অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

बालकांचे आरोग्य :आयुर्वेदविचार

बालकांचे आरोग्य :आयुर्वेदविचार

बाळघुटी

मुलांच्या आरोग्यासाठी'बाळकडू' या नावाने ओळखला जाणारा औषधांचा गट खूप उपयोगी पडतो. या गटात कडू आणि तिखट चवीची औषधे असतात. हे पदार्थ पाण्यात उगाळून बाळाला दोन वेळा चाटवले जातात. अशी औषधे परंपरेने घराघरांतून चालत आली आहेत.

बाळघुटीमध्ये वेखंड, बाळहिरडे,हळकुंड, काकडशिंगी, बेहडा,मुरुडशेंग, जायफळ, चिंचोका,खारीक, बदाम यांसारखे घटक असतात.

ही औषधे टिकाऊ स्वरूपात ठेवता येतात. ही औषधे सहाणेवर उगाळून त्यांचे सूक्ष्म अंश बाळाला रोज चाटवता येतात.

बाळाची छाती कफाने भरत असल्यास वेखंड वापरावे. स्वच्छ दगडावर मध (एक चमचा) टाकून वेखंडाची कांडी त्यात उगाळून तयार करावे. हे चाटण बाळास चाटवल्यास बाळाला चिकट फेसकट उलटी होऊन छातीतील फेसकटपणा कमी होतो.

छाती भरत असेल तर वेखंड व काकडशिंगी उगाळणे किंचित वाढवावे. कधीकधी बाळाला शी होताना खडा झाल्याने कुंथावे लागते. यासाठी रोजच्या उगाळण्यामध्ये बाळहिरडा अधिक उगाळावा व चिंचोका उगाळू नये.

बाळाला पातळ शी होत असल्यास खारीक, बदाम बाळहिरडा कमी करून किंवा वगळून जायफळ, चिंचोका, यांचे उगाळणे अधिक करून चाटण द्यावे.

पोटात दुखण्यामुळे पोटाकडे हात नेऊन बाळ थांबून थांबून रडते. असे असेल तर मुरुडशेंग अधिक उगाळावी; जायफळ, चिंचोके, बदाम हे उगाळू नयेत.

लहान मुलांना जुलाब, शी चे खडे, छाती भरणे, यांसारखे अनेक त्रास होत असतात. यासाठी सूक्ष्म प्रमाणात दिलेल्या औषधांनी वेळीच सुधारणा घडवता येते.

कृमींसाठी

मुलांच्या वाढीसाठी आणि कृमिप्रतिबंधासाठी विडंगाचे बी (वावडिंग) पाण्यात उकळून हे पाणी मुलांना प्यायला द्यावे. दिवसाला सहा दाणे विडंग पुरते. विडंगारिष्ट नावाचे तयार औषधही मिळते. हे औषध चार वर्षावरील मुलांसाठी दोन चमचे रोज याप्रमाणे तीन आठवडे द्यावे. तीन आठवडे थांबून परत एकदा तीन आठवडे औषध द्यावे.

तेल चोळणे

भारतीय परंपरेत बाळांना तेल लावण्याचे फार महत्त्व आहे. तीळ, शेंगदाणे, खोबरे,सूर्यफूल, इत्यादींची तेले अंगाला चोळण्यासाठी वापरता येतात. टाळू भरण्याबरोबरच अंगाला तेल चोळण्याने शरीरात ते शोषले जाऊन पोषण होते. कृश दुबळी मुलेही या उपायाने सुधारतात असे सिध्द झाले आहे. अति कुपोषण असलेल्या मुलांना मात्र तेल मालिश करू नये.

आहारविचार

कुपोषित मुलांचे पोषण चांगले होण्यासाठी डबाबंद आहारापेक्षा बाजरी, गहू, चणा,तांदूळ यांचे मिश्रण स्वस्त व सकस असते. या मिश्रणामध्ये काही विशिष्ट औषधी वनस्पती मिसळून अधिक पोषक आहार होतो. बला, अतिबला, जपा, तालीमखाना,इत्यादी वनस्पतींची चूर्णे मिसळून तयार केलेल्या धान्यखिचडीला यवागू असे नाव आहे.

लहान मुलांच्या बाबतीत आहार भूक कमी आहे अशी तक्रार अनेक पालक करतात. बाळसे धरावे म्हणून पुन्हापुन्हा बळेच खाऊ घालण्यासाठी प्रयत्न होतो. काही बाळांची पचनशक्ती मंद असल्याने अशा प्रयत्नांना यश येत नाही. सर्व बाळांची प्रकृती सारखीच नसते.

पचनशक्ती मंद असलेल्या बालकांना दूध, केळी, अंडी, मासे यांऐवजी गव्हाच्या साळीच्या लाह्या, फुटाणे, इत्यादी पदार्थांनी पचन सुधारते. मध, मूग भाजून तयार केलेले पीठ चांगले अंगी लागते. हे जर लक्षात घेतले नाही तर नुसत्या पोषक पदार्थाचा मारा करून अजीर्ण होते. यामुळे उलट आजारच होतात असा अनुभव आहे.

क्षीरबस्ती

क्षीरबस्ती हा पोषण सुधारण्याचा आणखी एक चांगला उपाय आहे. अपु-या दिवसांच्या बाळांसाठी क्षीरबस्ती उपयुक्त आहे. बाळाला शी होऊन गेल्यानंतर ही क्षीरबस्ती द्यावी. क्षीरबस्ती म्हणजे कडू औषधे टाकून उकळलेले दूध असते. असे 15-20 मि.ली. दूध (शरीराच्या तापमानाचे) पिचकारीने हळूहळू गुदद्वारातून गुदाशयात सोडावे. तीन ते सहा तासांत ही बस्ती रक्तामध्ये शोषली जाते. हा उपचार नियमित केल्यानंतर पोषण सुधारते असा अनुभव आहे.

बाळाच्या पहिल्या दोन-तीन दिवसांत अंगावरचे दूध नसल्यास 3 थेंब तूप + 2 थेंब मध हे मिश्रण सकाळी-सायंकाळी चाटवावे. याबरोबरच अंगावरचे दूध पाजणे चालूच ठेवावे.

 

लेखक : डॉ. श्याम अष्टेकर (MBBS, MD community Medicine)

संदर्भ : आरोग्यविद्या

अंतिम सुधारित : 6/5/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate