बाळाचा जन्म झाल्यावर प्रथम त्याची नाळ कापतात. नाळ कापताना खूप काळजी घेणे आवश्यक असते. विळा, सुरी, कात्री वगैरे जे सापडेल त्याने नाळ कधीही कापू नये. नवीन ब्लेड व दोरा १५ मिनिटे पाण्यात उकळत ठेवावा. निर्जंतुक केलेला दोरा घेऊन बेंबीपासून चार बोटं किंवा सुमारे २ इंच अंतरावर दोऱ्याने नाळ बांधून घ्यावी व नवीन ब्लेडने कापावी. नाळेवर हळद-कुंकू, बुक्का, राख पावडर असं काहीही लावू नये.
बाळ जन्मत:च रडले पाहिजे. ते रडले म्हणजे त्याचे नवे जीवन सुरळीत झाले असे समजावे. कारण त्यामुळे त्याची श्वास घेण्याची क्रिया सुरु झाल्याचे लक्षात येते.
जन्मत: बाळाचं वजन निदान अडीच किलो (पाच पौंड) असावे. पाचव्या महिन्यात ते दुप्पट होते, आणि १ वर्षाने तिप्पट होते. बाळाचं वजन अडीच किलो पेक्षा कमी असल्यास डॉक्टरांना दाखवावे.
अपूर्ण वाढीचे मूल कसे ओळखावे ?
बाळंतपण ३७ आठवड्यांच्या आत झालेले असल्यास बाळ अपुऱ्या दिवसांचे समजले जाते. त्याचे वजन २ किलो पेक्षाही कमी असते. उंची १८ इंचापेक्षा कमी असते. तसेच त्याची हालचालही कमी असते व डोकं मोठे असते. रंग लालसर पण हातपाय निळसर असतात अशा बाळांना दवाखान्यात किंवा आरोग्य केंद्रावर नेणे गरजेच असते.साधारणपणे ६-७ दिवसांनी बाळाची नाळ पडते. पहिले ३-४ दिवस त्यातून थोडा स्त्राव येतो. त्यामुळे तिथे ओलसरपणा राहिला किंवा नाळेतून पू येऊ लागला तर त्वरित डॉक्टरांना दाखवावे.
पहिल्या १२ तासाच्या आत बाळाला हिरवट काळसर शी होते. अशी शी ३-४ दिवस होते. एक संपूर्ण दिवस बाळाला शी झाली नाही तर काही व्यंग आहे का ते पहावे व डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. बहुतेक मुले एक-दोन दिवसात शू करतातच. त्यावर लक्ष ठेवावे. कपडे ओले होतात की नाही ते पहावे. लघवीची धार व्यवस्थित असेल तर मुत्रमार्गाला काही अडचण नाही असे समजावे . शू केला नाही तर डॉक्टरांना दाखवावे
.
नवजात बाळकांची काळजी भाग - २ (या पुढील लेखावर जाण्यासाठी कृपया या लिंकवर क्लिक करा)
स्त्रोत : बालसंगोपन, माहिती व शिक्षण मार्गदर्शक पुस्तिका, वॉटरशेड ऑगनायझेशन ट्रस्ट
अंतिम सुधारित : 8/22/2020
एक किंवा एकापेक्षा अधिक वेळा पातळ अगर पाण्यासारखी ...
म्हातारपण किंवा दीर्घ आजारपण यामुळे माणूस अंथरुणाल...
अतिसार म्हणजे वारंवार मलप्रवृत्ती होणे, मल पातळ हो...
डॉक्टर्स आणि नर्सेस एवढेच मनुष्यबळ गृहीत धरून स्वा...