অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

बालपक्षाघात

बालपक्षाघात

प्रादेशिक रोगोत्पत्ती -साथीचे गंभीर प्रकार अनेक देशांतून व बेटांतून उद्‌भवल्याची नोंद झाली आहे आणि यामध्ये अमेरिका, यूरोप व आफ्रिका यांचा समावेश आहे. १९४२-५३ या काळात अमेरिकेत सर्वांत मोठी व दीर्घकाळ टिकलेली साथ पसरली होती. १९५० मध्ये तेथे ३३,३४४ रोग्यांची नोंद झाली होती. प्रतिबंधक लशीच्या वापरानंतर १९७१ मध्ये ही संख्या फक्त १७ वर आली होती. १९५२ मध्ये डेन्मार्क, जर्मनी व बेल्जियम या देशांत गंभीर स्वरुपाच्या साथी उद्‌भवल्या होत्या. आशियातील मुंबई, सिंगापूर, जपान, कोरिया व फिलिपीन्स या भागांतही साथी उद्‌भवल्या होत्या.

भारतात बालपक्षाघात प्रदेशनिष्ठ स्वरूपात असून अधूनमधून तो साथीच्या स्वरुपात उद्‌भवतो. नवी दिल्ली येथील रुग्णालयांतून १९७२, १९७३, १९७४ व १९७५ या वर्षी अनुक्रमे २,२१७; २,७११; २,७११; २,१५० व ३,२१५ इतके बालपक्षाघाताचे रोगी आढळलेले होते.

संप्राप्ती

हा रोग प्रतिजननिर्मितिदृष्ट्या [⟶ प्रतिजन] स्वतंत्र असलेल्या तीन प्रकारच्या पोलिओ व्हायरसांमुळे होतो. हे व्हायरस पिकोर्ना गटातील रिबोन्यूक्लिइक अम्लयुक्त (आरएनयुक्त) व्हायरस आहेत [⟶ व्हायरस]. त्यांचा व्यास ८ ते ३० नॅनोमीटर (१ नॅनोमीटर = १०-९ मीटर) असून ते आतड्यात आढळणाऱ्या व्हायरसांच्या गटात मोडतात. ईथर, क्लोरोफार्म, आतड्यातील पित्त व प्रक्षालके (कृत्रिम रीतीने बनविलेले मलिन वस्तू निर्मल करण्याचा गुण असलेले साबणाखेरीज इतर पदार्थ) यांना ते प्रतिरोध करतात, कारण त्यांच्या बाह्यवरणात लिपिड (स्निग्ध द्रव्य) नसते. बहुसंख्य मोठ्या साथी प्रकार -१ व्हायरसामुळे उद्‌भवलेल्या होत्या. अधूनमधून प्रकार-३ चाही साथीशी संबंध असल्याते आढळले आहे. प्रकार-२ मुळे साथ उद्‌भवल्याचे भारतात अजूनपर्यंत आढळलेले नाही. बहुसंख्य लोकांना या व्हायरसांचा संसर्ग झालेला असून त्यांच्या रक्तात पोलिओ प्रतिपिंडे [प्रतिजनांना विरोध करण्यासाठी रक्तद्रवात निर्माण झालेली विशिष्ट प्रथिने;⟶ प्रतिपिंडे] तयार झाली असल्यामुळे दृश्य रोगलक्षणे आढळत नाहीत.

मानव हाच या व्हायरसांचे एकमेव संचय स्थान असून संक्रामण नाक, तोंड, घसा व आंत्रमार्ग (लहान आतडे व मोठे आतडे यांनी मिळून होणारा अन्नमार्ग) या क्रमाने होते. शरीरात प्रविष्ट झाल्यानंतर आंत्रमार्गात त्यांचे प्रजनन होते. संबंधित लसीका ग्रंथी [⟶ लसीका तंत्र] व जालिका-अंतःस्तरीय तंत्रातही [शरीरात निरनिराळ्या ठिकाणी असलेल्या व रोगप्रतिकारक्षमता निर्माण करण्याशी संबंध असलेल्या कोशिकांच्या गटांतही ;⟶ जालिका-अंतःस्तरीय तंत्र] ते वाढतात. अल्पकाळ टिकणारी व्हायरसक्तता (रक्तामध्ये व्हायरस उपस्थित असणारी अवस्था) उत्पन्न होते आणि रक्तद्रवात प्रकारविशिष्ट प्रतिपिंडे तयार होतात. आंत्रमार्गातही प्रतिपिंडे तयार होतात.

केंद्रीय तंत्रिका तंत्राचे संक्रामण व्हायरसरक्ततेमुळे किंवा आंत्रमार्गातून संबंधित स्थानिक तंत्रिका गुच्छिकांमार्फत (तंत्रिका कोशिका गुच्छांसारख्या एकत्रित होऊन बनलेल्या तंत्रिका प्रभाव केंद्रांमार्फत) होते. मस्तिष्क स्तंभाचे संक्रामण गिलायु-उच्छेदनाच्या (टॉन्सिल काढून टाकण्याच्या) किंवा ग्रसनी गिलायु-उच्छेदनाच्या (नाकाच्या पश्च छिद्रापाशी असलेला टॉन्सिलाचा भाग प्रमाणाबेहर वाढून तयार झालेल्या गाठी काढून टाकण्याच्या) शस्त्रक्रियेनंतर तुटलेल्या तंत्रिकातंतूंमार्फत होते. त्वचेखाली अंतःक्षेपणाने प्रविष्ट झालेले व्हायरस स्थानिक तंत्रिकांमार्फत मेरुरज्जूत पोहोचून त्या स्नायूशी संबंधित असलेल्या मेरुरज्जूच्या अग्र शृंगातील कोशिकांवर दुष्परिणाम करून पक्षाघात उत्पन्न करतात.

प्रवृत्तिकर कारणांमध्ये सर्वसाधारण रोगप्रतिकारक्षमता कमी होणे, स्थानिक आघात (उदा., गिलायु-उच्छेदन शस्त्रक्रिया), इतर रोगाकरिता दिलेले अंत:स्नायू अंत:क्षेपण, अतिसार इत्यादींचा समावेश होतो. अतिश्रम, शरीराचे द्रुतशीतन या गोष्टी रोगोद् भवापूर्वी एक दोन दिवस अगोदर झाल्यास फलानुमान (लक्षणांवरून रोगाच्या संभाव्य परिणामाचा काढण्यात येणारा अंदाज) गंभीर बनते. गर्भारपणात स्त्रियांची रोगग्रहणशीलता वाढलेली असते. प्रथमप्रसवेपेक्षा बहुप्रसवा अधिक रोगग्रहणशील असतात.

रोगपरिस्थितिविज्ञान

(रोगाची वारंवारता व प्रसार यांना कारणीभूत असणाऱ्या विविध घटकांमधील परस्परसंबंधांचा अभ्यास). बालपक्षाघात हा रोग प्रदेशनिष्ठ व साथ या दोन्ही स्वरूपांत जगभर आढळतो. १९७८ मध्ये जागतिक आरोग्य संघटनेकडे १५० देशांकडून आलेल्या आरोग्य वृत्तांतानुसार ३५,५९० रोग्यांची नोंद झाली होती. आजाराचा फैलाव मानवाद्वारे होतो. दृश्य लक्षणे असणाऱ्या एका रोग्यामागे डझनावारी व्यक्तींमध्ये अतिसौम्य स्वरुपाचा, अप्रगत आणिपक्षाघातविहीन रोग अस्तित्वात असतो. या अज्ञात रोगवाहकामुळे साथींच्या वेळी प्रतिबंधक उपाय योजण्यात अडचणी येतात. पूर्वी बिंदुक संक्रामणच (रोग्याच्या खोकल्यामुळे बाहेर पडणाऱ्या व्हायरसयुक्त सूक्ष्म थेंबांतून जवळच्या व्यक्तीच्या नाकात व घशात होणारे संक्रामणच) फैलावास कारणीभूत असल्याचा समज होता. काही शास्त्रज्ञांनी १९३८ मध्ये मल व वाहितमल यांमधून व्हायरसांचे अस्तित्व दाखवून दिल्यानंतर मल-मुख संक्रामण होत असण्याला पुष्टी मिळाली. काही साथी दूषित दुधाच्या सेवनामुळे उत्पन्न झाल्याचेही आढळले आहे. तरीदेखील केवळ दूषित पाण्यामुळेच उदभवलेली साथ आजपर्यंत आढळलेली नाही. सर्वसाधारणपणे प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष मानवी संपर्क रोगफैलावास कारणीभूत असतो.

बालपक्षाघाताच्या साथी विशिष्ट भौगोलिक भागात मर्यादित राहतात. त्या मोसमी स्वरुपाच्या असतात. सार्वजनिक आरोग्य सुविधा उपलब्ध नसलेल्या ठिकाणी रोग (मुख्यत: लहान मुलांत) लक्षणविरहित आणि बिनसाथीच्या स्वरुपात (तुरळक रोगी आढळणे) कायम असतो. अशा प्रदेशातून अर्भकाच्या जन्मानंतर सुरुवातीच्या काही महिन्यांतच विष्ठेतून पसरलेल्या व्हायरसांशी संपर्क येऊन तिन्ही प्रकारच्या व्हायरसांचे संक्रामण होते; परंतु मातेकडून काही प्रमाणात रोगप्रतिकारक्षमता प्राप्त झालेली असल्यामुळे गंभीर आजार उत्पन्न होत नाही. अशा समाजामध्ये रोगप्रतिबंधक प्रतिपिंडे लहान वयातच तयार होतात. याच कारणामुळे ग्रामीण भागातून रोगप्रतिकारक्षमता लवकर तयार होते. शहरातून राहणाऱ्यांमध्ये रोगप्रतिकारक्षमतेचा उच्च बिंदू गाठण्यास वयाची १५ किंवा १८ वर्षे लागतात. आर्थिक दृष्ट्या गरीब जनतेच्या वस्तीतून भरमसाट दाट वस्ती व निकृष्ट आरोग्यसेवा यांमुळे व्हायरस संसर्ग लवकर होऊन रोगप्रतिकारशक्ती श्रीमंत लोकांच्या मुलांपेक्षा गरीबांच्या मुलांत लहान वयातच निर्माण होते. ज्या देशांतून आरोग्य सुविधा वाढून पाणीपुरवठा, कचरा व मल-मूत्रादींची योग्य विल्हेवाट इ. गोष्टी उपलब्ध होतात, त्याच देशांतून बालपक्षाघाताचा संसर्ग होण्याचे वय हळूहळू वाढत जाते. तसेच पक्षाघातयुक्त आजारांचे प्रमाणही वाढते, असे आढळून आले आहे.

विकृतिजनन

शरीरात प्रविष्ट झालेल्या व्हायरसामुळे व्हायरसरक्तता उत्पन्न होऊन किंवा तंत्रिका तंत्राच्या परिसरीय भागाद्वारे (याला अक्षदंडाद्वारे प्रसार असेही म्हणतात) केंद्रीय तंत्रिका तंत्रात व्हायरस प्रवेश करतात. या ठिकाणी त्यांची वाढ झाल्यानंतरच आजाराची मुख्य लक्षणे दिसू लागतात. कारण हे व्हायरस तंत्रिका कोशिकांवर विषारी परिणाम करतात. मेरुरज्जू, मस्तिष्क स्तंभ व मस्तिष्क तंत्रिकांची केंद्रके या भागातील अतिसंवेदनाशील प्रेरक (शरीरातील स्नायूंचे आकुंचन व ग्रंथिस्त्रावोत्पादन यांवर नियंत्रण ठेवणाऱ्या) तंत्रिका कोशिकांवर दुष्परिणाम होतो व काही कोशिकांचा नाश होतो. सर्वच कोशिकांचा पूर्ण नाश न होता काही अर्धवट नाश पावतात. अंशत: नाश पावलेल्या अशा कोशिका पुन्हा पूर्ववत होऊ शकतात. जेवढ्या प्रमाणात तंत्रिका कोशिका पूर्ववत होतात तेवढ्या प्रमाणात पक्षाघात झालेल्या स्नायूंची क्रियाशीलता पूर्ववत होऊ शकते. पूर्ण नाश झालेल्या कोशिकांशी संबंधित असलेल्या स्नायूमध्ये कायमचा पक्षाघात निर्माण होतो.

अलीकडील संशोधनानुसार बालपक्षाघाताचा व आनुवंशिकतेचा संबंध असल्याचे दिसून आले आहे. रोगग्रहणशीलता जीनांवर (आनुवंशिक लक्षणे एका पिढीतून पुढील पिढीत नेणाऱ्या सुतासारख्या सूक्ष्म घटकांमधील-गुणसूत्रांमधील-आनुवंशिक घटकांच्या एककांवर) अवलंबून असावी.

सौम्य व अप्रगत आजारात व्हायरस तंत्रिका तंत्रात प्रवेश करीत नाहीत. पक्षाघातविहीन प्रकारात तंत्रिका कोशिकांचा प्रत्यक्ष नाश होत नाही. तंत्रिका कोशिकांच्या अपघटनाच्या (घटक अलग होण्याच्या) प्रमाणानुसार पक्षाघाताची तीव्रता वाढते. मेरुरज्जूच्या अग्र शृंगातील कोशिकांवर प्रामुख्याने दुष्परिणाम झालेला असतो. तो भाग सुजलेला व रक्ताधिक्य झालेला आढळतो. सूक्ष्मदर्शकीय तपासणीत रक्तवाहिनीभोवती व अन्यत्र एककेंद्रक कोशिका (एक दीर्घवर्तुळाकार अथवा खाचयुक्त केंद्रक-कोशिकेच्या कार्यावर नियंत्रण ठेवणारा पुंज-असलेल्या व मोठ्या आकारामानाच्या पांढऱ्या कोशिका) मोठ्या प्रमाणावर जमा झालेल्या दिसतात. रंगविलयनापासून (रंगद्रव्य नाहीसे होण्यापासून) पूर्ण अपघटनापर्यंतचे सर्व बदल आढळतात. मेरुरज्जूत विकृती अग्र शृंग भागातच मर्यादित राहते व सहसा पश्चभागात पसरत नाही.

लक्षणे

रोगाचा परिपाक काल (व्हायरस शरीरात शिरल्यापासून रोगलक्षणे सुरु होण्यापर्यंतचा काळ) सर्वसाधारणपणे ७ ते १४ दिवसांचा असतो. प्रगतशील देशांतून ६ महिने ते ३ वर्षे वयापर्यंत रोग होण्याची शक्यता अधिक असते व ५ वर्षानंतर रोग क्वचितच आढळतो. साथी सर्वसाधारणपणे जुलै व ऑगस्ट या महिन्यांत उद्भवतात. व्हायरस शरीरात प्रविष्ट झाल्यानंतर परिणाम पुढीलपैकी कोणत्याही अवस्थेत होऊ शकतो : (१) लक्षणविरहित संसर्ग, (२) अपूर्ण अथवा अप्रगत अवस्था, (३) पक्षाघातपूर्व किंवा पक्षाघातविहीन अवस्था आणि (४) पक्षाघातयुक्त अवस्था.

लक्षणविरहित अवस्था

या अवस्थेत कोणतेही रोगलक्षण आढळत नाही; परंतु नासा-ग्रसनी (घसा) व आंत्रमार्गात व्हायरसांचे अस्तित्व असते, अशा व्यक्तीला रोगवाहक म्हणतात.

अपूर्ण अथवा अप्रगत अवस्था

या अवस्थेत ज्वर, पडसे, अंगदुखी, सांधेदुखी, भूक मंदावणे, अतिसार वा बद्धकोष्ठ यांसारखी अनिश्चित स्वरुपाची लक्षणे आढळतात आणि ती अल्पकाळ टिकतात. बालपक्षाघाताच्या साथीच्या दिवसात व शंका असल्यास अशा रुग्णांना ७ ते १० दिवस पूर्ण विश्रांती घेण्याचा सल्ला देणे हितावह असते.

पक्षाघातपूर्व अथवा पक्षाघातविहीन अवस्था

या अवस्थेत लक्षणे अपूर्ण अवस्थेप्रमाणेच असतात; परंतु अधिक गंभीर असतात. मान, हात व पाय यांचे स्नायू ताठर बनतात. काही स्नायुगटांत वेदना होतात व स्पर्शासह्यत्व (हाताने दाबून पाहिल्यास वेदना होणे) असते. रोगी लंगडत चालतो व हातात किंवा पायात कंप सुरू होतो. बद्धकोष्ठ किंवा मूत्रावधारण (मूत्राशयात मूत्र तुंबणे) होते. रोग्यास पडल्या जागी उठून बसावयास सांगितल्यास ती कृती कष्टप्रद होते आणि दोन्ही हात पाठीकडे नेऊन तो त्यांच्या आधाराचा टेकू घेऊनच बसतो.  प्रतिक्षेपी क्रियांपैकी काही वाढतात, तर काही मंद होतात. रोगी पुष्कळ वेळा अस्वस्थ व चिंताग्रस्त झाल्याचेही आढळते. मस्तिष्कमेरुद्रवाच्या (मेंदू व मेरुरज्जू यांना यांत्रिक आधार देणाऱ्या द्रवाच्या) तपासणीत कोशिकावृद्धी व प्रथिनवृद्धी झाल्याचे आढळते. ही अवस्था कोणताही दोष न उरता २ ते ३ आठवड्यांत पूर्णपणे बरी होते.

पक्षाघातयुक्त अवस्था

या अवस्थेत एका किंवा अधिक स्नायुगट अशक्त बनतात. ही अवस्था जलद वाढते व बहुतकरून पायातील स्नायूंवर दुष्परिणाम होतो. पक्षाघात असममित प्रकारचा असून खोल (गाढ) अथवा कंडरा संबंधित (स्नायू अस्थींना उपस्थींनाकूर्चांना-घट्ट बांधणाऱ्या तंतुसमूहांशी संबंधित असलेल्या) प्रतिक्षेपी क्रिया नाहीशा होतात. संवेदी तंत्रिका तंत्रावर परिणाम होत नाही. मूत्राशय स्नायूंच्या पक्षाघातामुळे मूत्रावधारण होते. पक्षाघात झालेल्या स्नायूतील शक्तिऱ्हास सौम्य ते गंभीर असू शकतो. या अवस्थेचे तीन प्रकारांत वर्गीकरण करतात : (अ) पृष्ठवंशीय, (आ) मस्तिष्क स्तंभीय आणि (इ) मस्तिष्कशोथ.

पृष्ठवंशीय बालपक्षाघात

पृष्ठवंशात (पाठीच्या कण्यात) असलेल्या मेरूरज्जूतील तंत्रिका कोशिकांवर प्रामुख्याने दुष्परिणाम होत असल्यामुळेया प्रकाराला हे नाव दिले आहे आणि तो सर्व प्रकारांत अधिक आढळतो. यात बाहू व पाय यांतील मोठ्या स्नायुगटांवर दुष्परिणाम होतो. आजाराच्या तिसऱ्या दिवसापासून स्नायुशैथिल्य व अशक्तपणा उदभवतो. पक्षाघाताचे प्रमाण मेरुरज्जूच्या अग्र शृंगातील प्रेरक तंत्रिकांच्या नाशावर अवलंबून असते. काही महिन्यांनंतर संबंधित स्नायूंची अपवृद्धी होते व ते आकारमानाने लहान बनतात.

बालपक्षाघात - डावा पाय अधू व आखूड झाल्यामुळे श्रोणी (घडाचा तळभाग) विरूद्ध बाजूस कलली आहे.

श्वसनक्रियेत भाग घेणारे अंतरापर्शुक (बरगड्यांच्या मधे असणारे) स्नायू व मध्यपटल (वक्ष व उदर यांना अलग करणारे स्नायुमय पटल) यांचा पक्षाघात गंभीर स्वरुपाचा असून कधीकधी कृत्रिम यांत्रिक श्वसनक्रिया उपकरण वापरावे ला ग ते. मूत्रावधारणा व बद्धकोष्ठ अल्पकालीन असतात. सर्वसाधारणपणे ज्वर उतरल्यानंतर पक्षाघाताची प्रगती थां ब ते आणि काही दिवसांनतर हळूहळू सुधारणा दिसू लागते. सुधारणेचा अंदाज शक्ती परत येणे व खोल प्रतिक्षेपी क्रियांतील बदल यांवरून करता येतो. १२ आठवड्यांत जा स्ती त जास्त सुधारणा होते. ३ ते ६ महिन्यानंतर उरणारा पक्षाघात बहुतकरून कायम स्वरुपाचा असतो. पक्षाघात झा ले ल्या स्ना यूं ती ल झीज सर्वसाधारणपणे ४ ते ६ आठवड्यांनंतर सुरू होते.

मस्तिष्क स्तंभीय बालपक्षाघात

मस्तिष्क स्तंभामध्ये म स्ति ष्क तंत्रिकांची प्रेरक केंद्रके तसेच श्वसन केंद्रक, रक्ताभिसरण केंद्रक यांसारखी महत्त्वाची जीवनाश्यक केंद्रे असतात. यामुळे तेथील तंत्रिका कोशिकांवर दुष्परिणाम झाल्यास गंभीर स्वरुपाची लक्षणे उदभवतात. गिळणे, बोलणे इ. क्रियांवर परिणाम होऊन त्या अशक्य बनतात. घशात श्लेष्मासंचय होतो, आवाज घोगरा आणि अनुनासिक बनतो. श्लेष्मासंचयामुळे श्वासनलिका बंद होऊन रोगी गुदमरण्याची शक्यता असते. डोळ्यांचे स्नायू व जबड्यांचे स्नायू यांचा पक्षाघात होण्याचा संभव असतो. अशक्तपणामुळे किंवा पक्षाघातामुळे मृदू तालू, ग्रसनी व स्वरयंत्राचे स्नायू आणि ध्वनिरज्जू यांच्याशी संबंधित असलेल्या क्रियांवर गंभीर परिणाम होतात. श्वसन केंद्रक व रक्तवाहिनी प्रेरक (रक्तवाहिन्यांच्या भित्तीचे प्रसरण व आकुंचन यांवर नियंत्रण ठेवणारे) केंद्रक यांवरील दुष्परिणामामुळे श्वसनक्रिया व रक्तदाब यांवर गंभीर परिणाम होतो. कष्टश्वसन, अनियमित नाडी, अवसाद नीलवर्णता, संभ्रम व बेशुद्धी यांसारखी गंभीर लक्षणे उदभवतात व रोगी श्वसननिष्फलतेमुळे दगावतो.

स्तंभीय प्रकार बहुधा गिलायु-उच्छेदन किंवा ग्रसनी गिलायु-उच्छेदन शस्त्रक्रियेनंतर अक्षदंड प्रसाराद्वारे उदभवतो. कधीकधी पृष्ठवंशीय व स्तंभीय प्रकार मिश्र अवस्थेत एकाच रुग्णात दिसतात. स्तंभीय प्रकार घातक असला, तरी त्याची तीव्रावस्था संपताच रोगी पूर्णपणे बरा होण्याची शक्यता अधिक असते. अनेक वेळा दोन ते सहा वर्षे वयाच्या प्रतिरक्षित मुलातही फक्त सातव्या मस्तिष्क तंत्रिकेचा (आनन-चेहऱ्याच्या स्नायूंशी संबंधित असलेल्या-तंत्रिकेचा) पक्षाघातही आढळतो.

मस्तिष्कशोथ

इतर कोणत्याही कारणामुळे उदभवणाऱ्या मस्तिष्कशोथाप्रमाणेच पोलिओ व्हायरसजन्य

मस्तष्कशोथातील लक्षणे असतात [⟶ तंत्रिका तंत्र]. चिडखोरपणा, झापड, निद्रा, कंप, मान ताठ होणे,

बेशुद्धी, झटके, अर्धांगवात आणि मस्तिष्क तंत्रिका पक्षाघात यांपैकी लक्षणे उदभवतात. हा प्रकार स्वतंत्र किंवा वरील दोन्ही प्रकारांबरोबर मिश्र स्वरुपातही आढळतो.

निदान

वर वर्णन केलेली लक्षणे, साथीची शंका इत्यादींवरून पक्षाघातपूर्व अवस्थेत निदान करणे शक्य असते. घशातील श्लेष्म्याची तपासणी तसेच विष्ठा-संवर्धन (विष्ठेतील व्हायरसाचे कोशिका माध्यमात केलेले संवर्धन) निदानास मदत करतात. मस्तिष्क-मेरुद्रवातील कोशिका संख्यावृद्धी व प्रथिनवृद्धी निदानास उपयुक्त असतात. मात्र त्याकरिता करावा लागणारा कटि-सूचिवेध (तिसऱ्या व चौथ्या मणक्यांच्या मध्ये सुई खुपसणे) अगदी जरूर असल्यासच करावा. तीव्र अवस्थेनंतर तीन आठवड्यांनी केलेल्या रक्ततपासणीत रक्तद्रवातील प्रतिपिंडाच्या प्रमाणातील वाढ निदानास पुष्टी देते.

फलानुमान

स्तंभीय प्रकारात तसेच अंतरापर्शुक स्नायू व मध्यपटल यांचा पक्षाघात झालेल्यांपैकी ६ ते १० % रोगी दगावतात. बालपक्षाघाताच्या एकूण रुग्णांपैकी ८० % रोगी लक्षणविरहित अवस्थेतच बरे होतात. पक्षाघात झालेल्या रोग्यांत काही प्रमाणात स्नायूंची शक्ती पूर्ववत होते. आजाराच्या तीव्रावस्थेत किती प्रमाणात सुधारणा होईल हे सांगणे कठीण असते. सुरुवातीस ज्या मानाने पक्षाघात झालेल्या स्नायूचा शक्तिऱ्हास झाला असेल, त्यावर स्नायू पूर्ववत होणे अवलंबून असते. उदा., स्नायुशक्ती शून्यावर आली असेल, तर सुधारणा होणे जवळजवळ कठीण असते. तीन महिन्यांच्या आत स्नायुशक्ती वाढू लागल्यास बरीच सुधारणा होण्याची शक्यता असते. हातातील स्नायूंपेक्षा पायातील स्नायू सुधारण्याची शक्यता जास्त असते. ज्या स्नायूंच्या तंत्रिका पुरवठ्याचा कायमचा नाश होतो त्यांचे जलददुष्पोषण होते आणि त्यांचे अवकुंचन (कायमचे आकुंचन) होऊन अपंगत्व वाढते. लहान मुलात पक्षाघात झालेल्या अवयवाची वाढ खुंटते. रोग एकदा होऊन गेलेल्या व्यक्तीत तो सहजा पुन्हा उदभवत नाही.

चिकित्सा

बालपक्षाघात संसर्गजन्य असल्यामुळे रोग्यास इतरांपासून अलग ठेवून प्रतिबंधात्मक रुग्णपरिचर्या करणे जरूरीचे असते. पोलिओ व्हायरसाच्या विरूद्ध कोणतेही विशिष्ट औषध उपलब्ध नाही. यामुळे रुग्णपरिचर्या व पक्षाघातयुक्त प्रकारात स्नायूंच्या सुधारणेवर अवलंबून असलेले व्यावसायिक चिकित्सात्मक उपाय महत्त्वाचे असतात. पक्षाघात, गिळणे, बोलणे, श्वसनक्रिया इत्यादींवर काळजीपूर्वक लक्ष ठेवणे जरूरीचे असल्यामुळे रोग्यास रुग्णालयात ठेवणे हितावह असते.

पक्षाघातयुक्त प्रकारात पुढील गोष्टी महत्त्वाच्या असतात

(१) रोगी आणि त्याचे माता पिता व नातलग यांच्या मनावरील रोगासंबंधीच्या भीतीचे दडपण हलके करून त्यांना दिलासा द्यावा. (२) एकापेक्षा अधिक अवयवांतील पक्षाघात, वाढता पक्षाघात, कष्टश्वसन, स्तंभीय प्रकाराची लक्षणे आढळल्यास रोग्यास रुग्णालयात हलवावे. (३) रोग वाढू नये म्हणून रुग्णास पूर्ण विश्रांती देऊन काळजीपूर्वक रुग्णपरिचर्या करावी. (४) विद्रुपता प्रतिबंधाकरिता शरीरस्थितीकडे लक्ष द्यावे. दोन्ही पावले पायाशी काटकोनात ठेवून गुडध्यात अल्पसा बाक असावा. श्रोणिसंधी व पृष्ठवंश सरळ असावेत. अंथरुणाखाली लाकडी फळी ठेवावी. वाळूने भरलेल्या पिशव्या आणि हलके बंधफलक योग्य त्या ठिकाणी व जरूरीप्रमाणे वापरावीत. (५) अवकुंचन प्रतिबंधाकरिता पक्षाघातयुक्त अवयवात परकृत (दुसऱ्याच्या मदतीने) हालचाल चालू ठेवावी व तो पूर्णपणे निष्क्रिय राहणार नाही याकडे लक्षद्यावे. (६) मूत्रावधारण व बद्धकोष्ठ यांवर उपाय योजावेत. रोगाची क्रियाशील अवस्था चालू असताना तीन आठवड्यांपर्यंत वरील इलाज चालू ठेवावेत आणि त्यानंतर दीर्घकालीन उपचार भौतिकी चिकित्सक व विकलांग चिकित्सक [⟶ भौतिकी चिकित्सा; विकलांग चिकित्सा] यांच्या सल्ल्याने चालू ठेवावेत.

स्तंभीय प्रकारात पुढील गोष्टींकडे विशेष लक्ष द्यावे लागते

(१) श्वसनमार्ग अडथळाविरहित ठेवणे. लाळ, अन्न किंवा उलटीतील द्रव श्वसनमार्गात न शिरण्याची दक्षता घेणे. (२) रोग्यास विशिष्ट अंगस्थितीत ठेवून गुरूत्वाकर्षणाद्वारे स्त्राव उत्सर्जित होण्यास मदत करणे. जरूर तेव्हा यांत्रिक शोषकाच्या मदतीने घशातील स्त्राव शोषून घेणे. (३) अंतर्नीला द्रावणांचा (शिरेतून द्यावयाच्या द्रावणांचा) उपयोग करून रक्तद्रवातील पाणी व विद्युत् विच्छेद्य पदार्थ (ज्यांच्या द्रावणातून विद्युत् प्रवाह पाठविला असता ज्यांचे घटक अलग होतात असे पदार्थ) यांचे संतुलन कायम ठेवणे. (४) जरूर तेव्हा श्वासनाल-छिद्रीकरण शस्त्रक्रिया करणे. (५) श्वसन निष्फलतेकरिता कृत्रिम श्वसनयंत्र वापरणे.

प्रतिबंधात्मक उपाय

भारतात बालपक्षाघात हा अजूनही बालवयातील रोग असल्यामुळे सर्व लहान मुलांवर रोगप्रतिबंधक उपाय योजणे योग्य व शक्य आहे. भारतात दर दहा हजारांत एक मूल या रोगाने अपंग बनते, असे आढळले आहे. मोठ्या प्रमाणावर केलेल्या रक्तद्रव तपासणीवरून असे आढळले आहे की, बहुतेक सर्व प्रौढांत रोगप्रतिकारक्षमता उत्पन्न झालेली आहे. अर्भकावस्थेपासून तयार होत जाणारी रोगप्रतिकारक्षमता वयाच्या पाचव्या ते सातव्या वर्षापर्यंत योग्य त्या प्रमाणात तयार होते.

जगातील प्रगत व श्रीमंत राष्ट्रांनी प्रतिबंधक लशीचा योग्य वापर करून या रोगाचे पूर्ण उच्चाटन केले आहे. भारतासारख्या प्रगतिशील देशांतून रोग साथीच्या व प्रदेशनिष्ठ स्वरुपात आढळतो म्हणून प्रतिबंधक उपाय महत्त्वाचे ठरतात.

रोग्यास दोन ते तीन आठवडे अलग ठेवणे, संपर्कित व्यक्तींना तीन आठवडे विलग्नवासात ठेवणे (रोगाचा प्रसार होऊ नये म्हणून इतर व्यक्तींपासून अलग ठेवणे) व मोठा जनसमुदाय जमा होऊ न देणे या गोष्टी महत्त्वाच्या असल्या, तरी भारतासारख्या देशांतून त्यांची अंमलबजावणी जवळजवळ अशक्य असते.

मृत किंवा हतप्रभ (रोगोत्पादक शक्ती क्षीण केलेल्या परंतु जिवंत) व्हायरसांचा उपयोग करून शरीरात रोगप्रतिकारक्षमता निर्माण करता येते. १९५५ पासून अशा व्हायरसांपासून बनविलेल्या लशींचा उपयोग करून अमेरिकेने या रोगास पूर्ण प्रतिबंध केला आहे. सुरुवातीस मृत व्हायरसांपासून बनविलेली व जोनास सॉल्क या शास्त्रज्ञांच्या नावावरून ‘सॉल्क लस’ हे नाव दिलेली लस वापरात होती; परंतु तिच्यात काही दोष आढळल्यामुळे तसेच ती अधिक खर्चाची असल्यामुळे, हतप्रभ व्हायरसांपासून बनविलेली व अल्बर्ट साबिन या शास्त्रज्ञांचे नाव दिलेली ‘साबिन लस’ वापरण्यात येऊ लागली. पहिले अंत:क्षेपणानेच देता येई, तर दुसरी तोंडाने देता येते.

या लशीत तीनही प्रकारचे व्हायरस असतात व म्हणून तिन्ही विरूद्ध प्रतिकारक्षमता निर्माण होते. नैसर्गिक प्रतिकारक्षमतेप्रमाणेच या लशीमुळे उत्पन्न होणारी प्रतिकारक्षमता असते. ती जलद तयार होते व अधिक काळ टिकते. याशिवाय ती आंत्रमार्गात वारंवार होणाऱ्या संसर्गाविरुद्ध प्रतिरोध निर्माण करते. या लशीची ठराविक मात्रा साखरेत मिसळून तोंडाने देतात. वयाच्या चौथ्या ते सहाव्या महिन्यांपासून चार ते सहा आठवड्यांच्या अंतराने तीन ते चार वेळा मात्रा देतात. वयाच्या तिसऱ्या ते पाचव्या वर्षांच्या दरम्यान एक किंवा दोन मात्रा पुन्हा देतात. साथीच्या वेळी आणखी एखादी मात्रा देण्यास हरकत नाही.

साथीच्या काळात गिलायू किंवा ग्रसनी गिलायू काढून टाकण्याची शस्त्रक्रिया करू नये. संसर्गजन्य रोगाची रुग्णालये व रुग्णचिकित्सा प्रयोगशाळा यांत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी दर पाच-सहा वर्षांनी लशीची वर्धक मात्रा घेतल्यास त्यांची रोगप्रतिकारक्षमता योग्य पातळीवर राहते.

आयुर्वेदीय वर्णन व चिकित्सा

हा विकार बहुधा लहान मुलांना होत असतो. हा अर्धांगवातासारखाच विकार आहे; पण तो एखाद्याच अंगाला किंवा उपांगाला किंवा त्यातील एखाद्या स्नायूला होत असतो. जो भाग लुळा असतो त्या भागावर जळवा लावाव्यात म्हणजे त्यातील मारक विष निघून जाईल. गाढवी किंवा घोडी ह्यांचे दूध रुग्ण मुलाला नियमाने पचेल तसे पाजले पाहिजे. तो अवयव शेकून नारायण तेल, निर्गुड्यादि तेल किंवा चंदनबलालाक्षादि तेल ह्यांचे अभ्यंग करून हळूवार मर्दन करून त्या भागात जिरविले पाहिजे किंवा शेकून मर्दन केले पाहिजे. लाकडी पट्ट्या लावून गरम कापड्याने तो अवयव बांधून ठेवावा. शेळी, कोंबडा, कबूतर इत्यादींचे मांस शिजवून त्यांच्या पोटीसाने सौम्य असा शेक द्यावा. वातनाशक द्रव्यांनी महाघृत सिद्ध करून त्यातून किंवा नारायण तेलातून एकांगवीर समीरपन्नग, राजवल्लभ वातागजांगकुश ह्यांपैकी योग्य ते औषध द्यावे. वरील तेलांचा मात्रावस्तीही देत असावे.

-----------------------------------------------------------------------------------------

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate