स्तनपान हे पोषणाचा एक स्रोत म्हणण्यापेक्षा कितीतरी अधिक आहे – त्यामुळे माता तसंच तिच्या बाळाच्या आरोग्याला फायदा होतो.
बाळाला पहिल्या सहा महिन्यांत केवळ स्तनपान करवणं सर्वोत्तम कारण त्यामुळं पचनाशी निगडीत समस्यांपासून संरक्षण मिळतं – ते पचायला सोपं असतं आणि बध्दकोष्ठता होत नाही. त्यामुळं बाळाच्या आतड्यांची प्रतिकारशक्ती वाढते.
स्तनपानामुळं दमा आणि कानाच्या संक्रमणापासून संरक्षण मिळतं – याचं कारण असं की त्यामुळं बाळाच्या नाक आणि घशातील पडद्यांवर एक सुरक्षात्मक स्तर तयार होतो.
गायीच्या दुधानं काही बाळांना तीव्र प्रतिक्रीया येते. त्या तुलनेत स्तनपान हे शंभर टक्के सुरक्षित आहे.
स्तनपान करवलेल्या बाळांना नंतरच्या वयात लठ्ठपणा येत नाही असं संशोधनात आढळून आलं आहे – याचं कारण असं की त्यांना भूक लागते तेव्हाच ते अन्न घेतात त्यामुळं पहिल्यापासूनच अतिरीक्त वजन वाढण्याची शक्यता नसते.
बालवयात होणारा रक्तपेशीचा कर्करोग, टाईप-एक मधुमेह आणि नंतरच्या आयुष्यात उच्च रक्तदाब टाळण्याशी देखील स्तनपानाचा संबंध आहे.
स्तनपानामुळं मुलाची बुध्दी काही अंशांनी वाढते असं मत आहे कारण आई आणि बाळ यांच्यात भावनिक नातं निर्माण होतं, आणि अंशतः त्यात अनेक मेदाम्लं असतात जी बाळाच्या मेंदूच्या विकासात उपयुक्त ठरतात.
स्तनपान करवणा-या नवमातांचं वजन नंतर लवकर कमी होतं. त्याचप्रमाणं प्रसुतीनंतरचा तणाव आणि रक्तस्त्राव कमी करायला त्यामुळं मदत होते.
प्रसुतीनंतर नियमितपणे स्तनपान करवल्यास स्तन आणि गर्भाशयाच्या कर्करोगाची शक्यता कमी करता येते – बाळाच्या संगोपनाचा काळ जितका अधिक तेवढा धोका कमी होतो.
स्तनपान करवणे अगदी सोयीचे आणि मोफत आहे (बाहेरील अन्नपदार्थ, दूध पाजावयाच्या बाटल्या आणि इतर वरच्या अन्नाची सामुग्री यांच्या तुलनेत) आणि सगळ्यात उत्तम म्हणजे माता आणि बाळाचं भावनिक नातं सुदृढ होतं – मातेच्या शरीराचा होणारा स्पर्शदेखील बाळाला आश्वस्त करणारा असतो.
बाळाला स्तनपान केव्हा सुरु करावे ?
बाळ जन्माला आल्यानंतर लगेचच त्याला स्तनपान सुरु करावे. उघड्या बाळाला (त्याला हलक्या हातानं पुसून घेऊन कोरडं केल्यानंतर) आईनं स्तनांच्या जवळ धरावं आणि त्वचेचा स्पर्श होऊ द्यावा. त्यामुळे दूध वाहणं सुलभ होतं आणि बाळाला उब मिळते. त्याचप्रमाणं आई आणि बाळ यांच्यात भावनिक संबंध दृढ व्हायला मदत होते.
स्तनपान लवकर सुरु का करावे ?
याची चार मुख्य कारणं आहेतः
बाळ हे पहिल्या ३० ते ६० दिवसांमधे अतिशय क्रियाशील असते.
या काळात त्याची चोखण्याची भावना देखील अत्यंत क्रिय़ाशील असते.
लवकर सुरु करण्यानं स्तनपान यशस्वी होण्याची शक्यता वाढते. स्तनातून येणारा पहिला पिवळसर घट्ट द्राव हा बाळाला संक्रमणापासून वाचवणा-या अनेक घटकांनी युक्त असतो, तो लसीसारखंच काम करतो.
स्तनपान करवण्यानं स्तन सुजणे आणि वेदना टाळली जाते आणि प्रसुतीपश्चात रक्तस्त्राव कमी होतो.