कोष्टक क्र. २. गाय, आई व दोन अर्भक अन्ने यांमधील घटकद्रव्यांचे तुलनात्मक प्रमाण.
घटकद्रव्ये
आईचे दूध
गायीचेदूध
ट्रूफूड अर्भक अन्न
एस. एस. ए. अर्भक अन्न
प्रथिने (%)
१.१९
३.५
१.८
१.५
केसिन (%)
०.४
२.८
०.७
०.६
वसा (%)
३.११
३.८
३.०
३.५
लॅक्टोज (%)
७.१८
४.८
६.६
७.०
कॅलरी मूल्य (प्रती १०० ग्रॅ.)
७१.०
६९.०
६२.०
लोह (मिग्रॅ/१०० ग्रॅ.)
०.२
०.१
०.१३
०.५
फॉस्फरस (मिग्रॅ./१०० ग्रॅ.)
१६.०
९९.०
-
३३.०
कॅल्शियम (मिग्रॅ./१०० ग्रॅ.)
३४.०
१२६.०
९०.०
-
क जीवनसत्व (मिग्रॅ. /१०० ग्रॅ.)
४.०
२.०
-
५.०
अर्भक अन्न तयार करण्यासाठी कधीकधी दुधाबरोबर अनेक प्रकारची धान्ये व कडधान्ये यांचाही उपयोग करण्यात येतो. यांपैकी मोड आलेल्या बार्लीचा (सातूचा) वापर करून तयार केलेली माल्टयुक्त दूध-भुकटी अनेक देशांत सर्रास वापरण्यात येते. अशी भुकटी तयार करताना मोड आलेली बार्ली नियंत्रित तापमानाचा (५०°–८०° से.) वापर करून कोरडी करतात व चाळून मोड वेगळे करतात. उरलेल्या धान्याचे पीठ करून गव्हाच्या पिठाबरोबर पाण्यात मिसळून चांगले घोटतात. यामुळे धान्यातील स्टार्चाचे डेक्स्ट्रिनमध्ये रूपांतर होते. नंतर ते गाळून त्यात दूध, मीठ, खाण्याचा सोडा इ. घालून त्याची भुकटी बनवितात.
अशा विविध प्रकारच्या भुकट्या तयार करताना त्यांत वापरले जाणारे दूध व इतर पदार्थ योग्य त्या प्रमाणात एकत्र करून, एकजीव करून, एकजीव करून तुषार शुष्कन वा रूळ शुष्कन पद्धतीने [वाळविण्याच्या पद्धतीने; ⟶ दूग्धव्यवसाय] त्याचे निर्जलीकरण करण्यात येते आणि ताबडतोब ती भुकटी निर्जंतुक केलेल्या व कथिलाचा मुलामा दिलेल्या डब्यांत निर्वात स्थितीत यंत्राच्या साहाय्याने भरतात व डबे बंद करतात. अशा कारखान्यातील वातावरण व यंत्रसामग्री स्वच्छ व आरोग्य-दृष्ट्या उत्कृष्ट असणे, तसेच उत्पादनासाठी वापरला जाणारा माल उत्तम प्रतीचा व रोगजंतुविरहित असणे आवश्यक असते.
बालक सुमारे ३ महिन्यांचे झाल्यावर त्याच्या चर्वण-शक्तीचा व रुची ग्रंथींचा विकास होऊ लागतो. तसेच त्याला पूर्वीपेक्षा अधिक कॅलरी ऊर्जा, लोह, कॅल्शियम, फॉस्फरस, प्रथिने व जीवनसत्वे यांची जरूरी असते. नुसते दूध वा पर्यायी दूध यांतून त्यांची गरज पूर्ण होऊ शकत नाही. अशा वेळी त्याला सर्व प्रकारचे अन्न पदार्थ शिजवून, चुरून व चवदार बनवून दाटसर स्वरूपात खावयास देणे इष्ट ठरते. सामान्यतः बालक ज्या कुटुंबात वाढत असते त्या कुटुंबातील प्रौढाचे अन्न चुरून हळूहळू त्याला भरविण्यास हरकत नाही. तथापि सर्वसामान्यतः हे अन्न नेहमीच संतुलित असेल असे नाही व त्यामुळे त्यावर वाढणाऱ्या बालकाचे पोषण योग्य तऱ्हेने होऊ शकत नाही. म्हणून अशा वयोगटातील बालकांसाठी जी खाद्ये तयार करण्यात येतात त्यांना शिशुखाद्ये असे म्हणतात. ह्या शिशुखाद्यांमुळे बालकांची अंगावर पिण्याची सवय हळूहळू सोडविता येते. ही खाद्ये बनविण्यासाठी तृणधान्ये, कडधान्ये, फळे, भाज्या, मांस, मासे, तेलबिया इत्यादींचा वापर करण्यात येतो. तृणधान्ये वापरून तयार केलेली शिशुखाद्ये सर्वसामान्यतः बालकांचा पहिला घट्ट (घनरूपातील) आहार म्हणून वापरली जातात. अशा शिशुखाद्यांत तांदूळ, गहू, मका, बार्ली, ओट इ. धान्यांची पिठे, शुष्क यीस्ट [⟶यीस्ट], गव्हाचे मोड, जीवनसत्वे (विशेषतः क, अ, ब१२, ब६, फॉलिक अम्ल, निअॅसीन), फॉस्फरस व कॅल्शियम यांसाठी डाय वा ट्राय कॅल्शियम फॉस्फेट, लोहासाठी सोडियम आयर्न पायरोफॉस्फेट, पाणी इत्यादींचे योग्य प्रमाणातील पातळसर मिश्रण वापरून रूळ शुष्कन पद्धतीने त्याचे निर्जलीकरण केले जाते. निर्जलीकरणासाठी वापरण्यात आलेल्या उष्णतेमुळे मिश्रण शिजविले जाऊन सुकल्यावर त्याचे हलके व लुसलुशीत पापुद्रे तयार होतात आणि अनेक अर्भक अन्नांप्रमाणेच भुकटी करून ते डब्यात भरतात. ही भुकटी गरम दुधात वा पाण्यात योग्य प्रमाणात कालवून मऊ व दाटसर स्वरूपात भरविली जाते. अशा शिशुखाद्याचे पोषणमूल्य त्यात वापरलेल्या अन्नपदार्थांवर व ते भरविण्यासाठी कशात कालविले आहे ह्यांवर अवलंबून असते आणि डब्यावर देण्यात आलेल्या सूचनेप्रमाणे ते तयार करणे आवश्यक असते.
याशिवाय मोड आलेली ज्वारी, नाचणी, बार्ली इत्यादींचे पीठ, शेंगदाणे, सोयाबीन यांचे दूध वा त्यांच्या प्रथिनयुक्त पेंडीपासून मिळणारे पीठ इत्यादींमध्ये वसायुक्त पदार्थ, जीवनसत्वे, लवणे, साखर इ. पदार्थ विशिष्ट प्रमाणात घालून तयार केलेली प्रथिनसमृद्ध खाद्ये सर्वत्र वापरात आहेत. मात्र अशा शिशुखाद्यांत वापरलेल्या रसायनांची नावे त्यांच्या डब्यावर स्पष्टपणे नमूद करावी लागतात. कोष्टक क्र. ३ मध्ये काही भारतीय व अमेरिकन शिशुखाद्ये व त्यांतील पोषण घटकांचे प्रमाण दिलेले आहे.
तंतुविरहित बालक अन्ने पुढील प्रकारांत उपलब्ध आहेत : (१) तंतुविरहित फळांचे रस : एक वा अनेक प्रकारच्या फळांचे रस व क जीवनसत्व यांपासून तयार केलेली बालक अन्ने; (२) तंतुविरहित फळांचे गर : फळांचे गर, साखर, सायट्रिक अम्ल, मीठ, रूपांतरित स्टार्च यांपासून तयार केलेली; (३) तंतुविरहित भाज्या : (अ) साध्या व (आ) मलईयुक्त : भाज्या, दुधातील घन पदार्थ, साखर, रूपांतरित स्टार्च यांपासून तयार केलेली; (४) तंतुविरहित रस्सा (सूप) : वेगवेगळी फळे, भाज्या, मांस, कोंबडी इत्यादींपासून तयार केलेली; (५) तंतुविरहित मांस : कोंबडी, मेंढी, बकरी, डुक्कर, टर्की इत्यादींच्या मांसांपासून तयार केलेली; (६) तंतुविरहित अंड्यातील बलक; (७) तंतुविरहित पुडिंग व डेझर्ट (भोजनोत्तर उपाहार) : साखर, रूपांतरित स्टार्च, दूध-भुकटी इत्यादींपासून तयार केलेली. कोष्टक क्र. ४ मध्ये काही अमेरिकन तंतुविरहित बालक अन्ने व त्यांतील पोषण घटकांचे प्रमाण यांची माहिती दिलेली आहे.
कोष्टक क्र. ४. काही अमेरिकन तंतुविरहित बालक अन्ने, त्यांचे पोषण मूल्य व त्यांतील पोषण घटकांचे प्रमाण |
|||||||
तंतुविरहित बालक अन्नाचा प्रकार |
कॅलरी मूल्य/१०० ग्रॅ. |
आर्द्रता % |
प्रथिने % |
वसा % |
कार्बोहायड्रेटे % |
लवणे %(राख) |
तंतुमय पदार्थ % |
फळांचे रस |
६४.० |
८३.८ |
०.३ |
०.३ |
१५.१ |
०.३ |
०.२ |
फळांचे गर |
८६.० |
७७.८ |
०.३ |
०.२ |
२०.८ |
०.३ |
०.६ |
भाज्या |
|
|
|
|
|||
(अ) साध्या |
४०.० |
८८.७ |
१.४ |
०.२ |
८.२ |
०.९ |
०.६ |
(आ) मलईयुक्त |
६१.० |
८४.९ |
२.० |
०.८ |
१०.६ |
१.१ |
०.६ |
मांस |
१११.० |
७८.६ |
१३.६ |
६.१ |
०.५ |
१.२ |
० |
अंड्यातील बलक |
२०२.० |
७०.३ |
१०.४ |
१७.६ |
०.३ |
१.४ |
० |
रस्सा |
५६.० |
८६.९ |
२.४ |
१.८ |
७.६ |
१.० |
०.३ |
पुडिंग |
८९.० |
७७.२ |
१.२ |
०.८ |
२०.३ |
०.५ |
०.२ |
सामान्य बालकांच्या पोषणासाठी वापरता येणारी व वर वर्णन केलेली बालक अन्ने ही अकाल-प्रसव बालके वा काही आनुवंशिक विकृती असलेली बालके यांच्या पोषणासाठी वापरता येत नाहीत. अकाल-प्रसव बालकांचा जन्म अपुऱ्या दिवसांनी झालेला असल्यामुळे गर्भावस्थेतील त्यांची वाढ सर्व दृष्टींनी अपूर्ण असते. सामान्य बालकांपेक्षा दूध ओढणे व गिळणे त्याला अवघड जाते. तसेच पचनक्रियेस उपयुक्त असे पाचकरस योग्य प्रमाणात तयार होत नसल्यामुळे अन्नाचे पचन व त्यातील घटकांचे शोषण कमी प्रमाणात होत असते. अशा बालकांना 'आईचे दूध हे सर्वोत्कृष्ट अन्न आहे', हे सर्वमान्य असले, तरी अलीकडील संशोधनांवरून या अन्नाबरोबरच बाहेरून त्याला जीवनसत्वे, लवणे व प्रथिने योग्य प्रमाणात भरविण्याची आवश्यकता असल्याचे आढळून आले आहे. त्याचप्रमाणे साध्या दुधाऐवजी त्यात पुरेसे लॅक्टिक वा सायट्रिक अम्ल घालून तयार केलेले अम्लीकृत दूध अशा बालकांना पचण्यास सुलभ होते. इंग्लंडमध्ये अशा प्रकारच्या उपलब्ध असलेल्या ‘लॅसिडॅक’ या दुग्धान्नात सु. ०.४ % लॅक्टिक अम्ल वापरले जाते. सर्वसामान्य बालकांना अतिसारासारखे रोग झाल्यास नेहमीचे बालक अन्न पचणे कठीण जाते. अशा वेळीही अम्लीकृत दुग्धान्नांचा चांगला उपयोग होतो.
आनुवंशिक विकृतींपैकी ‘लॅक्टोज असह्यता’ व ‘फिनिल कीटोनमेह’ [फिनिल अॅलॅनीन या अॅमिनो अम्लाच्या चयापचयात-शरीरातील भौतिक-रासायनिक घडामोडींत-बिघाड झाल्यामुळे मूत्रातून फिनिल कीटोन हा पदार्थ उत्सर्जित होणारी जन्मजात विकृती; ⟶ फिनिल अॅलॅनीन] या दोन विकृतींत बालकांना खास बालक अन्ने द्यावी लागतात. लॅक्टोज असह्यता या विकृतीत बालकाच्या शरीरात लॅक्टेज हे एंझाइम [जीवरासायनिक विक्रिया घडून येण्यास मदत करणारे प्रथिन; ⟶ एंझाइमे] अपुरे असते. त्याच्या अभावी लॅक्टोज पचविता येत नाही व दुधाच्या सेवनाने अतिसार, जुलाब होणे, वजन कमी होणे, कृशता इ. लक्षणे दिसू लागतात. अशा वेळी ज्यांत लॅक्टोज नाही अशी सोयाबीन. शेंगदाणे इत्यादींपासून तयार केलेली दुग्धान्ने वापरणे किंवा मांस, अंडी यांवर आधारित अशी बालक अन्ने वापरणे इष्ट ठरते. अमेरिकेत प्रचलित असलेल्या अशा एका बालक अन्नात कोंबडीचे पिलू, ग्लुकोज, यीस्टचा अर्क, चरबीयुक्त पदार्थ, जीवनसत्वे व लवणे वापरतात; तर ‘मॉल्स’ मिश्रणात तांदूळ, अंडी, ग्लुकोज. मीठ, खाण्याचा सोडा हे पदार्थ वापरले जातात. भारतात उपलब्ध असलेले लॅक्टोडेक्स हे बालक अन्न सौम्य स्वरुपात लॅक्टोज असह्यता असलेल्या बालकांना उपयुक्त आहे. फिनिल कीटोनमेह या विकृतीत फिनिल अॅलॅनीन ह्या अॅमिनो अम्लाच्या चयापचयाच्या क्रियेत फिनिल अॅलॅनीन हायड्रॉक्लिलेज या एंझाइमाच्या अभावामुळे अडथळा निर्माण होतो व मानसिक अपंगत्व येते. अशा बालकांना ज्यांत फिनिल अॅलॅनीन कमी आहे अशी खाद्ये द्यावी लागतात. सर्वसाधारणतः बालकाला अर्भकावस्थेत त्याच्या वजनाच्या प्रत्येकी किलोग्रॅमला दररोज २५ मिग्रॅ., तर शिशु- अवस्थेत १० मिग्रॅ. इतक्या फिनिल ॲलॅनिनाची आवश्यकता असते. त्यामुळे अर्भकाच्या द्रव आहारात आवश्यक प्रमाणात फिनिल अॅलॅनीन असलेले जलीय विच्छेदित (पाण्याची विक्रिया करून अलग झालेल्या घटक द्रव्यांनी युक्त असे) केसीन, चरबी, कार्बोहायड्रेटे व लवणे यांचा वापर केला जातो, तर चार महिन्यांनंतर हळूहळू घन आहार देण्यास सुरुवात झाली की, योग्य प्रमाणात फिनिल अॅलॅनीन असलेले जलीय विच्छेदित प्रथिन, इतर प्रथिने (दूध, मांस, मासे यांतील), फळे, भाज्या इत्यादींचा वापर करून तयार केलेल्या लापशीसारख्या आहाराचा वापर केला जातो. भारतात अशी बालक अन्ने मिळत नाहीत. पाश्चात्य देशांतील ‘सायमोग्रान’ या बालक अन्नात कार्बोहायड्रेटे ३८.५%, वसा ९%, प्रथिने २९%, कॅलरी मूल्य ४००, फिनिल अॅलॅनीन १० मिग्रॅ., तर ‘लोफेनलॅक’ मध्ये कार्बोहायड्रेटे ५७%, वसा १८%, प्रथिने १५%, फिनिल अॅलॅनीन ८० मिग्रॅ. आणि ‘मिनाफेन’ मध्ये कार्बोहायड्रेटे ४८%, वसा ३१%, प्रथिने १७.५%, कॅलरी मूल्य ५५०, फिनिल अॅलॅनीन २० मिग्रॅ. अशी घटक द्रव्ये असतात.
बालक अन्नांची निर्मिती ही, भारतात म्हैसूर येथील सेंट्रल फूड टेक्नॉलॉजिकल रिसर्च इन्स्टिट्यूटने ती बनविण्याचे तंत्रज्ञान १९५८ मध्ये शोधून काढल्यावर, सुरू झाली. तोपर्यंत भारताची गरज आयात करूनच भागविली जात होती. १९५८ मध्ये गुजरातमधील आणंद येथील 'खेडा जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघा'च्या कारखान्यात अर्भक अन्नाचे उत्पादन सर्वप्रथम करण्यात आले आणि नंतर अनेक कारखान्यांतून त्यांचे उत्पादन सुरू झाले. भारतात मुख्यत्वे म्हशीचे दूध उपलब्ध असल्याने त्यापासून बालक अन्न तयार करण्यासाठी पाश्चात्य तंत्रज्ञान वापरताना भारतीय शास्त्रज्ञांना त्यात बरेच बदल करावे लागले. आज असे अत्याधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध असूनही स्वस्त व मुबलक दुधाच्या पुरवठ्याचा अभाव, वाहतुकीच्या गैरसोयी, आवेष्टनावरील निर्बंध इ. विविध अडचणींमुळे भारतात इतर देशांच्या मानाने बालक अन्नांचे उत्पादन बरेच कमी आहे. अर्भक अन्ने व शिशुखाद्ये अशी दोनच प्रकारांची बालक अन्ने तयार करण्यात येतात. तथापि सर्वसामान्यांना न परवडणारी किंमत, बालकांच्या पोषणाच्या पूर्वापार चालत आलेल्या पद्धती, बालक अन्नाविषयीचे अज्ञान इ. बाबींमुळे लोकसंख्येच्या मानाने मागणी फारच कमी आहे. शासनातर्फे खेडेगावातून राबविल्या जाणाऱ्या अनेक बालकल्याणकारी योजनांमुळे बालक अन्नांचा ग्रामीण भागात थोडाफार प्रसार होत आहे.
भारतात अर्भक अन्ने व शिशुखाद्ये यांचे उत्पादन केले जाते. भारतातील अशा बालक अन्नांची निर्मिती करणाऱ्या कारखान्यांची संख्या व त्यांचे उत्पादन कोष्टक क्र. ५ मध्ये दिलेली आहे.
कोष्टक क्र. ५. भारतातील बालक अन्ने तयार करणाऱ्या कारखान्यांची संख्या व त्यांचे उत्पादन. |
||||
बालक अन्नाचा प्रकार |
वर्ष |
कारखान्यांची संख्या |
उत्पादनक्षमता(टन) |
प्रत्यक्ष उत्पादन(टन) |
अर्भक अन्न |
१९७६ |
१० |
२९,५७८ |
२६,३२१ |
१९७७ |
११ |
२९,९७८ |
२९,६८३ |
|
१९७८ |
१५ |
४८,९९८ |
३७,५४३ |
|
शिशुखाद्ये व |
१९७६ |
६ |
८,९५१ |
६,५०० |
प्रथिन समृद्ध खाद्ये |
१९७७ |
८ |
१०,८१५ |
२,४९२ |
१९७८ |
१० |
११,९१५ |
४,५०७ |
भारतात तयार होणाऱ्या दूध-भुकटीतील घटक द्रव्यांची सरासरी टक्केवारी कोष्टक क्र. ६ मध्ये दिली आहे.
यांशिवाय ‘भारतीय एमपीएम’ (शेंगदाणा पीठ, हरभऱ्याच्या डाळीचे पीठ, कॅल्शियम कार्बोनेट, जीवनसत्वे यांनी युक्त), 'सेंट्रल फूड टेक्नॉलॉजिकल रिसर्च इन्स्टिट्यूट'ने तयार केलेली ‘बाल-आहार’ (गव्हाचे पीठ, भाज्या, तैलहीन पेंडीचे पीठ, कॅल्शियम, जीवनसत्वे यांनी युक्त) व ‘लॅक्टोन’ (शेंगदाणा पीठ, मलई काढलेल्या दुधाची भुकटी, गहू व बार्ली पीठ, कॅल्शियम, जीवनसत्वे यांनी युक्त), कर्णाल (हरियाना) येथील नॅशनल डेअरी रिसर्च इन्स्टिट्यूटचे ‘सोय-व्हे फूड’ ही बालक अन्ने भारतात तयार करण्यात येतात.
भारतीय मानक संस्थेने बालक दुग्धान्नांसाठी केलेले मानक (आय. एस. १९४७ -१९६८ ) पुढीलप्रमाणे आहे (त्यात इतर जोड रसायनांचा वापर करण्यास मनाई आहे) : आर्द्रता ३.५%, प्रथिने २०.५% (किमान), कार्बाहायड्रेटे ३५.०% (किमान), वसा १८.२८%, लवणे ८.५% (कमाल), विद्राव्यता निर्देंशांक ९५.५% (तुषार पद्धती), ८५. ०% (रूळ पद्धती), अ जीवनसत्व १,५०० आंतरराष्ट्रीय एकके (किमान), ड जीवनसत्व ४०० आंतरराष्ट्रीय एकके (किमान), लोह ४ मिग्रॅ., बॅसिलस कोलाय सूक्ष्मजंतूंची संख्या १० प्रती ग्रॅम (कमाल) व एकूण सजीव सूक्ष्मजंतूंची संख्या ५०, ००० प्रती ग्रॅम.
कोष्टक क्र. ६. भारतात तयार होणाऱ्या दुध-भुकटीतील घटक द्रव्यांची सरासरी टक्केवारी |
|||||||
दुग्धान्नाचे नाव |
प्रथिन % |
कार्बोहायड्रेटे % |
वसा % |
आर्द्रता % |
लोहमिग्रॅ./१०० ग्रॅ. |
कॅल्शियम % |
फॉस्फरस % |
लॅक्टोजेन |
२१.६ |
५०.८ |
१९.० |
३.० |
६.०० |
* |
* |
अमूल स्प्रे |
२२.० |
५०.० |
१८.० |
* |
४.०० |
१.०० |
०.८ |
मधू स्प्रे |
२२.० |
५०.० |
२०.० |
३.५ |
७.१४ |
१.०० |
०.५ |
ऑस्टर मिल्क |
२५.५ |
४६.० |
२०.० |
* |
४.०० |
* |
* |
इंडेक |
२२.० |
५०.० |
१८.० |
१.८ |
४.०० |
* |
* |
सपन |
२१.० |
५२.५ |
१८.० |
* |
४.०० |
१.०० |
०.८ |
लिव्हर्स बेबी फूड |
२६.० |
४६.९ |
१९.० |
* |
४.०० |
१.३३ |
०.८ |
लॅक्टोडेक्स |
१४.५ |
२०.० |
६.५ |
३.५ |
* |
* |
|
** आकडे उपलब्ध नाहीत. |
भारतातून बालक अन्नांची निर्यात बहारीन, संयुक्त अरब अमीर राज्ये, कुवेत, सौदी अरेबिया, अमेरिकेची संयुक्त संस्थाने, कॅनडा, बांगला देश, नेपाळ, श्रीलंका, फ्रान्स, नायजेरिया इ. देशांना करण्यात येते. मार्च १९७९ ते मार्च १९८०, या काळात अर्भक अन्नांची (दुग्धान्नांची) निर्यात सु. ८८,७०० किग्रॅ. (सु. २२.७ लक्ष रु.) व माल्टयुक्त दुग्धान्नांची निर्यात सु. ८,३०,३०० किग्रॅ. (सु. १.५५ कोटी रु.) इतकी करण्यात आली.याउलट बेल्जियम, प. जर्मनी, ब्रिटन व अमेरिका येथून दुग्धान्नांची सु. ११,११,६०३ किग्रॅ.ची (सु. १.८६ कोटी रुपये) व माल्टयुक्त दुग्धान्नांची सु. २०,७२,०९६ किग्रॅ.ची (सु. ९० लक्ष रुपये) आयात मार्च १९७९ ते मार्च १९८० या काळात भारतात करण्यात आली.
याउलट बेल्जियम, प. जर्मनी, ब्रिटन व अमेरिका येथून दुग्धान्नांची सु. ११,११,६०३ किग्रॅ.ची (सु. १.८६ कोटी रुपये) व माल्टयुक्त दुग्धान्नांची सु. २०,७२,०९६ किग्रॅ.ची (सु. ९० लक्ष रुपये) आयात मार्च १९७९ ते मार्च १९८० या काळात भारतात करण्यात आली.
विकसनशील देशांत बालक अन्नांनी पदार्पण केलेले असले, तरी ते होताना या उद्योगाच्या स्वतःच्या आचारसंहितेचा कित्येकदा भंग झाल्याचे आढळून आले आहे. असे सु. १,००० भंग इंटरनॅशनल बेबी फूड अॅक्शन नेटवर्क या संस्थेकडे नमूद केले आहेत. हे सर्व भंग पाश्चात्य देशांतील उत्पादकांनी केलेले आहेत, असे आढळून आले आहे. विकसनशील देशांतील अडाणी जनतेला 'कोणत्याही कंपनीच्या बालक अन्नांची विक्री करू दिल्या जात नाही' असे या आचारसंहितेत नमूद केले आहे. अशा देशांतील बालकाना दूध तयार करण्यासाठी व ते पाजण्याच्या बाटल्या धुण्यासाठी जे पाणी वापरले जाते ते अशुद्ध असते आणि बालक अन्न कसे तयार करावे याचे पुरेसे ज्ञान दिले जात नाही या कारणांमुळे आढळणारे तेथील बालकांचे मृत्यूप्रमाण इतर कारणांपेक्षा जास्त असल्याचे दिसून आले आहे. शिवाय हे बालक अन्न लहान मुलांना पचेल असे नसते. ह्यामुळे त्या देशांत बालक अन्नाची विक्री करू नये, असे आचारसंहितेत म्हटलेले आहे. याच नियमाचा मुख्यतः भंग होत आहे. यासाठी ⇨ जागतिक आरोग्य संघटनेने काही संहिता व नियम केलेले आहेत; पण त्याला उत्पादकांनी विरोध दर्शविला आहे यामुळे काही विकसनशील देश बालक अन्नांच्या विक्रीस बंदी घालणारे कायदे करण्याच्या मार्गावर आहेत.
--------------------------------------------------------------------------------------
स्त्रोत: मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 6/5/2020
कृषी, अन्न व सहकार विभागातून पुरवठा विभाग स्वतंत्र...
कृषी, अन्न व सहकार विभागातून पुरवठा विभाग स्वतंत्र...
अन्नपदार्थातील काही घटक काढून घेणे. उदा. दुधातील स...
अन्न आणि औषधे यांचे प्रमाणीकरण करून, त्यांच्या निर...