काही कुटुंबांकडे जनावरे फारशी नसतात. अशा घरांसाठी जैविक कचरा व्यवस्थापनासाठी ही सर्वात सोपी पध्दत आहे. या पध्दतीत - दोन खड्डे करावेत. प्रत्येक खड्डा 1मी.x 1मी. x1मी. आकाराचा असावा. खड्डयाच्या तळाशी वीट-तुकडयांचा एकेरी थर द्यावा. खडडयाच्या भोवती चिखलाने थोडा उंचवटा करून पाणी आत येणे रोखावे.
रोजचा जैविक कचरा खड्डयात टाकावा. हा थर 6 इंच जाडीचा झाल्यावर पातळ शेण त्यात टाकून मिसळावे. यावर मातीचा एक पातळ थर द्यावा. या थरावर जैविक कचरा टाकत राहावा. तो 6 इंच झाल्यावर पूर्वीप्रमाणे शेण मिसळून,वरती मातीचा थर द्यावा. याप्रमाणे खड्डा भरून जाईल. याचप्रकारे खड्डा भरून फुटभर थर वर येईल तोपर्यंत कचरा शेण टाकणे चालू ठेवावे. यानंतर वरती चिखलाचा थर देऊन लिंपावे. हा भरलेला खड्डा तसाच ठेवून आता दुसरा खड्डा वापरायला द्यावा. सहा महिन्यांत पहिल्या खड्डयात उत्तम खत तयार होते.
हे खत आता वापरायला काढावे. तोपर्यंत दुसराही खड्डा भरलेला असेल. ही खड्डा पध्दत जास्त पावसाच्या प्रदेशात उपयुक्त नाही. अशा ठिकाणी ढीग पध्दत वापरावी लागते. काही प्रदेशात जमीन भुसभुशीत असते, त्यामुळे खड्डे टिकत नाहीत. या प्रदेशात खड्डा थोडा मोठा करावा आणि विटांनी आतून बांधून घ्यावा. वीट बांधकाम जमिनीवर 6 इंच असले की खड्डा चांगला टिकतो. ज्या कुटुंबांकडे जनावरे असतात, त्यांनी शेण वेगळे मिसळण्याची गरज नाही. रोजच्या रोज शेण व कचरा टाकत राहावा.
गावपातळीवर कंपोस्टिंगसाठी मोठी जागा करावी लागते. खड्डा करताना 1 मीटर उंची/ किंवा खोली ठेवावी. रुंदी 1.2 मीटर आणि लांबी 3 मीटर इतकी असावी. दोन खड्डयांमध्ये दीड मीटर मोकळी जागा असावी. गरजेप्रमाणे या खड्डयांची /हौदांची संख्या ठेवावी. दर सहा महिन्यांनी पूर्वीचा खड्डा/हौद वापरता येतो. हौदांची उंची मात्र 0.8 मीटर इतकीच असावी.
ज्या प्रदेशात पाऊस जास्त पडतो (सह्याद्री घाटमाथा व कोकण) तेथे खड्डा पध्दत फार उपयोगाची नसते. अशा ठिकाणी ढिगारा पध्दतीने कंपोस्ट खत करावे. यासाठी किमान 7चौ.मी. जागेची गरज असते. आधी योग्य ठिकाणी जमीन धुम्मस करून घ्यावी. या जागेवर जैवकचरा साठवत जावे. थर सहा इंच झाल्यावर त्यात शेण मिसळावे. यावर मातीचा 2/3 इंचाचा थर द्यावा. यावर परत कचरा टाकत राहावे. ढिगारा एकूण 1 मी. उंच होईपर्यंत थरावर थर देत राहावे.
यानंतर 3/4 दिवस थांबून वर चिखलाचा थर द्यावा. चिखलाने लिंपून ढिगारा पूर्ण बंद करावा. आता नवीन जागेवर ढिगारा करावा. 3-6 महिन्यांनंतर पहिला ढिगारा काढून त्यातील खत वापरावे. ज्यांना शक्य आहे त्यांनी ढिगारा करण्यासाठी विटांचा हौद बांधून घ्यावा. चौकोनी हौदापेक्षा गोल हौद जास्त टिकतो. हा हौद अडीच फूट उंचीचा असावा. या हौदासाठी चारशे विटा,अर्धी गोणी सिमेंट, 5 घनफूट वाळू आणि गवंडी-मजुरी लागते. या सर्वांचा खर्च सुमारे 1हजार रुपये इतका येईल.
लेखक : डॉ. श्याम अष्टेकर (MBBS, MD community Medicine)
संदर्भ : आरोग्यविद्या
अंतिम सुधारित : 10/7/2020
वॉटरशेड ऑर्गनायझेशन टृस्ट प्रस्तुत कंपोस्ट खत हि ...
राज्यामध्ये शेळी-मेंढीपालन व्यवसाय हा प्रमुख ग्राम...
गटचर्चा ही आरोग्यसंवादाची एक प्रभावी पध्दत आहे. त्...
कंपोस्ट खत हा सर्वसामान्य शेतकरी स्वतःच्या शेतावर ...