स्पर्धेच्या युगामुळे ताण- तणावाची व्याप्ती वाढत असून लहान मुले असो किंवा तरुण-तरुणी, पुरूष असो किंवा महिला, या सर्वांसह वृध्दांना देखील याने आपल्या कवेत घेतलं आहे. मानसिक आरोग्य म्हणजे नेमके काय, त्याची लक्षणं काय आहेत आणि त्याच्यावर उपचार कसे केले जातात याविषयी जाणून घेण्यासाठी मानसोपचार तज्ज्ञ डॉ. निलम मुळे यांना जय महाराष्ट्र कार्यक्रमात आमंत्रित करण्यात आलं आहे.
डॉ. मुळे यांनी मानसोपचारामध्ये मास्टर ही पदवी प्राप्त केली आहे. निसर्गोपचार, योगा, ध्यानधारणा यामधला ३ वर्ष कालावधीचा पदवी अभ्यासक्रम देखील त्यांनी पूर्ण केला आहे. अमरावती येथे तसेच सध्याच्या सह्याद्री हॉस्पीटलमध्ये देखील मानसोपचारतज्ज्ञ म्हणून त्यांनी काम पाहिलं आहे. २००९ पासून त्यांनी स्वत:ची प्रॅक्टीस सुरू केली असून मानसिक आजाराविषयी जनजागृती करणे हे त्यांचं ध्येय आहे. जय महाराष्ट्र कार्यक्रमातून त्यांच्याशी साधलेला हा संवाद.
जसं एखादं वाद्य वाजवण्यासाठी त्यामध्ये संतुलन जसं गरजेचं असतं. तंबोऱ्याच्या तारा कसल्या तर त्या तुटून जातील आणि त्या जर ढिल्या सोडल्या तर त्यामध्ये नाद निर्मिती होणार नाही. म्हणजेच त्याच्यामध्ये योग्य संतुलन असणं गरजेचं आहे. तसंच आपलं देखील आहे. आपलं शरीर हे यंत्र आहे. शरीर-मन-मेंदू यामध्ये देखील योग्य संतूलन असणं गरजेचं आहे. शरीराचं यंत्र हे मनावर अवलंबून आहे. यासाठी आपलं मन सतत सकारात्मक विचारांमध्ये गुंतवूण ठेवणं गरजेचं आहे. थोडासाही ताण जाणवला तर त्यावर वेळीच उपचार करणं महत्त्वाचं आहे. जसं आपण पाय दुखतोय, गुडघा दुखतोय म्हणून डॉक्टरकडे जातो तसंच जरासंही मन दुखलं तरी डॉक्टरकडे जाणे गरजेचे आहे. मन आनंदी नसेल तर आपण समाधानी राहू शकत नाहीत.
सर्वांत महत्त्वाचं म्हणजे तुम्ही आपल्या आवडीचा छंद जोपासणं गरजेचं आहे. सर्वांनी खेळायला पाहिजे कारण खेळ आपल्याला चांगल्या पद्धतीनं जगण्याचं शिकवत असतं. खेळामुळे आपण खूप आनंदी राहत असतो. वर्तमानात कसं आनंदी रहावं हे आपण खेळातून शिकतो. जसं की एखाद्या खेळाडून गोल केला तर तो आनंद साजरा करतो त्याला याची चिंता नसते की आपण उद्याचा सामना जिंकणार की हारणार. तो फक्त आजचा क्षण आनंदानं साजरा करत असतो. त्यामुळे सर्वांनी खेळणं खूप गरजेचं आहे. शिवाय आपल्याला ज्या गोष्टीमध्ये वेळ घालवणं गरजेचं आहे. ध्यानधारणा, सूर्य नमस्कार, योगा यामुळे देखील ताण तणाव खूप प्रमाणात कमी होतील. तसेच आपल्याला खूपच ताण जाणवत असेल तर मानसोपचार तज्ज्ञाचा किंवा समुपदेशकाचा सल्ला घेणं कधीही आवश्यक आहे.
तणावाखाली असणारा रुग्ण एकांतप्रिय असतो. तो स्वत:च्या भावविश्वात रमणारा असतो. त्याने समाजाकडे नेहमी सकारात्मकतेने पाहणे गरजेचे आहे. तसंच त्याने नाटक किंवा चित्रपट पाहणे गरजेचे आहे. समाजातील विविध स्तरातील लोकांना भेटावे सर्वांशी बोलायला पाहिजे.
थोडक्यात याची व्याख्या करायची झाल्यास “संतुलित जीवनशैली” असणं म्हणजे मानसिक आरोग्य असं म्हणता येईल. मानसिक आरोग्य हे मेंदू, शरीर आणि मन या तिन्हींशी निगडीत असल्यामुळे या तिघांमध्ये संतुलन असणं खूप गरजेचं असतं. हे संतुलन जोपर्यंत आहे तो पर्यंत आपलं मानसिक आरोग्य चांगलं आहे असं समजलं जातं. सध्याच्या धावपळीच्या आणि स्पर्धेच्या युगात अनेक कारणांमुळे आपलं मानसिक आरोग्य ढासळत चाललं आहे आणि आपण आपल्या जीवनातल्या आनंदीक्षणापासून वंचित राहत आहोत. परिणामी आपण अधिकच तणावग्रस्त बनत चाललं आहे.
सध्याच्या स्पर्धेच्या युगात तणाव हा सर्वांनाच जाणवतो. लहान मुलं, तरुण, पुरुष, महिला, तसंच वृध्दांना देखील तणावाला सामारे जावं लागतं. विशेष म्हणजे केवळ ८ ते १० वर्षांच्या मुला-मुलींमध्ये देखील या आजाराचे प्रमाण वाढत असल्याचं दिसून येत आहे आणि ही बाब खूप गंभीर आहे. उदाहरण द्यायचं झालं तर माझ्याकडे एका १० वर्ष मुलीचेपालक माझ्याकडे आले आणि ते म्हणाले की “माझ्या मुलीला अध्यात्माची फार ओढ लागलेली आहे आणि ती नेहमी म्हणत आहे की मला देवाकडे जायचे आहे”विशेष म्हणजे ते पालक खूप खुश होते की त्यांच्या मुलीला देवाकडे जायचे आहे. पण त्यांना हे माहितीच नव्हतं की त्यांच्या मुलीला एक मानसिक आजार आहे आणि हे आत्महत्येकडे जाण्याचं लक्षण असू शकतं. गंभीर बाब म्हणजे ते पालक मानसिक आजाराविषयी ते अनभिज्ञ होते. या वयोगटातल्या मुला-मुलीमधील वागण्याच्या बदलत जाणाऱ्या सवयीवरुन आपणाला याचा अंदाज येणं आवश्यक आहे. त्यांचं शांत शांत राहणं, चिडचिड करणं, बोलण्याच्या पद्धतीत बदल होणं अशा काही गोष्टींवरून आपणास लक्षात यायला हवं की ते मानसिक तणावाखाली आहेत. तरूण पिढीमध्ये तर तणावाचं कारण खूप वेगवेगळे असल्याचं दिसून येत आहे कारण बरेच तरूण फेसबुकवर मला खूप लाईक्स मिळाले, मला गर्लफ्रेंड नाही, मला बॉयफ्रेंड नाही अशा गोष्टींवरून देखील तणावाखाली जाताना पहायला मिळतात. वैवाहिक आयुष्य जगताना देखील जोडप्यांना तणावाखालून जावं लागतं.
‘पूर्वी वाढत्या वयात या आजाराचं प्रमाण दिसून येत असे. मात्र आज असं नाही म्हणता येणार कारण आज लहान वयातच अनेकांना तणाव दिसून येत असल्यानं मानसिक आजाराचं प्रमाण वाढत आहे. यामध्ये विद्यार्थ्यांचं प्रमाण सर्वांत जास्त आहे. विशेष म्हणजे केवळ ८ ते १० वर्षांच्या मुला-मुलींमध्ये देखील या आजाराचे प्रमाण वाढत असल्याचं दिसून येत आहे आणि ही बाब खूप गंभीर आहे.
डीप्रेशन हा सर्वात जास्त आढळणारा आजार आहे. हा आजार अनेकांमध्ये आढळून येतो मात्र त्याची कारणे वेगवेगळी असतात. स्क्रिझोफेनिया हा आजार देखील अनेकांमध्ये दिसून येतो. या आजारामध्ये व्यक्ती असंबंधित बोलत राहतो. त्याला बोलण्याचे भान राहत नाही. ऑप्शीसन्स कंपलसिव्ह डीसऑर्डर या आजारामध्ये व्यक्ती स्वच्छतेच्याबाबतीत अति जागरुक असतात. वारंवार हात धुणे ही सवय त्याच्यामध्ये असते. हात नाही धुतले तर आपल्याला काही होईल असे त्याला सतत वाटत असते. दुश:चिंता हा देखील एक आजार आहे. यामध्ये रुग्ण निरर्थक गोष्टींची चिंता करत असतो. कोणत्याही गोष्टीची अतिचिंता त्याला वाटत असते. साधारणपणे हे प्रकार आपल्याकडे मोठ्या प्रमाणात पहायला मिळतात.
नाही. सरसकटपणे असं म्हणता येणार नाही. साधारणपणे दोन प्रकारचे व्यक्तिमत्व असतात. एक सकारात्मक आणि दुसरं नकारात्मक. पहिल्या प्रकारातल्या एखादा अध्यात्माविषयी खूप बोलतो आहे, चर्चा करतो आहे, ज्ञान ग्रहण करतो आहे म्हणजे तो आयुष्याकडे सकारात्मकदृष्टीनं पाहतो आहे, आपल्या जीवनात आणि समाजात सकारात्मक बदल करतो आहे. हे खरंच समाजासाठी चांगलं आहे. पण नकारात्मक व्यक्ती मात्र त्यामध्ये गुरफटल्या जात असतो. उदाहरण द्यायचं झालं तर एखादा रुग्ण दैनंदिन कामं सोडून दिवसांतले अनेक तास देवासमोर बसलेला असतो, देवाची पूजा केली नाही तर मला काहीतरी होईल, माझं कुठलंच काम होणार नाही असे नकारात्मक विचार त्याच्यात निर्माण होतात.
मानसिक आरोग्य बिघडण्याचं मुख्य कारण म्हणजे आजची जीवनशैली होय. आजच्या स्पर्धेच्या युगात मनात आलेली आणि हवी असलेली गोष्ट लगेच हवी आहे. कोणतीही गोष्ट प्राप्त करण्यासाठी जो संयम लागतो तो आजच्या पिढीमध्ये दिसून येत नाही. महत्त्वाकांक्षा असणं वेगळं आणि अतिमहत्त्वाकांक्षा असणं हे वेगळं. या अतिमहत्त्वाकांक्षेपायी आजचा तरूण तणाखाली येत आहे.
हे प्रमाण उपचारातल्या नियमिततेवर अवलंबून आहे. मी आता पूर्णपणे ठिक झालो आहे आता मला उपचाराची गरज नाही असे वाटून अनेक रुग्ण औषधोपचार बंद करतात किंवा समुपदेशकाकडे जाणे थांबवतात. परिणामी रुग्ण पूर्णपणे बरा होत नाही. म्हणून रुग्णांनी औषधोपचार नियमित घेणे, मार्गदर्शक तत्वे पाळणे, थेरपी पूर्ण करणे खूप गरजेचे आहे.
आज सगळीकडे विभक्त कुटूंबपद्धती पहायला मिळत आहे. एकत्र कुटूंब पद्धती असताना सहाजिकच सर्वांना आपलं मन मोकळं करण्यासाठी घरात खूप लोकं असायची. विभक्त कुटूंबपद्धतीमध्ये सदस्यांची संख्या कमी असल्यानं लहान मुलं चिडचिडं बनत चालली आहेत. घरात त्यांच्याशी बोलायला कुणीच नसल्यानं मुलं त्यांच्या खेळण्याशी, बाहुल्यांशी बोलतात अनेकदा एकटंच काहीतरी करत बसतात तेव्हा मात्र त्यांच्या पालकांनी लक्ष द्यायला हवं की आपलं मुल एकट्यात काय करत आहे, काय बोलत आहे.
महत्वाचं म्हणजे आजच्या स्पर्धेच्या युगात लहान मुलांना वेळच मिळत नाही. कारण दिवसातले किमान ६ ते ८ तास शाळा, क्लासेस यांच्यात जातात. आजच्या आई वडिलांना वाटतं की माझं मुल स्पर्धेत पुढं जाण्यासाठी जन्मलं आहे. माझं म्हणणं आहे की तुम्ही आपल्या मुलाकडं एक सामाजिक व्यक्तिमत्व म्हणून पहा जे भविष्यात आपल्या समाजाचा एक भाग होणार आहे त्याला त्याप्रमाणं घडवा. तो जरी अभ्यासात कमी असेल तर त्यामध्ये सकारात्मक दृष्टीने बदल घडवून आणा.
साधारणपणे गंभीर मानसिक आजाराचं प्रमाण ३० टक्के आहे. तसं पाहिलं तर आजच्या स्पर्धेच्या युगात प्रत्येक व्यक्तीला कोणता ना कोणता ताण असतोच. अनेक जण आपण केलेल्या कामाबद्दल समाधानी नसतात, ८ ते १० तास काम करुनही काम केल्याचं समाधान मिळत नाही. अशावेळी आपण आपल्या जीवनशैलीकडे बारकाईने पाहणं गरजेचं असतं. आपला जास्तीत जास्त वेळ कशात जात आहे, आपला जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा आहे हे आपण पाहणं गरजेचं आहे. याकडे दुर्लक्ष केलं तर आपला प्रवास गंभीर मानसिक आजाराकडे होऊ शकतो.
ही महत्त्वाची बाब आहे. कारण रुग्ण तर सोडाच पण कुटूंबिय देखील हे मान्य करत नाहीत की आमच्या कुटूंबात कोणी मानसिक रुग्ण आहे. यासाठी वेगवेगळ्या प्रकारे रुग्णांना डॉक्टरपर्यंत आणण्यासाठी प्रयत्न केले जातात. जसे की त्याला डॉक्टरकडे जायचे आहे असं न सांगता आपल्याला एका मॅडमला भेटायला जायचे आहे असे सांगावे लागते. त्याला आवडणाऱ्या गोष्टींवर पहिल्यांदा चर्चा केली जाते. एकदा त्याचा विश्वास संपादन केला की, मग उपचाराला सुरूवात केली जाते.
तसं पाहिलं तर अनुवांशिकता खूप महत्त्वाची आहे. आपल्या आजोबा, वडील यांना जर एखादा मानसिक आजार असेल तर शक्यता असते की पुढल्या पिढीला याचा धोका असतो. तसंच परिस्थितीजन्य प्रकारात कुटूंब देखील महत्त्वाचा भाग असतो. आपण एका कुटूंबाचे घटक असतो. आपण कोणत्या कुटूंबातून आलोत, कुठल्या वातावरणात वाढलो आहोत, शिक्षण कोणत्या क्षेत्रात घेतलं आहे हे खूप महत्त्वाचं आहे. यातून देखील ते तणावाखालून जातात. तरूण पिढीमध्ये तर तणावाचं कारण खूप वेगवेगळे असल्याचं दिसून येत आहे कारण बरेच तरूण फेसबुकवर मला खूप लाईक्स मिळाले, मला गर्लफ्रेंड नाही, मला बॉयफ्रेंड नाही अशा गोष्टींवरून देखील तणावाखाली जाताना पहायला मिळतात.
तसं पाहिलं तर मानसिक रुग्णाच्या प्रमाणात खूपच कमी मानसोपचार तज्ज्ञ आणि समुपदेशक उपलब्ध आहेत. समाजातील संतुलन योग्य ठेवण्यासाठी तरूणांनी या क्षेत्राकडे वळणे गरजेचे आहे. करिअरसाठी हे क्षेत्र चांगलं आहे.ज्यांना समाजासाठी काहितरी करायचं आहे त्यांनी निश्चितच याकडे वळणं योग्य राहिल. मानसशास्त्र किंवा समाजशास्त्र या विषयात पदवी अथवा पदविका प्राप्त करुन समुपदेशानाचे कार्य करता येते. महत्त्वाचे म्हणजे समुपदेशकामध्ये संयम खूप महत्त्वाचा असतो. कारण मानसिक रुग्ण हा पूर्णपणे खचलेला असतो अशा वेळी समुपदेशकाने त्यामध्ये सामावून जाता तटस्थ राहून त्याच्याशी संवाद साधणं गरजेचं आहे. कंटाळून न जाता त्याला वारंवार मार्गदर्शन करणं गरजेच आहे.
लेखक - जयश्री श्रीवास्तव
स्त्रोत - महान्युज
अंतिम सुधारित : 7/12/2023
आज कालची जीवनपद्धती ही अतिशय वेगवान व फास्टफूड कल्...
पूर्वहंगामी ऊस लागवडीत पिकाची वाढ होत असताना थंडीच...
अचानक हवामान बदलामुळे ताण येऊन रोगप्रतिकार शक्ती क...
निरनिराळ्या कामधंद्यांमुळे वेगवेगळ्या प्रकारचे धोक...