অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

शवपरीक्षा

शवपरीक्षा

मृत शरीराच्या म्हणजे शवाच्या अंतर्गत व बाह्य भागाच्या शास्त्रीय तपासणीला शवपरीक्षा म्हणतात. शवाचे बाहेरून काळजीपूर्वक निरीक्षण करतात. तसेच शरीर, त्यातील महत्त्वाचे अवयव व संरचना यांचे विच्छेदन करून परीक्षण करतात. रोगाचे कारण, स्वरूप, त्याचे शरीरावर झालेले परिणाम, शरीरात रोगामुळे झालेल्या बदलांची व्याप्ती व क्रम आणि अशा प्रकारे रोगप्रतिक्रियेची क्रमवार झालेली प्रगती व यंत्रणा या गोष्टी शवपरीक्षेद्वारे उघड होतात. अनैसर्गिक कारणांनी झालेल्या संशयस्पद मृत्यूच्या बाबतीतही शवपरीक्षा करतात. यामुळे मृत्यूचे कारण, वेळ वगैरे गोष्टी उघड होतात.

इतिहास

रोगाच्या अभ्यासासाठी पहिली मानवी शरीरविच्छेदने इ. स. पू. ३०० मध्ये अँलेक्झांड्रियाच्या हीरॉफिलस व ⇨एरासिस्ट्राटस या वैद्यक शास्त्रज्ञांनी केली. मात्र रुग्णाच्या तक्रारी दिसू शकतील व जाणवू शकतील अशी रोगलक्षणे आणि रुग्णाच्या मृत्यूनंतर शरीरात आढळलेला रोगग्रस्त भाग यांच्यामधील परस्परसंबंध निश्चित करण्याचे काम सर्वप्रथम ⇨ गेलेन या ग्रीक वैद्यक तज्ज्ञाने इसवी सनाच्या दुसऱ्या शतकाच्या अखेरीस केले. शवपरीक्षेचा मार्ग खुला करणारा हा एक महत्त्वाचा टप्पा ठरला. तथापि मध्ययुगात मानवी शरीरविच्छेदनास परवानगी नव्हती.

रीररचना व शरीरांतर्गत क्रिया यांची व्यवस्थित माहिती होण्यासाठी व रोगाच्या मुळाशी जाण्यासाठी शवपरीक्षा करणे आवश्यक आहे, हे शास्त्रज्ञांना तेराव्या शतकापासून पटू लागले. कोणास कळू न देता पुरलेले शव बाहेर काढून त्याची परीक्षा करण्याचे प्रयत्न काही ठिकाणी होत असत. मात्र तेराव्या शतकात दुसऱ्या फ्रेडरिक राजाने दर दोन वर्षांनी मृत्यूदंड दिलेल्या दोन गुन्हेगारांची शवे वैद्यकीय विद्यालयांना ज्ञानार्जनासाठी द्यावीत, असा आदेश काढला. यांपैकी एक विद्यालय सालर्नो येथील होते.

प्रबोधान काळात (सु. चौदावे ते सतरावे शतक) शरीररचनाशास्त्राचा पुनर्जन्म झाला, हे ⇨ अँड्रिअस व्हेसेलिअस यांच्या De Humani Corporis Fabrica (१५४३) या ग्रंथावरून उघड होते. या ग्रंथामुळे प्राकृत व अप्राकृत वा विकृत शरीररचनांमधील भेद स्पष्ट होऊ शकला. ⇨ लिओनार्दो दा व्हींची यांनी तीस शवांचे विच्छेदन करून अप्राकृत शरीररचनांची नोंद केली. तसेच ⇨ मायकेलअँजेलोयांनीही अनेक शवविच्छेदने केली होती.

मृत्यूस कारणीभूत झालेली चूक किंवा अपराध सिद्ध करण्यासाठी पहिली न्यायवैद्यकीय किंवा कायदेशीर शवपरीक्षा बोलोन्यातील न्यायाधीशाच्या सूचनेवरून १३०२ साली करण्यात आली. केवळ मृत्यूचे नेमके कारण शोधून काढण्यासाठी फ्लॉरेंन्स येथील वैद्य आंतोन्यो बेनीव्ह्येनी यांनी पंधराव्या शतकात १५ शवपरीक्षा केल्या. मृत व्यक्तींमध्ये जिवंतपणी असलेली रोगलक्षणे व त्यांनी काढलेले काही निष्कर्ष यांचा परस्परसंबंध जोडण्याचाही प्रयत्न त्यांनी केला. पोप पाचवे अलेक्झांडॅर यांचे आकस्मित व अनपेक्षित रीतीने निधन झाले. या संशयास्पद मृत्यूमुळे त्यांच्या देहाची शवपरीक्षा करण्यात आली होती. (१४०१). सोळाव्या व सतराव्या शतकांत शवपरीक्षांचे प्रमाण वाढत गेले आणि त्यांच्याविषयीचे अहवाल संकलित करून छापण्यात आले. यांपैकी जिनीव्हा येथील तेओफिल बॉन्ये (१६२०–८९) यांचे विकृत शारीरविषयक पद्धतशीरपणे केलेले संकलन सर्वोत्कृष्ट होते. त्यासाठी त्यांनी ३,००० शवपरीक्षांमधील निरीक्षणे अभ्यासली होती. यातून प्रेरणा घेऊन ⇨ जोव्हान्नी बास्तीस्ता मोगोन्ये यांनी आपला ग्रंथ (इं. शी. ऑन सीट्स अँड कॉझेस ऑफ डिसीजेस अँज इंव्हिस्टिगेटेड बाय अँनॉटमी) प्रसिद्ध केला (१७६१). या ग्रंथात त्यांनी अंदाजे ७०० रुग्णांच्या रोगलक्षणांची त्यांच्या शरीरांचे निरीक्षण करून काढलेल्या निष्कर्षांशी तुलना केली होती. या ग्रंथामुळे शवपरीक्षेतील निष्कर्षांच्या आधारे रोगांचे अनुसंधान (बारकाईने अध्ययन) करण्यास प्रारंभ झाला. मोर्गान्ये हे आधुनिक विकृतिविज्ञानाचे जनक मानले जातात. यानंतरच्या मॅथ्यू बेली यांच्या द मॉर्बिड अँनॉटमी ऑफ सम ऑफ द मोस्ट इंपॉर्टट पार्टस ऑफ द ह्यूमन बॉडी (१७९४) या ग्रंथाने या विषयात कळस गाठला. हा ग्रंथ आधुनिक विकृतिविज्ञानाचे पाठ्यपुस्तक म्हणता येईल. विविध निरीक्षकांनी विशिष्ट प्रकारच्या अनेक निदानीय व विकृतिवैज्ञानिक बाबींच्या व्याख्या तयार केल्या. अशा प्रकारे शवपरीक्षेविषयीच्या आधुनिक वैद्यकीय वाटचालीचा मार्ग खुला झाला.

व्हिएन्ना येथील कार्ल फोन रोकिटान्स्की (१८०४७८) यांच्यामुळे स्थूल शवपरीक्षा म्हणजे नुसत्या डोळ्यांनी पाहून केलेली शवपरीक्षा प्रगत होण्यास साहाय्य झाले. फ्रेंच शरीररचनाशास्त्रज्ञ व शरीरक्रियावैज्ञानिक मारी-फ्रांस्वा-ग्झेव्ह्ये बीशे (१७७१ १८०२) यांनी रोगाचा अभ्यास करताना विविध सामान्य तंत्रे (संस्था) व ऊतके (समान रचना व कार्य असणारे कोशिकांचे-पेशींचे-समूह) यांच्या कार्यावर भर दिला. ⇨ रूडोल्फ लूटव्हिख कार्ल फिरखो (१८२१ – १९०२) या जर्मन विकृति-वैज्ञानिकांनी कोशिकीय (पेशीविषयक) विकृतिवैज्ञानिक तत्त्व मांडले. त्यानुसार कोशिकांमध्ये होणारे बदल हे रोगाची माहिती करून घेण्यासाठी आधारभूत असतात. विकृतिविज्ञानाला व शवपरीक्षेला हे तत्त्व लागू पडते. केवळ विकृतिवैज्ञानिक शरीररचनाशास्त्रावर (म्हणजे रोगग्रस्त ऊतकाच्या संरचनेच्या अभ्यासावर) भर देण्याच्या वृत्तीविरुद्ध त्यांनी धोक्याचा इशारा दिला. उलट त्यांनी शरीरक्रियावैज्ञानिक विकृतिविज्ञानावर म्हणजे रोगाच्या अनुसंधानातील जीवाच्या कार्याच्या अभ्यासावर भर दिला. या तत्त्वामुळे शवपरीक्षेची उपयुक्तता वाढली.

संयुक्त सूक्ष्मदर्शकाचा शोध लागल्याने शवपरीक्षेतून मिळणारे रोगग्रस्त अवयवांचे भाग बारकाईने अभ्यासणे शक्य झाले. अवयवातील कोशिका व त्यांतील संरचना आणि रक्तवाहिन्या यांमध्ये कशा पद्धतीने फरक होत जातात, यांसंबंधी अधिकाधिक माहिती उपलब्ध होत गेली. अशा प्रकारे शवपरीक्षेत सूक्ष्मदर्शक हे अतिशय उपयुक्त साधन ठरले.

धुनिक शवपरीक्षेचे क्षेत्र पुष्कळ व्यापक झाले आहे. आता तिच्यात विशेषीकृत मूलभूत विज्ञानांमधील सर्व माहिती व साधने यांचा उपयोग करून घेण्यात येतो. इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकाने दिसू शकणाऱ्या संरचनांचे परीक्षणही शवपरीक्षेत आता केले जाते. तसेच रेणवीय जीवविज्ञानातील तंत्रेही (उदा., डीऑक्सिरिबोन्यूक्लिइक अम्ल डिएनए ठसे) शवपरीक्षेत वापरतात.

शवपरीक्षेचे उद्देश

सर्वसाधारणपणे शवपरीक्षेचे उद्देश दोन प्रकारचे असतात. एक म्हणजे वैद्यकीय ज्ञानवर्धनासाठी व दुसरे न्यायवैद्यकीय (कायदेशीर) कारणांसाठी. दोहोंसाठी तज्ज्ञाची गरज असते.

ज्ञानवर्धनासाठी शवपरीक्षा

ही शवपरीक्षा करावयाची झाली, तर मृत्यू आकस्मिक अथवा संशयास्पद स्थितीत झालेला नाही याची खात्री करणे आवश्यक असते. तसेच मृत व्यक्तीच्या जवळच्या नातेवाइकांची शवपरीकेसाठी लेखी परवानगी मिळविणे, हेही आवश्यक असते.

 

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 4/18/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate