অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

नवजात अर्भक - 1 ते 7 दिवस

नुकतेच जन्मलेले बाळ (नवजात अर्भक) 1 ते 7 दिवस

बाळाच्या प्रकृतीला धोका

खालील बाबतींत तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

  • बाळाला उलटया होणे.
  • बाळ काळे-निळे पडणे.
  • 48 तास लघवी न होणे.
  • पहिल्या 24 तासांत शौचास न होणे, गुदद्वार बंद असणे.
  • बाळ नीट पीत नसणे, दूध ओढत नसणे.
  • पहिल्या दोन दिवसांतच कावीळ होणे.
  • झटके येणे किंवा हालचाल नसणे.
  • ताप येणे.
  • जन्मवजन दोन किलोपेक्षा कमी असणे.
  • तोंडाशी फेस येणे.

नवजात अर्भकाची तपासणी

श्वसन व रक्ताभिसरण

जन्मल्यानंतर स्वतंत्र श्वसनक्रिया सुरू होणे ही बाळासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट असते. श्वसनाचा मार्ग साफ होऊन मूल जन्मल्यावर प्रथम रडते. तेव्हा श्वसन स्वतंत्रपणे सुरू होते.

  • पहिल्या रडण्यानंतर शांत झालेल्या मुलाचा श्वसनाचा दर प्रत्येक मिनिटाला 30 ते40 इतका असतो. त्यात अनियमित लय असू शकते.
  • त्वचेचा रंग गुलाबी असतो, श्वसनक्रियेत किंवा हृदय व रक्ताभिसरणात काही दोष असल्यास बाळाचे ओठ, डोळयाखालचा भाग, हात, पाय व नखे यांवर निळसर झाक असते.
  • कधीकधी मूल पांढरट व निस्तेज दिसते. असे काही असल्यास मूल रुग्णालयात पाठवावे.
  • श्वसनक्रियेत जर काही दोष असेल तर श्वसनाच्या वेळी बाळाच्या नाकपुडया फुलतात, छातीच्या फासळया आत ओढल्या जातात आणि हनुवटी व मान वरखाली होते.
  • श्वसनात जास्त गंभीर दोष असेल तेव्हा श्वास सोडताना बाळ कण्हते.

विष्ठा

बाळ प्रथम शी (विष्ठा) करते ती हिरवट-काळसर रंगाची असते. पहिले दोन ते तीन दिवस हा रंग टिकतो. प्रथम शी करण्याची वेळ जन्मल्यावर 48 तासांपर्यंत कधीही असू शकते. 4 ते 5 दिवसात काळा रंग जाऊन पिवळी शी होऊ लागते.यात बाळा-बाळात पुष्कळ फरक असतो. काही बाळे दिवसातून 12-15 वेळा शी करतात. याउलट काही बाळे4 ते 7 दिवसात एकदा शी करु लागतात. पिवळी व सैलसर शी असेल तर किती वेळा होते त्याबद्दल चिंता करण्याचे कारण नसते.

खालील तक्रारी आढळल्यास सावधानता बाळगावी.

  • बाळाला शी होत नसेल तर गुदद्वार बाहेरून मोकळे आहे किंवा नाही हे करंगळी घालून तपासावे.
  • तोंडाने फेस अथवा बुडबुडे काढणे आणि पहिल्या 48 तासांत एकदाही शी न करणे ही बाळाच्या पचनमार्गात अडथळा असल्याची चिन्हे असू शकतात.
  • तोंडाने काहीही पाजल्यावर लगेच भडभडून होणारी उलटी किंवा हिरवी उलटी.

लघवी

मुलगा असेल तर लघवीची धार लांब पडते की नाही हे आईस विचारावे. जर लघवीची धार व्यवस्थित असेल तर (लघवीच्या पिशवीपासून ते लघवीच्या जागेपर्यंत) मूत्रमार्गात अडथळा नाही असे समजावे. पहिल्या 24 तासांत लघवी झाली नाही तर तज्ज्ञाकडे पाठवावे.

डोके

पूर्ण दिवस भरून जन्मलेल्या बाळाच्या डोक्याचा आकार बाकी शरीराच्या मानाने मोठा असतो.

जन्मताना डोक्यावर आलेल्या दाबामुळे डोक्याच्या वरच्या भागावर फुगल्यासारखे दिसते. हा फुगीर भाग 24 ते 48 तासांत नाहीसा होऊन डोक्याला सारखेपणा येतो.

डोक्याचा घेर 32-36 से.मी. (सर्वसाधारण 35 से.मी.) असतो.

टाळू

डोक्याची हाडे पूर्ण जुळलेली नसतात. त्यामुळे पुढे शंकरपाळयाच्या आकारात तर पाठीमागे त्रिकोणी आकारात टाळू असते. पुढील टाळू 1 वर्षात व मागील टाळू 1 महिन्यात भरते

हात-पाय

नवजात बाळाचे हात-पाय दुमडलेल्या अवस्थेत असतात व मुठी मिटलेल्या असतात.

शरीरावर चिकटा

जन्मताना बाळाच्या अंगावर बहुधा पांढ-या चिकट पदार्थाचे आवरण असते. जन्मानंतर खूप घासून हा चिकटा काढू नये नाहीतर नाजूक त्वचेला इजा होते. हा चिकटा हळूहळू आंघोळी सोबत 2-3 दिवसात जातो.

वजन

आपल्या देशात नवजात बाळाचे वजन 2 किलो ते 3 किलो (सर्वसाधारणपणे 2.5किलो) असते

संप्रेरकांचे परिणाम

आईच्या शरीरातील स्त्रीसंप्रेरकांमुळे (हार्मोन्स) कधीकधी, सुरुवातीला काही दिवस बाळाचे स्तन मोठे व सुजल्यासारखे दिसतात. त्यातून कधीकधी दूधही पाझरते.

मुलगी असेल तर याच कारणाने (स्त्रीसंप्रेरकांमुळे) योनिमार्गातून एक-दोन दिवस रक्तस्रावही होऊ शकतो.

थोडया दिवसांत हे परिणाम आपोआप थांबतात.

दूध ओढणे

सर्वसाधारणपणे निरोगी बाळ जन्मल्यावर लगेच अंगावरचे दूध ओढू शकते. कमी वजनाचे/दिवसाचे मूल दूध ओढायला दमते.

 

लेखक : डॉ. श्याम अष्टेकर (MBBS, MD community Medicine)

संदर्भ : आरोग्यविद्या

अंतिम सुधारित : 6/9/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate