অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

रस्त्यावरचे अपघात व अस्थिभंग

रस्त्यावरचे अपघात व अस्थिभंग

 

 

 

 

 

 

 

अस्थिभंगाची आणि जखमांची चर्चा पुस्तकात इतर ठिकाणी केली आहे. रस्त्यावरच्य अपघातांचे प्रमाण खूप वाढते आहे आणि त्यात अनेक प्रकारच्या जखमा होतात,  यातल्या ब-याच घातक ठरतात. आपल्या सोयीसाठी आपण या जखमांचे वर्गीकरण करू या.

  1. केवळ त्वचेला झालेल्या जखमा
  2. त्वचा व त्याखालचे स्नायू इत्यादींना झालेल्या जखमा.

हात-पायाशी संबंधित अस्थिभंग, डोके फुटणे व त्यातील मेंदू, डोळा, कान यांच्या जखमा, जबडयाच्या व चेह-याच्या जखमा
छातीच्या जखमा, आतली फुप्फुसे हृदय यांना इजा, उदरपोकळीतील जठर, लहान आतडे, पांथरी, इ. इंद्रियांना इजा पोहोचणे
योग्य तो प्रथमोपचार देऊन जखमीस ताबडतोब रुग्णालयात पोहोचवावे. छातीच्या,पोटाच्या व डोक्याच्या जखमा फसव्या असतात, कारण आतील अवयवांना इजा झाली आहे की नाही हे कळणे सोपे नसते. वेळीच या गोष्टी कळल्या नाहीत आणि उपचारांना उशीर झाला तर मृत्यूही येऊ शकतो.

अपघातांच्या बाबतीत खालीलपैकी काहीही खाणाखुणा दिसल्यास विशेष धोका असतो.  कान, नाक, तोंड यांपैकी कोठूनही रक्तस्राव होणे (कवटी फुटलेली असण्याची शक्यता)  कोठेही अस्थिभंग आढळणे. यासाठी त्या व्यक्तीच्या सर्व शरीराची तपासणी करावी लागेल. डोके, हात, पाय, फासळया, पाठीचा कणा, कंबर यांपैकी कोठेही अस्थिभंग असू शकेल. अस्थिभंगाच्या ठिकाणी बहुधा वेदना आढळते (वृध्द व्यक्ती असेल तर अस्थिभंग वेदनारहितही असू शकतो). अस्थिभंग उघड किंवा आतल्या आत असू शकतो.

अतीव वेदना, विशेषतः पोट व छाती यांतील वेदना (आतील अवयवांना मार लागला असेल.).

रक्तस्राव

बाहेर दिसणारा रक्तस्राव थांबवणे शक्य असते. जखमेच्या जागी कपडा दाबून बहुधा रक्तस्राव थांबतो. पण आतला रक्तस्राव ओळखणे आणि थांबवणे अवघड असते. याची एक महत्त्वाची खूण म्हणजे रक्तदाब कमी-कमी होत जाणे व नाडी वेगाने चालणे. कधीकधी रक्तस्रावाच्या जागी फुगवटा किंवा सूज दिसते.
बेशुध्दी, दम लागणे यांपैकी काही आढळल्यास, दोन्ही डोळयांवर बाजूने प्रकाशझोत टाका. बाहुल्यांचा आकार वेगवेगळा असल्यास किंवा बाहुलीचा आकार बदलत नसल्यास किंवा बाहुलीचा आकार खूप बारीक झाला असल्यास धोका असतो. (या बाबतीत मेंदूस इजा असण्याची शक्यता), शरीराचा कोठलाही भाग हलवता न येणे, निर्जीव होणे, किंवा बधिरता. (चेतातंतू किंवा नसेला मार लागणे)
नाडीच्या जागा-मनगट, पाऊल - तपासून पहा. शरीराच्या कोणत्याही भागातला रक्तप्रवाह थांबल्यास धोका असतो. नाडी कमी किंवा त्या भागाचा रंग फिका होणे यावरून अंदाज बांधता येईल.

दातांची रेषा वाकडीतिकडी होणे-जबडयाच्या अस्थिभंगाची शक्यता. इतर कोठलीही गंभीर इजा आढळल्यास.

प्रथमोपचार

  1. आधी जखमी व्यक्तीस धीर द्या व इतरांना मदतीला बोलवा.
  2. अपघाताच्या परिस्थितीतून व्यक्तीस बाजूला काढा. उदा. अंगावर काही अवजड वस्तू पडल्या असल्यास त्या काढा.
  3. रक्तस्राव होत असल्यास तो थांबवा. (याबद्दल जास्त माहिती त्वचेच्या प्रकरणात, 'जखमा' या सदरात दिलेली आहे.)
  4. शक्य असेल तर जखमा स्वच्छ फडक्याने बांधून घ्या.
  5. श्वसन व नाडी तपासून घ्या. या क्रिया बंद पडलेल्या दिसल्या तर कृत्रिम उपायांनी या क्रिया चालू करण्याचा प्रयत्न करा. हे तंत्र सोपे आहे आणि 'बुडणे' या सदरात त्याची माहिती दिली आहे.
  6. अस्थिभंग असेल तर तो भाग योग्य पध्दतीने 'बांधून'ठेवा म्हणजे वेदना होणार नाही.
  7. ज़खमीस चालता येत नसेल तर त्याला हलवताना योग्यती काळजी घ्या. एक चादर आणि दोन बांबू वापरून स्ट्रेचर बनवता येईल. पाठीच्या कण्याचा अस्थिभंग असेल तर जखमीस विशेष काळजीपूर्वक हलवले पाहिजे, यामुळे चेतारज्जूस जास्त इजा होत नाही. यासाठी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पाठीच्या कण्याची हालचाल न करता ताठ अवस्थेत उताणे किंवा पालथे नेले पाहिजे. अशा वेळी निदान तीन-चार जणांची मदत लागते.

 

लेखक : डॉ. श्याम अष्टेकर (MBBS, MD community Medicine)

संदर्भ : आरोग्यविद्या

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate