অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

आपले मूल कुपोषित नाही ना?

मुले हेच राष्ट्राचे भवितव्य असते. मुलांचे आरोग्य, पोषण आणि वाढ हे देशाच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे आहे. कुटुंबाची यात मुख्य जबाबदारी आहे. परंतु भारतात सुमारे 40% मुले कुपोषित आहेत. गरिबी हे याचे एक महत्त्वाचे कारण आहे. पण श्रीमंत कुटुंबातही वेगळ्या प्रकारचे कुपोषण असतेच. कुपोषणाने आरोग्य बिघडते,कार्यक्षमता कमी होते आणि शालेय प्रगती खुंटते. कुपोषणाबद्दल काही महत्त्वाच्या गोष्टी आपण जाणून घेऊ या.

कुपोषणाची कारणे

 • बरेचसे कुपोषण आईच्या पोटातच सुरू होते. आई कुपोषित आणि कमी शरीरभाराची असली तर बाळही कमी वजनाचे होण्याची शक्यता वाढते.
 • जन्मल्यानंतर उशिरा आणि कमी स्तनपान करण्याने बाळाचे पोषण आणि वाढ कमी होते.
 • सहा महिन्यापर्यंत बाळे ठीकठाक दिसतात, त्यानंतर बाळाला स्तनपान कमी पडायला लागते. अशा वेळी पूरक आहारासाठी योग्य सल्ला मिळायला पाहिजे. यानंतर फक्त दूध पुरत नाही आणि पातळ दूध तर अजिबात पुरत नाही.
 • ताप, खोकला, जुलाब वगैरे आजारांनी बाळाची तब्बेत क्षीण होते आणि भूकही कमी होते. यामुळे कुपोषण आणि आजार यांचे दुष्टचक्र सुरू होते.
 • भारतीय बालकांच्या आहारात प्रथिने कमी पडतात. यामुळे स्नायूंची आणि हाडांची वाढ कमी पडते.
 • तिसऱ्या वर्षापर्यंत बाळाच्या वाढीचा पहिला टप्पा पूर्ण होतो. या टप्प्यात वाढ कमी झाली तर पुढे ती पूर्ण भरून येत नाही.

कुपोषण कसे ओळखायचे?

बालकाचे पोषण आणि वाढ तपासण्यासाठी 4 मुख्य पद्धती आहेत.

 • दंडघेर मोजणे ही सगळ्यात सोपी पद्धत. 1-5 वर्ष वयाच्या बालकांमध्ये ही सारखीच लागू पडते. दंडघेर 13.5 से.मी.पेक्षा जास्त असणे चांगले.दंडघेर 11.5 से.मी.पेक्षा कमी असेल तर कुपोषण समजावे. दंडघेर 11.5 ते13.5 च्या दरम्यान मध्यम कुपोषण समजा. मोजमापासाठी साधा टेप किंवा दंडघेर पट्टी वापरा.
 • वयानुसार उंची न वाढणे म्हणजे खुरटणे. खुरटणे म्हणजे दीर्घ कुपोषण असते. सुमारे 20% बालकांची वाढ खुरटलेली आढळते. अपेक्षित उंचीसाठी वयानुसार काही ठोकताळे आहेत. जन्मावेळी 50से.मी. सहा महिन्याच्या शेवटी 65 सेमी 1वर्षाच्या शेवटी 75 सेमी, 2 वर्षाअखेर 85 सेमी, 3 वर्षाअखेर 95 सेमी आणि 4 वर्षाच्या शेवटी 100सेमी उंची योग्य समजावी.यासाठी तक्तेही मिळतात
 • वयानुसार कमी वजन ही सर्वाधिक वापरातली पद्धती आहे. सुमारे 40%बालके अपेक्षित वजनापेक्षा हलकी असतात. कमी वजन म्हणजे शरीरभार आणि वाढ कमी असणे. अपेक्षित वजनासाठी काही ठोकताळे पुढीलप्रमाणे :जन्मावेळी 3 किलो, सहाव्या महिन्याअखेर 6 किलो, 1 वर्षाअखेर 9 किलो,2 वर्षाशेवटी 12 कि. 3 वर्षाअखेर 14 कि. 4 वर्षाअखेर 16 किलो.
 • डोक्याचा घेरदेखील पोषणावर अवलंबून आहे. जन्मावेळी डोक्याचा घेर34से.मी असावा. सहाव्या महिन्याअखेर 42, वर्षाअखेर 45 दुसऱ्या वर्षाशेवटी 47,  तिसऱ्या वर्षाअखेर 49 चौथ्या वर्षाअखेर 50 सेमी अपेक्षित आहे.
 • या मोजमापाशिवाय कुपोषणाच्या काही खाणाखुणाही असतात. उदा.रक्तद्रव्याचे प्रमाण 12 ग्रॅमच्या वर असावे. सुमारे 50% बालकांमध्ये रक्तपांढरी असते. रक्तपांढरी म्हणजे रक्तद्रव्य कमी असणे.

प्राथमिक उपचार आणि प्रतिबंध

 • सहा महिन्यापर्यंत बाळाला केवळ स्तनपान द्यावे. तोपर्यंत इतर काहीही आवश्यक नसते.
 • बालकांना दर 2-3 तासांनी खाणे-पिणे लागते. मोठ्यांप्रमाणे ते 2-3जेवणांवर दिवस काढू शकत नाहीत.
 • सहाव्या महिन्यानंतर शक्यतर अंडे किंवा माशाचा तुकडा खाऊ घालावा.प्राणिज प्रथिने बाळाच्या वाढीसाठी चांगली असतात.
 • आपले कुटुंब शाकाहारी असेल तर शेंगदाणे, सोयाबिन, डाळींचा बालकाच्या आहारात समावेश करावा.
 • बालकांना भरपूर तेलतूप खाऊ द्या. याने ऊर्जा वाढते.
 • साखर आणि गुळानेही ऊर्जा वाढते. जंतांची काळजी करू नका. त्याचा साखर-गुळाशी संबंध नसतो.
 • फळे, भाजीपाला, खारीक, बदाम इ. पदार्थ खायला पचायला सोपे करून भरवा.
 • बालकाची प्रगती आणि वाढ वेळोवेळी तपासून घ्या. यासाठी डॉक्टर किंवा नर्सची मदत घ्या. बाळाला भरवण्याआधी आपले हात धुवायला पाहिजेत.
 • नेहमी संडास वापरा. उघड्यावर संडास केल्याने रोगजंतू पसरून बालकांच्या पोषणाला मार बसतो.
 • बालकांचे आजार ओळखून लवकरात लवकर उपचार करून घ्या.

सूचना

 • गरोदरपणात आईची चांगली काळजी घ्या. त्यामुळे बाळाचे वजन वाढते.आईला योग्य खाणे-पिणे, झोप आणि विश्रांती मिळायला पाहिजे.
 • मुलीचे लग्न योग्य वयातच करा. कमी वयातल्या आयांना कमी वजनाची मुले होतात.
 • बाळाला पाजण्या-भरवण्यासाठी आईला वेळ द्या आणि मदत करा.
 • पाळणाघरे आणि बालसंगोपनाची रजा या राष्ट्रीय गरजा आहेत. ही चैन नाही.
 • बालसंगोपनात आईबरोबर बाबांनीही भाग घ्यायला पाहिजे. हे सर्व कुटुंबाने केले पाहिजे.
 • मुलांना हवं तेवढं खाऊ द्या. खाण्यापिण्याच्या वस्तू त्यांना सहज मिळतील अशा ठेवा.
 • मुलांना तळकट, मसालेदार पदार्थांची सवय लावू नका.

 

लेखक : डॉ. श्याम अष्टेकर (MBBS, MD community Medicine)

संदर्भ : आरोग्याविद्या

अंतिम सुधारित : 6/24/2020© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate