অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

वेळीच उपचाराने कर्करोगाची वाढ रोखणे शक्य

वेळीच उपचाराने कर्करोगाची वाढ रोखणे शक्य

केवळ सतर्कता, प्रतिबंध आणि उपलब्ध उपचार यांच्या उपयोगाने कर्करोगाचा प्रादुर्भाव, वाढ, पुनरावृत्ती, शरीरांतर्गत प्रसार वगैरे गोष्टी रोखता येऊ शकतात आणि रुग्णाचे जीवनमान वाढवता येऊ शकते. एक गोष्ट मात्र खरी की सुरुवातीच्या काळात वेळीच निदान झाले,योग्य उपाययोजना व उपचार मिळाले तर कर्करोग बरा होऊ शकतो. नियंत्रणात राहू शकतो.

कोणत्याही वयाच्या स्त्री-पुरुषांना शरीराच्या कोणत्याही भागामध्ये किंवा रक्तात सुद्धा कर्करोग होऊ शकतो. स्त्रियांना होणाऱ्या कर्करोगामध्ये गर्भाशयाचा कर्करोग आणि स्तनांचा कर्करोग यांचं प्रमाण फार मोठं आहे. याकडे दुर्लक्ष करण्याचे अथवा दुखणे अंगावर काढण्याचे प्रमाण अधिक आहे.म्हणूनच स्तनांच्या कर्करोगामुळे हजारो महिलांना आपले प्राण गमवावे लागतात.

कर्करोग म्हणजे पेशींची अनियमित वाढ. स्तन कर्करोग हा स्तनांच्या पेशींमध्ये होतो. स्तनांमध्ये असणाऱ्या दुधाच्या ग्रंथी आणि दुग्धनलिकेत पेशींची अनियमित वाढ व्हायला सुरुवात होते. पेशींची वाढ व्हायला सुरुवात झाल्यावर पुढील लक्षणं दिसून येतात.

स्तनांमध्ये गाठ तयार होणं, स्तनांचा आकार वाढणं किंवा बदलणं अथवा सूज येणं, स्तनाग्रे वक्र होणं, स्तनांची त्वचा लालसर असणं, त्वचेवर लहान खड्डे पडणं, स्तनाग्रे दाबल्यावर स्राव पाझरणं किंवा स्रावाचा रंग बदलणं. स्तनांमध्ये आलेली गाठ हे स्तन कर्करोगाचं प्राथमिक लक्षण असू शकतं. तसंच स्तनातील एकूण गाठींपैकी 10 ते 12 टक्के या गाठी फक्त कर्करोगाच्या असू शकतात. त्यामुळे स्तनांमध्ये आलेल्या गाठींकडे दुर्लक्ष करू नका. प्रत्येक स्त्रीने आपल्या स्तनांची नियमित तपासणी केली पाहिजे. तसंच प्रत्येक स्त्रीने किमान वयाच्या तिशी नंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार प्रतिवर्षी मॅमोग्राफी तपासणी करून घेतली पाहिजे. एखादीला स्तन कर्करोग झालेला आहे की नाही, याची पडताळणी करण्यासाठी स्तनांची तपासणी करावी लागते. ही तपासणी मॅमोग्राफी या उपचार पद्धतीनं केली जाते. मॅमोग्राफी उपचारपद्धतीत खूपच कमी किरणोत्सर्गांना सामोरं जावं लागतं. तसंच या तपासणीत स्तनांवर थोडा दाबही येतो. मात्र या उपचारपद्धतीत हाताला न लागणाऱ्या कॅन्सरच्या सूक्ष्म गाठींचंही निदान होतं आणि ब्रेस्ट कॅन्सर रोगातून एखादी लवकरात लवकर बरीही होते. परिणामी वयाच्या तिशी-चाळीशीनंतर प्रत्येक स्त्रीनं दरवर्षी मॅमोग्राफी करून घेणं तिच्या आरोग्याच्या फायद्याचं ठरू शकतं. एखाद्या स्त्रीच्या नात्यातील एकापेक्षा जास्त जणींना किंवा स्तन कर्करोग झाला असेल तर त्या कुटुंबात कॅन्सर या रोगाची जनुकं असण्याची शक्यता दाट असते. अशा स्त्रियांनी वेळीच तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेण्यास कोणत्याही प्रकारची हयगय करू नये.

एखाद्या स्त्रीच्या नात्यातील आई, मावशी, बहीण अथवा आजीला स्तन कर्करोगाची लागण 50 वर्षं वयाच्या आत झाली असेल, अशा नात्यातील स्त्रियांनी त्यांच्या आई अथवा बहिणीला ज्या वयात कर्करोगाची लागण झाली असेल त्याच्या 10 ते 15 वर्षे आधीपासून चांगल्या डॉक्टरांकडून आपली तपासणी करून घ्यावी.

आजी किंवा दूरच्या नात्यातील मावशीला स्तन कर्करोग झाला असेल तर त्या स्त्रीला स्तन कर्करोग होण्याचा धोका थोडा जास्त संभवतो. स्तन कर्करोगाची अनुवंशिकता असणाऱ्या कुटुंबात BRCA1 किंवा BRCA2 ही जनुकं सापडतात. ज्या स्त्रियांमध्ये ही जनुकं आढळून येतात, त्या प्रत्येक स्त्रीला स्तन कर्करोगाबरोबरीने बीजांडाचा कर्करोग (युटेरियन कॅन्सर) होण्याची शक्यता इतर सामान्य स्त्रियांपेक्षा पाच पटीनं वाढते. अशावेळी तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासण्या करून वेळीच उपचार करणं कधीही योग्य.

प्रतिबंध

रोग न होण्यासाठी केलेली उपायोजना कधीही चांगली. पुढील उपायांचा दैनंदिन जीवनात उपयोग केल्यास स्तन कर्करोग रोखता येतो. अँटीऑक्सिडंटचं प्रमाण जास्त असलेले पदार्थ जसं की, चांगल्या स्वच्छ पाण्यावर पोसलेल्या आणि रासायनिक खतांचा वापर न करता पिकवलेल्या हिरव्या पालेभाज्या, लाल तसंच पिवळ्या रंगांची फळं खाणे. सफरचंद, द्राक्षं, पीच यांसारखी आंबट चवीची फळं खा! उकळून अर्धा कप केलेला ग्रीन टी प्या. आहारामध्ये दही-दुधाचं प्रमाण वाढवा.

रेडमीट आणि मीठ कमी करा. रोज ताजं आणि सकस अन्न खा. शारीरिक हालचाली वाढवा. नियमित हलका व्यायाम करा. व्यायामामध्ये नियमित योगासनं करा. कडक उन्हापासून स्वतःचा बचाव स्वतःच करा. पुरेशी झोप घ्या.

स्व-स्तन तपासणी (सेल्फ ब्रेस्ट एक्झाम)

वयाच्या तिशीनंतर प्रत्येक स्त्रीनं डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे स्तन कर्करोगासाठी गरजेची असलेली मॅमोग्राफी तपासणी करणं आवश्यक आहे. अपुरी माहिती आणि त्यातील वेदनांमुळे अनेक जणी ही चाचणी करणं टाळतात. अशावेळी स्व-स्तन तपासणी (सेल्फ ब्रेस्ट एक्झाम) हा पर्याय अचूक ठरतो. म्हणजे स्वतःच्या स्तनांची चाचणी स्वतःच करणं. सेल्फ ब्रेस्ट एक्झाम हा खात्रीशीर उपाय नसला तरीही स्त्रीला तिच्या स्तनांमधील गाठींचा अंदाज येतो.

मॅमोग्राफी

स्तनांची क्ष-किरण छायाचित्रं म्हणजे मॅमोग्राफी. स्तनांमध्ये असणाऱ्या गाठी ह्या कर्करोगाच्या आहेत की नाही याचं निदान मॅमोग्राफी या तपासणीत केलं जातं. ही तपासणी मासिक पाळीनंतरच्या काही दिवसांत केली जाते. या तपासणीत स्तनांची चाचणी करताना कमी क्षमतेच्या क्ष-किरणांचा उपयोग केला जातो. मॅमोग्राफी करताना प्रत्येक स्तनाच्या दोन अशा एक वरून आणि एक बाजूने क्ष-किरण प्रतिमा घेतल्या जातात. स्तनांत गाठींचा पुंजका नक्की कुठे आहे, हे ठरवण्यासाठी मॅमोग्राफीचा उपयोग होतो.

अल्ट्रासोनोग्राफी

या तपासणीत स्तनांची क्ष-किरण-चित्र-मालिका मिळते, जी संगणकीकृत (कम्युटराईज्ड) असते. तसंच या तपासणीत स्तनांची अंतर्गत रचनाही कळते. स्तन कर्करोगाची लागण झालेल्या स्त्रीच्या स्तनातील कर्करोगाच्या गाठी दुधाच्या ग्रंथी आणि दुग्धनिलिकेत किती दूरपर्यंत पोहोचलेल्या आहेत, याचा आढावा द्विमिती (टू डायमेंशन) आणि त्रिमिती (थ्री डायमेंशन) चित्रांच्या माध्यमातून 'अल्ट्रासोनोग्राफी' तपासणीतून घेता येतो.

स्तनांचा एमआरआय

जेव्हा 'मॅमोग्राफी' आणि 'अल्ट्रासोनोग्राफी' यांच्याद्वारे तपासणी होऊनही दुग्धग्रंथी अथवा दुग्ध नलिकेत गुंतागुंतीच्या जागी वाढणाऱ्या कर्करोगाच्या गाठी कशा प्रकारे शस्त्रक्रिया करून काढल्या पाहिजेत, याचा अंदाज येत नाही...निश्‍चित निर्णयाप्रत नेणारे निष्कर्ष मिळत नाहीत, तेव्हा स्तनांच्या एमआरआयच्या साह्याने शस्त्रक्रियेच्या पूर्वी आवश्यक अशा प्रतिमा मिळवता येतात.

नो टच ब्रेस्ट स्कॅन

स्तन कर्करोगाचं निदान करणारी ही वेदनारहित चाचणी असून यात किरणोत्सर्जन (रेडिएशन) अत्यंत कमी प्रमाणात केलं जातं. मॅमोग्राफी, अल्ट्रासोनोग्राफी आणि 'स्तनांचा एमआरआय' या चाचणीत होणा-या वेदानांच्या तुलनेत या चाचणीत स्तन तापासणीत वेदना होत नाहीत. ही विनाशुल्क सुविधा महाराष्ट्रातील प्रत्येक शासकीय वैद्यकीय महाविद्यालये आणि रुग्णालांमध्ये उपलब्ध आहे.

या तपासण्यांतून स्तन कर्करोगग्रस्त स्त्रीच्या स्तनांत वाढणाऱ्या पेशींचा प्रकार कोणता आहे, हा कर्करोग दोन्ही स्तन आणि शरीरात कुठपर्यंत पोहोचला आहे तसंच 'कर्करोग' ग्रस्त स्त्री रजोनिवृत्तीला पोहोचलेली आहे की नाही, या तीन प्रमुख घटकांवर स्तन कर्करोगाचा उपचार अवलंबून आहे. त्याचप्रमाणे स्तन कर्करोगाच्या उपचारास सुरुवात करण्यापूर्वी स्तनात कर्करोगाच्या प्रसाराचं प्रमाणही निश्‍चित केलं जातं. जसं की, कर्करोगाच्या गाठी स्तनात कुठपर्यंत पोहोचल्या आहेत. गाठी स्तनातील खोलवरच्या स्नायुंमध्ये किती पसरल्या आहेत. एका स्तनातला कर्करोग दुस-या स्तनात पोहोचला आहे की नाही. कर्करोगाच्या गाठी या अधिक क्रियाशील की कमी क्रियाशील आहेत.

या मुदद्यांचा आधार घेत डॉक्टर स्तन कर्करोगग्रस्त रुग्णांवर उपचार करतात. जर स्त्रीच्या स्तनातील कॅन्सरची गाठ ही सूक्ष्म असेल तर ती गाठ आणि त्या गाठीच्या आजूबाजूचा भाग शस्त्रक्रिया करून काढून टाकतात. त्याचबरोबरीने शस्त्रक्रियेत लसिका ग्रंथीही काढून टाकतात. स्तनातील गाठ जर अतिशय लहान असेल तर ती गाठ आणि तिच्या आजूबाजूचा भाग शस्त्रक्रिया करून काढून टाकणं तसंच काखेतल्या लसिकाग्रंथी काढून टाकणं डॉक्टरांना पुरेसं वाटतं. त्यामुळे स्तन वाचवता येऊ शकतं. गाठ जर मोठी असेल तर संपूर्ण स्तन काखेतल्या लसिकाग्रंथींसह काढून टाकणं जरुरीचं असतं. हे उपचार करत असताना रेडिओ थेरपी, केमोथेरपी किंवा हार्मोनलथेरपी यांचीही मदत घेतली जाते.

संभाव्य गट

वय वर्षे 30 ते 70 या वयोगटातील स्त्रियांना स्तन कर्करोग होऊ शकतो. आपल्या कुटुंबामध्ये स्तन कर्करोगाचा इतिहास असेल तर अनुवंशिकता अथवा जीन्सच रचनेमुळे स्तन कर्करोग होण्याची शक्यता 5 ते 10 टक्क्यांनी वाढते. आपल्याला या आधी कोणताही कर्करोग झाला असेल किंवा स्तनांचा काही आजार झाला असेल तर स्तन कर्करोग होण्याचा धोका असतो. जन्मतः क्रोमोझोम्समध्ये बदल झालेल्या महिलांनाही स्तन कर्करोग होऊ शकतो. मूल नसलेल्या महिला तसंच वयाच्या तिशीनंतर अपत्यप्राप्ती झालेल्या महिलाही स्तन कर्करोगाच्या आजाराच्या बळी पडू शकतात. पन्नाशीनंतर महिलांना येणारी रजोनिवृत्ती ही त्याना स्तन कर्करोगाच उंबरठ्यावर नेऊन ठेवते. ज्या महिलांच्या स्तनांमधील पेशी अधिक घनदाट असतात त्यांनाही स्तन कर्करोगाची लागण होऊ शकते. दीर्घकाळ गर्भनिरोधक गोळी घेणाऱ्या महिलांच्या स्तनांमध्ये स्तन कर्करोगाच्या पेशींची वाढ होऊ शकते. प्रसूतीनंतर आपल्या नवजात शिशुला स्तनपान न देणा-या महिलांमध्ये स्तन कर्करोगाची लक्षणं आढळतात. ज्या महिला दिवसातून दोन ते पाच वेळा मद्यप्राशन करीत असतील त्यांनाही स्तन कर्करोग या आजाराच्या मांडवाखालून जावं लागतं. पाळी गेल्यानंतर प्रमाणाबाहेर स्थूल झालेल्या महिलांमध्येही स्तन कर्करोग या आजाराचं प्रमाण वाढतं.

-डॉ. सोमनाथ सलगर

माहिती स्रोत: महान्युज

अंतिम सुधारित : 1/29/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate