অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

शवसंलेपन

शवसंलेपन

शवसंलेपन

विशिष्ट रासायनिक दुर्गंधिनाशक द्रव्यांचा लेप चढवून मृत मानवी शरीराचे जतन करण्याची पद्धत. मृत देहाचे विघटन न होता, ते निर्जंतुक व अविकृत रूपात दीर्घकाळ टिकून राहावे, यासाठी विशिष्ट रासायनिक प्रक्रियांद्वारा ते जतन करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती प्राचीन काळापासून रुढ होत्या. प्राचीन ईजिप्तमधील लोकांची अशी धारणा होती, की मृत्यूसमयी अनेक प्रकारच्या आत्मिक शक्ती शरीरातून बाहेर पडतात. त्यांपैकी 'का'. 'बा' व 'आख' या अत्यंत महत्त्वाच्या समजल्या जात. 'का' ही जीवनावश्यक शक्ती उंचावलेल्या दोन हातांच्या प्रतीकाने दाखवीत. 'बा' ही मानवी रूप धारण केलेल्या पक्षाच्या रूपाने दाखविली जाणारी शक्ती कुठेही संचार करून परत थडग्यात येऊ शकते, असा समज असे. 'आख' ही डोक्यावर तुरा असलेल्या 'आयबिस' नावाच्या पक्षाच्या रूपाने दाखविली जात असे व तिचा संबंध अमरत्वाशी असे. मृत व्यक्तीच्या शरीराची ओळख मरणोत्तर जीवन जगण्यासाठी या वरील शक्तींना पटणे आवश्यक मानीत. यासाठीच शवसंमेलनाची (एम्बामिंग) प्रथा प्राचीन ईजिप्तमध्ये प्रथम अस्तित्वात आली. राजवंशपूर्व काळात (इ. स. पू. सु. ३१०० वर्षे) मृत व्यक्तीला केवळ चटईत किंवा कातड्यात गुंडाळून जीवनावश्यक वस्तूंच्या समवेत वाळवंटात पुरत असत. वाळवंटातील उष्णतेमुळे शरीरातील पाणी शोषले जाऊन जीवाणूंची वाढ होत नसे व शुष्क शरीर शेकडो वर्षे टिकत असे. दुसऱ्या राजघराण्याच्या काळात रेझिनमध्ये बुडविलेल्या लिलनच्या पट्ट्यांनी शव घट्ट लपेटले जात असे. तिसऱ्या राजघराण्याच्या काळात शवसंलेपनाची प्रथा अस्तित्वात आली. एम्बामिंग याचा लॅटिन भाषेतील अर्थ सुगंधी द्रव्यामध्ये (रेझीन) ठेवणे असा आहे. ईजिप्शियन ममी या संज्ञेची व्युत्पत्ती 'मोमियाई' (बिट्युमेन किंवा पिच या डांबराशी संबंधित द्रव्याचा निदर्शक) या अरबी शब्दापासून झाल्याचे मानतात. ह्यावरून एम्बामिंग ह्या पद्धतीला 'ममिफिकेशन' असे दुसरे नाव रूढ झाले. शव नदीतीरावरील बंदिस्त जागेत नेऊन 'नॅट्रॉन' (सोडियम कार्बोनेट) द्रव्य मिसळलेल्या पाण्याने स्वच्छ केले जात असे. या द्रव्याचे खडे कैरोपासून सु. ६४ किमी. वरील सरोवराच्या काठी विपुल प्रमाणात आढळतात. या द्रव्यामध्ये निर्जंतुकीकरणाचा व मृत शरीरातील आर्द्रता शोषून घेण्याचा गुणधर्म आहे.

शवसंलेपन प्रक्रियेत सर्वप्रथम शवाच्या नाकपुड्यांमधून किंवा डोळ्यांच्या खोबणीतून तीक्ष्ण हत्यार डोक्यात घुसवून मेंदूचे तुकडे बाहेर काढत व त्या पोकळीत रेझिनमध्ये भिजविलेले लिननचे तुकडे भरले जात. नंतर पोटाचा छेद घेऊन आतील अवयव काढले जात. फक्त हृदय ठेवत, कारण त्याला विचार करण्याचे इंद्रिय मानत. पोटाची पोकळी पामच्या दारूने व कुटलेल्या मसाल्याने स्वच्छ करून, शिवून नॅट्रॉनमध्ये बहात्तर दिवस ठेवत असत. त्यानंतर ते शव धुऊन व गोंदात भिजविलेल्या लिननच्या पट्ट्यांनी बांधून मानवी देहकाराशी मिळत्याजुळत्या, सुशोभित लाकडी पेटीमध्ये ठेवून देत. ही पद्धत फार खर्चाची होती. या पद्धतीने मेरेसांख राणीची ममी तयार करायला २७२ दिवस लागले. कमी खर्चाच्या शवसंलेपन प्रक्रियेत पिचकारीने शवाच्या गुदद्वारातून सेडार तेल भरले जाते व नॅट्रॉनचा उपयोग करून गुदद्वार बंद केले जाते. ठारावीक काळानंतर ते उघडले जाते, तेव्हा पोटातील सर्व अवयवांचे द्रवरूपात रूपांतर होऊन ते बाहेर फेकले जातात. या प्रक्रियेत पोट फाडावे लागत नाही. नॅट्रॉनमुळे मांस नष्ट होते व फक्त त्वचा व हाडे उरतात. शव मधामध्ये बुडवून ठेवण्याचीही पद्धत होती. सिकंदर बादशहाचे शव काचेच्या पेटीत मधामध्ये बुडवून लोकांना पाहण्यासाठी ठेवण्यात आले होते.

भारताच्या पूर्वेतिहासात राजस्थान, सिंध आणि बलुचिस्तानात उघड्यावर ठेवलेली मृत शरीरे बाहेरील उष्ण आणि कोरड्या वातावरणामुळे शुष्क झाल्याची नोंद मिळते. झाडाच्या फांदीवर लटकवलेली अगर घराच्या छपरावर ठेवलेली काही नवजात अर्भकांची सुरकुतलेली शरीरे आढळून आली आहेत. तसेच ज्या व्यक्तींना नकळत किंवा जाणूनबुजून आर्सेनिक (एक विषारी मूलद्रव्य) दिले गेले, अशा व्यक्तींचे मृतदेह कोरडे होण्यास वेळ लागत नाही. आर्सेनिकामुळे त्वचेखालील मृदू अवयव कोरडे होऊन त्वचा आणि हाडे एकत्र येत असल्यामुळे 'शवसंलेपन' ह्या क्रियेसाठी आर्सेनिक लेड सल्फाइड आणि पोटॅशियम कार्बोनेट ह्यांचे प्रवाही मिश्रण मृत शरीराच्या जांघेतील रोहिणीत अगर महारोहिणीमध्ये अंतःक्षेपित करण्याची पद्धतही प्रचलित आहे.

आधुनिक काळात १०% फॉर्मालीन व २०% ग्लिसरॉन (वा स्पिरिट) आणि ग्लिसरीनचे मिश्रण मृत व्यक्तीच्या मानेवर उजव्या बाजूच्या रक्तवाहिनीमध्ये अंतःक्षेपित करतात व त्याच वेळी डाव्या बाजूच्या रक्तवाहिनीमधून प्रवाही द्रव्य बाहेर शोषून घेतले जाते. या प्रक्रियेने शव सहा महिने टिकवता येते. त्याचप्रमाणे शव टिकवण्यासाठी बर्फाचा व शवागाराचा उपयोग केला जातो.

शवसंलेपन ही क्रिया केलेली मृत शरीरे विशेषतः वैद्यकीय महाविद्यालयांत शवविच्छेदनासाठी उपयुक्त ठरतात. तसेच परदेशात मृत पावलेल्या व्यक्तीचे शव अंत्यंसंस्कारासाठी स्वदेशी आणण्यापूर्वी तसेच शवावरील अंत्यंसंस्कार करण्यास फार वेळ लागणार असेल, तर शवसंलेपनाची क्रिया करावी लागते.

 

यंदे, विश्वास

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 4/14/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate