অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

बालवयातल्या मानसिक समस्या

सुमारे पाच-दहा टक्के मुलांच्या बाबतीत मानसिक समस्या असतात, परंतु पालक याबद्दल तक्रार घेऊन येतीलच असे नाही. याचे एक कारण म्हणजे या समस्या लक्षात येणे आणि त्याबद्दल सल्ला घेण्याइतकी सवड काढणे आवश्यक आहे. पालक तक्रारी घेऊन येतात त्या तीन प्रकारच्या असतात.

बालवयातल्या मानसिक समस्या

  1. वयाच्या मानाने अयोग्य वागणूक : उदा. दहा वर्षाच्या मुलाने अंथरूणात लघवी करणे, इ.
  2. शारीरिक, मानसिक अक्षमता : उदा. शाळेत 'ढ' राहणे, वयाच्या हिशेबाप्रमाणे काम, जबाबदारी नीट न पार पाडणे. उदा. आठ वर्षाच्या मुलाने साधी कपबशी इकडून तिकडे नेताना फोडणे, हातात वस्तू नीट न धरणे, गरजेपेक्षा अधिक शारीरिक हालचाली करणे, कमी स्मरणशक्ती, कमी समज, इ.
  3. वाईट वागणूक : चोरी, खोटे बोलणे, सतत मारामारीची तक्रार, इतरांशी सतत भांडण, इत्यादी. वेळीच काळजी घेतली नाही तर अशी मुले गुन्हेगारीकडे वळण्याची शक्यता असते.

कारणे

या प्रकारच्या तक्रारींची कारणमीमांसा मोठी आणि गुंतागुंतीची आहे, पण खालीलप्रमाणे त्यांची वर्गवारी करता येईल.
  • जीवशास्त्रीय कारणे : आनुवंशिकता, मूकबधिरता, निरनिराळे आजार, मतिमंदपणा,इ. यापैकी ऑटिझमबद्दल वेगळया प्रकरणात माहिती दिलेली आहे.
  • मुलाची मानसिक कारणे : पालकांशी किंवा आईवडिलांशी न जमणे, घरातली भांडणे, भावंडांशी संघर्ष, इ.
  • कौटुंबिक, सामाजिक कारणे : अवास्तव कडक शिस्त, प्रेमाचा ओलावा नसणे किंवा अतिलाड, गरिबी, अतिश्रीमंती, आजूबाजूचे विशिष्ट वातावरण, इत्यादी.
  • बालवयात लैंगिक शोषण - विशेषत: कौटुंबिक सदस्यांकडून.

बालवयातील काही ठळक मानसिक समस्या

उदासीन मूल (सहा वर्षापर्यंत) : असे मूल उदास, अलिप्त असते. इतर मुलांच्या मानाने त्याची चळवळ कमी असते. मतिमंदता, शारीरिक आजार, असमर्थता (उदा. कुपोषण, क्षय, इ.), भावनिक कारणांपैकी एखादे कारण यामागे असू शकेल. लवकरात लवकर मानसिक डॉक्टरकडून तपासून घेऊन पुढची काळजी घ्यायला पाहिजे. अतिचळवळे मूल (सहा वर्षापर्यंत) : अशी मुले खूप हालचाल करीत असतात,स्वस्थ बसत नाहीत आणि हातातल्या कोठल्याही गोष्टीवर त्यांचे लक्ष फारसे स्थिर नसते. सतत अस्थिर मन, कोठलीही गोष्ट धडपडीशिवाय येत नाही अशी त्यांची स्थिती असते. यामागेही मतिमंदता, मेंदूला इजा किंवा भावनिक अस्थिरता यांपैकी काही कारणे असू शकतील. अचानक श्वास रोखून धरणे व निश्चल होणे : काही मुले (विशेषतः तीन वर्षापर्यंतची) अचानक श्वास रोखून धरतात व निश्चल होतात. यामागे सर्वांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेण्याचा प्रयत्न असतो. कुटुंबीयांकडून आपणाकडे दुर्लक्ष होत असण्याची मुलाची भावना यामागे असू शकते. अंथरुणात लघवी करणे (6 ते 15 वर्षे) : सामान्यपणे तीन वर्षापर्यंत मुलाला लघवीवर नियंत्रण ठेवण्याचे तंत्र जमते. अनेक कारणांमुळे मूल तीन वर्षानंतरही अंथरुणात लघवी करते. असे नेहमीच होत असेल तर त्यामागे मूत्रसंस्थेचे आजार किंवा मानसिक कारणे असू शकतात. मानसिक कारणांत असुरक्षितता, लक्ष वेधून घेण्याची इच्छा, रात्री बाहेर लघवीस जाण्याची भीती (अंधार), इत्यादी कारणे असतात. रात्री झोपताना खूप पाणी पिण्याची सवय यामागे असू शकते. कारणे समजल्यानंतर उपचार करता येतील. कारणे समजावून घेऊन आवश्यक तर तज्ज्ञाकडे पाठवा. यासाठी होमिओपथिक उपचार उपयुक्त ठरतात. बालवयातील रोगभ्रम : काही मुले अनेक मानसिक कारणांमुळे शारीरिक आजाराच्या तक्रारी करतात. या जाणूनबुजून केलेल्या नसून नकळत 'वापरलेल्या'तक्रारी असतात. यांत सतत डोके दुखणे, पोटदुखी, झटके, थरकाप, इत्यादी माहीत असलेली लक्षणे येतात. याचा निर्णय वैद्यकीय तपासणीनंतरच शक्य आहे. त्याच्या मागचे कारण मानसिक आहे अशी शहानिशा झाल्यावर उपचारासाठी मदत करता येईल.

 

लेखक : डॉ. श्याम अष्टेकर (MBBS, MD community Medicine)

संदर्भ : आरोग्याविद्या

अंतिम सुधारित : 7/21/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate