गेल्या काही वर्षांपासून इंधनाची टंचाई ही एक गंभीर समस्या बनली आहे. देशात फार मोठया प्रमाणावर झाडतोड झाली आहे. चुलीत जाळण्याकरिता लागणारे सरपण गोळा करण्यासाठी स्त्रियांना मैलोन् मैल पायपीट करावी लागते. अशाच वेगाने झाडतोड चालू राहिली आणि झाडांची लागवड केली गेली नाही तर येत्या 15-20 वर्षांत अन्न शिजवायला इंधनच मिळणार नाही अशी परिस्थिती निर्माण होईल.
जंगलतोडीमुळे निसर्गाचा समतोल ढासळतो आहे. उशिरा व अवेळी येणा-या पावसामुळे कधी दुष्काळ तर कधी अतिवृष्टी होत आहे. जमिनीची धूप होऊन पडिक जमिनी आणि कोरडा वैराण भूभाग वाढतो आहे. जंगलतोडीला सरकार व चोरटे हे ही जबाबदार आहेत. निसर्गावर अवलंबून असलेले मानवी जीवनही त्यामुळे असंतुलित होत आहे. संतुलन ढळू नये म्हणून भविष्यकाळासाठी नवीन झाडे लावण्याचा उपक्रम सरकार करत आहे. परंतु आपल्या देशात लाकूड फाटयाचा वापर इतक्या मोठया प्रमाणावर होतो आहे की, लाकूड फाटयाची मागणी आणि पुरवठा यांची सांगड घालणे कठीण आहे.
ग्रामीण भागात घरगुती कारणासाठी लागणा-या एकूण उर्जेपैकी 80% ऊर्जा स्वयंपाकासाठी वापरली जाते. खेडयातील लोक वर्षानुवर्षे चुली वापरत आहेत परंतु ह्या चुलींची कार्यक्षमता कमीच आहे. पारंपरिक चुलींच्या क्षमतेत 1% जरी वाढ झाली तरी प्रतिवर्षी लाखो टन लाकूड वाचेल. जळणाच्या टंचाईमुळे चुलीमध्ये सुधारणा करुन चुलींची कार्यक्षमता वाढवण्याचे व इंधनात बचत करण्याचे प्रयत्न संशोधकांनी सुरु केले आहेत.
महिलांना सरपण गोळा करण्यासाठी वणवण करावी लागते. चुलींच्या धुरामुळे त्यांच्या आरोग्यावर घातक परिणाम होतो. शिवाय लाकूडफाटयासाठी होणा-या झाडतोडीमुळे पर्यावरणावर दुष्परिणाम होतात. या सर्व समस्यांचे मूळ चुलीशी निगडित असल्याने चुलीत सुधारणा होणे ही काळाची गरज आहे.
भारत सरकारने 1983-84 साली सुधारित चुलीचा कार्यक्रम प्रात्यक्षिक स्वरुपात सुरु केला. पुढे 1987 पासून यातील प्रात्यक्षिक शब्द काढून 'सुधारित चुलीचा कार्यक्रम' म्हणून हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. इथे वर्धा येथील लक्ष्मी चुलींची माहिती दिली आहे. अशाच चुली कोकणात गोपुरी आश्रमानेही तयार केल्या आहेत.
लक्ष्मी मातीच्या चुलीप्रमाणेच लक्ष्मी सिमेंटची चूल आहे. यामध्ये दोन प्रकार आहेत. पहिल्या प्रकारामध्ये चुलींची सध्या उपलब्ध असलेल्या साच्यातून तयार केलेली लक्ष्मी सिमेंट चूल येते. दुस-या प्रकारामध्ये चुलीची लांबी, रुंदी थोडी कमी करून चुलीचे आकारमान आणि वजन कमी केले आहे. मात्र आतील मोजमापांमध्ये बदल केलेला नाही. यामुळे चुलीसाठी लागणारे सिमेंट मिश्रण कमी होऊन चुलींचे एकूण वजन व चुलींची किंमतही कमी होते. चुलींची कार्यक्षमता लक्ष्मी मातीच्या चुलींइतकीच म्हणजे 24 ते 26 % आहे.
1. जळण आणण्यासाठी लागणारा वेळ व पैसा यात बचत हाते.
2. जळण गोळा करण्यासाठी करावी लागणारी पायपीट कमी करावी लागते.
3. चुलीवर व वैलावरही अन्न शिजत असल्यामुळे झटपट स्वयंपाक होऊन वेळेची बचत होते.
4. चूल चांगली पेटल्याने धूराचे प्रमाण कमी होते. धुराडयावाटे धूर बाहेर टाकला गेल्यामुळे धुराने डोळयांना व छातीला होणारा त्रास कमी होतो. त्यामुळे आरोग्य चांगले राहते.
5. भांडी कमी काळी होतात.
6. चूल उत्तम पेटत असल्यामुळे फुंकण्याचे श्रम वाचतात.
7. लाकूडफाटयाव्यतिरिक्त लाकडाच्या छोटया ढलप्या, गोव-या, बुरकुंडे, काटयाकुटया अशा सर्व प्रकारचे जळण ह्या चुलीत उत्तम पेटते.
8. अचूक एकसारख्या मापाच्या चुली भराभर काढण्यासाठी लोखंडी साचा असल्यामुळे गावच्या कुंभारांना तसेच महिलांनाही घरबसल्या उद्योगधंदा सुरु करण्याची नवी संधी आहे.
9. ही चूल जवळजवळ पारंपरिक वैलाच्या चुलीसारखीच दिसत असल्यामुळे महाराष्ट्रातील स्त्रियांच्या पसंतीस उतरते. चूल सुटसुटीत, सुबक आकाराची व कमी जागेत सुध्दा मावणारी आहे.
1. सिमेंट 10 किलो 7 किलो
2. दगडाची बारीक
कच बारीक गिट्टी 33 किलो 22 किलो
3. दगडाची भुकटी
(पावडर) 24 किलो 16 किलो
4. पाणी आवशकतेनुसार आवशकतेनुसार
लेखक : डॉ. श्याम अष्टेकर (MBBS, MD community Medicine)
संदर्भ : आरोग्याविद्या
अंतिम सुधारित : 10/7/2020