অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

स्वाईन फ्लू : नको भीती

स्वाईन फ्लू : नको भीती

सध्या इन्फ्लुएंझा ए एच 1 एन 1 चे रूग्ण मोठ्या प्रमाणावर आढळून येत आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात जानेवारी 2015 पासून आजअखेर स्वाईन फ्लूचे 20 संशयित रूग्ण आढळले आहेत. त्यापैकी 8 रूग्ण स्वाईन फ्लू पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. पैकी एका महिला रूग्णाचा मृत्यू झाला असून, 5 रूग्ण बरे झाले आहेत आणि दोघांवर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. स्वाईन फ्लू संशयित रूग्णांवर योग्य उपचार करण्याकरिता कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जिल्हा शल्यचिकीत्सक यांच्या अधिपत्याखाली स्वतंत्र उपचार कक्ष स्थापन करण्यात आला आहे. जिल्ह्यात फ्लू सदृश्य रूग्णांच्या सर्वेक्षणाची जबाबदारी ग्रामीण भागात जिल्हा आरोग्य अधिकारी यांचा, महानगरपालिका भागात मनपा आरोग्य अधिकारी व नगरपालिका क्षेत्रात जिल्हा शल्यचिकीत्सक यांना देण्यात आली आहे.

इन्फ्ल्युएंझा ए एच 1 एन 1 विषाणू हवेतून पसरतो व त्याचा अधिशयन कालावधी 1 ते 7 दिवसांपर्यंत आहे. स्वाईन फ्लूच्या अतिजोखमीच्या व्यक्तींमध्ये 5 वर्षाखालील मुले आणि त्यातही विशेष करून 1 वर्षाखालील बालकांचा समावेश होतो. त्यामुळे स्वाईन फ्लूला प्रतिबंध घालण्यासाठी शाळांमध्येही उपाययोजना करणे गरजेचे आहे.

सर्व वर्ग शिक्षकांनी वर्ग सुरु करण्यापूर्वी त्यांच्या वर्गातील विद्यार्थ्यांपैकी कोणी फ्लूच्या लक्षणांनी ग्रस्त नाही ना?, याची काटेकोर पाहणी करणे गरजेचे आहे. यामध्ये सर्दीसह अल्पज्वर, अंगदुखी किंवा अंगदुखी शिवाय घसा खवखवणे, डोकेदुखी, उलट्या व जुलाब यासारख्या लक्षणांचा समावेश आहे. जर असा विद्यार्थी आढळल्यास त्याला / तिला त्वरित शाळेच्या वैद्यकीय विभागाकडे पाठवावे. अशा विद्यार्थ्यास/ विद्यार्थिनीस 7 दिवस घरी राहण्याचा व जनसंपर्क टाळण्याचा सल्ला द्यावा. पालकांनी त्यांच्या घरातील इतर मुलांना फ्लूसदृश्य लक्षणे दिसत असल्यास त्यांनाही घरी ठेवणे आवश्यक आहे. मुलांच्या प्रकृतीवर बारकाईने लक्ष ठेवावे. लक्षणांची तीव्रता वाढल्यास अथवा प्रकृतीत बिघाड आढळून त्वरित वैद्यकीय विभागास कळवावे. आवश्यक ते वैद्यकीय उपचार घ्यावेत.

ज्या विद्यार्थी, शिक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांना वैद्यकीय अधिकारी यांनी 7 दिवस घरी राहण्याचा सल्ला दिला आहे, त्यांनी वैद्यकीय देखरेखीखाली उपचार घ्यावेत. तसेच जनसंपर्क टाळावा. लक्षणे बळवल्यास वैद्यकीय विभागास तात्काळ कळविण्यात यावे.
विद्यार्थी, शिक्षक आणि शैक्षणिक संस्थेमध्ये/ शाळेमध्ये काम करणारे कर्मचारी यांनी वारंवार आपले हात साबणाने व पाण्याने स्वच्छ धुवावेत.

शाळेतील सर्वांनी शिंकताना/ खोकताना आरोग्यदायी शिष्टाचार पाळावेत. विद्यार्थी, शिक्षण आणि शाळेमध्ये तसेच शैक्षणिक संस्थेमध्ये काम करणारे कर्मचारी यांनी खोकताना/ शिंकताना तोंडासमोर टिश्शु पेपर/ हात रुमाल धरावा. वापरलेला टिश्शु पेपर स्वतंत्र प्लॅस्टिक बॅगमध्ये टाकावा. ज्या योगे त्याची योग्य विल्हेवाट लावता येईल.

फुफ्फुस, हृदय, मूत्रपिंड अथवा चेतासंस्थेचे जुनाट आजार असणाऱ्या तसेच रक्ताचे विकार असणाऱ्या व्यक्ती या फ्लूच्या दृष्टीने अतिजोखमीच्या गटात मोडतात. त्यामुळे असे अतिजोखमीचे आजार असणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये/ कर्मचाऱ्यांमध्ये जर फ्ल्यू सदृश्य लक्षणे आढळली तर शाळा व्यवस्थापनाने त्यांना ताबडतोब वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून तपासून घेऊन तातडीने उपचार सुरु करावेत आणि वैद्यकीय सल्ल्यानुसार त्यांचे घरगुती रुग्णालय स्तरावर विलगीकरण करावे.

शैक्षणिक संस्थांनी वसतिगृहामध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांची व तेथील कर्मचाऱ्यांची आरोग्य विषयक तपासणी नियमित करावी. वसतिगृहामध्ये फ्लूसदृश्य लक्षणे असणारे विद्यार्थी/ कर्मचारी आढळल्यास व्यवस्थापनाने स्थानिक वैद्यकीय अधिकाऱ्याकडून सर्व विद्यार्थी/ कर्मचाऱ्यांची तपासणी करुन घ्यावी.

सर्व शाळा व शैक्षणिक संस्थांनी त्यांच्या वर्गाची व परिसराची नियमित स्वच्छता ठेवावी. तसेच, एच 1 एन 1 प्रसाराबाबत 'काय करावे व काय करु नये' याबाबतची माहिती महत्त्चाच्या ठिकाणी लावण्यात यावी.

 

- डॉ. बी. डी. आरसूळकर जिल्हा शल्यचिकित्सक, सी. पी. आर. हॉस्पिटल, कोल्हापूर

माहिती स्रोत: महान्यूज, सोमवार, ०२ मार्च, २०१५

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate