অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

बालकाचे पहिले वर्ष : पोषण व आहार

पोषण व वाढ

वाढ, विकास व निरोगीपणा या सर्वांसाठी लागणारी प्रमुख गोष्ट म्हणजे योग्य पोषण. एखाद्या समाजाचे आर्थिक, सामाजिक मुल्यमापन करण्याचा एक मार्ग म्हणजे या समाजातील लहान मुलामुलींच्या पोषणाचे मुल्यमापन करणे. योग्य स्वच्छ आणि पुरेशा अन्नाआभावी आज आपल्या देशात अनेक रोग दिसतात.

योग्य अन्न न मिळाल्याने मुलांची वाढ खुरटते. अति कुपोषणामुळे बौध्दिक वाढही खुंटते. रोगाचा मुकाबला करण्याची शक्ती कमी होते. जुलाब, जंत आणि कुपोषण यांचे एकमेकांमध्ये अगदी घट्ट नाते आहे. कारण सर्वसाधारणपणे आर्थिक,सामाजिक परिस्थितीमुळे परिसराची स्वच्छता व पिण्याच्या पाण्याची योग्य काळजी राखली जात नाही. अनेक घरातील सर्व मोठी माणसे कामावर जातात व मुलांची जबाबदारी त्याचेच मोठे भावंड घेत असतात.

लहानपणी कुपोषण, खुरटलेली वाढ आणि रोगटपणा ज्या मुलांच्या मागे लागतो, तो मोठेपणातही त्यांची सहसा पाठ सोडत नाही. मोठेपणीही या मुलांची काम करण्याची शक्ती,रोगप्रतिकारशक्ती कमी पडते. म्हणून लहानपणापासून योग्य व समतोल आहार महत्त्वाचा आहे.

स्तनपान महत्त्वाचे

जन्मापासून पहिले सहा महिने बाळाला फक्त स्तनपान द्यावे. या काळात आईचे दूध हा बाळासाठी सर्वोत्तम आहार असतो. बाळ जन्मल्यावर लगेच अर्ध्या तासात पाजण्यासाठी अंगावर घेणे महत्त्वाचे असते. पहिल्या चिकामध्ये भरपूर प्रथिने व रोगप्रतिबंधक घटक (प्रतिघटक) असतात. म्हणून हा चीक वाया जाऊ देऊ नये.

पहिल्या दिवसापासून अंगावर पाजू लागल्याने दूध येण्याची क्रिया लवकर व सुलभ होते. असे केले नाही तर छाती दाटून दुखते व बाळाला अंगावर ओढणे अवघड होते.

तिस-या ते चौथ्या दिवशी चीक संपून नेहमीसारखे दूध येणे सुरू होते. दूध कमी पडल्यास उकळून थंड केलेले पाणी, साखर घालून वाटी-चमच्याने पाजावे. पण प्रत्येक वेळी प्रथम बाळाला पाजायला घेणे आवश्यक आहे.

बाळाला स्तनपानाचे अनेक फायदे आहेत

आईचे दूध हे बाळाच्या आहाराच्या सर्व गरजा पूर्ण करते म्हणून पहिल्या सहा महिन्यांपर्यंत हे पूर्ण अन्न आहे.

बाळाच्या भुकेच्या वेळी ते लगेच उपलब्ध असते, विकत घ्यावे लागत नाही. त्याचे तपमान बाळासाठी सुयोग्य असते.

आईचे दूध शुध्द असते, रोगजंतू बाळाच्या पोटात जात नाहीत.

आईच्या दुधात अनेक रोगप्रतिबंधक द्रव्ये असतात. म्हणूनच आईच्या दुधामुळे बाळाला जुलाब, पोलिओ, गोवर यांसारख्या रोगांचा मुकाबला करण्यास मदत होते.

अंगावर पाजल्याने आई-मुलामधले नाते घट्ट होण्यास मदत होते.

अंगावर पाजण्याचे फायदे आईलाही होतात

गर्भाशयाची पिशवी लवकर आकुंचन पावून रक्तस्राव थांबण्यास, कमी होण्यास मदत होते.

वजन नियंत्रित राहते.

बाळ अंगावरचे दूध पीत असता सहसा आईच्या बीजांड -कोषात स्त्रीबीज तयार होत नाही. त्यामुळे पाळी लवकर सुरू होत नाही व पाळणा लांबण्यास मदत होते. (परंतु पाळणा लांबण्यासाठी हा खात्रीचा मार्ग नाही म्हणून त्यावर अवलंबून राहता येत नाही.)

अंगावर पुरेसे दूध नसणे

अशा आईने भरपूर पाणी प्यावे, पौष्टिक आहार घ्यावा व बाळाच्या प्रत्येक भुकेच्या वेळी स्तन चोखण्यास द्यावे. यामुळे बहुतेक वेळा आपोआप भरपूर दूध येऊ लागते. अंगावरचे दूध वाढण्यासाठी आधुनिक औषधशास्त्रात निश्चित सिध्द अशी औषधे नाहीत. परंतु आयुर्वेदिक औषधे उदा. कडूबोळ, शतावरी यांचा उपयोग होतो. याबद्दल या प्रकरणाच्या शेवटी तपशील दिला आहे.

आईच्या आहारात डाळी, हिरव्या भाज्या, पपई, दूध, अंडी, मासे, इत्यादींचा शक्य तेवढा समावेश करावा.

कधीकधी स्तनाग्रे (बोंडशी) आत वळलेली असतात. त्यामुळे बाळाला स्तन तोंडात धरून चोखता येत नाही. यावर उपाय गरोदरपणापासूनच करावा लागतो. स्तनाग्रे रोज नियमितपणे बोटांनी ओढून बाहेर काढणे व चोळणे याने फायदा होतो. पण त्याचा उपयोग न झाल्यास दूध पिळून काढून वाटी-चमच्याने पाजावे.

स्तनावर बसण्यासाठी वेगळे बूच औषधाच्या दुकानात मिळते (नीपल शील्ड). त्याचाही चांगला उपयोग होतो.

स्तनाच्या बोंडाला चीर पडणे

बाळाच्या जोरात ओढण्यामुळे कधीकधी सुरुवातीस स्तनाग्रास चीर पडते. त्यामुळे बाळाला पाजताना खूप दुखते व दूध कमी येऊन छाती दाटते. अशी चीर बरी होईपर्यंत बाळाला त्या स्तनावर पाजण्यास घेऊ नये.

दूध पिळून काढून छाती मोकळी करावी. स्तनातले दूध शोषून घेण्यासाठी एक पंप औषधांच्या दुकानात मिळू शकेल. तो लावून दूध काढता येते, स्तन दाबायची गरज पडत नाही. त्या चिरेतून रक्त-पू येत नसेल तर हे दूध बाळाला वाटी-चमच्याने पाजण्यास काहीच हरकत नसते, पण छाती कधीही दाटू देऊ नये.

स्तनाग्राला खुली हवा व सूर्यप्रकाश मिळावा. दिवसातून दोन-तीनदा स्तनाग्रे कोमट पाण्याने धुऊन त्यावर जंतुनाशक मलम लावावे. त्याने जंतुलागण टळते व चीर भरून येते. त्यामुळे दूध नेहमीप्रमाणे पाजता येते.

जर एवढे करूनही दूध येत नसेल किंवा पुरे पडत नसेल तर वरचे दूध देणे भाग पडते.

वरचे दूध

वरचे दूध देताना ते शक्यतो आईच्या दुधाशी मिळते जुळते करून घ्यावे लागते. नाही तर वरच्या दुधामुळे त्रास होतो. वरचे दूध शक्यतो गाईचे किंवा शेळीचे असावे. विशेषत:,बाळ दोन महिन्यांपेक्षा लहान असेल तर गाईचे दूध उकळून थंड करून साय काढून टाकावी. एक कप दूध + पाव कप पाणी + एक चमचा साखर असे दूध वाटी-चमच्याने पाजावे.

बहुतेक आया वरच्या दुधात साखर टाकत नाहीत. (साखरेमुळे जंत होतात असा गैरसमज आहे.) आईच्या दुधात नैसर्गिकरित्या साखरेचे प्रमाण जास्त असते. मात्र वरच्या दुधात साखर घातली नाही तर त्यांचे उष्मांक कमी पडून बाळाचे पोषण चांगले होत नाही. गाईच्या व म्हशीच्या दुधात क्षार जास्त असतात म्हणून वरचे दूध पाजताना बाळाला दिवसातून दोन-तीनदा स्वच्छ पाणी पाजावे. दूध म्हशीचे असल्यास एक कप दुधाला अर्धा कप पाणी घालावे.

तीन महिन्यांच्या पुढे पाणी न घालता दूध पाजावे. दूध पावडरच्या डब्यामधले दूध द्यायलाही हरकत नसते. डब्यावर लिहिलेल्या प्रमाणात दूध तयार करावे लागते. कमी पावडर घातल्यास दूध पातळ होते म्हणून कमी पोषक असते. मात्र गाई-म्हशीच्या दुधापेक्षा डब्याचे दूध फारच महाग पडते.

वरचे दूध पाजण्याची योग्य पध्दत जमली नाही, तर दूध बाळाच्या अंगी लागत नाही. असे बाळ कुपोषित होते. यासाठी जर वरचे दूध पाजण्याची वेळ आली तर योग्य त-हेने दूध पाजणे अतिशय महत्त्वाचे आहे. वरचे दूध हे गाईचे, बकरीचे, म्हशीचे यांपैकी किंवा दूध-पावडरच्या डब्यामधले देता येते.

वरचे दूध शक्यतो बाटलीने पाजू नये, वाटी-चमच्याने पाजावे. बाटलीने पाजायचे असेल तर दर वेळेस बाटली व बूच उकळून, निर्जंतुक करूनच वापरावी लागते. नाहीतर जुलाब होतात. बाटलीचा वापर हे जुलाबाचे एक महत्त्वाचे कारण आहे.

इतर पूरक आहार

सहाव्या महिन्यानंतर आईच्या दुधाबरोबर पूरक अन्न म्हणून वरचे अन्न सुरू करावे.प्रथम भाताची घट्ट पेज, वरणाचे घट्ट पाणी यात पालक, करडई, गाजरे, कोबी यांसारखी कुठलीही भाजी पूर्ण शिजवून त्यात मीठ किंवा साखर घालून मऊ करून भरवावी.

कुठल्याही फळाचा (उदा. संत्री, मोसंबी, पिकलेले केळे, आंबा, चिक्कू, द्राक्षे,) रस किंवा गर काढून रोज अर्धी वाटी भरून द्यावा. यामुळे बाळाला 'क' जीवनसत्त्व मिळते.

चमच्याने घट्टसर (खिरीसारखे) पदार्थ भरवायला सुरुवात करताना चमचा जिभेच्या टोकाला लावू नये, जिभेच्या मागल्या भागात ठेवावा. नाही तर बाळ जिभेने चमचा ढकलून देते किंवा पदार्थ थुंकून टाकते.

एका वेळी एकाच नव्या पदार्थाची चव लावावी. तो पदार्थ नीट पचतो आहे किंवा नाही हे बघून नवा पदार्थ द्यावा. या वयातच सर्व अन्नपदार्थाच्या चवी लागणे महत्त्वाचे असते. कारण सहा महिन्यांनंतर बाळाच्या योग्य वाढीसाठी केवळ दूध पुरत नाही. वरचे अन्न उशिरा सुरू केले तर काही मुलांना तोपर्यंत फक्त दुधाची आवड निर्माण झालेली असते. जावळ झाल्यानंतर (म्हणजे उशिरा) वरचे अन्न सुरू करणे हे कुपोषणाचे एक कारण आहे. हे टाळण्यासाठी सहा महिन्यांनंतर हळूहळू तांदळाची खीर, नाचणीची खीर, वरणभात (अगदी मऊ शिजवून) किंवा खिचडी, उकडलेला बटाटा मऊ करून, चपाती, भाकरी, केळे, पपई,आंबा, पेरू, इत्यादी जमेल तसे ते फळ, अंडे उकडून प्रथम पिवळा भाग व नऊ -दहा महिन्यांनंतर पूर्ण अंडे, मटनाचे पाणी (सूप), कोणतीही पालेभाजी, गाजर, टोमॅटो, तूप,लोणी, इत्यादी देणे सुरू करावे. अशा प्रकारे आहारातील पदार्थ हळूहळू वाढवत न्यावेत. एक वर्षाच्या बाळाने अनेक प्रकारचे पदार्थ खाल्ले पाहिजेत. वर्षभरानंतर दुधाचे प्रमाण कमी करावे. दिवसातून फक्त दोन किंवा तीन वेळाच दूध द्यावे व वरचे अन्न वाढवावे.

दात येण्याच्या सुमारास रोज नाचणीची दूध, गूळ घालून खीर सुरू करावी. नाचणीत भरपूर कॅल्शियम असते. पौष्टिक खीर करण्याची एक सोपी पध्दत आहे. 1 कप तांदूळ + अर्धा कप हरबरा डाळ + अर्धा कप शेंगदाणे हे सर्व भाजून भरडून ठेवावे. गरजेप्रमाणे या भरडयात दूध व गूळ घालून खीर तयार करता येते. तांदळाऐवजी नाचणी चालते.

मुलांना खाऊ पिऊ घालताना या 9 सूचना लक्षात ठेवा

1. जन्मल्यावर अर्ध्या तासात पहिले स्तनपान.

2. सहा महिन्यापर्यंत फक्त स्तनपान.

3. अठरा महिन्यापर्यंत स्तनपान चालूच ठेवले पाहिजे.

4. सहा महिन्यांपासून खिरीसारखे एकजीव पातळ पदार्थ द्या. हे पचायला सोपे असतात.

5. खिरीसारख्या पातळ पदार्थात प्रत्येक वेळी थोडे प्रथिनयुक्त पदार्थ घाला उदा. सोयाबीन किंवा शेंगदाणा कूट.

6. मुलांना दिवसातून निदान 6 वेळा नीट खाऊ पिऊ घालावे. मुलांचे पोट लहान असल्याने ती मोठया माणसांसारखे जास्त जेवून दोन जेवणांवर भागवू शकत नाहीत.

7. चार महिन्यांनंतर जीवनसत्त्वयुक्त आणि खनिजयुक्त पदार्थही द्यायला सुरुवात करा. (गाजर, पपई, हिरवा भाजीपाला, गूळ इ. हे सर्व अर्थात खूप शिजवून व पातळ करून द्यावे.)

8. बाळाच्या आजारपणातही खाईल तेवढे खाऊ पिऊ घालावे. नाहीतर त्या काळात वाढीचा वेग कमी होतो.

9. तेल, तूप यांमध्ये पिठूळ पदार्थापेक्षा जास्त ऊष्मांक असतात, त्यामुळे कमी आहारातही दुप्पट ऊष्मांक मिळून भरपाई होते. कमी खाणा-या मुलांना हा उपाय विशेष बरा पडतो. कुपोषणातही यांचा चांगला फायदा होतो.

वजन , उंची

- पहिल्या 7 दिवसांत बाळाची नाळ पडून जाऊन बेंबी कोरडी पडलेली असते.

- दहाव्या दिवशी बाळाचे वजन परत जन्मवजनाएवढे होते.

- बाळाचे वजन 5 व्या महिन्यात जन्मवजनाच्या दुप्पट होते.

- एक वर्षाचे मूल जन्मवजनाच्या तिप्पट वजनाचे असते.

- एक वर्षामध्ये बाळाची उंची 25 ते 30 से.मी. (1 फूट) ने वाढते.

दात

दात येण्याची सुरुवात बहुसंख्य मुलांमध्ये पाच ते नऊ महिन्यांत खालच्या मधल्या दाताने होते व एक वर्षापर्यंत सर्वसाधारणपणे 6 ते 8 दात आलेले असतात.

विकास व इतर वाढ

4-5 आठवडयांचे बाळ आईला ओळखू लागते. हे 'ओळखून हसणे' दोन महिन्यांपर्यंत पूर्ण विकसित होते. जर 2 ते 3 महिन्यांचे बाळ आईला ओळखून हसत नसेल तर त्या मुलाच्या बाकीच्या वाढीकडेही काळजीपूर्वक लक्ष ठेवावे.

3 महिन्यांचे बाळ जर पोटावर पालथे ठेवले तर स्वत:ची मान व डोके अर्धवट 'धरू'शकते.

4 महिन्यांचे मूल मान पूर्णपणे सावरते. 5 ते 6 महिन्यांत बाळ पालथे वळू लागते.

4 महिन्यांचे बाळ छोटी वस्तू बघून हातात पकडू पाहते; पण अजून बोटांनी उचलू शकत नाही. पण 6-7 महिन्यांत खुळखुळा उचलून एका हातातून दुस-या हातात घेऊ शकते.

4 ते 7 महिन्यांत मूल अधिकाधिक हसरे, खेळकर बनते.

6-7 महिन्यांचे मूल हात पुढे टेकून एकटे बसू शकते असे बाळ जर उभे धरले तर स्वत:चे पूर्ण वजन पायावर पेलूही शकते.

8व्या - 9व्या महिन्यात बाळ 'दादा, बाबा' असे सुटे दोन अक्षरी शब्द बोलू शकते. बाळाच्या नावाने हाक मारल्यावर लक्ष देऊ लागते, टाटा करायला शिकते.

9 ते 10 महिन्यांत मूल रांगायला किंवा सरपटायला लागते. याच सुमाराला बोटांनी एखादी वस्तू उचलणे बाळाला जमते. पण अजूनही मुठीचा आधार घ्यावा लागतो.

12व्या महिन्यात नुसत्या बोटांनी वस्तू उचलायला जमते.

टाळू

डोक्याचा घेर जन्मताना सुमारे 32-35 से.मी.असतो,तो सहा महिन्यात 44 से.मी. व एक वर्षात 47 से.मी. होतो.

सहा महिन्यांनंतर पुढल्या टाळूचा खड्डा कमी होऊ लागतो. 9 महिने ते 18 महिने या वेळात कधीही टाळू पूर्ण भरते. मागची टाळू जास्तीत जास्त चार महिन्यांपर्यंत पूर्ण भरते.

डोक्यावर पुढील बाजूस शंकरपाळयाच्या आकाराचा खड्डा असतो. त्याला 'पुढली टाळू' असे म्हणतात. डोक्याच्या कवटीची हाडे पूर्ण भरलेली नसल्यामुळे टाळूचा खड्डा तयार झालेला असतो. टाळूचे कार्य अतिशय महत्त्वाचे असते. जन्माच्या वेळी बाळ त्याच्या डोक्यापेक्षा लहान असलेल्या योनिमार्गातून बाहेर पडते. यावेळी कवटीची हाडे एकमेकांवर सरकू शकतात व त्यामुळे मेंदूवर प्रत्यक्ष दाब येत नाही. जन्मानंतर इतर शरीराच्या मानाने मेंदूची वाढ भराभर होते. यामुळे (कवटीची हाडे अजून एकमेकाला पूर्ण जुळलेली नसल्यामुळे) मेंदूला वाढण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध होत राहते. मेंदूच्या आकारमानाची वेगाने होणारी वाढ जवळपास पूर्ण झाल्यावर टाळू पूर्णपणे भरते, म्हणजेच कवटीची हाडे एकमेकांशी जुळतात. सर्वसाधारणपणे टाळू पूर्ण भरून येण्याचा काळ एक वर्ष ते दीड वर्ष इतका असतो.

टाळू 18 व्या महिन्यापर्यंत भरून न आल्यास काही गंभीर आजारांची शंका घ्यावी. (उदा. मुडदूस, मेंदूभोवती जास्त पाणी असणे, हाडांचे काही उपजत आजार, इत्यादी.)

टाळू तेलाने भरण्याचा व टाळू प्रत्यक्ष भरून येण्याचा(म्हणजेच कवटीची हाडे पूर्णपणेमिळून येण्याचा) काहीही संबंध नाही. मात्र हे तेल त्वचेतून रक्तात शोषले जाऊन बाळाला त्यातून उष्मांक मिळून बाळाची प्रकृती सुधारते. शिवाय रोज टाळू भरताना आईचे टाळूकडे लक्ष जाते. त्यामुळे टाळू उचललेली असणे, फुगणे किंवा खोल जाणे या महत्त्वाच्या खुणांकडे तिचे लक्ष राहते.

टाळूमधून डोक्यातील रक्तवाहिनीचे - रोहिणीचे - ठोके कळू शकतात. यामुळेच काहीजण 'टाळू उडते' म्हणून घाबरून जातात. पण त्यात तसे भिण्यासारखे काही नसते.

टाळू खोल जाणे ही शरीरातले पाणी कमी झाल्याची (शोष) महत्त्वाची खूण आहे. म्हणून जुलाब किंवा उलटया होत असलेल्या मुलाची टाळू बघणे महत्त्वाचे असते. त्यावरून बाळाला होणारे जुलाब, उलटया व शोष याबद्दल कळू शकते.

टाळू फुगली असल्यास धोका संभवतो. (रडताना मात्र प्रत्येक बाळाची टाळू फुगते.)

फुगलेली टाळू

मेंदूभोवतीच्या आवरणामध्ये जास्त पाणी साचणे, मेंदूला सूज, मेंदूज्वर, मेंदूभोवती रक्तस्राव इत्यादींमध्ये टाळू फुगते. चिडचिडे मूल, ताप, उलटया व बदललेली नजर,हातापायांच्या विचित्र हालचाली, फिट्स यांबरोबर जर टाळू फुगलेली असेल तर ते मेंदूच्या सूजेचे लक्षण आहे. उपचार लगेच सुरू होणे महत्त्वाचे आहे.

दोन वर्षापर्यंत बालकाच्या विकासाचे टप्पे (तक्ता (Table) पहा)

 

लेखक : डॉ. श्याम अष्टेकर (MBBS, MD community Medicine)

संदर्भ : आरोग्याविद्या

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate