অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

बुडणे

बुडणे

आपल्या देशात पाण्यात बुडून होणा-या मृत्यूंमध्ये खेडयांतल्या स्त्रियांची संख्या फार आहे. यातल्या ब-याच घटना आत्महत्येच्या किंवा खुनाच्या असतात. परंतु त्या'अपघात' असल्याचे भासवले जाते. चुकून बुडण्याच्या घटना त्या मानाने थोडया असतात. पाण्यात बुडल्यावर प्रथम नाकातोंडात पाणी जाऊन फुप्फुसे व जठर यांत पाणी शिरते. जठराला पाण्याची सवय असते, पण फुप्फुसांना पाणी अजिबात चालत नाही. वायुकोशांमध्ये पाणी शिरल्यावर फुप्फुसांचे श्वसनाचे काम बंद पडते. जर दोन्ही फुप्फुसांचा बहुतांश भाग पाण्याने व्यापला असेल तर प्राणवायू-कार्बवायूची देवाणघेवाण थांबून मृत्यू ओढवतो. श्वसन बंद पडल्यानंतर 3 मिनिटांत श्वसन परत चालू करणे शक्य झाले नाही तर मृत्यू ओढवतो. फुप्फुसातून थोडे पाणी रक्तप्रवाहात शोषले जाते, हृदयक्रिया चालू असल्यास फुप्फुसे ब-याच प्रमाणात रिकामी होऊन प्राण वाचू शकतो. मात्र मोठया प्रमाणात पाणी रक्तप्रवाहात आल्यावर रक्तातील क्षारांच्या पातळीत बदल होऊन हृदयक्रियेवर घातक परिणाम होतो. समुद्राचे खारट पाणी रक्तात शिरते तेव्हा हृदय अचानक बंद पडते आणि गोडे पाणी शिरते तेव्हा हृदयक्रिया अनियमित आणि कापरी होते. दोन्हीमुळे मृत्यू ओढवू शकतो.

प्रथमोपचार

बुडित व्यक्तीला बाहेर काढून प्रथमोपचार दिल्यास काही वेळा जीव वाचू शकतो. बुडिताच्या प्रत्येक घटनेत हे प्रयत्न केलेच पाहिजेत.

पाणी बाहेर काढणे

बुडलेल्या व्यक्तीला बाहेर काढल्यानंतर तिची श्वसनक्रिया आणि हृदयक्रिया सुरळीत चालू ठेवणे महत्त्वाचे आहे. या दोन गोष्टी शक्य झाल्या तरच प्राण वाचू शकतील. यासाठी कृत्रिम श्वसन व हृदयक्रिया चालू करण्यासाठी उपाय करावे लागतील. काहीजण रुग्णाच्या पोटावर बसून प्रथमोपचार करतात म्हणजे शरीराच्या वजनाने पोटातील पाणी अन्ननलिकेवाटे बाहेर पडते. पण हे बाहेर पडणारे पाणी परत श्वसनसंस्थेत जाणार नाही ही दक्षता घ्यावी लागते; यासाठी रुग्णाला उताणे झोपवण्यापेक्षा पालथे झोपवून श्वसनक्रिया दिल्यास सोपे होते. पण हृदयक्रिया बंद पडली असेल तर मात्र हृदयावर दाब देण्यासाठी उताणेच झोपवावे लागते. अशा परिस्थितीत रुग्णाचे तोंड एका बाजूला वळवले तरी बाहेर पडणारे पाणी श्वसनसंस्थेत जाणे टळू शकते. श्वसन व हृदयक्रिया सुरळीत झाल्यावर रुग्णालयात हलवावे. बुडलेल्या व्यक्तीच्या मागून पोटाला कव घालून उचलल्यास पोटातले पाणी बाहेर पडायला मदत होते. बुडलेल्या व्यक्तीला बाहेर काढल्यानंतर दोन्ही पाय धरून हवेत गोल फिरवण्याची पध्दत काहीजण वापरतात. यामुळे पोटात गेलेले पाणी उलटले जाऊन तोंडावाटे बाहेर पडण्याची शक्यता असते.पण श्वसनक्रिया व हृदयक्रिया याकडे लक्ष देणे जास्त आवश्यक आहे हे लक्षात ठेवले पाहिजे.

श्वसनोपचार

कृत्रिम श्वसन देण्याच्या दोन पध्दती आहेत. एक पध्दत म्हणजे तोंडाला तोंड लावून दर मिनिटाला 15-16वेळा श्वासोच्छ्वास करवणे. दुसरी पध्दत म्हणजे रुग्णाच्या छातीच्या बाजूला चवडयावर बसून छातीच्या दोन्ही बाजूंवर दाब देणे व काढणे. या पध्दतीत दाब दिल्यावर हवा बाहेर पडते. दाब सोडल्यावर छाती विस्फारून हवा आत ओढली जाते. ही क्रियाही दर मिनिटास 15-16वेळा करावी. बुडालेल्या व्यक्तीच्या बाबतीत काहीजण ही दुसरी पध्दत वापरतात. कृत्रिम हृदयक्रिया याबरोबर हृदयक्रिया बंद पडली असेल तर आधी छातीच्या मध्यभागाच्या हाडावर दोन-तीन वेळा मुठीने जोरात ठोका. या आघाताने हृदयाचे ठोके परत चालू होण्याची शक्यता असते. या बरोबरच हृदयाच्या जागी दोन हातांचे तळवे एकमेकांवर ठेवून दर मिनिटास 50-60 वेळा दाब द्या.

दोन्ही प्रथमोपचार एकत्र

हृदयक्रिया व श्वसनक्रिया चालू करण्यासाठी हे दोन्ही प्रथमोपचार एकच व्यक्ती करू शकते. पण मदत असेल तर ती घ्यावी. यासाठी एकदा कृत्रिम श्वसन व चार वेळा हृदयावर दाब असा क्रम ठेवून दर मिनिटास 15 श्वसन व 50-60 वेळा हृदयावर दाब देता येईल. याबरोबर रुग्णाच्या मानेवर बाजूला मोठया रोहिणीवर नाडी तपासता येते. हृदयक्रिया दुबळी असल्यामुळे मनगटावर नाडी कळणे अवघड असते, पण गळयात नाडी नक्की कळू शकते. मदतीला दुसरी व्यक्ती असल्यास ती नाडी तपासणी करू शकेल. हा एकत्र प्रथमोपचार तसा दमवणारा असतो. दुसरी व्यक्ती मदतीला असल्यास आलटून पालटून हे करता येईल. दहा मिनिटे प्रथमोपचार करून उपयोग न झाल्यास प्रयत्न थांबवा. प्रथमोपचार चालू ठेवून व्यक्तीला रुग्णालयात दाखल करावे. पाणी गेल्यामुळे फुप्फुसांमध्ये जंतुदाह (न्युमोनिया) होण्याची शक्यता असते. बुडित व्यक्तीमध्ये धुगधुगी असताना रुग्णालयात नेल्यास प्राणवायूही देता येतो आणि त्याचा चांगला उपयोग होतो.बुडणे व कायदा बुडिताची घटना ही पोलिसांना कळवणे बंधनकारक आहे. अपघात, खून, आत्महत्या,इत्यादी गोष्टींची शहानिशा होणेही आवश्यक असते. म्हणून घटनेसंबंधी योग्यचौकशी व मरणोत्तर तपासणी झाली पाहिजे. पण एवढे करूनही सत्य सापडेलच असे नाही. कारण बुडून प्राण गेल्यानंतर शवविच्छेदनात एवढेच कळते, की त्या व्यक्तीने पाण्यात असताना'श्वास' घेतला होता की नाही. फुप्फुसातले पाणी, हृदयाच्या कप्प्यांची तपासणी, जठरातल्या पाण्यातल्या पाणवनस्पती, इत्यादींवरून 'मृत्यू पाण्यात पडण्याआधी झाला की नंतर' एवढे निश्चित होऊ शकते. आधीच जीवे मारून फेकले असेल तर शरीराच्या आत असे काहीही बदल न होता फक्त हातापायांची त्वचा पांढरी पडणे, जलचरांनी लचके तोडणे, इत्यादी वरवरच्या खाणाखुणा दिसतात. बुडून प्राण गेल्याचे नक्की झाले तरी अपघात, आत्महत्या, खून याबद्दल इतर पुरावाच सत्य सांगू शकेल. उदा. एखादी बुडित व्यक्ती हातपाय बांधलेल्या अवस्थेत असेल तर हा खूनच असणार, आत्महत्या किंवा अपघात नाही. शिवाय सामाजिक, कौटुंबिक अन्यायाने एखाद्या सासुरवाशिणीने विहिरीत जीव दिला तर तांत्रिकदृष्टया ती आत्महत्या असते, पण खरे तर खूनच होतो. याचा निर्णय निष्पक्ष न्याययंत्रणा आणि परिस्थितिजन्य पुरावाच देऊ शकेल.

 

लेखक : डॉ. श्याम अष्टेकर (MBBS, MD community Medicine)

संदर्भ : आरोग्यविद्या

अंतिम सुधारित : 6/5/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate