অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

स्‍वैच्छिक रक्‍तदान काळाची गरज

स्‍वैच्छिक रक्‍तदान काळाची गरज

आजच्‍या स्‍पर्धेच्‍या व धकाधकीच्‍या  युगात दिवसेंदिवस वाढणारे अपघात, वाढते औद्योगिकरण व त्‍यांच्‍याशी संबंधित अपघात, दळणवळण अपघात इत्‍यादीमुळे  रक्‍त आणि रक्‍तघटक ही आरोग्‍य सेवेतील आवश्‍यक उपचार प्रणाली झालेली आहे.

आजचा रक्‍तदाता उदयाचा रक्‍त घेणारा असू शकतो किंवा आज रक्‍त घेतलेला रुग्‍ण बरा झाल्‍यावर भविष्‍यात रक्‍तदाता असू शकतो. काहीही अपेक्षा न करता दिलेले रक्‍तदान हे जीवनदान आहे.

रक्‍तदान फक्‍त नातेवाईक व मित्रांनाच न करता अनेक अनोळखी रुग्‍णांना रक्‍त देवून खरी मानवसेवा करता येते.  प्रत्‍येक रक्‍तदात्‍याचे संकलित कलेले रक्‍तपिशवीच्‍या सर्व आवश्‍यक तपासण्‍या केल्‍या जातात. ज्‍यामध्‍ये प्रामुख्याने एचआयव्‍ही, सिफीलीस, मलेरिया, हेपिटायटीस बी तसेच हेपिटायटीस सी इत्‍यादी  तपासण्‍या केल्‍या जातात. त्‍यामध्‍ये  ज्‍या रक्‍तदात्‍याचे रक्‍त दुषित आढळून येईल.  त्‍या रक्‍तदात्‍यांना समुपदेशन करुन त्‍यांना पुढील उपचार तसेच त्‍यांच्‍या संपर्कात असणारे कुटुंबीय यांचीही तपासणी होते व मोफत सल्‍ला दिला जातो.

स्‍वैच्छिक रक्‍तदात्‍यांचे रक्‍त हे धंदेवाईक तसेच रक्‍त विकणा-या रक्‍तदात्‍यांपेक्षा सुरक्षित असते. जास्‍तीत जास्‍त रक्‍तदान करण्‍यासाठी  व्‍यापक जनजागृती कार्यक्रम घेतले जातात.  त्‍यामध्‍ये  रक्‍तदान शिबिरांचे आयोजन केले जाते. रक्‍तदान करण्‍यासाठी औषधी आणि प्रसाधन कायदा 1940 नुसार रक्‍तदात्‍याचे वय 18 व 60 वर्षे असावे. वजन 45 किलोच्‍या वर, पल्‍स रेट 60 ते 100 प्रति मिनीट, रक्‍तदाब नॉर्मल असावा. हिमोग्‍लोबीन 12.5 टक्‍क्‍यांच्‍यावर असावे आणि शरीराचे तापमान 37.5 अंशाच्‍यावर असू नये. या अटी पूर्ण करणारा कोणताही रक्‍तदाता रक्‍तदान करु शकतो.

रक्‍त हे शरीराचा अविभाज्‍य घटक आहे. संपूर्ण मासपेशींना तसेच अवयवांना पोषण व प्राणवायू (ऑक्‍सीजन) देण्‍याचे काम रक्‍त करत असते. गरीब व गरजू रुग्‍णांना रक्‍तदान केल्‍याने त्‍यांचे प्राण आपण वाचवू शकतो असा संदेश देण्‍याचे काम या निमित्‍ताने केले जाते. अनेक गंभीर आजार, अपघात, प्रसूती, कॅन्‍सर(कर्करोग), रक्‍ताशी निगडित गंभीर आजार थॅलासेमिया, सिकलसेल  इत्‍यादीसाठी  रक्‍ताची आवश्‍यकता असते आणि हे सर्व सुरक्षित रक्‍तदानातून वरील सर्व रुग्‍णांना रक्‍त पुरवठा करणे सहज शक्‍य होते.  त्रिपुरा, तामिळनाडू, पश्‍चिम बंगाल आणि महाराष्‍ट्र  ही राज्‍ये राष्‍ट्रीय पातळीवर रक्‍तदान करणारी राज्‍य आहेत.  त्रिपुरा आणि ईशान्‍य राज्‍ये ही 93 टक्‍के ( उच्‍चांक ) रक्‍तसंकलन करणारी राज्‍ये  आहेत. मात्र,  मणीपूर हे सर्वात कमी स्‍वेच्‍छा रक्‍तसंकलन करणारे राज्‍य आहे.

समाजात रक्‍तदानाविषयी असणारे गैरसमज दूर करुन जास्‍तीत जास्‍त लोकांमध्‍ये जनजागृती करुन रक्‍तदान वाढवणे ही आजच्‍या काळाची गरज आहे. यासाठी विद्यार्थी,  तरुणांसह पात्र सर्व (18 ते 60 वर्षे) वयोगटातील रक्‍तदाते यांना या कार्यक्रमात सहभागी केले जाते  तसेच  स्‍वयंसेवी सामाजिक संघटना, आरोग्‍य संस्‍था यांचा सहभागही अत्‍यंत महत्त्वाचा आहे.  सर्व पात्र  रक्‍तदात्‍यांनी जास्‍तीत-जास्‍त संख्‍येने रक्‍तदान करुन राष्‍ट्रीय कार्यात सहभाग नोंदवावा, असे आवाहन असे अहमदनगर जिल्‍हा रुग्‍णालयाचे डॉ. अशोक क. पारधे यांनी केले आहे.  दरवर्षी 1 ऑक्‍टोबर या दिवशी स्‍वैच्छिक रक्‍तदान दिन साजरा करण्‍यात येतो.

रक्‍तदानाचे महत्त्व, रक्‍तदानाची आवश्‍यकता याबाबतचे संदेश विविध माध्‍यमांद्वारे जनतेला देण्‍यात येतात. पहिला रक्‍तदान दिन सन 1975 मध्‍ये इंडियन सोसायटी ऑफ ब्‍लड ट्रान्‍सफ्यूजन अॅण्‍ड इम्‍युन्‍यूटॉलॉजी या संस्‍थेने केला.  ही संस्‍था 22 ऑक्‍टोबर 1971 मध्‍ये स्‍थापन झाली.  या संस्‍थेचे संस्‍थापक सदस्‍य श्रीमती के. स्‍वरुप कृष्‍णा आणि जे.जी जॉली हे होते. या वर्षीच्‍या स्‍वैच्छिक रक्‍तदान दिनाचे बोधवाक्‍य ‘डोनेट ब्‍लड,इट्स अबाऊट लाईफ’ म्‍हणजेच "रक्‍तदान करा, हे जीवनासाठी (जीवनदान देण्‍यासाठी) आवश्‍यक आहे" असे आहे.

  1. संपूर्ण देशात स्‍वेच्‍छा रक्‍तदानाचे महत्त्व  रुजविण्‍यासाठी प्रत्‍येक  नागरिकामध्‍ये जनजागृतीद्वारे प्रयत्‍न करणे.
  2. गरजू रुग्‍णांसाठी  लागणा-या  रक्‍त संकलनाचे उद्दिष्‍टाप्रमाणे रक्‍त संकलन करणे.
  3. शिबीरांचे आयोजन करुन शासकीय, निमशासकीय रेड क्रॉस, नगरपालिका रक्‍तपेढया, खाजगी रक्‍तपेढ्यांमध्‍ये रक्‍तसाठा वाढवणे
  4. रक्‍तदाते स्‍वयस्‍फूर्तीने रक्‍तदान करण्‍याकरिता त्‍यांचे आभार व सत्‍कार कार्यक्रम आयोजित करणे
  5. जे लोक रक्‍तदान करण्‍यास पात्र असूनही रक्‍तदान करत नाही अशा लोकांना रक्‍तदानाचे महत्त्व, फायदे  इत्‍यादी सांगून त्‍यांना रक्‍तदान करण्‍यास प्रवृत्‍त  करणे,
  6. जे रक्‍तदाते फक्‍त आजारी, नातेवाईक  व मित्र रुग्‍णानांच  रक्‍तदान  करतात अशांना शिबिरामध्‍ये रक्‍तदान करण्‍यास प्रवृत्‍त करणे यासाठी विविध उपक्रम अहमदनगर जिल्‍ह्यात राबविण्‍यात येत आहेत.

 

संकलन - राजेंद्र सरग,जिल्‍हा माहिती अधिकारी, अहमदनगर

स्त्रोत - http://rajendrasarag.blogspot.in/2016/10/blog-post_8.html

 

अंतिम सुधारित : 8/3/2023



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate