অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

स्वाईन फ्ल्यूचे आव्हान

वेळीच उपचार आणि काळजी घेण्याची गरज अतिशय झपाट्याने पसरत असलेला स्वाईन फ्ल्यूचा संसर्ग हे आज देशापुढीलच नव्हे, तर महाराष्ट्रासमोरीलही एक मोठे आव्हान बनले आहे. दि. १५ मार्च, २०१५ रोजी केंद्र शासनाच्या आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या माहितीनुसार, स्वाईन फ्ल्यूची लागण होऊन भारतात १ हजार ७३१ हून अधिक लोक आणि महाराष्ट्रात ३०१ हून अधिक लोक दगावले आहेत. देशभरात ३० हजार लोकांना आणि महाराष्ट्रातील ३ हजार लोकांना या रोगाची लागण झाली आहे. असे असले तरी, स्वाईन फ्ल्यूच्या रुग्णाला वेळीच उपचार मिळाले आणि रुग्णाची योग्य काळजी घेतली, तर या रोगावर मात करणे सहज शक्य आहे. म्हणूनच स्वाईन फ्ल्यूविषयीची जनजागृती व्हावी, याकरिता स्वाईन फ्ल्यूच्या संसर्गाविषयी या अंकातून महत्त्वपूर्ण माहितीप्रसिद्ध करीत आहोत...

स्वाईन फ्ल्यू किंवा ‘इन्फ्ल्यूएंझा-ए’ हा संसर्गजन्य रोग ‘एच-१ एन-१’ या विषाणूपासून होतो. याची लक्षणे  प्रामुख्याने पुढीलप्रमाणे असतात.

स्वाईन फ्ल्यूची लक्षणे कोणती?

  • सर्दी, घशात खवखव होणे.
  • ३८ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक ताप
  • अंगदुखी, सांधेदुखी
  • खोकला
  • काही वेळा उलट्या व हगवण

फ्ल्यूचा प्रसार कसा होतो?

  • आजारी व्यक्तीच्या शिंकण्या-खोकण्यातून हा रोग पसरतो. रोगाचे स्वरूप सर्वसाधारणपणे सौम्य असते. त्यामुळे हा रोग पसरू नये, यासाठी नागरिकांनी न घाबरता काळजी घेण्याची गरज आहे.

अधिक काळजी कोणी घ्यावी?

  • मधुमेह, उच्च रक्तदाब, कर्करोग, दमा, फुफ्फुस-मूत्रपिंडाचे आजार, तसेच इतर अनुवंशिक आजार असणार्‍या व्यक्तींमध्ये आणि गर्भवतींमध्ये हा रोग गंभीर रूप धारण करताना दिसतो. लठ्ठ व्यक्तींमध्ये, तसेच स्टेरॉईडसारखी औषधे दीर्घकाळ घेणार्‍या व्यक्तींमध्येही गुंतागुंत आढळून येते.

रोगाचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी काय करावे?

  • साबण आणि स्वच्छ पाण्याने हात वारंवार धुवा.
  • पौष्टिक आहार घ्या. आहारात लिंबू, आवळा, मोसंबी, संत्री आणि हिरव्या पालेभाज्या यांचा वापर करा. भरपूर पाणी व द्रव पदार्थ घ्या.
  • पुरेशी झोप आणि विश्रांती घ्या.
  • शिंकताना, खोकताना नाक आणि तोंडावर रुमाल धरा.
  • डॉक्टरांच्या सल्ल्याने विनाविलंब उपचार सुरू करा. फ्ल्यूवरील उपचार ४८ तासांच्या आत सुरू झाल्यास ते अधिक गुणकारी ठरतात.

काय करू नये

  • सार्वजनिक ठिकाणी थुंकू नका.
  • फ्ल्यूची लक्षणे असल्यास हस्तांदोलन करू नका.
  • फ्ल्यूसदृश लक्षणे असतील, तर गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका.

रुग्णाची घरगुती काळजी कशी घ्यावी

  • बहुतांश फ्ल्यू रुग्ण सौम्य स्वरूपाचे असतात. त्यांना रुग्णालयात भरती करण्याची आवश्यकता पडत नाही. घरामध्ये फ्ल्यूच्या रुग्णांची काळजी अशी घ्यावी-
  • घर मोठे असेल, तर रुग्णांकरिता वेगळी खोली निश्चित करावी.
  • रुग्णाने शक्यतो बैठकीच्या खोलीत ज्या ठिकाणी सर्व कुटुंबिय असतील तेथे येणे टाळावे.
  • रुग्णाने नाकावर साधा रुमाल बांधावा.
  • रुग्णाची सेवा शक्यतो कुटुंबातील एकाच व्यक्तीने करावी.
  • घरात जर कोणी अतिजोखमीचे आजार असणारे असतील, तर रुग्णाने त्यांच्या निकट सहवासात जाऊ नये.
  • घरात ब्लीच द्रावण तयार करावे. याचा उपयोग रुग्णाचे टेबल, खुर्ची, तसेच रुग्णाचा स्पर्श होणारे पृष्ठभाग पुसण्यासाठी करावा.
  • रुग्णाने वापरलेले टिश्यू पेपर अथवा मास्क इतस्तत: टाकू नयेत.
  • रुग्णाने वापरलेले रुमाल गरम पाण्यात/ब्लीच द्रावणात अर्धा तास भिजवून स्वच्छ धुवावेत.
  • रुग्णाचे अंथरूण, पांघरूण, टॉवेल हाताळल्यास हात साबण व पाण्याने स्वच्छ धुवावेत.
  • रुग्णाने भरपूर विश्रांती घ्यावी.
  • धूम्रपान करू नये.
  • डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधे घ्यावीत.
  • दिवसातून किमान दोन वेळा गरम पाण्यात मीठ, हळद टाकून गुळण्या कराव्यात.
  • गरम पाण्यात निलगिरी तेल/मेंथॉल टाकून त्याची वाफ घ्यावी.
  • ताप आणि फ्ल्यूची इतर लक्षणे मावळल्यानंतर किमान चोवीस तासांपर्यंत घरी राहावे.
  • धाप लागणे, श्‍वास घेताना छातीत दुखणे, खोकल्यातून रक्त पडणे, ताप न उतरणे अशी लक्षणे आढळल्यास, तसेच लहान मुलांमध्ये चिडचिड करणे, खाण्यास नकार, उलट्या अशी लक्षणे दिसल्यास तात्काळ डॉक्टरांना दाखविणे आवश्यक आहे.

राज्य शासन काय उपाययोजना करत आहे?

  • फ्ल्यूसदृश रुग्णांचे नियमित सर्वेक्षण.
  • फ्ल्यूसदृश  रुग्णांवर वर्गीकरणानुसार उपचार.
  • राज्यातील १२८ उपजिल्हा, जिल्हा आणि वैद्यकीय महाविद्यालयांच्या रुग्णालयात विलगीकरण कक्षाची स्थापना.
  • उपचार सुविधा असणार्‍या सर्व खासगी रुग्णालयांना स्वाईन फ्ल्यू उपचाराची मान्यता.
  • राज्यातील चार शासकीय प्रयोगशाळांमार्फत मोफत निदान सुविधा.
  • ‘ऑसेलटॅमीवीर’ औषधांचा पुरेसा साठा.
  • अन्न व औषध विभागामार्फत सर्व एक्स शेड्यूलधारक औषध दुकानांमध्ये ‘ऑसेलटॅमीवीर’ औषधे उपलब्ध.
  • शासकीय आणि खाजगी डॉक्टरांच्या स्वाईन फ्ल्यूविषयक कार्यशाळा.
  • फ्ल्यू प्रतिबंधासाठी जनतेचे आरोग्य शिक्षण.

(स्रोत : राज्य आरोग्य शिक्षण संपर्क विभाग, पुणे)

स्त्रोत:  वनराई

अंतिम सुधारित : 6/19/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate