वजन व उंची वाढण्याचा वेग तीन ते पाच वर्षे या वयामध्ये कमी असतो. प्रतिवर्षी वजनात सुमारे दोन किलो व उंचीत 2-3 इंच (सहा ते आठ सें.मी.) वाढ होते. तीन वर्षानंतर मूल एकेका पायरीवर एकेक पाय ठेवून चढू शकते. पण उतरताना प्रत्येक पायरीवर दोन्ही पाय ठेवत उतरते.उतरताना एका पायरीवर एका पायाचा वापर करायला चौथ्या वर्षी जमते. पाचव्या वर्षी लंगडी घालणे जमते.
तिस-या वर्षानंतर आपले वय सांगणे, मुलगा की मुलगी सांगणे त्याला/तिला जमते.
चौथ्या वर्षानंतर फुलीचे चित्र काढता येते, तर पाचव्या वर्षानंतर तिरपी रेष असलेली आकृती (उदा. त्रिकोण) काढता येते.
अडीच ते तीन वर्षांपर्यंत सर्व दुधाचे दात (पहिले दात) आलेले असतात (एकूण 20)हे दात पडून नवे यायची सुरुवात सहाव्या सातव्या वर्षी होते आणि कायमचे दात येऊ लागतात. 12-13 वर्षांपर्यंत सर्व कायमचे दात येतात. फक्त शेवटची दाढ 17 ते 21 या वर्षात येते. (एकूण दात 32).
वाढ व विकासाचे हे सर्व टप्पे थोडेफार पुढेमागे होऊ शकतात. उदा. जे मूल वेळेवर किंवा वेळेआधीच चालू लागते त्याच्याबाबतीत दात उशिरा येऊ शकतात किंवा बोलणे उशिरा येते. पण वाढीचे अनेक टप्पे उशिरा येत असतील, तर मात्र अधिक तपासणीची गरज असते.
लेखक : डॉ. श्याम अष्टेकर
(MBBS, MD community Medicine)
संदर्भ : आरोग्याविद्या
अंतिम सुधारित : 10/7/2020
डॉक्टर्स आणि नर्सेस एवढेच मनुष्यबळ गृहीत धरून स्वा...
म्हातारपण किंवा दीर्घ आजारपण यामुळे माणूस अंथरुणाल...
अतिसार म्हणजे वारंवार मलप्रवृत्ती होणे, मल पातळ हो...
या विभागात अ जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे म्हणजेच योग...