अ जीवनसत्त्वाच्या अभावामुळे होणारे आजार हल्ली कमी झाले आहेत. याला कारण अ जीवनसतवाचा वाटपाचा कार्यक्रम.
या आजारात माशाच्या खवल्यासारखे डाग डोळयाच्या पांढ-या भागावर दिसू लागतात. हे डाग बुबुळाच्या बाहेरच्या बाजूला असतात. पण नाकाच्या बाजूला कधी येत नाहीत. डोळयात काजळ घातल्यावर या खरखरीत भागावर काजळ साचून हा भाग उठून दिसतो. या खवल्यासारख्या भागाला बिटॉटचे ठिपके म्हणतात. (बिटॉट हे एका शास्त्रज्ञाचे नाव आहे.) आता हा आजार फार क्वचित आढळतो.
'अ' जीवनसत्त्वाचे जास्त शक्तीचे तेलकट औषध बाटलीतून मिळते. याचा एक चमचा म्हणजे दोन लाख युनिट असतात. आजाराच्या उपचारासाठी एकूण सहा लाख युनिट द्यावे लागतात (रोज एक चमचा तीन दिवस).मात्र आजार नसल्यास केवळ एक चमचा द्यावे.
रातांधळेपणा टाळण्यासाठी, सर्व मुलांना 5 वर्षापर्यंत दर 6 महिन्यांनी एक चमचा अ' जीवनसत्त्वाचा डोस द्यावा.
'अ' जीवनसत्त्वाअभावी येणारे अंधत्त्व हे पूर्णपणे टाळण्यासारखे आहे. त्यासाठी करायची उपाययोजना ही अतिशय साधी आहे. त्यामुळे मुलाचे आयुष्यभराचे भावी नुकसान टाळता येईल.
उपचार केल्यानंतर रातांधळेपणा, डोळयाचा कोरडेपणा, पूर्ण बरा होतो. पण बिटॉटचे ठिपके एकदा तयार झाले की जात नाहीत. मात्र, बुबुळाचा कोरडेपणा व धूसरपणा जाऊन ते परत पूर्ववत चकचकीत होऊ शकते. पण बुबुळ मऊ पडून फुटले तर परत कधीही दृष्टी येऊ शकत नाही. गरोदर मातेस 'अ' जीवनसत्त्वाच्या अभावामुळे रातांधळेपणा येऊ शकतो. म्हणून गरोदर मातेलाही रातांधळेपणासाठी डोस देणे आवश्यक आहे. बुबुळाचा कोरडेपणा व धूसरपणा ही अंधत्त्वाची पूर्वसूचना समजा. यावर अजिबात वेळ न दवडता उपचार करा. या बरोबरीने जंतासाठी बेंडेझोल हे औषध द्यावे.
'अ' जीवनसत्त्वाची कमतरता टाळण्यासाठी हिरव्या पालेभाज्या, (विशेषत: शेवग्याचा हिरवा पाला, पालक, मेथी, इत्यादी) रंगीत फळे (उदा. गाजरे, टोमॅटो,पपई, आंबा,भोपळा, इ.) व प्राण्यांचे मांस, यकृत, अंडी, मासे उपयोगी आहेत. या सर्व पदार्थांमध्ये'अ' जीवनसत्त्व भरपूर असते.
'ड' जीवनसत्त्वाचा अभाव (मुडदूस)
हाडांमध्ये चुन्याचे क्षार जमून हाडे मजबूत होण्यासाठी 'ड' जीवनसत्त्वाची गरज असते. 'ड'जीवनसत्त्वाची कमतरता असल्यास हाडांमध्ये चुन्याचे क्षार न जमल्याने हाडे दुबळी व मऊ बनतात.
दूध, माशाचे तेल, अंडी, मांस, इत्यादींमध्ये 'ड' जीवनसत्त्व भरपूर असते. सूर्यप्रकाशात (विशेषत: कोवळे ऊन) त्त्वचेखाली 'ड' जीवनसत्त्व त्यार होत असते. म्हणून मुले बाहेर हिंडायच्या वयाची झाली, की मुडदूस आपोआप कमी होतो. बाळास रोज सकाळच्या कोवळया उन्हात 15 मिनिटे ठेवल्यास 'ड' जीवनसत्त्वाची गरज भागते.
'ड' जीवनसत्त्वाची पुडी एकदाच दूधातून द्यावी. 'ड' जीवनसत्त्वाचा डोस दर सहा महिन्यांतून एकदा देता येतो.
'ब' जीवनसत्त्वाचा अभाव
'ब' गटात काही उपप्रकार आहेत.
'ब' गटातील जीवनसत्त्वे ही हिरव्या भाज्या, मोड आलेली धान्ये (उदा. मोड आलेली मटकी, मूग, वाटाणे, हरबरे) दूध, प्राणिज पदार्थात असतात, तांदूळ-गहू यांच्या बाहेरच्या आवरणात 'ब' जीवनसत्त्वे असतात. कोंडा पूर्ण काढून टाकला तर कोंडयाबरोबर ही जीवनसत्त्वे जातात. तसेच भाजी शिजवून वरचे पाणी टाकून दिल्यास या पाण्यात जीवनसत्त्वे निघून जातात. म्हणून धान्याचा कोंडा पूर्ण काढू नये, आणि भाज्या जास्त शिजवून पाणी काढून टाकू नये.
'ब' जीवनसत्त्वाच्या अभावामुळे तोंड येणे. गालांवर चट्टे येणे, तोंडाच्या आत फोड येणे या खुणा दिसतात. ओठांच्या कडा चिराळतात.
'ब' गटातील फॉलिक ऍसिडमुळे गर्भाची वाढ चांगली होते. तसेच रक्तप्रमाण सुधारते. हे जीवनसत्त्व हिरव्या भाजीपाल्यात असते.
उपचार
आईच्या दुधामध्ये 'क' जीवनसत्त्व कमी असते. त्यामुळे सहा महिन्यांनंतर हिरव्या पालेभाजीचा रस, फळाचा रस चालू केला नाही तर बाळाला 'क' जीवनसत्त्व कमी पडू लागते.
सुरुवातीला रोगप्रतिबंधक शक्ती कमी होते व रक्तपांढरीची लक्षणे दिसू लागतात. (रक्तवाढीसाठी लोह, 'ब' जीवनसत्त्व, 'क' जीवनसत्त्व आणि प्रथिने यांची गरज असते.
'क' जीवनसत्त्वाचा अभाव जास्त झाल्यास हाडांना सूज येते व ही हाडे दुखू लागतात. त्यामुळे उचलून घ्यायला गेले तर मूल रडते. छातीच्या फासळयांना मध्यरेषेजवळ दुखरेपणा असतो. सांधे दुखतात, हिरडया सुजतात व त्यांतून रक्त येते.
'क' जीवनसत्त्वासाठी लिंबू, संत्रे, मोसंबी, आवळा, इत्यादी फळे उपयुक्त आहेत. 'क'जीवनसत्त्वाच्या गोळयाही मिळतात. जर वाढलेल्या आजारात उपचार सुरू केले तर दिवसातून 2 ते 3 गोळया 5 दिवस द्याव्यात.
भारत म्हणजे सर्वाधिक रक्तपांढरीचा देश झाला आहे. शालापूर्व वयोगटात 60% मुले रक्तपांढरी ग्रस्त असतात. रक्तपांढरी म्हणजे रक्ताचा फिकटपणा. रक्ताचे मुख्य घटक म्हणजे तांबडया व पांढ-या रक्तपेशी. या सर्व पेशी द्रवपदार्थात तरंगत असतात. रक्ताचा लालपणा,त्याची प्राणवायू सर्व शरीरात पोहोचवण्याची क्षमता ही तांबडया रक्तपेशींवर अवलंबून असते. तांबडया रक्तपेशींचा लालपणा हिमोग्लोबीन नावाच्या रक्तद्रव्यामुळे असतो.
हिमोग्लोबीन तयार होण्यासाठी लोह, प्रथिने, 'ब'आणि 'क' जीवनसत्त्वे यांची गरज असते. त्यामुळे या घटकांची अन्नामधील कमतरता (उदा. निकृष्ट किंवा अपुरे अन्न) हे रक्तपांढरीचे प्रमुख कारण आहे.
रक्तपांढरीला आणखीही काही कारणे असू शकतात.
रक्तस्त्राव - नवीन रक्त तयार होण्याच्या वेगाहून जास्त प्रमाणात रक्तस्त्राव होत असेल (उदा. आतडयातील रक्त शोषणारे हूककृमी, जुनी वारंवार होणारी रक्तीआव, आमांश, गुदाशय बाहेर पडत असेल तर त्याबरोबर होणारा रक्तस्त्राव, इत्यादी) तर रक्तपांढरी उद्भवते.
रक्तनाश - वारंवार होणारा मलेरिया हे महत्त्वाचे सामान्य कारण आहे. (मलेरियामध्ये मोठया प्रमाणावर रक्तपेशी फुटतात). तसेच सिकलपेशी किंवा थॅलॅसीमिया यांसारख्या गंभीर आजारांमध्ये रक्तपेशींचा मोठया प्रमाणावर नाश होतो. अशा व्यक्तीची रक्त तयार करणारी यंत्रणाही दोषयुक्त असते.
बाळाच्या शरीरात साधारण सहा महिने पुरेल इतका लोह खनिजाचा साठा असतो. यामुळे मुलांना सहा महिन्यांपर्यंत सहसा रक्तपांढरी होत नाही. दूध हे पूर्ण अन्न असेल तरी त्यात लोहक्षार व 'क' जीवनसत्त्व अगदी कमी असतात. त्यामुळे पहिले सहा महिने मुलांच्या शरीरातील लोहक्षारांचा साठा रक्तपेशी तयार करण्यासाठी वापरला जातो. सहा महिन्यांनंतर जर वरचे अन्न सुरू केले नाही तर लोहक्षार व जीवनसत्त्वांची कमतरता पडून रक्तपांढरी होते. बाळाच्या आईला रक्तपांढरी असेल तर अशा बाळांच्या शरीरातील लोहक्षारांचे साठे, रक्तपेशी कमी असतात. अशा मुलांमध्ये रक्तपांढरी सहा महिन्यांच्याही आधी दिसते.
आपल्या देशात गरिबीमुळे आहाराचा दर्जा निकृष्ट व अपुरा असतो. त्यातच स्त्रियांच्या दुय्यम अवस्थेमुळे त्यांच्या वाटयाला त्यातीलही अधिक निकृष्ट अन्न येते. तशातच वरचेवर होणारी बाळंतपणे, इतर आजार व त्यांकडे होणारे दुर्लक्ष यामुळे स्त्रियांमध्ये रक्तपांढरी फार मोठया प्रमाणात आढळते. अशा आयांच्या बाळांमध्येही लोहक्षाराचा साठा कमी असतो. अशा मुलांना अन्नपदार्थ सहा महिन्यांत सुरू न केल्यास रक्तपांढरी होते.
लेखक : डॉ. श्याम अष्टेकर (MBBS, MD community Medicine)
संदर्भ : आरोग्याविद्या
अंतिम सुधारित : 6/5/2020
एक किंवा एकापेक्षा अधिक वेळा पातळ अगर पाण्यासारखी ...
प्रत्येकच रोग सर्वानाच होतो असं नाही परंतु बहुतांश...
अतिसार म्हणजे वारंवार मलप्रवृत्ती होणे, मल पातळ हो...
योनिद्वारे रक्तस्रावाची कारणे अनेक आहेत. त्यांचे य...