অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

स्ट्रोक उष्माघाताचा !

उन्हाळ्यात विदर्भ, मराठवाड्यात उष्माघाताचे बळी गेल्याचे आपण नेहमी ऐकतो. मात्र आता तापमान वाढीमुळे राज्यभरात उष्माघाताने “घात” झालेल्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. उष्माघात म्हणजे उष्णतेचा आघात. इंग्रजीत त्याला सनस्ट्रोक म्हणतात. या व्याधीत सुरुवातीला चक्कर, डोकेदुखी, मळमळ-उलटी, पोटात वेदना, गोंधळलेली अवस्था ही सामान्य लक्षणे रुग्णामध्ये पहायला मिळतात. याकडे दुर्लक्ष केल्यास मात्र रुग्णाला जीवही गमवावा लागतो.

कारणे व लक्षण

प्रखर तापमानात बाहेर उन्हात फिरणे (यामुळे शरीरातील पाण्याची मात्रा अचानक कमी होते व मृत्यु ओढवतो.), उन्हात जाताना कानाला फडके न बांधता फिरणे (यामुळे उष्णता थेट मेंदुपर्यंत पोहोचते.), उपाशी पोटी जास्त काळ तीव्र उन्हात फिरणे (यामुळे शरीरास साखरेचा, ग्लुकोजचा पुरवठा कमी होतो.), अति थंड पाणी पिणे अथवा एसी मधून थेट उष्णतेच्या जागी जाणे (यामुळे शरीराच्या तापमानात अचानक बदल होतो.) ही उष्माघाताची सामान्य कारणे आहेत. उन्हाळ्यात बाहेरील तापमान 40 सेल्सियसहून अधिक असते. मात्र शरीरातील घाम निर्माण करणाऱ्या केंद्रामुळे बाहेरील तापमान काहींही असो शरीराचे तापमान 37 अंश सेल्शियस ठेवले जाते. तेच शरीरासाठी योग्य असते.

ऊन आणि गरम हवेच्या झोतामध्ये काम करावे लागले किंवा तीव्र उष्णतेच्या संपर्कात गेल्यास शरीरातील तापमान नियंत्रित करणारी हायपोथॅलॅमसमधील यंत्रणा कोलमडून पडते आणि उष्माघात होतो. उष्माघात होण्याचे नेमके कारण म्हणजे शरीरातून बाहेर पडणाऱ्या उष्णतेहून शोषलेली उष्णता अधिक असते. यामुळे शरीराचे तापमान वाढते. उष्माघात झाल्यानंतर तातडीची वैद्यकीय सेवा मिळाली नाही तर मृत्यू ओढवतो. उष्माघात आणि ताप येणे या भिन्न प्रक्रिया आहेत. ताप येण्यामध्ये शरीराचे तापमान नेहमीहून अधिक राहते. व्याख्येप्रमाणे उष्माघात म्हणजे शरीराचे तापमान 38.1 पेक्षा अधिक किंवा त्याहून अधिक तापमानाला स्थिर राहणे. सामान्यपणे दुपारी शरीराचे तापमान 37.70 सेल्सियस असते. उष्माघातामध्ये हे तापमान 40 सेल्सियस होवून ते जीवघेणे ठरते.
उष्ण, कोरडी त्वचा हे उष्माघाताचे लगेच ओळखून येणारे लक्षण आहे.

त्वचेलगतच्या रक्तवाहिन्यामधून उष्णता बाहेर पडण्याच्या प्रक्रियेमध्ये त्वचा लालबुंद होते. त्वचेचा रंग काळपट असेल तर नखे, ओठ, आणि खालची पापणी ओढून पाहिल्यास त्वचेचा नेहमीचा रंग बदलल्याचे समजते. ओठ सुजतात, घाम येण्याचे बंद झाल्याने त्वचा कोरडी पडते. उष्माघाताची इतर लक्षणे कारणपरत्वे बदलतात. उष्माघाताबरोबर जलशुष्कता असल्यास मळमळ, उलट्या, डोकेदुखी आणि रक्तदाब कमी झाल्याचे आढळून येते. परिणामी रुग्ण बेशुद्ध पडतो. अशा व्यक्तीला उभे करण्याचा प्रयत्न केल्यास ती खाली पडते.

तीव्र स्वरूपाचा उष्माघात असल्यास व्यक्ती गोंधळल्यासारखी होते, कधीकधी संतापते, मद्यपान केल्यासारखी स्थितीही होते. रुग्णाची नाडी जलद लागते, श्वसनाचा वेग वाढतो. रक्तदाब कमी झाल्याने हृदय अधिक वेगाने आकुंचन पावून शरीरास पुरेसा ऑक्सिजन पुरवण्याचा प्रयत्न करते. रक्तदाब कमी झाल्याने रक्तवाहिन्या आकुंचन पावतात. त्वचा फिकट होते. फिकट त्वचा झाल्यास ही उष्माघाताची तीव्र अवस्था असते. लहान मुलांना उष्माघातामध्ये झटके येतात. शरीरातील अवयवांचे कार्य थांबते आणि मृत्यू ओढवतो.

बाहेरील तापमान चाळीसहून अधिक आणि शरीराचे तापमान चाळीस झाल्यास उष्माघात होतो. उष्माघात दोन प्रकारचा होतो. एका प्रकारात बाह्य तापमानामुळे शरीराचे तापमान वाढते. ते नेहमीच्या उपायांनी कमी होत नाही. आणि दुसरा बाह्य तापमान अधिक असता शारिरिक कष्टाची कामे करताना किंवा उन्हाळ्यात व्यायाम करताना होतो. शारिरिक कष्टाची कामे करताना स्नायूंच्या चयापचयामुळे आधीच शरीर अधिक उष्णता निर्माण करते. उष्ण आणि दमट हवेत शरीर थंड ठेवण्याची यंत्रणा काम करीत नाही. हा अनुभव ऐन उन्हाळ्यात खेळाच्या स्पर्धा घेताना येतो. यात भर घालणाऱ्या बाबी म्हणजे अतिशय कमी पाणी पिणे, मद्यपान आणि वातानुकूलित यंत्रणा बंद पडणे या आहेत.

प्रथमोपचार आणि उपचार

उष्माघातात लवकरात लवकर शरीरातील जादा उष्णता काढणे व रक्ताभिसरण खेळते ठेवणे हाच महत्त्वाचा प्रथमोपचार आहे. त्यासाठी रुग्णास तातडीने सावलीत नेणे, ओली चादर अंगावर टाकून वारा घालणे हे ताबडतोब करण्याचे उपाय आहेत. शक्य असल्यास रुग्णास थंडगार पाण्यात थोडा वेळ ठेवावे. रुग्णाच्या शरीराचे तापमान थोडे कमी झाल्यावर त्याला बाहेर काढावे. याबरोबरच हातपाय चोळावेत म्हणजे रक्ताभिसरण सुधारते. प्रथमोपचारानंतर मात्र रुग्णाला तातडीने रुग्णालयात नेवून औषधोपचार सुरु करणे गरजेचे आहे.

औषधांच्या परिणामामुळे झालेल्या उष्माघातावर उपचार म्हणून पॅरासिटॅमॉल, ॲसस्पिरिन सारख्या ताप कमी होण्यासाठी देण्यात येणाऱ्या औषधांचा वापर करू नये. उष्माघात झालेल्या व्यक्तीने थंड पाण्याच्या टबमध्ये शरीर बुडवण्याने शरीरातील उष्णता कमीतकमी वेळात बाहेर पडते. हा उपाय तारतम्याने करावा लागतो. टबातील पाणी अति थंड असल्यास रुग्णाच्या त्वचेलगतच्या रक्तवाहिन्या संकोचतात आणि शरीरातील उष्णता बाहेर येण्यात अडथळा निर्माण होतो. प्रायोगिक स्वरूपामध्ये उष्माघात स्थितीपर्यंत असलेल्या रुग्णास थंड पाण्यात बुडवण्याने पुढची गंभीर स्थिती येत नाही.

शरीराचे तापमान 40 सेल्सियस होऊन व्यक्ती बेशुद्ध झाल्यास तातडीचे वैद्यकीय उपचार करावे लागतात. रुग्णालयामध्ये सलाईन लावणे, जठरामध्ये नळी टाकून आतील द्रव बाहेर काढणे आणि जठरात शीत सलाइन नळीवाटे देणे आणि तातडीच्या उपायामध्ये रक्ताचे तापमान कमी करण्यासाठी डायलिसिस वर रुग्ण ठेवणे अशा उपायांचा समावेश होतो. उष्माघात होऊ नये यासाठी सोबत मान आणि डोके झाकेल असा मोठा पांढरा रुमाल किंवा पंचा, पूर्ण अंगभर शक्यतो सुती कपडे वापरावेत. कमीत कमी वेळात इच्छित स्थळी पोहोचण्यासाठी प्रयत्न करावेत, शक्यतो तीव्र उन्हात जाणे टाळावे, जवळ पाण्याची बाटली ठेवावी, दर अर्ध्या तासाने एक ग्लास पाणी प्यावे, अधून-मधून बर्फ न टाकलेले लिंबू पाणी प्यावे. अशा छोट्या उपायांनी व योग्य जीवनशैलीने आपण उष्माघात टाळू शकतो.

 

लेखक - संग्राम इंगळे,
उप माहिती कार्यालय बारामती

स्त्रोत : महान्युज

 

अंतिम सुधारित : 6/5/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate