बाळ जन्मल्याबरोबर अर्ध्यातासातच स्तनपान करावे. फक्त सिझेरियन झाले असल्यास आईची भूल उतरल्यावर म्हणजेच चार तासांनी लगेचच स्तनपान करावे. नवजात बालकास रोग होण्याची भीती जास्त असते. बाळ जन्माला येते त्याचवेळी त्याला चोखण्याची क्रिया माहित असते. पहिल्या तसत त्याची चोखण्याची शक्ती जास्त असते. नंतर ती थोडी कमी होते. जन्मानंतर मूल सुमारे पहिला तासभर जागे असते. मग ते झोपी जाते. म्हणून मुलाला जन्मानंतर अर्ध्या तासातच आईने अंगावर पाजावे त्यामुळे गर्भाशय पुन्हा मुळ आकारात यायलाही मदत होते.
चीक घट्ट दुधासारखा असतो. त्याचा रंग लिंबाच्या रंगासारखा पिवळसर हिरवा असतो. दुधामध्ये पहिले तीन ते सहा दिवस हा चीक असतो. चीकातील रोगप्रतिबंधक शक्तीमुळे बाळाचे अनेक रोगांपासून संरक्षण होते. उदा. जुलाब, सर्दी, पडस, खोकला, कान फुटणे, पोलियो, दमा इत्यादी आजारांपासून बाळाचा बचाव होतो. हा चीक पोटात गेल्यामुळे बाळाला शौचास साफ होते आणि पोटातील काळी घाण शौचावाटे आपोआपच बाहेत पडते. चीक जरी घट्ट असला तरी पचायला तो हलका असतो. या चीकामुळे आतड्यात पाचकरस तयार होण्यास मदत होते. चीक व दुधातील अन्न घटक बाळाला पोषक ठरतात. तरीही काही माता तो चीक काढून टाकतात ते चुकीचे आहे. तसेच काही माता तीन दिवस बाळाला पाजातच नाही तेही अगदीच चुकीचं आहे.
आईचे दूध हाच बाळाचा सर्वात उत्तम आहार आहे. आईचे दूध निर्जंतुक असते. आईच्या दुधात प्रथिने स्निग्ध पदार्थ तसेच जीवनसत्त्वे, क्षार आणि रोगप्रतिबंधक घटक असतात म्हणूनच आईच्या दुधाची तुलना इतर कुठल्याही दुधाशी होणार नाही. आईचे दूध पचायला हलके असते. बाळाच्या वाढीस जरूर असणारे सर्व पोषक घटक योग्य त्या प्रमाणात असतात. आईच्या दुधाचे तापमान बाळास योग्य असते. मुख्य फायदा म्हणजे स्तनपानामुळे आई व मुलात शारीरिक आणि भावनिक नाते निर्माण होते. त्यामुळे परस्परातील प्रेम वात्सल्य वाढते. आईने रोज स्वच्छ आंघोळ करून स्तनपान वेळेवर करणे गरजेचे आहे. बाळाला स्तनपान दिल्याने त्याच्या चोखण्यामुळे दूध तयार होण्यास मदत होते.
बऱ्याचवेळा दुध पिताना हवाही पोटात जाते आणि त्यामुळे धेकाराबरोबर उलटीही होते. त्याकरिता दूध पाजून झाल्यावर बाळाला खांद्यावर घेऊन थोपटावे म्हणजे ढेकाराच्या स्वरुपात हवा निघून जाईल व बाळाला उलटी होणार नाही. जर उलटीमधून दूध किंवा दह्यासारखा पदार्थ पडत असल्यास काळजी करू नये पण बाळ अचानकपणे उलटी करू लागले व उलटी हिरवी पिवळी असल्यास ताप असल्यास मात्र डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
दूध पाजण्यापूर्वी हात आणि स्तनांची बोंडे पाण्यानं स्वच्छ करावी. बाळाला पाजताना आईने अवघडून बसू नये. मंदी घालून बसवेल. बाळाचे डोकं वर आपल्या कोपरावर घ्यावे व दुसऱ्या हाताने स्तनाचे बोंड त्याच्या तोंडात दयावे. निजून दूध पाजण्यास हरकत नाही. पण आई व बलाने कुशीवर निजावे. स्तनाचा दाब नाकावर पडल्यास बाळाचा जीव घाबरा होईल. स्तनांची स्वच्छता आईने चांगली ठेवायला हवी. अन्यथा बाळाला व आईला जंतूदोष होऊ शकतो. स्तनांमध्ये गळू झाला असेल तर तिला स्तनांमध्ये दुखू शकते, सूज येते व तापही येत असेल तर डॉक्टरांना दाखवावं. बाळाला पाजण्याच्या आधी व नंतर स्तन व बोंडे नीट पुसून घ्यायला हवीत.
बाळास त्याच्या भुकेप्रमाणे पहावे. आईला भरपूर दूध येत असेल तर बाळ पोटभर दूध पिऊन झोपते. स्तनात उरलेलं दूध काढून टाकावं नाहीतर स्तनात गाठ येऊन स्तनास सूज येते व त्यामुळे बाळास दूध पाजण्यास अडथळा येतो. प्रत्येक स्तनातून दहा मिनिटे दूध पाजावे. बाळाची शांत झोप हे पोटभर दुध पिऊन झाल्याचे लक्षण समजावे.
बाळाला जास्तीत जास्त दिवस अंगावर पाजावे. पहिले सहा महिने तर आईचे दूध हेच बाळाचे अन्न व पाणी असते. पण निदान बाळ दिड ते दोन वर्षाचे होईपर्यंत त्याला अंगावर पाजावे. अंगावर पाजणाऱ्या आईने स्वतःच्या आहाराची काळजी घेतली पाहिजे. तिच्या जेवणात पालेभाज्या, दूध, फळे, मोड आलेली कडधान्ये ह्या गोष्टी असाव्यात. बाळ आनंदी असेल, त्याला शी व्यवस्थित होत असेल व झोपही चांगली येत असेल तर त्याला पुरेसं दूध मिळते असे समजावे.
स्त्रोत : बालसंगोपन, माहिती व शिक्षण मार्गदर्शक पुस्तिका, वॉटरशेड ऑगनायझेशन ट्रस्ट
अंतिम सुधारित : 6/5/2020
या विभागात अ जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे म्हणजेच योग...
डॉक्टर्स आणि नर्सेस एवढेच मनुष्यबळ गृहीत धरून स्वा...
एक किंवा एकापेक्षा अधिक वेळा पातळ अगर पाण्यासारखी ...
अतिसार म्हणजे वारंवार मलप्रवृत्ती होणे, मल पातळ हो...