অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

साथ व साथीचे नियंत्रण

साथ व साथीचे नियंत्रण

साथ व साथीचे नियंत्रण

एखाद्या प्रदेशात विशिष्ट आजाराचा उद्भव नेहमीच्या अपेक्षित प्रमाणापेक्षा अधिक झाल्यास साथ आली असे समजले जाते. रोगांची निर्मिती कशामुळे होते व शरीरात त्यामुळे कोणत्या प्रक्रिया घडून येतात, त्याबद्दल फारशी माहिती आणि तिला आधार देणारी प्रत्यक्ष प्रमाणे जेव्हा उपलब्ध नव्हती, त्या काळात साथींचा संबंध दैवी प्रकोपाशी लावला जात असे. माणसांची पातके, त्यांमुळे होणारे दूषित वातावरण, दूषित शरीरे किंवा आकाशातील ग्रह-ताऱ्यांची बदलती स्थिती यांसारख्या गोष्टींनाही साथींच्या आगमनाबद्दल जबाबदार धरले जाई. अठराव्या शतकात सूक्ष्मजंतू आणि त्यांच्यामुळे होणारे संसर्गजन्य (संक्रामणजन्य) रोग यांची माहिती मिळू लागल्यावर ‘साथीचे आजार’ हा शब्दप्रयोग मुख्यतः तीव्र संक्रामणजन्य विकारांच्या संदर्भात प्रचारात आला; उदा., पटकी (कॉलरा), प्लेग, इन्फ्ल्यूएंझा इत्यादी. विसाव्या शतकात आरोग्याविषयी व्यापक प्रमाणात जाणीव होऊ लागल्यानंतर संक्रामणांखेरीज इतर विकारांचा, तसेच आरोग्य-विघातक घटनांचाही अभ्यास साथींच्या शीर्षकाखाली होऊ लागला; उदा., कर्करोग, मधुमेह, हृदयविकार, रक्तदाब, मनोविकार, अपघात, धूम्रपान, मादक पदार्थांचे सेवन, औषधी पदार्थांचे दुष्परिणाम इत्यादी.

एकोणिसाव्या शतकाच्या मध्याच्या सुमारास इंग्लंडमध्ये पटकी व आंत्रज्वराच्या (टायफॉइडाच्या) साथी वरचेवर उद्‌भवत होत्या. त्यावेळी त्यांचा पद्घतशीर अभ्यास करून प्रतिबंध करण्याच्या उद्देशाने रोगपरस्थितिवैज्ञानिक संस्था स्थापन झाली. लंडन शहराला पिण्याचे स्वच्छ पाणी पुरविणे आणि टेम्स नदीत शहराचे मलयुक्त सांडपाणी न सोडणे यांसाठी आवश्यक ते नियम करण्यात या संस्थेचा पुढाकार होता. सार्वजनिक आरोग्यविषयक स्वतंत्र सरकारी विभाग याच सुमारास स्थापन होऊन साथीच्या रोगांच्या अभ्यासास चालना मिळाली. मुख्यतः तीव्र संसर्गजन्य विकारांच्या प्रतिबंधाचा उद्देश पुढे ठेवून हा अभ्यास होत असतो. त्यातून समाजाचे सर्वसाधारण आरोग्य सुधारुन समाजकल्याणास मदत होत असते.

अशा रोगपरिस्थितिवैज्ञानिक अभ्यासात साथीच्या रोगाची भौगोलिक व्याप्ती आणि समस्येची तीव्रता अचूकपणे जाणून तिची नोंद करण्याचा उद्देश प्राधान्याने सर्वप्रथम असतो. त्याबरोबरच रोगनिर्मितीची सर्व कारणे शोधली जातात; उदा., सूक्ष्मजीवांचा प्रकार, दूषित पाणी किंवा खाद्यपदार्थ, प्रतिकारशक्तीमधील न्यूनता, कुपोषण, हवेचे प्रदूषण, वैयक्तिक आरोग्य-विषयक सवयी इत्यादी. या सर्व अभ्यासातून मिळालेली माहिती संकलित होऊन तिच्या पोश्वभूमीवर आरोग्यसेवेचे नियोजन केले जाते. तसेच या नियोजित सेवेची अंलबजावणी व तिचे मूल्यमापन यांसाठीही अशी माहिती उपयुक्त ठरते.

ही सर्व उद्दिष्टे समोर ठेवून कराव्या लागणाऱ्या अभ्यासाच्या पद्घतीमध्ये काही भाग वर्णनात्मक तर इतर भाग सखोल विश्लेषणात्मक असतो. त्यासाठी सांख्यिकीय सूत्रांचा उपयोग करणे इष्ट असते. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रत्येक रुग्णावर त्वरित उपचार करीत असतानाच असा अभ्यास शांतपणे नियोजित केला जातो. लोकांमध्ये निष्कारण निर्माण होणारे धास्तीचे वातावरण कमी करण्यासाठी अभ्यासाचे निष्कर्ष उपयोगी पडू शकतात. त्यामुळे हा अभ्यास त्वरित सुरु करणे आवश्यक ठरते. पुढील काही प्रश्नांची उत्तरे प्राप्त करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभाग अशा प्रसंगी कार्यरत होतो :

(१) रोगाचा धोका असलेली लोकसंख्या किती आहे व कोणत्या प्रकारची आहे? उदा., शाळकरी मुले, नदीकाठची वस्ती, यात्रेकरु, उपाहारगृहात खाणाऱ्या व्यक्ती इत्यादी. रोगांचे प्रमाण (वारंवारता) निश्चित करण्यासाठी जी छेदस्थानाची संख्या आवश्यक असते ती प्राप्त करण्यासाठी हा आकडा आवश्यक असतो. उदा., एकूण वीस हजार शाळकरी मुलांपैकी एक हजारांना गोवर झाला आहे असे कळू शकले, तर दुसऱ्या एखाद्या ठिकाणच्या प्रमाणापेक्षा हे अधिक आहे किंवा कसे हे ठरविता येते.

(२) रोगाची निश्चिती येत असलेला ताप इन्फ्ल्यूएंझा, डेंग्यू, हिवताप किंवा इतर काही रोगांमुळे आहे? जुलाब, उलट्या ही लक्षणे पटकीची का ग्रॅस्ट्रोची? काविळीचे कारण काय? इन्फ्ल्यूएंझाचा प्रकार कोणता? पूर्वी आलेल्या साथीमधील विषाणू व आताचे विषाणू यात काही फरक आहे का?

(३) साथीचा उद्‌भव केव्हा झाला? आजार किती दिवस टिकत आहे? कोणत्या ऋतूत अधिक रुग्ण आढळतात?

(४) प्रदेशाच्या किंवा शहराच्या कोणत्या भागात उद्‌भव झाला आहे? नकाशा पुढे ठेवून त्यावर साथीच्या प्रगतीची नोंद करणे आवश्यक ठरते.

(५) आजारी पडणाऱ्या व्यक्तींमध्ये प्रामुख्याने कोणत्या प्रकाराचे आधिक्य आहे? वय, लिंगभेद, व्यवसाय, सामाजिक दर्जा व व्यसनाधीनता यांसारखे घटक ओळखू येतात का?

(६) रोगाच्या प्रसाराचे स्वरुप कसे आहे? एकाच ठिकाणी केंद्र आहे की अनेक केंद्रांपासून तो पसरत आहे? लागणीचा वेग मंद आहे की शीघ्र? प्रसारामध्ये प्रवासी व्यक्ती, आहाराचा प्रकार व प्रत्यक्ष संपर्क यांसारख्या घटकांची भूमिका आहे का? उदा., २००३ मधील ‘सार्स’ २००९ मधील ‘स्वाईनफ्ल्यू’ या रोगांत आंतरराष्ट्रीय प्रवास हा महत्त्वाचा घटक होता [⟶ सार्स]. रोगसंक्रामण एखाद्या केंद्राकडून सर्वांना होत आहे का? (उदा., अन्न-विषबाधा); अथवा संक्रा मणाची साखळी आहे का? (उदा., पटकी, आंत्रज्वर इत्यादी).

 

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 7/2/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate