ट्रांमधील प्रत्यक्ष संपर्क थांबलेला असतो, म्हणून ही समिती अशा राष्ट्रांमध्ये आणि तेथील राष्ट्रीय रेडक्रॉस संस्थांमध्येही मध्यस्थ म्हणून संपर्क राखण्याचे काम करते. युध्दामुळे माणसांचे होणारे स्थलांतर, युद्धग्रस्त सामान्य नागरिकांच्या हालअपेष्टा, युध्दातून उद्भवणारी रोगराई व उपासमार, निराधार सैनिक, वस्तू व औषधांची जाणवणारी टंचाई यांमुळे समितीचे काम युध्दानंतरही चालू राहते. अशा प्रकारे दुसऱ्या महायुध्दांनंतर समितीने वरील संघाच्या सहकार्याने संयुक्त मदत आयोग स्थापन करून त्याच्यामार्फत युद्धग्रस्तांना अन्न, वस्त्र, औषधे, पाणी वगैरे वस्तूंचा पुरवठा करून व वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देऊन त्यांच्या हालअपेष्टा कमी केल्या. शिवाय युद्धकैद्यांच्या परत पाठवणीच्या कामावरही देखरेख ठेवली.

दू<रवरचा विचार केल्यास युद्धग्रस्तांचे रक्षण करून त्यांची काळजी घेण्याची निगडित असणाऱ्या आंतरराष्ट्रीय संकेतांना व्यापक स्वरूप देणे व त्यांच्यात सुधारणा करणे, हे समितीचे सर्वांत महत्वाचे काम आहे. समितीचे हे काम दुसऱ्या महायुध्दांनंतर विशेष वाढले आहे. तसेच युद्धकाळात बिगरलष्करी लोकांचे रक्षण करण्यासाठी नवीन संकेत निर्माण करण्याचेही काम समिती करते आहे. याचबरोबर आपले वजन खर्च करून आंतराष्ट्रीय मानवतावादी करार घडवून आणणे व त्यांवर देखरेख ठेवणे ही कामे, तसेच आंतराराष्ट्रीय मानवतावादी कायद्यांत सुधारणा घडवून आणण्याचे प्रयत्न ही समिती करते. परागंदा सैनिक व व्यक्तींचा शोध घेण्याच्या कामी मदत करण्यासाठी हिची ‘मध्यवर्ती शोध उपक्रम’ (सेंट्रल ट्रेसिंग एजन्सी) ही उपशाखा १८७० साली स्थापण्यात आली आहे. जिनीव्हा येथे हिचे स्वतंत्र कार्यालय असून हिचा व्याप आता पुष्कळच वाढला आहे. हिच्या कार्यामुळे कुटुंबातील ताटातूट झालेल्या व्यक्तींची पुनर्भेट होऊ शकते.

यांशिवाय ही समिती यादवी युध्दाच्या वेळीही मदत करते, तसेच अणवस्त्रांवर निर्बंध घालण्याच्या दृष्टीने चाललेल्या चर्चेत भाग घेते. समिती दरवर्षी सर्वोत्तम परिचारिकेला ‘फ्लॉरेन्स नाइटिंगेल’ पदक देते. या समितीला १९१७ व १९४४ साली ही समिती व राष्ट्रीय रेडक्रॉस संस्थांचा संघ यांना मिळून १९६३ साली शांततेचे नोबेल पारितोषिक मिळविले होते.

राष्ट्रीय रेडक्रॉस संस्थांचा संघ : शांतता काळातील परस्पर सहकार्य व विकासविषयक कामांची आखणी करणे या हेतूने ही अनौपचारिक स्वरूपाची संघटना १९१९ साली स्थापण्यात आली. अमेरिकन रेडक्रॉसच्या युद्धपरिषदेचे अध्यक्ष हेन्री पी. डेव्हिसन (१८७७–१९२२) यांच्या नेतृत्वाखाली हा संघ स्थापन झाला व तेच पहिले अध्यक्ष झाले, तर फ्रान्स ,ग्रेट ब्रिटन, इटली, जपान हे या संघाचे पहिले सदस्य होते. संघाचे मुख्यालय जिनीव्हा येथे आहे. १९८३ सालापर्यंत १२६ हून अधिक संस्था याच्या सदस्य होत्या व व्यक्तिगत सदस्यांची संख्या २० कोटीहून जास्त होती. याच्या कार्यकारी वा नियामक मंडळावर प्रत्येक संस्थेचा सदस्य असतो. नियामक मंडळाची बैठक दोन वर्षांतून एकदा होते. शिवाय संघातर्फे जगाच्या विविध भागांत प्रादेशिक परिषदा घेण्यात येतात. सदस्य संस्था व व्यक्ती यांच्याकडून मिळणारी वर्गणी आणि देणग्या यांतून संघाचा खर्च चालतो. संघाचे जिनीव्हा येथील सचिवालय संघाची कामे कशी करून घेता येतील, त्याची व्यवस्था पहाते.

निरनिराळ्या राष्ट्रीय संस्थांमध्ये संपर्क साधणे, या संस्थांच्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील मदत व बचाव कार्यात एकसूत्रता आणणे, या संस्थांचे प्रतिनिधित्व करणे, विशेषतः शांततेच्या काळात आरोग्यविषयक सुधारणा करणे, रोगप्रतिबंधक उपाय योजणे व औषधोपचाराची सोय करणे; तसेच महापूर, भूंकंप, स्फोट, वणवा, अपघात, वादळ, धरण फुटणे, दुष्काळ यांसारख्या नैसर्गिक वा मानवनिर्मित आपत्तींच्या वेळी आपदग्रस्तांना मदत करण्यासाठी कायम स्वरूपाची यंत्रणा सज्ज ठेवणे आणि नव्याने स्वतंत्र झालेल्या देशात राष्ट्रीय रेडक्रॉस संस्था स्थापण्याच्या दृष्टीने पूर्वतयारी करून नवीन संस्थेच्या उभारणीला चालना देणे ही या संघाची काही महत्वाची कामे होत. याकरिता संघाच्या मदत, आरोग्य, शुश्रुषा, कनिष्ठ रेडक्रॉस इ. स्वतंत्र समित्या (वा कार्यालये) आहेत. यांच्यामार्फत करण्यात येणारी काही कामे पुढीलप्रमाणे होत : आरोग्य, रूग्ण व समाजसेवा यांसाठी तांत्रिक विभाग चालविणे; दुबळ्या राष्ट्राची मदत करण्याची कुवत कमी पडल्यास तेथील मदतकार्य हाती घेणे आरोग्य शिक्षणासाठी साधनसामग्री पुरविणे; रेडक्रॉसविषयक गटांमधील सहकार्य वाढविणे; निराश्रितांची काळजी घेणे वगैरे. संघाच्या रूग्णसेवा कार्यालयात १९५१ साली समाजसेवा विभाग समाविष्ट करण्यात आला. हा विभाग माहिती विषयक सेवा पुरवितो. रेडक्रॉसच्या शिष्यवृत्तीसाठी उमेदवार निवडतो व सल्ला देतो. तसेच रेडक्रॉस रूग्णसेवा शाळा, रूग्णपरिचारिकांचे मदतनीस व गृहरूग्णसेवा शिक्षक यांच्या प्रशिक्षणाच्या संदर्भात मार्गदर्शन करतो. संघाच्या प्रादेशिक परिषदांमुळे राष्ट्रीय संस्थांना विविध देशांसमोर येणाऱ्या सामाईक अडीअडचणीविषयीच्या माहितीची देवाणघेवाण करता येते. जागतिक आरोग्य संघटना, आंतरराष्ट्रीय निर्वासित संघटना, अन्न व कृषि संघटना, युनेस्को इत्यादींची उद्दिष्टे व रेडक्रॉसची उद्दीष्टे यांत बऱ्याच बाबतींत सारखेपणा असल्याने संघ त्यांच्याशी संपर्क ठेवून असतो व त्यांच्याशी सहकार्यही करतो. संघाचे वेगळे कनिष्ठ रेडक्रॉस कार्यालय असून त्याच्यातर्फे कनिष्ठ विभागांना साहाय्य देण्यात येते. राष्ट्रीय रेडक्रॉस संस्थांमार्फत ७५ पेक्षा अधिक देशांमध्ये मुख्यत्वे प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांचे कनिष्ठ विभाग संघटित करण्यात आलेले आहेत. विविध वंशांच्या भिन्न संस्कृतींत वाढणाऱ्या मुलांमधील मैत्री व परस्परांविषयीची जाणीव वाढविणे हे या विभागांचे मुख्य उद्दिष्ट आहे.

राष्ट्रीय रेडक्रॉस संस्था : जिनिव्हा युद्धसंकेत मान्य असलेल्या प्रत्येक देशात रेडक्रॉसची एकेक संस्था स्थापण्यात आलेली असून तिला राष्ट्रीय रेडक्रॉस संस्था म्हणतात. आंतरराष्ट्रीय रेडक्रॉस समितीकडून मान्यता मिळविण्यासाठी राष्ट्रीय संस्थेला पुढील अटींची पूर्तता करावी लागते: (१) त्या देशाचे शासन जिनीव्हा संकेताची बांधिलकी मानणारे असले पाहिजे; (२) संस्थेने रेडक्रॉसचे नाव व बोधचिन्ह स्वीकारले पाहिजे; (३) तो देश व त्याच्या वसाहती हे सर्व संस्थेचे कार्यक्षेत्र असून असे कार्य करणारी ती एकमेक संस्था हवी; (४) वंश, लिंग, जात, वर्ग, राजकीय मतप्रणाली किंवा धर्म हे लक्षात न घेता संस्थेचे सदस्यत्व देशातील सर्वांना खुले असायला हवे; (५) इतर देशातील राष्ट्रीय संस्था व आंतरराष्ट्रीय समिती यांच्याशी संपर्क राखण्याचे संस्थेला मान्य असावे लागते आणि (६) तिने आपली कामे जिनीव्हा युद्धसंकेतांनुसारच केली पाहिजेत. अशा तऱ्हेने एका देशात राजकारणापासून पूर्णतया अलिप्त व स्वायत्त असलेली एकच रेडक्रॉस संस्था असते. सामान्यपणे बहुतेक राष्ट्रीय संस्थाच्या स्वतंत्र्य कनिष्ठ व युवक (युथ) विभाग असतात.

बेल्जियम, फ्रान्स, इटली व स्पेन येथील राष्ट्रीय संस्था १८६३ च्या जिनीव्हा परिषदेनंतर लगेचच १८६४ साली स्थापन झाल्या. तदनंतरच्या शतकात जगात शंभराहून अधिक अशा संस्था स्थापन झाल्या. १९६०–७० या दशकात आफ्रिकेत २२ (१६ रेडक्रॉस व ६ रेडक्रेसंट) उत्तर व दक्षिण अमेरिकेत २३, आशियात २५ (१८ रेडक्रॉस, ६ रेडक्रेसंट व १ रेडलायन अँड सन), ऑस्ट्रेलेशियात २ आणि यूरोपात २९ तसेच रशियात रेडक्रॉस व रेडक्रेसंट अशी एक संयुक्त राष्ट्रीय संस्था स्थापन करण्यात आली.

राष्ट्रीय संस्था आपापल्या देशातील रेडक्रॉसच्या कार्यांचे नियोजन करतात. युद्धकाळात या संस्था पुढील कामे करतात: रूग्णवाहिका, रूग्णालय, रूग्णसेवक व वैद्यकीय तज्ञ यांची तजवीज करणे; संक्रमण करणाऱ्या तुकड्यांना व्याप्त प्रदेशातून वैद्यकीय साहित्य व अन्नधान्य पुरविणे; जखमी सैनिक व असैनिकी लोकांना रूग्णालयीन सोयी उपलब्ध करून देणे; विस्थापित व परागंदा कुटूंबियांचा ठावठिकाणा लावण्याचे प्रयत्न करणे आणि युद्धग्रस्त बिगरलष्करी व्यक्ती व निर्वासित यांच्यासाठी बचाव व मदत कार्य हाती घेणे. अर्थात स्थानिक परिस्थिती व गरजा यांच्यानुसार या संस्थेच्या कामात काही प्रमाणात तफावत पडत असली, तरी त्यामागील उद्दिष्ट्ये तीच असतात आणि कामाचा दर्जा आंतरराष्ट्रीय रेडक्रॉसने सूचित केल्याबरहुकूम ठेवावा लागतो.

कनिष्ठ (ज्यूनिअर) रेडक्रॉस : ही आंतरराष्ट्रीय रेडक्रॉसची एक शाखा आहे. शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थी हिचे सदस्य असतात. त्यांच्यावर विश्वबंधुत्व, मानवता व सेवावृत्ती या मूल्यांचे संस्कार व्हावेत व या मूल्यांविषयीचा त्यांचा आदर वाढीस लागावा म्हणून १९१७ साली हिची स्थापन करण्यात आली. आरोग्य सेवाभाव व सर्वांशी मैत्री यांवर या शाखेची उभारणी झाली आहे. पहिल्या महायुध्दाच्या वेळी प्रथमच शाळेतील विद्यार्थ्यांनी रेडक्रॉसच्या कामात भाग घेतला.

शांततेच्या काळातील कामे : पहिल्या महायुध्दानंतर विशेषकरून राष्ट्रीय रेडक्रॉस संस्थांच्या शांततेच्या काळातील कामाचा व्याप खूप वाढला. यात आरोग्य व समाजकल्याण यांविषयीची पुष्कळ कामे येतात. पुष्कळ संस्थांनी प्रथमोपचाराचे कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर हाती घेतले आहेत. उदा. अपघात टाळण्याचे शिक्षण, पोहायला शिकविणे व पाण्यापासून बचार करणे, किणाऱ्यावर व हमरस्त्यावर प्रथोमपचार केंद्रे चालविणे, आणिबाणीच्या वेळी रूग्णवाहिकेची सेवा उपलब्ध करून देणे, गिर्यारोहण करताना अडचणीत आलेल्या लोकांसाठी बचाव पथके धाडणे वगैरे.

अनेक संस्था प्रशिक्षित रूग्णपरिचारिकांचे मदतनीस व गृह व्यवस्थापक यांना प्रशिक्षण देतात. तसेच माता व मुले यांच्यासाठी उपचार व कल्याण केंद्रे चालवितात (उदा., इराण व ग्वातेमाला येथे) भारतीय रेडक्रॉसतर्फे सुईणींना प्रशिक्षण देण्यात येते. काही संस्था अपंग मुलांच्या कामात कुशल आहेत. उदा., ऑस्ट्रेलियन संस्था अंगग्रह झालेल्या मुलांची सेवा करते, ब्रिटिश संस्था मूकबधिकरांसाठी मोठे काम करते, तर स्वीडिश संस्था शारीरिक व मानसिक दृष्ट्या अपंग असलेल्यासाठी उन्हाळी शिबिरे घेते. पुष्कळ संस्थांनी शाळकरी मुलांच्या आरोग्यावर भर दिला आहे आणि काही संस्था परागंदा व अनाथ मुलांसाठी केंद्रे चालवितात. काही एकाकी व विभक्त झालेल्या वृध्दांची सेवा करतात आणि विशेषतः अंधासाठी असलेल्या केंद्रांना भेट देण्याची व्यवस्था करतात.

सैनिक व माजी सैनिक आणि त्यांचे कुटूबीय यांना काही संस्था मार्फत आर्थिक मदत, कायदेविषयक सल्ला इ. सेवा देण्यात येतात. विशेषतः अमेरिका, ऑस्ट्रेलिया, व फिलिपीन्स येथील संस्था माजी सैनिक व त्यांचे कुटूंबीय यांना मदत करतात. उदा., शासनाकडून मिळणारे फायदे मिळवून देण्यासाठी कायदेशीर मदत, अपंग सैनिकांना पुन्हा प्रशिक्षण देणे, विकलांगांना लागणारी साहाय्यक साधने पुरविणे इत्यादी.

रूग्णालये, दवाखाने व चिकित्सालये चालविणे हे काही संस्थांचे प्रमुख काम आहे. उदा., दक्षिण, अमेरिका व लेबानन येथे ग्रामिण भागांसाठी फिरते. दवाखाने चालविण्यात येतात. काही संस्था रूग्णसेवा करणाऱ्याना वेगवेगळ्या प्रकारचे प्रशिक्षण देतात. उदा., फ्रेंच संस्था पदव्युत्तर पातळीपर्यंतचे प्रशिक्षण देते, तर ब्रिटिश संस्था नागरी संरक्षणविषयक प्रशिक्षण देते. पुष्कळ संस्था रूग्णवाहिका औषधे, ⇨प्रारण चिकित्सा, बालपक्षाघात (पोलिओ) व क्षय यांविषयीच्या कामांसाठी रूग्णसेविका व मदतनीस यांची नावे नोंदवितात. स्विस संस्था बहुउद्देशीय आरोग्य केंद्र चालविते, तर पुष्कळ संस्था आरोग्यशिक्षणात लक्ष घालतात. उदा., क्षय, बालपक्षाघात, कर्करोग व गुप्तरोग यांच्याविरूद्धच्या मोहिमा तसेच घरगुती आरोग्य विषयक अभ्साक्रम पन्नासहून अधिक संस्था चालवितात. घरात आजारी पडून असणाऱ्या रूग्णांसाठी लागणारी साधनसामग्री उसनवारीने देण्यासाठी काही संस्था तशी भांडारगृहे चालवितात. उदा., ब्रिटिश, स्वीडिश इ. संस्था.

रक्तपेढ्या चालविणे हेही काम पुष्कळ संस्था करतात. यात अमेरिकन व कॅनडियन संस्थांनी असाधारण स्वरूपाचे काम केले आहे. छावणीपासून दूर राहणाऱ्या सैनिकांसाठी काही संस्था काम करतात. उदा., ऑस्ट्रेलियातील संस्थेने अशा ठिकाणी गृहव्यवस्थापकांना पाठविण्याची व्यवस्था केला आहे. काही संस्थांनी वणवाग्रस्तांसाठी व पूरग्रस्तांसाठी वेगळ्या तुकड्या ठेवल्या आहेत. दक्षिण आफ्रिकेतील संस्थेने प्रथमोपचार केंद्रे व दवाखाने आपदग्रस्तांसाठी काढले आहेत; तर स्वीडिश संस्थेची हवाई रूग्णवाहिका आहे. काही संस्थांची कामे वैशिष्ट्येपूर्ण आहेत. उदा., अमेरिकन संस्था सैनिक व जनता यांच्यात संपर्क ठेवण्याचे, औद्योगिक सुरक्षिततेविषयीचे वर्ग चालविण्याचे व मानवातावादी करारांचे पालन करण्यासाठी शासनाला मदत करण्याचे कामही करते. फ्रेंच संस्था हवाई रूग्णसेविका सेवा पुरविते आणि इटालियन संस्था हमरस्त्यावर आणिबाणीची परिस्थिती निर्माण झाल्यास मदतीसाठी रूग्णवाहिका सेवा पुरविते. दीर्घकाळ अंथरूणाला खिळून पडलेल्या व एकाकी रूग्णांना सागरी सफर घडवून आणण्यासाठी नेदर्लंड्सची संस्था ‘झां आंरी द्यूनां’ नावाचे जहाज रूग्णालयाप्रमाणे सज्ज ठेवते. नॉर्वेतील संस्था तुरूंगातील कैद्यांच्या भेटीगाठी घेण्याची व्यवस्था करते व मुक्त झालेल्या कैद्यांसाठी पुनवर्सन केंद्र चालविते. स्वित्झर्लंडमध्ये तिबेटी निर्वासितांसाठी रेडक्रॉसचे केंद्र आहे आणि थायलंडमधील संस्था सर्पोद्यान चालविते व सापाच्या विषाविरूद्धची लस तयार करून जगभर पाठविते. कॅनडातील संस्था जेष्ठ नागरिकांना मदत करते व हरवलेल्या व्यक्तींचा शोध घेण्याच्या कामी सहाय्य करते. पुण्याच्या जिल्हा शाखेतर्फे ग्लुकोज लवणद्राव (सलाइन) व ऊर्ध्वपातित पाणी यांचे उत्पादन करण्यात येते व ती माफक दराने रूग्णालयांना पुरविण्यात येतात.

भारतीय रेडक्रॉस संस्था

पहिल्या महायुध्दाच्या सुमारास भारताचा रेडक्रॉस चळवळीशी संबंध आला. १९१३ साली भारतीय कंपनी अधिनियमानुसार रेडक्रॉस ॲसोसिएशनची नोंदणी करण्यात आली. याच सुमारास या कामासाठी एक कोटी रूपये देणगी मिळाली व या ॲसोसिएशनचे काम सुरू झाले. बंगालचा दुष्काळ व इतर नैसर्गिक आपत्तीच्या वेळी या संस्थेने बचाव व मदत कार्य केले. २७ मार्च १९२० रोजी त्या वेळच्या शासनाच्या अधिनियम १५ नुसार ब्रिटिश रेडक्रॉसची शाखा म्हणून भारतीय रेडक्रॉसची स्थापना झाली. नंतर सर्व देशभर रेडक्रॉसच्या शाखा संघटित करण्यात आल्या. उदा., बाँबे प्रेसिडेन्सी इंडियन रेड क्रॉस सोसायटीने तेव्हा मुंबई, पुणे, बेळगाव आणि सिंध या चार जिल्हा शाखा स्थापल्या. १९३७ सालच्या सुधारित १७ अधिनियमानुसार ॲसोसिएशनची मान्यता काढून घेण्यात आली. १९३८ साली जिल्हा शाखांविषयी योग्य नियम जाहीर करून त्यांनुसार त्यांची फेरमांडणी करण्यात आली आणि तेव्हापासून येथील रेडक्रॉस संघटना खऱ्या अर्थाने स्वयंसेवी (वा स्वायत्त) झाली. १९३९–५० या काळात ब्रिटिश लष्करी वैद्यकीय अधिकारी जिल्हा शाखेचा उपाध्यक्ष असे; मात्र १ ऑक्टोबर १९५० रोजी प्रथमच या पदावर भारतीय व्यक्तीची निवड करण्यात आली.

भारतीय रेडक्रॉस संस्थेची राज्य, जिल्हा व उपजिल्हा (तालुका) अशा तीन शाखांत विभागणी केलेली आहे. रेडक्रॉसची सैनिकांसाठीची स्वयंसेवी रूग्णालय सेवा व सेंट जॉन अँब्युलन्स ॲसोसिएशन हे दोन या संस्थेचे वेगळे घटक आहेत. भारतीय रेडक्रॉस संस्थेची व्यवस्था स्वयंसेवक पहातात व हिची बहुतेक कामे स्वयंसेवकच करतात. १९८० साली हिचे ७४ लाखाहून जास्त सदस्य होते. उपराष्ट्रपती हिचे प्रसिद्ध अध्यक्ष असून राज्यपाल राज्य-शाखेचे अध्यक्ष असतात. हिचा सर्व स्वयंस्फूर्तपणे मिळणाऱ्या देणग्यांतून भागविला जातो. हिच्या महाराष्ट्रातील सर्व शाखांची नोंदणी, मुंबई सार्वजनिक विश्वस्त अधिनियमानुसार करण्यात येते. भारतातील कनिष्ठ रेडक्रॉसची सुरूवात १९२६ साली झाली आणि १९३० साली त्याची रीतसर नोंदणी झाली. १९७६–७७ साली यात रेडक्रॉस युवक गटाची भर पडली.

आधीच्या काळात जिल्हा शाखा मुख्यत्वे निधी जमवीत व उभारीत असत. रूग्णालयातील रोगी, बालकल्याण केंद्रे, फिरते दवाखाने, सर्वसाधारणपणे आढळणाऱ्‍या रोगांच्या संबंधात आरोग्यशिक्षणासाठी करण्यात येणारा प्रचार, रूग्णालयविस्तार, अपंगांना देण्यात येणारे कृत्रिम अवयव, तसेच रुग्णसेविकांची संख्या व वेतनमान वाढविणे या गोष्टींसाठी हा निधी वापरला जात असे.

सध्या भारतीय रेडक्रॉस संस्था पुढील प्रकारची कामे करते, तसेच अशा सर्व प्रकारच्या कामांमध्ये इतर सेवाभावी संस्थांना सहकार्य करते. रोग्यांवर उपचार करणे, कुटुंबकल्याणविषयक शस्त्रक्रिया व त्यांचा प्रचार करणे, नाममात्र मोबदला घेऊन शस्त्रक्रिया करणे, सकस आहारयोजना सुचविणे व मुलांना मोफत दूध देणे, साथीच्या रोगांविरूद्धचे लस टोचण्यासारखे प्रतिबंधात्मक उपाय आणि साथ आल्यावर तिच्या निवारणाचे उपाय योजणे; शारीरिक व मानसिक अपंगांच्या शाळा चालविणे; निवृत्तीनंतरचे लाभ सैनिकांना मिळवून देण्यास मदत करणे; गर्भवती आणि नवमातांना सल्ला देणे; माता व बालक यांची कल्याण व मार्गदर्शन केंद्रे, अलर्क रोगाविरूद्धच्या लसीचे केंद्र, बालवाड्या, बालसंगोपन आणि विकासकेंद्रे, घरगुती शुश्रूषा, प्रथोमपचार व शिवणकामाचे वर्ग, वैद्यकीय तपासणी शिबिरे, रूग्णवाहिका सेवा, अपंग सैनिकांसाठीची पुनर्वसन केंद्रे, रूग्णालये (उदा., पाचगणीचे क्षयरोग रूग्णालय) इ. चालविणे; वृक्षारोपणास मदत करणे वगैरे प्रकारचे ग्रामीण व नागरी समाजकल्याण कार्यक्रम रेडक्रॉसतर्फे हाती घेतले जातात.

रक्तपेढी व रक्ताधान याविषयीचे काम १९४१ पासून अधिक पद्धतशीर करण्यात येऊ लागले आहे. याकरिता रक्त गोळा करणे, ते साठविणे आणि ते नाममात्र मोबदला घेऊन अथवा मोफत पुरविणे ही कामे केली जातात. शिवाय रक्तरस व रक्तविषयक संशोधन केंद्रही चालविण्यात येते. महाराष्ट्रात मुंबई, पुणे, जळगाव, कोल्हापूर, सोलापूर, व बारामती येथे रेडक्रॉसच्या रक्तपेढ्या आहेत.

भूकंप, पूर, दुष्काळ, आग, अपघात, स्फोट, युद्ध यांसारख्या आपत्तींच्या वेळी देशातील व परदेशातील आपदग्रस्तांना निराश्रितांना व जखमीनां अन्न, वस्त्रे, औषधे, पाणी, पुस्तके, करमणुकीची आणि वैद्यकीय सेवा व साधने, भेटवस्तू इ. पुरविणे व आर्थिक साहाय्य देणे ही कामे रेडक्रॉसतर्फे केली जातात.

कनिष्ठ व युवक शाखा

शाळा व महाविद्यालयातील ५ ते २५ वर्षांपर्यंतची मुले हिच्यात असून १९८० मध्ये भारतात हिच्या सदस्यांची संख्या ७७ लाखाहून अधिक होती. महाराष्ट्रात मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर, धुळे,नासिक व यवतमाळ येथे हिच्या जिल्हा शाखा आहेत. जागतिक व भारतीय रेडक्रॉस चळवळीची माहिती लहानपणी करून घेणे व या चळवळीच्या तत्वांचा प्रसार करण्यासाठी विविध कार्यक्रम व उपक्रम हाती घेणे हे हिचे प्रमुख काम आहे.

आपल्या स्वतःच्या व इतरांच्या आरोग्यांची काळजी घेणे; रोगी, आपदग्रस्त बालकांना मदत करणे आणि जगातील सर्व मुलांना आपले मित्र मानणे ही कामे करण्याची शपथ हिचे सदस्य घेतात. स्वतःचे आरोग्य उत्तम राखणे व त्यासाठी चांगल्या सवयी अंगी बाणविणे; इतरांचे आरोग्य सुधारण्यासाठी मदत करणे प्रथमोपचार व रोगप्रतिबंधक उपायांचे शिक्षण घेणे; अपंगत्वाची कारणे व उपाय जाणून घेणे; अन्नातील भेसळ ओळखणे वगैरे गोष्टी सदस्यांना या शाखेतर्फे शिकविण्यात येतात.

भारतात या शाखेतर्फे प्रत्यक्षात पुढील प्रकारची कामे केली जातात: गरजू विद्यार्थी, रूग्णालयातील रोगी व अपंग विद्यार्थी यांना भेटणे व त्यांच्याशी मैत्री करणे; आपत्तीच्या वेळी निधी व मदत गोळा करणे; देशी -विदेशी विद्यार्थ्यांशी पत्रमैत्री करणे प्रत्यक्ष भेटी घेणे; उत्सवाच्या व मिरवणुकीच्या वेळी तसेच रेल्वे व बस स्थानके येथे प्रथमोपचार मदत, पाणी व सेवा केंद्रे चालविणे; नेतृत्वविषयक तसेच आंतरराज्यीय व आंतरराष्ट्रीय शिबिरे भरवून मैत्री वाढविणे; तसेच श्रमदान, कपडे गोळा करणे, अपंगमेळावे घेणे, दारूबंदी व व्यसनमुक्ती प्रचार, झुणका भाकर केंद्र चालविणे व वैद्यकीय तपासणी शिबिर भरविणे, व्याख्याने व पत्रकस्पर्था आयोजिणे, प्रदर्शन भरविणे, नेत्रदान व कुष्ठरोगविषयक जागृती निर्माण करणे, छंद व वस्तुसंग्रह यांना प्रोत्साहन देणे इ. सामाजिक प्रकल्प हाती घेणे वगैरे.

-----------------------------------------------------------------------------------------

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 7/19/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate