पाश्चात्त्य जगाला सूचिचिकित्सेचा परिचय सतराव्या शतकात झाला. डच वैद्य व्हिल्हेल्म टेन राईन यांनी जपानमधील नागासाकी शहराला भेट देऊन आल्यानंतर या पद्घतीची माहिती यूरोपीय लोकांना करुन दिली व प्रथम ‘ॲक्युपंक्चर’ (सुईने टोचणे) ही संज्ञा प्रचारात आणली. त्यानंतर त्यांनी अशा प्रकारचे उपचार प्रयोगाखातर करुन पाहिले असावेत. फ्रान्समध्ये १८१० मध्ये प्रथम सूचिचिकित्सा स्वीकारल्याची अधिकृत नोंद आढळते. परंतु खुद्द चीनमध्ये मात्र याच काळात पाश्चात्त्यांच्या प्रभावामुळे या तंत्राची पीछेहाट झाली. च्यिंग (मांचू) घराण्याच्या सम्राटांच्या काळात (इ. स. १६४४–१९१२) सूचिवेध हा प्रगतीला अडसर आहे, असे मानून शाही वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये हा विषय प्रथम दुर्लक्षिला गेला आणि १८२२ मध्ये त्याची पूर्ण हकालपट्टी झाली. जनसामान्यांमध्ये प्रिय असलेली ही उपचारपद्घती १९२९ मध्ये पूर्ण बंद झाली. साम्यवादी राजवटीत पारंपरिक वैद्यकाला उत्तेजन मिळू लागल्यावर मात्र सूचिचिकित्सेचे पुनरुज्जीवन झाले आणि बीजिंग, शांघाय व नानकिंग येथे विशेष संशोधन संस्था सुरु करण्यात आल्या.
सूचिचिकित्सेचा प्रारंभ प्राचीन चिनी तत्त्वज्ञानामधील दोन मूलभूत गुणांच्या संकल्पनेतून झाला. यिन व यांग या दोन विरुद्घ गुणांच्या शक्ती शरीरात वास करीत असतात. त्यांच्यामध्ये पूर्ण संतुलन कधीच शक्य नसते. सतत चढ-उतार होत असतात आणि ‘की’ नावाची ऊर्जा (चैतन्य) मेरिडियन नावाच्या वाहिन्याजालांतून वाहत असते. त्यामुळे शारीरिक परिवर्तने होत राहतात. प्रत्येक दिवशी निराळी मनःस्थिती व शारीरिक स्थिती आढळते. परंतु असंतुलित अवस्था दीर्घकाळ टिकल्यास बाह्य विकारजनक शक्तींना संधी मिळते व रोगांची निर्मिती होते, असे या तत्त्वज्ञानाचे प्रतिपादन आहे. यिन या शक्तीचा संबंध स्त्रीत्व, शीतलता, प्रकाश, पृथ्वी, निष्क्रियता आणि स्थितिशीलता (आहे ते टिकवून धरणे) या गुणांशी जोडला आहे. तर यांग ही शक्ती, पौरुष, उष्णता, अंधार किंवा कृष्णवर्ण, स्वर्ग, आक्रमकता आणि नवनिर्मिती यांसारख्या गुणांशी निगडित आहे. प्राचीन शरीरविषयक चिनी विचारांनुसार प्रत्येक अंतर्गत इंद्रियांशी व ऊर्जा वाहणाऱ्या मेरिडियनशी संबंधित असे बिंदू त्वचेच्या पृष्ठभागावर असतात. त्यांच्यावर दाब देऊन किंवा त्यांना उत्तेजित करुन संबंधित इंद्रियांमुळे निर्माण होणाऱ्या विकारांपासून आराम मिळू शकतो. पाच प्रमुख भरीव इंद्रिये म्हणजे हृदय, फुप्फुसे, यकृत, प्लीहा व वृक्क (मूत्रपिंड); या प्रत्येक इंद्रियास जोडलेल्या पोकळ इंद्रियांचाही विचार केलेला आहे. उदा., रक्तवाहिन्या,श्वासनलिका, पित्तवाहिनी, मूत्राशय (प्लीहेच्या बाबतीत अशी वाहिनी वा पोकळ इंद्रिय आधुनिक शरीरशास्त्राच्या दृष्टीने शक्य दिसत नाही). या सर्व भरीव इंद्रियांचे व पोकळ इंद्रियांचे प्रतिनिधित्व त्वचेवरील बिंदूंनी होऊ शकते. त्वचेवरील बिंदूंना जोडणाऱ्या रेखा (रेषा) म्हणजे ऊर्जेच्या वाहिन्या मेरिडियन असतात. त्यातून वाहणारी अतिरिक्त यिन किंवा यांग शक्ती सूचिवेधनाने काढून टाकली जाते आणि संतुलन साधण्यास मदत होते. प्रत्येक इंद्रियाच्या कार्यशीलतेसाठी दोन प्रकारची ऊर्जा आवश्यक असते : (१) बाह्य ऊर्जा जी अन्न, पाणी, वायू इ. जड पदार्थांतून मिळते. (२) ‘की’ नावाची आंतरिक ऊर्जा किंवा चेतना यिन किंवा यांगच्या स्वरुपात पदार्थबाह्य अशी असते. ही आंतरिक ऊर्जेची किंवा चेतनेची संकल्पना मोजमापाने अथवा प्रयोगाने सिद्घ करण्यासारखी नाही.
सूचिचिकित्सेचा विकास सु. ४००० वर्षांपूर्वीच्या दगडी तीक्ष्ण साधनांच्या उपयोगातून झाला असावा असे समजले जाते. त्वचेवरील गळवे फोडण्यासाठी व आतील द्रव काढून टाकण्यासाठी अशा तीक्ष्ण साधनांचा उपयोग होत असावा. बिअनस्टोन या नावाने ओळखले जाणारे हे दगड पुढे कालबाह्य होऊन त्यांची जागा चिनी मातीच्या भांड्यांसारख्या पदार्थांच्या उपकरणांनी व नंतर धातूच्या (चांदी, सोने, लोखंड) सुयांनी घेतली. विविध आकाराच्या २·५–२५ सेंमी. लांबीच्या ९ सुयांचा मूलभूत संच अनेक वर्षे प्रचलित होता. थंड किंवा तापविलेल्या सुया वापरल्या जात. सुई टोचण्याच्या ठिकाणी आणि अन्यत्र मोक्सा नावाच्या वनस्पतींच्या पानांच्या चूर्णापासून केलेले शंकूच्या आकाराचे ज्वलनशील गोळे किंवा सोंगट्या ठेवून त्यांना पेटविण्याचा उपचार (ज्वलन-चिकित्सा) पूर्वी प्रचारात होता. या सर्व उपचारांचे तात्त्विक अधिष्ठान सूचिचिकित्सेवरील पहिला ग्रंथ नाई चिंग सु वेन यापासून पुढे येऊ लागले. इ. स. पू. पाचव्या शतकापासून या ग्रंथाची निर्मिती अनेक लेखकांनी केली असावी. पीत सम्राट ह्वांग टी आणि त्याचा मंत्री ची पाय यांच्यामधील तत्त्वज्ञानविषयक चर्चा त्यात प्रारंभी असल्यामुळे या ग्रंथास पीतसम्राटाचा वैद्यकविषयक अभिजात ग्रंथ या नावानेही ओळखले जाते. इ. स. पू. ४७५ ते २२१ मध्ये या ग्रंथातील तत्त्वज्ञान मांडले गेले. पुढे हान घराण्यातील सम्राटांच्या काळातील नवकन्फ्यूशस विचारांचाही त्यावर प्रभाव पडला. विसाव्या शतकात आधुनिक शरीरक्रियाविज्ञानाच्या आधारे सूचिचिकित्सेचे परिणाम अभ्यासले जाऊ लागले. विशेषतः वेदनाहारक क्रियेचा अर्थ लावण्यात अनेक अभ्यासकांना यश मिळाले आहे.
आकृतीत दाखविल्याप्रमाणे एन्केफॅलीन निर्माण करणाऱ्या कोशिकांना मेरुरज्जूच्या प्रत्येक पातळीवर ए-डेल्टा तंतूकडून उत्तेजन मिळते. त्यामुळे त्या विशिष्ट पातळीवरील वेदनांपासून आराम मिळू शकतो. परंतु ही यंत्रणा इतक्या मर्यादित स्वरुपाची नाही. मेरुरज्जूमधून मेंदूच्या दिशेने जाणारे संदेश जेव्हा अधोथॅलॅमस या मध्यमस्तिष्कीय क्षेत्रात पोहोचतात, तेव्हा अशाच प्रकारचे कार्य घडू शकते. यासाठी उपयुक्त कोशिका मस्तिष्कनालेभोवती (मेंदूच्या आतील भागातील द्रवयुक्त पोकळ नलिकेभोवती) असलेल्या क्षेत्रात आढळतात. तेथेही एन्केफॅलिनाची निर्मिती होते. त्यामुळे निर्माण झालेली वेदना कमी करण्याचे संदेश परत खालच्या दिशेने प्रवास करुन मेरुरज्जूच्या अनेक पातळ्यांवर जिलेटिनी पदार्थांमध्ये पोहोचून वेदनाहरणाचे कार्य करु शकतात. यामुळे सूचि-चिकित्सेचा परिणाम केवळ स्थानिक वेदना तात्पुरत्या मर्यादित न राहता अधिक दूरगामी (परिणामकारक) कशा होऊ शकतात हे स्पष्ट होते. वेदना नसलेल्या परिस्थितीत आणि अंतर्गत इंद्रियांच्या (ज्यांच्या तंत्रिकांना स्वायत्त तंत्रिकात विविध केंद्रांकडून संदेश प्राप्त होत असतात) विकारांचे उपचार करताना, कोणत्या कोशिका कार्यान्वित होतात ते अजून स्पष्टपणे समजलेले नाही.
स्त्रोत: मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 10/7/2020
निरनिराळ्या समाजांत व संस्कृतींत अनेक पद्धती विकसि...
व्याधी निवारण करण्यासाठी वापरण्यात येणारी एक उपचार...