অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

ऱ्हीसस घटक

ऱ्हीसस घटक

(Rh किंवा आरएच घटक). बहुसंख्य व्यक्तींच्या रक्तातील तांबड्या कोशिकांच्या (पेशींच्या) पृष्ठावरील पटलात आनुवंशिक रीत्या आलेली अनेक वैशिष्ट्यदर्शक प्रथिनद्रव्ये असतात. ABO या मुख्य रक्तगट पद्धतीशिवाय [मुख्य रक्तगट निदर्शक प्रतिजनांशिवाय; ⟶रक्तगट] आढळणाऱ्या या अनेक घटकांना मिळून Rh घटक असे संबोधण्यात येते. ज्या व्यक्तीच्या रक्तात हे घटक आढळतात त्यांच्या रक्तगटाला Rh-धन (Rh पॉझिटिव्ह) आणि ज्यांच्या रक्तात ते आढळत नाहीत त्यांच्या रक्तगटाला Rh-ऋण (Rh निगेटिव्ह) असे म्हणतात. काही कारणाने Rh ऋण व्यक्तीच्या रक्तात Rh-धन तांबड्या कोशिकांचा प्रवेश झाल्यास हे घटक ⇨प्रतिजन म्हणून कार्य करतात म्हणजेच प्रतिरक्षा (रोगप्रतिकारक्षमता प्रतिक्रियेला चालना देतात. ऱ्हीसस माकडाच्या [मॅकाका म्युलाट्टा; ⟶माकड] रक्तात या प्रकारचा प्रतिजन प्रथम आढळल्याने याला ऱ्हीसस घटक हे नाव पडले असून Rh हे ऱ्हीससचे संक्षिप्त रूप आहे.

भारतामध्ये Rh-धन रक्तगट असलेल्या व्यक्तीची संख्या ९५% असून जगातील इतर काही प्रदेशांतील ही टक्केवारी पुढीलप्रमाणे आहे. कॉकेशियन (यूरोप), कॅनडा व अमेरिकेची संयुक्त संस्थाने येथे ८५% बास्कस (पिरेनीज) ६५ ते ७५% बर्बर (आफ्रिका) व बदायून (सिनाई) ७० ते ८२% वगैरे.फिलिप लेव्हिन व आर्. ई. स्टेटसन यांना १९३९ साली हा घटक आढळला होता. १९४० साली कार्ल लँडस्टायनर व अलेक्झांडर वीनर यांनी ऱ्हीसस माकडाच्या रक्तातील तांबड्या कोशिका अंतःक्षेपणाने (इंजेक्शनाने) सशाच्या रक्तात मिसळल्या. या सशापासून मिळालेला प्रतिरोधक रक्तरस माणसाच्याही तांबड्या कोशिकांविरुद्ध प्रतिक्रिया दाखवतो म्हणजेच ऱ्हीसस माकडाच्या तांबड्या कोशिकांवरील घटकासारखा घटक माणसाच्याही तांबड्या कोशिकांवर आढळतो, हे त्यांनी दाखवून दिले.

त्यांनीच त्याचे ऱ्हीसस घटक असे नामकरण केले. हा घटक प्रतिजनासारखा वागतो व या पहिल्या घटकासारखे कित्येक Rh प्रतिजन तांबड्या कोशिकांवर असतात, हे नंतर कळून आले; परंतु अजूनही Rh प्रतिजनांच्या जीवरासायनिक व रचनात्मक स्वरूपाची पूर्ण माहिती उपलब्ध झालेली नाही. एकसारख्या पद्धतीने वागणाऱ्या अनेक प्रतिजनांचा समावेश व त्यांची आनुवंशिकता यामुळे Rh रक्तगट पद्धती अतिशय गुंतागुतीची झाली आहे. मिळालेल्या माहितीचा आनुवंशिक संदर्भात योग्य अन्ववार्थ लावणे व या सर्व रक्तगटांना आणि त्यामागील आनुवंशिक वस्तुस्थितीला समर्पक नावे देणे याबद्दल अनेक मतभेद आहेत.

इ. स. १९४३ साली आर् .ए. फिशर व आर्. आर्‌. रेस यांनी या संदर्भात सुचविलेल्या सिद्धांतास फिशर-रेस सिद्धांत असे म्हणतात. त्यानुसार Rh प्रतिजनांच्या Cc, Dd, Ee अशा तीन विकल्पीय जोड्यांशी संकेतबद्ध केलेल्या एकमेकांसन्निध संलग्न असलेल्या तीन जनुकांच्या [जीनांच्या; ⟶जीन] साहाय्याने Rh घटकांच्या आनुवंशिकतेचे स्पष्टीकरण देण्याचा त्यांनी प्रयत्न केला. तुलनात्मक सोपेपणा हे या सिद्धांताचे वैशिष्ट्य असले, तरी Rh घटकांच्या आनुवंशिक व रक्तरसवैज्ञानिक गुंतागुंतीचे यथार्थ व पूर्ण स्पष्टीकरण करण्यास तो पुरा पडत नाही. म्हणून उपलब्ध माहितीनुसार Rh आणि इतर अनेक रक्तगट पद्धतीसाठी अनेक विकल्पांच्या संकल्पनेला जास्त पाठबळ मिळत आहे.

जास्त गुंतागुंतीत न शिरता सर्वसाधारणपणे असे म्हणता येईल की, सर्व Rh प्रतिजनांची माहिती अलिंग गुणसूत्रांच्या [⟶ गुणसूत्र] एका जोडीतील (गुणसूत्र १ मधील) आखूड भुजेच्या टोकाला व एकमेकांशी संलग्न असलेल्या जनुकांच्या तीन गटांमार्फत पुढील पिढ्यांत संक्रमित केली जाते. याप्रमाणे जवळजवळ छत्तीस विकल्प माहीत झाले असून त्यांपैकी आठ सर्वसाधारणपणे जास्त आढळतात.Rh रक्तगट पद्धतीमध्ये जवळजवळ तीस रक्तगट निश्चित केले गेले आहेत; परंतु यांतील RhO किंवा D हा एकच रक्तगट सर्वात महत्त्वाचा होय (लँडस्टायनर व वीनर यांना ऱ्हीसस माकडात प्रथम सापडलेला हाच गट होय). कारण हा एकच रक्तगट प्रतिरक्षा प्रतिक्रियेला सर्वाधिक चालना देणारा आणि म्हणून वैद्यकीय दृष्टीनेही सर्वात महत्त्वाचा आहे. सर्वसाधारणपणे याच रक्तगटाच्या अस्तित्वानुसार व्यक्त Rh- धन अथवा Rh- ऋण हे ठरविले जाते.

सर्वसाधारण परिस्थितीत हा घटक व्यक्तीच्या रक्तात असला किंवा नसला तरी त्या व्यक्तीच्या आरोग्यावर या वस्तुस्थितीचा काहीही विपरीत परिणाम होत नाही. कारण प्रति-Rh-प्रतिपिंड नैसर्गिक रीत्या रक्तात आढळत नाहीत; परंतु जेव्हा Rh- ऋण व्यक्तीच्या रक्तात Rh- धन रक्त मिसळते, तेव्हा त्या व्यक्तीत प्रतिरक्षा प्रतिक्रिया निर्माण होते म्हणजेच Rh- धन तांबड्या कोशिकांविरुद्ध प्रति-Rh- प्रतिपिंड (ॲम्लुटिनीन) निर्माण होण्यास सुरूवात होते. दोन प्रकारच्या परिस्थितीत अशी शक्यता निर्माण होते. (१) Rh- ऋण व्यक्तीला Rh- धन रक्त दिले जाणे (रक्ताधान) व (२) Rh-ऋण मातेने Rh-धन अपत्याला जन्म देणे.

Rh-ऋण व्यक्तीला Rh-धन रक्त दिले गेल्यास त्या व्यक्तीच्या रक्तात प्रति- Rh-प्रतिपिंडनिर्मिती सुरू होते. पहिल्या वेळी ग्राहकांमध्ये हे प्रतिपिंड निर्माण होईपर्यंत दात्याचे Rh-धन रक्त विरळ होऊन गेलेले असते व समूहनाद्वारे (एकत्र होऊन पुंजका तयार होण्याद्वारे) उद्‌भवणारी गंभीर प्रतिरक्षा प्रतिक्रिया निर्माण होत नाही; परंतु अशा व्यक्तीला परत Rh-धन रक्त दिल्यास त्याच्या शरीरात आधीच असलेले प्रति- Rh-प्रतिपिंड Rh-धन तांबड्या कोशिकांचे समूहन व नाश करतात. समूहनाने तयार झालेल्या तांबड्या कोशिकांच्या लहान गुठळ्यांमुळे लहान रक्तवाहिन्या चोंदतात व ऊतकांचा (समान रचना व कार्य असलेल्या कोशिकांच्या समूहांचा) ऑक्सिजनाचा पुरवठा बंद झाल्याने ऊतकमृत्यू ओढवतो. तसेच रक्तविलयक (तांबड्या कोशिकांतील रक्तारुण-हीमोग्लोबिन-अलग करणाऱ्या) घातक प्रतिरक्षा प्रतिक्रियेमुळे रक्तविलयनजन्य प्रतिक्रिया (Rh-प्रतिक्रिया) हा गंभीर आजार होऊ शकतो [⟶ रक्ताधान]. यामुळे रोग्याला मृत्यूही येऊ शकतो.

सध्या रक्ताधान करताना A B O या प्रमुख रक्तगटांबरोबरच Rh-रक्तगटाशीही जुळणारेच रक्त वापरले जात असल्याने व शिवाय उलटं जुळणी केली जात असल्याने या प्रकारची परिस्थिती उद्‌भवत नाही (अतितातडीच्या गंभीर परिस्थितीत, Rh-धन अथवा ऋण याचा विचार न करता, Rh-ऋण व्यक्तीला Rh-धन रक्त नाईलाजाने देणे भाग पडते, ही एकच अपवादात्मक परिस्थिती होय).आता दुसऱ्या परिस्थितीचा म्हणजे Rh-ऋण मातेला Rh-धन अपत्य होण्याचा विचार करू. आनुवंशिकेचा विचार केल्यास माता व पिता यांच्या Rh-धन अथवा ऋण असल्यामुळे अपत्य Rh-धन अथवा ऋण असण्याच्या पुढील शक्यता उद्‌भवतात.

आनुवंशिकतेने अपत्याला माता व पिता या दोघांकडून Rh-धन रक्त गटाचा वारसा मिळाल्यास अपत्याचा रक्तगट धन होतो. तसेच एकाकडून धन व दुसऱ्याकडून ऋण गटाचा वारसा मिळाल्यासही अपत्याचा दर्शनी रक्तगट धन होतो आणि दोघांकडूनही ऋण रक्तगटाचा वारसा मिळाल्यास मात्र अपत्य Rh- ऋण रक्तगटाचे होते.

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 7/15/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate