অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

शस्त्रक्रिया तंत्र

शस्त्रक्रिया तंत्र

शस्त्रक्रिया तंत्र

(शल्यचिकित्सा; सर्जरी). शरीराच्या एखाद्या भागातील दुखापत, व्यंग किंवा विकार यांच्यावर उपचार करण्यासाठी शस्त्रक्रिया आणि कौशल्यपूर्वक पुनःस्थापन या तंत्रांचा प्रामुख्याने वापर करणारी वैद्यक शाखा. शल्यचिकित्सा हा अधिक सर्वसमावेशक शब्द असून त्यात या शाखेतील कारणमीमांसा, विकृतिविज्ञान, निदान, शस्त्रक्रिया, उपचारांची निष्पत्ती यांचा विचार अभिप्रेत असतो. शस्त्रक्रिया तंत्र या शब्दाने केवळ शस्त्रक्रियेचा किंवा शस्त्रक्रियात्मक शल्यचिकित्सेचा बोध होतो.

शस्त्रक्रिया किंवा कौशल्यपूर्ण हाताळणी यांचा उपयोग बहुधा शरीराच्या एखाद्या भागापुरता मर्यादित अशा रोगासाठी केला जातो; उदा., अर्बुद (कोशिकांच्या – पेशींच्या – अत्याधिक वाढीमुळे निर्माण झालेली निरुपयोगी गाठ), जखम किंवा मुका मार, विशिष्ट इंद्रियांचा विकार, रचनात्मक दोष इत्यादी. सार्वदेहिक विकार किंवा शरीरभर पसरणाऱ्या औषधयोजनेची आवश्यकता असणारे विकार यांचा विचार शल्यचिकित्सेमध्ये होत नाही; उदा., मधुमेह, रक्तदाब, शरीरभर पसरणारी जंतुजन्य संक्रामणे (संसर्ग) इत्यादी.

इतिहास

शस्त्रांचा उपयोग उपचारासाठी करण्याची सुरुवात उत्तर अश्मयुगात झाली असावी; कारण इ.स.पू. ६०,००० ते १०,००० या काळातील काही मानवी सांगाड्यांच्या कवट्यांना गोल छिद्रे पाडलेली दिसून आली. शरीरात प्रवेश केलेल्या रोगजनक दैवी शक्तींना बाहेर काढून टाकण्यासाठी अशा प्रकारची ‘शल्यकर्मे’ केली जात असावीत.

प्राचीन भारतीय, इजिप्शियन, चिनी व सुमेरियन संस्कृतींच्या अभ्यासकांना त्या-त्या ठिकाणी वैद्यकीय उपचारांसाठी शस्त्रक्रिया होत असल्याचे पुरावे मिळाले आहेत. इतकेच नव्हे, तर औषधींच्या तुलनेत त्यांचा वापर अधिक प्रगत होता असे दिसते. भारतात सुश्रुतकालीन चिकित्सकांनी वापरलेली १२१ लोखंडी उपकरणे सर्वज्ञात आहेत. इ.स.पू. ७०० च्या सुमारास चरमावस्थेस पोहोचलेल्या या आयुर्वेदीय शल्यतंत्राने अनेक अवघड शस्त्रक्रिया विकसित केल्या होत्या. उदा., मोतीबिंदू काढणे, उदरपाटन करून (उदरावर छेद घेऊन) गर्भ बाहेर काढणे, मूत्राशयातील अश्मरी (मुतखडे) काढणे.

कपाळावरील त्वचेचा काही भाग खाली वळवून त्यापासून कृत्रिम नाकपुड्या तयार करण्यासारख्या दीर्घकाल चालणाऱ्या किचकट पुनर्रचनात्मक शस्त्रक्रियाही भारतीय वैद्य करू शकत. विद्यार्थ्यांना शल्यकर्माचे प्रशिक्षण देण्यासाठी व प्रायोगिक स्वरूपाच्या शस्त्रक्रिया करण्यासाठी मृत प्राण्यांचे मांस, फळे, घट्ट द्रवाने भरलेल्या चामडी पिशव्या यांचा उपयोग केला जाई. भारतातील ही शल्यतंत्रे प्रथम अरब साम्राज्यात व तेथून युरोपमध्ये पोहोचली, असे मानले जाते. [→ शल्यतंत्र व शालाक्यतंत्र].

सुमेरियन संस्कृती व तिच्यापासून निर्माण झालेल्या बॅबिलोनियन संस्कृतीमध्ये शल्यचिकित्सकाचा व्यवसाय प्रतिष्ठित व जबाबदारीचा गणला जात असावा. इ.स.पू. १७०० च्या सुमारास सम्राट ⇨ हामुराबी यांनी घालून दिलेल्या आचारसंहितेप्रमाणे शल्यचिकित्सकांना रुग्णांनी द्यावयाचा मोबदला आणि अयशस्वी शस्त्रक्रियांबद्दल त्यांच्याकडून प्राप्त करावयाची नुकसानभरपाई यांसारख्या गोष्टी निश्चत ठरवून दिल्या होत्या. ईबर्सच्या पपायरसामध्ये आढळलेल्या माहितीप्रमाणे इजिप्तमध्ये इ.स.पू. १५५० मध्ये साखमेत देवतेचे पुरोहित अनेक लहानलहान शस्त्रक्रिया करीत असत; उदा., सुंता करणे, गळू कापणे, तापलेल्या सळईने डाग देणे इत्यादी.

चीनमध्ये इ.स.पू. १८००च्या सुमारास हुआ ताओ नावाचे प्रसिद्ध शल्यचिकित्सक होऊन गेले. जखमी सैनिकांना मद्याच्या प्रभावाखाली ठेवून त्यांच्या जखमा ते शस्त्रक्रियेने स्वच्छ करीत असत. विषारी बाणांमुळे चिघळत असलेले मांस खरवडून काढणे, सूचिचिकित्सा, अग्निकर्म यांसारखी शल्यकर्मे त्या काळी चीनमध्ये प्रचारात होती. प्राचीन ग्रीक साम्राज्यात व त्यानंतर इ.स. पहिल्या शतकात रोमन साम्राज्यातही प्रामुख्याने सैनिकांच्या जखमांसाठीच शल्यकर्मे केली जात. सेल्सस या कोशकारांच्या नोंदीनुसार सुमारे २०० उपकरणे त्या वेळी शस्त्रक्रियांसाठी उपलब्ध होती.

शवविच्छेदनावरील धार्मिक निर्बंधांमुळे इसवी सनाच्या सुरुवातीच्या सुमारे एक हजार वर्षांत मानवी शरीररचनेबद्दलचे ज्ञान अप्रगत राहिले. प्राण्यांचे विच्छेदन आणि सैनिकांच्या जखमांवर उपचार करताना मिळालेली तुटपुंजी माहिती यांच्या आधारे वैद्यकीय व्यावसायिक काही आडाखे बांधत असत. मध्ययुगीन युरोपात रॉजर फ्रुगार्ड यांचा एक ग्रंथ (११८०), गाय डी चॉलिआक्स यांचा ग्रेट सर्जरी (१३६३) आणि जॉन ऑर्डन (१३०७–१३९०) यांचा युद्धातील जखमांवरील ग्रंथ यांमध्ये तत्कालीन ज्ञानाचे संकलन आढळते. तेराव्या शतकापासून शस्त्रक्रिया तंत्र ही एक स्वतंत्र विद्या म्हणून मान्यता पावू लागली. नाभिक, नाभिक-शल्यचिकित्सक आणि स्वतंत्रपणे शल्यचिकित्सा करणारे वैद्य असे तीन प्रकारचे व्यावसायिक या विद्येचा उपयोग करीत. मोडलेली हाडे बसविणे, अग्निकर्म, गळवे कापणे, जखमांवर उपचार करणे यांसारखी विविध कामे करणाऱ्या या व्यावसायिकांवर त्यांची ‘गिल्ड' नावाची संघटना नियंत्रण ठेवत असे. हळूहळू या विद्येला वैद्यकाची एक शाखा म्हणून प्रतिष्ठा मिळू लागली. सुरुवातीस इटलीमधील बोलोन्या विद्यापीठाने शल्यचिकित्सेचे शिक्षण देण्यास स्वीकृती दिली. पुढे फ्रान्समध्ये व सर्व युरोपभर विद्यापीठांनी हा विषय शिकविण्यासाठी स्वतंत्र प्राध्यापक नेमले.

सोळाव्या शतकात ⇨ अँड्रिअस व्हेसेलिअस यांचा मानवी शरीराच्या रचनेवरील विस्तृत ग्रंथ प्रसिद्ध झाला (१५४३). ⇨ आंब्रवाझ पारे(१५१०–१५९०) या पॅरिस विद्यापीठातील शल्यचिकित्सकांचा व्यासंगी अभ्यास आणि व्हेसेलिअस यांचा ग्रंथ यांमुळे शल्यचिकित्सकांचा व्यासंगी अभ्यास आणि व्हेसेलिअस यांचा ग्रंथ यांमुळे शल्यचिकित्सेच्या प्रगतीस वेग आला. शारीरविषयक जाणीव, रक्तस्राव थांबविण्यासाठी डाग देण्याऐवजी सुती किंवा रेशमी धाग्याने रक्तवाहिनी बांधण्याचे तंत्र, जखमांच्या मलमपट्टीसाठी गरम तेलाऐवजी सौम्य अशा अंड्याच्या बलकाचा वापर ही पारे यांच्या वैशिष्ट्यपूर्ण योगदानाची काही उदाहरणे आहेत. जर्मनीमधील फेब्रिशियस हितडेनस (१५६०–१६३४)आणि प्रख्यात चित्रकार ⇨ लिओनार्दो दा व्हींची (१४५२–१५१९) यांची शरीररचनेची वर्णने यामुळेही सोळाव्या शतकातील प्रगतीस हातभार लागला.

इंग्लंडमध्ये आठवे हेन्री यांच्या कारकिर्दीत शल्यचिकित्सक व नाभिक यांचे एकत्र संघटन होऊन टॉमस विकरी यांच्या अध्यक्षतेखाली एक राजमान्य संस्था निर्माण झाली. त्यामुळे व्यावसायिक प्रतिष्ठा व नियंत्रण या दृष्टींनी शल्यचिकित्सकांची प्रगती लक्षणीय ठरली. या शतकात युरोपमध्ये विद्यापीठात शिकलेल्या वैद्यांबरोबरच नाभिक, मुतखडा काढणारे आणि बहुविध तंत्रे वापरणारे फिरस्ते शस्त्रक्रिया करण्याचा व्यवसाय करीत असत. त्यांची संख्या हळूहळू कमी होऊ लागली.

सतराव्या शतकात भौतिक व रसायनशास्त्रातील प्रगतीच्या आधारे शरीरक्रियाविज्ञानाचा पाया घातला गेला; परंतु त्यामानाने शल्यचिकित्सेत विशेष बदल झाला नाही. अठराव्या शतकात व एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धात विकृतिविज्ञान व सूक्ष्म जीवशास्त्राचाविकास होऊ लागला. अने पूयजनक (पू तयार होणाऱ्या) रोगांमध्ये व जखमा चिघळण्यामध्ये सूक्ष्मजंतूंची वाढ हाच एक महत्त्वाचा घटक कारणीभूत असतो, हे स्पष्ट झाले. त्यामुळे शस्त्रक्रियेच्या तंत्रात स्वच्छतेकडे जास्त लक्ष देणे अपरिहार्य ठरले. परिणामतः त्यांच्या यशस्वितेचे प्रमाणही वाढू लागले.

इंग्लंडमध्ये ⇨ विल्यम हंटर (१७१८–१७८३) व ⇨जॉन हंटर (१७२८–१७९३) या बंधुद्वयांनी शारीर व विकृतिविज्ञान यांच्या आधारे शल्यचिकित्सेत अनेक तांत्रिक सुधारणा घडवून आणल्या. विशेषतः जॉन हंटर यांनी आपल्या अध्यापनात जखमा व त्या भरून येण्याची प्रक्रिया यांमधील विकृतिवैज्ञानिक बदलांवर अधिक भर दिला. याच काळात हेन्री ग्रे (१८२७–१८६१) यांचा ‘अनॉटॉमी: डिस्क्रिप्टिव्ह अँड सर्जिकल’ हा ग्रंथ तयार झाला (१८५८). अजूनही छत्तीसाव्या आवृत्तीच्या रूपात `ग्रेज अॅनॉटॉमी' या नावाने हा ग्रंथ वैद्यकीय अभ्यासात लोकप्रिय आहे.

 

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 1/29/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate