प्रथमोपचार म्हणजे जखमी व्यक्तीची ताबडतोब घ्यावयाची काळजी ही प्रथमोपचाराविषयीची कल्पना आधुनिक काळात जुनाट झाली आहे. आजच्या प्रथमोपचारकाला उपचारांचा अग्रक्रम ठरवता आला पाहिजे आणि मूळ जीवनाधारांचे त्यांला संपूर्ण ज्ञान असणे जरूर असून या ज्ञानाचा जीवनावश्यक शरीरक्रिया चालू ठेवण्याकरिता त्याला उपयोग करता आला पाहिजे.
रेडक्रॉस ही अशा तऱ्हेचे कार्य करणारी व सर्वसामान्यांना तद्विषयक प्रशिक्षण देणारी प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय संस्था आहे. [→ रेडक्रॉस]. अज्ञानापायी कित्येक वेळा मनात मदत करण्याचा हेतू असूनही रुग्णाचे नुकसान होण्याचा संभव असतो. कधीकधी अनभिज्ञ व्यक्तीने केलेले उपचार धोकादायकच ठरतात; उदा., अपघातात पाठीच्या मणक्याचे हाड मोडलेला रुग्ण हलवताना विशेष काळजी न घेतल्यास मेरुरज्जूस (पाठीच्या कण्यातून जाणाऱ्या दोरीसारख्या मज्जातंतूच्या जुडग्यास) इजा पोहोचून मूळ इजा अधिक गंभीर बनून कायमचा अधरांगघात (पायांसह शरीराच्या भागाचा पक्षाघात) होण्याचा धोका असतो.
सर्वसामान्यांना या विषयाचे पद्धतशीर प्रशिक्षण द्यावे व अशा कार्यात एकसूत्रीपणा यावा साठी १८८७ साली इंग्लंडमध्ये सेंट जॉन रुग्णवाहक संस्था निर्माण झाली. या संस्थेकडून अपघातात सापडण्याचा अधिक संभव असलेल्यांना (उदा., खाणमजूर, रेल्वेकामगार, पोलीसदल इत्यादिकांना) प्रथमोपचाराचे प्रशिक्षण देण्यास सुरुवात झाली. दहा वर्षांत या संस्थेचीच एक 'रुग्णवाहक सेना' तयार झाली. अशाच संस्था इतर देशांतही निर्माण झाल्या. भारतात शाळा व महाविद्यालये यांतील विद्यार्थी, बालवीर, वीरबाला, गृहरक्षक, सामाजिक कार्यकर्ते इत्यादींना या विषयाचे प्राथमिक ज्ञान देऊन तयार करण्यात आले आहे.
गंभीर अपघात झालेल्या जागी सामान्यतः गडबड व गोंधळ उडालेला असतो. अशा वेळी डोके शांत ठेवून चटकन कार्यरत होण्याची जरूरी असते. भोवतालची बघ्यांची गर्दी कमी करणे आवश्यक असते. अशा वेळी आपद्ग्रस्तास उघड जखम दिसत नसली, तरी प्रथम आडवे झोपवून ठेवावे. यामुळे रुधिराभिसरण-न्यूनत्व झाल्यामुळे उद्भवणाऱ्या संभाव्य अवसादास (रक्तदाब कमी होणे, नाडी मंदावणे, गार घाम फुटणे वगैरे लक्षणे असलेल्या अवस्थेस) प्रतिबंध होतो, तसेच अंतस्थ इंद्रियांचा अपाय वाढत नाही. प्रथमोपचारकाने रक्तस्राव, श्वासोच्छ्वास थांबणे, अस्थिभंगाची लक्षणे, विषबाधेची लक्षणे इत्यादींचा ताबडतोब आढावा घ्यावा. व्यक्ती जिवंत राहण्याकरिता दोन अत्यावश्यक शरीरक्रिया कार्यरत राहणे फार महत्त्वाची आहे : (१) श्वसनक्रिया आणि (२) रुधिराभिसरण. रुधिराभिसरण क्रियेत हृदयक्रिया एकदम बंद पडल्यास व त्याच वेळी श्वसनक्रियाही थांबल्यास मेंदूची भरून न येणारी हानी होण्याचा गंभीर धोका असतो. या क्रिया ताबडतोब सुरू करण्याच्या प्रयत्नांना 'हृद्-फुप्फुस संजीवन' म्हणतात. प्रत्येक प्रथमोपचारकास अशा प्रयत्नांची संपूर्ण माहिती असणे आवश्यक असते.
वरील उपायांनी रक्तस्राव न थांबला किंवा तो जोरात चालूच राहिला किंवा संपूर्ण रोहिणीच तुटली असेल, तरच रोहिणीबंध वापरावा. रोहिणीतील रक्तप्रवाह बंद करणाऱ्या कपडा, हातरुमाल, रबर वगैरेंपासून बनविलेल्या साधनाला रोहिणीबंध म्हणतात. सर्वांत सोपा व चटकन वापरता येणारा रोहिणीबंध पुढीलप्रमाणे बनवता व वापरता येतो. साधारणपणे चार बोटे रुंदीची फडक्याची घडी प्रथम दोन वेढे देऊन गाठ मारून, जखम आणि हृदय यांच्या दरम्यान असलेल्या हाताच्या किंवा पायाच्या प्रमुख रोहिणीवर बांधावी. शिल्लक राहिलेल्या फडक्याच्या दोन टोकांत लहान लाकडी काठीचा तुकडा ठेवून तो घट्ट राहील अशी दुसरी गाठ मारावी. लाकडी काठीची दोन्ही टोके फिरवून रक्तस्राव पूर्ण थांबेपर्यंत पीळ द्यावा. (आ. २).
स्त्रोत: मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 10/7/2020
कामावर असताना झालेल्या अपघातामुळे वा आजारपणामुळे क...
दुरदर्शन सह्याद्री निर्मित या माहितीपटात मानसिक आघ...
प्रत्येक अपघातात होणारी शारीरिक इजा कमीअधिक प्रमाण...
किसान क्रेडिट कार्डधारकांना ‘वैयक्तिक अपघात विमा प...