অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

बालकुपोषण होते कसे?

बालकुपोषणाचे प्रमुख कारणे

गरजेच्या मानाने अन्न-आहार कमी पडणे हे बालकुपोषणाचे प्रमुख कारण आहे.

  • आपल्या समाजातली बरीच बाळे (म्हणजे शेकडा30%) मुळात कमी जन्मवजनाची असतात. ही बाळे थोडी कमकुवत राहतात. विशेष काळजी घेतली तर ती पण चांगली वाढू शकतात.
  • कमी जन्मवजनाचे मुख्य कारण म्हणजे आईचे कमी वयात लग्न व बाळंतपण. मातेच्या काही आजारांनी पण जन्मवजन कमी राहते. रक्तपांढरी हा असाच एक आजार आहे.
  • बाळाच्या आईचे पोषण कमी होणे हे कमी जन्मवजनाचे एक महत्त्वाचे कारण !
  • काही बाळे ठीक वजनाची जन्मतात पण खाण्यापिण्याच्या गैरसमजुतीने कुपोषित राहतात. लवकर स्तनपान न करणे,वरचे लवकर सुरु करणे, अस्वच्छता,जंत, आजार, इ. कारणांनी बाळाला बाळसे कमी असते.
  • तरीही आईच्या दुधावरची बहुतेक बाळे सहा महिन्यांपर्यंत छान गुटगुटीत असतात. सहा महिन्यांनंतर बाळाला आईचे दूध कमी पडते. त्याला वरचे खाणे हळूहळू सुरू करायला पाहिजे. वरच्या खाण्याला उशीर झाला तर बाळ रोडावते.
  • काही बाळांना ताप, जुलाब, खोकला, पू, इत्यादी आजार होतात. याची नीट काळजी घेतली नाही तर बाळ लगेच रोडावते व कमी खाऊ-पिऊ लागते. अशक्त असलेले मूल लवकर बरे होत नाही. असे बाळ पुन्हा पुन्हा आजारी पडते. म्हणजेच बाळ कुपोषण-आजार-कुपोषण या दुष्टचक्रात सापडते.
  • कधीकधी कुपोषित मुलांमध्ये फुप्फुसांचा क्षयरोग (टी.बी.), इत्यादी आजार होऊ शकतात. सर्वसामान्य मुलांपेक्षा कुपोषित मुलांमध्ये क्षयाचे प्रमाण जास्त सापडते.
  • दुधाची बाटली पातळ दूध, दुधात साखर न घालणे ही पण कुपोषणाची महत्त्वाची कारणे आहेत.

बाळांची घ्यावयाची काळजी

बरीच बाळे 1 ते3 वर्षातच कुपोषित होऊन जातात. यात त्यांचे फार नुकसान होते. त्यांची वाढ पुढेही अपुरीच राहते. म्हणूनच 3 वर्षापर्यंत  बाळांची चांगली काळजी घ्यावी लागते.

तीन वर्षानंतरही वाढीसाठी चांगले खाणेपिणे, आरोग्यसेवा, स्वच्छता याची गरज असतेच. अंगणवाडीतले खाणे केवळ पूरक असते. मात्र तो मुख्य आहार नाही.

कुपोषणामागे चुकीच्या सामाजिक चालीरिती आहेत तशी गरीबी पण आहे. गरिबीमुळे आई-बापांना बाळाकडे पुरेसे लक्ष देता येत नाही. घरी बाळ सोडून कामावर जावे लागते. रोजगारासाठी गाव-घर सोडणा-या कुटुंबाची मुले जास्त कुपोषित होतात.

 

लेखक : डॉ. श्याम अष्टेकर

(MBBS, MD community Medicine)

संदर्भ : आरोग्याविद्या

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate