অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

स्वाईन फ्लू : दक्षता हाच सर्वोत्तम उपाय

स्वाईन फ्लू : दक्षता हाच सर्वोत्तम उपाय

सध्या पाऊस आणि वातावरणातील बदल यामुळे डासांची संख्या आणि परिणामी स्वाईन फ्लूच्या रूग्णांची संख्या वाढ होणे शक्य आहे. इन्फ्लुएंझा हा हवा, खोकला आणि शिंकेद्वारे उडालेल्या थेंबांनी दूषित पृष्ठभागांना स्पर्श केल्याने पसरणारा आजार आहे. स्वाईन फ्लूची लक्षणे दिसताच 48 तासांच्या आत उपचार सुरू करणे गरजेचे आहे. यामध्ये प्रतिकारशक्ती वाढवणे आणि खबरदारी घेणे हेच सर्वोत्तम उपाय आहेत. याबाबत स्वतः काळजी घेणे आणि इतरांना घेण्यास सांगणे गरजेचे आहे. वेळीच खबरदारी घेतली तर यामधून आपला बचावू शकतो.

जिल्ह्यामध्ये स्वाईन फ्ल्यूला प्रतिबंध करण्यासाठी जिल्हाधिकारी वि. ना. काळम यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. आरोग्य विभागामार्फत प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. स्वाईन फ्लूचा होत असलेला प्रसार चिंताजनक असले तरीही स्वाईन फ्लूबाबत वेळीच दक्षता घेतल्यास या साथीच्या रोगावर आपण मात करु शकतो. जिल्ह्यात स्वाईन फ्लूचा प्रतिबंध करण्यासाठी आरोग्य विभाग कटिबद्ध असून आरोग्य यंत्रणा 24 तास सक्रिय झाली आहे.

स्वाईन फ्लू म्हणजे वैज्ञानिक भाषेत ‘इन्फ्लुएंझा एच 1 एन 1’ या आजाराचे रुग्ण जिल्ह्यात आढळून येत आहेत. इन्फ्लुएंझा एच 1 एन 1 विषाणू हवेतून पसरतो व त्याचा अधिशयन कालावधी 1 ते 7 दिवसांपर्यंत आहे.

इन्फ्लुएंझा हा सौम्य स्वरूपाचा आजार आहे. परंतु काही उच्चरक्तदाब, मधुमेह व स्थुलपणा असलेल्या व्यक्तींमध्ये हा आजार गंभीर रूप धारण करू शकतो. दरवर्षी ‘इन्फ्लुएंझा लसीकरण’ हा आजार टाळण्याचा महत्त्वाचा उपाय आहे. उच्च रक्तदाब, मधुमेह असणाऱ्या व्यक्ती, दुसऱ्या व तिसऱ्या तिमाहीतील गरोदर माता, फ्ल्यू रूग्णोपचारात सहभागी डॉक्टर आणि इतर आरोग्य कर्मचारी या अतिजोखमीच्या व्यक्तींनी इन्फ्लुएंझा लस घ्यावी. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय सर्दी तापावरची औषधे घेऊ नयेत.

स्वाईन फ्लूची लक्षणे दिसल्यास त्या व्यक्तीने घाबरुन न जाता शक्य तितक्या कमी लोकांशी संपर्क ठेवून घरी विश्रांती घ्यावी.

फ्लूसारखी लक्षणे आढळल्यास कोमट पाण्यात मीठ टाकून गुळण्या कराव्यात. त्याचबरोबर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार घ्यावा. फ्ल्यूवर प्रभावी औषध उपलब्ध आहे. फ्ल्यूची लक्षणे सुरू झाल्यापासून 2 दिवसात ऑसेलटॅमीवीर हे औषध सुरू करून गोळ्यांचा पाच दिवसांचा पूर्ण डोस घेणे आवश्यक आहे.

स्वाईन फ्लूच्या अतिजोखमीच्या व्यक्तींमध्ये 5 वर्षाखालील मुले आणि त्यातही विशेष करून 1 वर्षाखालील बालकांचा समावेश होतो. जिल्ह्यात स्वाईन फ्ल्यूचा प्रतिबंध करण्यासाठी जिल्हाधिकारी वि. ना. काळम यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राम हंकारे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांनी आवश्यक उपाययोजनांना प्राधान्य दिले आहे. मात्र या रोगास प्रतिबंध करण्यासाठी खालील गोष्टी प्रत्येकाने जाणून घेणे गरजेचे आहे.

इन्फ्लुएंझा व्हायरस काय आहे..?

हा विषाणूंमुळे होणारा आजार आहे. याचा संसर्ग एका माणसापासून दुसऱ्या माणसाला होतो.

लक्षणे...

ताप येणे, डोकेदुखी, अंगदुखी, सर्दी खोकला, घसा दुखणे, अतिसर, उलट्या होणे, श्वास घेण्यास त्रास होणे.

हे करा...

हात सातत्याने साबण व पाण्याने धुवावेत. गर्दीच्या ठिकाणी व संपर्काच्यावेळी रूमाल व मास्क वापरावा. स्वाईन फ्ल्यू रूग्णापासून किमान एक हात दूर रहा. खोकताना, शिकताना तोंडाला रूमाल लावा. भरपूर पाणी प्या. पुरेशी झोप घ्या. पौष्टिक आहार घ्या. पौष्टिक आहार तसेच लिंबू, आवळा, मौसंबी व संत्री तसेच हिरव्या पालेभाज्यांचा आहार घ्यावा व भरपूर पाणी प्यावे. पुरेशी झोप घ्यावी,

हे टाळा...

हस्तांदोलन अथवा आलिंगण, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे घेणे, अफवा पसरविणे, गर्दीमध्ये जाण्याचे टाळावे. फ्ल्यू सारखी लक्षणे अंगावर काढू नका. अतिताण जागरण करू नये, इतस्तत: थुंकू नये.

अति जोखमीचे रूग्ण...

5 वर्षापेक्षा लहान बाळ, 65 वर्षांपेक्षा मोठी व्यक्ती, गर्भवती महिला, हृदयरोग, फुफ्फुसाचे आजार, यकृताचे आजार, मुत्रपिंड, दमा आजार असणाऱ्या व्यक्ती, रक्ताचे व मेंदूचे आजार असणारे रूग्ण, एच.आय.व्ही./एड्सचे रूग्ण, खूप कालावधीसाठी स्टेरॉईड घेणारे व्यक्ती उदा. दमा असलेल्या व्यक्ती..

आजारी असाल तर...

शक्य तितक्या कमी लोकांशी संपर्क ठेवून घरीच विश्रांती घ्या. पातळ पदार्थ मोठ्या प्रमाणात घ्या.

संकलन - शंकरराव पवार

माहिती स्रोत: महान्युज

अंतिम सुधारित : 4/22/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate