অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

सुरक्षित पिण्याचे पाणी

प्रस्तावना

पाणी हे जीवन आहे. पाण्याशिवाय  सृष्टीतला एकही जीव, वनस्पती जिवंत राहू शकत नाही. सजीव पाण्याशिवाय जगूच शकत नाहीत. पाण्याशिवाय  धान्य उत्पादन नाही की उद्योगधंदे कारखाने नाहीत. पाणी इतके अमुल्य असतांना आपल्याला पाण्याचे महत्त्व अदयाप का समजत नाही?

निसर्गचक्रानुसार पाऊस पडतो. काही ठिकाणी तर अतिसृष्टी होते. पण तरीही उन्हाळ्याचे शेवटचे दोन महिने संपूर्ण पाण्यासाठी वणवण भटकावे लागते. हे सगळ्या देशातलेच चित्र. परिस्थिती इतकी बिकट की, एव्हाना माणसे पाण्यासाठी एकमेकांच्या जीवावरही उठू लागली आहेत.

त्यामुळेच पाण्याचे महत्त्व प्रत्येकाने जाणून घेण्याची गरज आज निर्माण झाली आहे.

पिण्याचे स्वच्छ आणि मुबलक पाणी ही जीवनाची एक मुलभूत गरज आहे. पाणी टंचाईचे प्रमुख कारण म्हणजे पाण्याचा जमाखर्च बिघडणे. एकीकडे शहरांसाठी आणि शेतीसाठी पाण्याचा वाढता वापर ही झाली पाण्याचा वाढत्या खर्चाची बाजू, मात्र जमिनीच्या पोटातल्या साठ्यात भर पडत नाही. तसेच जमिनीच्या वरच्या थराची पाणी धरून ठेवण्याची क्षमता कमी झाली आहे.

यामुळे पाण्याच्या जमेची बाजू लंगडी झालेली आहे. पर्यावरण बिघडल्याने पाणी जिरण्याची क्रिया दुबळी झालेली आहे. आता आपल्याला पाणी अडवा-जिरवा कार्यक्रम आवश्यक आहे.

पाणी टंचाईचे कारण काही असले तरी त्याचे परिणाम आरोग्याच्या दृष्टीने घातक आहेत.

पाणी टंचाईमुळे स्वच्छता राहत नाही. पुरेसे पाणी असणे हे ते शुद्ध असण्याइतकेच महत्त्वाचे आहे. शहरी वस्तीला दरडोई २०० लिटर (किमान ४० लिटर) रोज इतकी गरज गृहीत धरतात. (अनेक मोठया शहरात आता इतके पाणी मिळू शकत नाही.) खेडयात शेतीसाठी होणारा पाण्याचा वापर सोडला तर दरडोई २०० लिटर हीच गरज धरायला पाहिजे. प्रत्यक्षात मात्र पाण्यासाठी मैलोन्मैल लांब पायपीट करावी लागते आणि प्रसंगी वाटीवाटीने घागरीत भरून पाणी आणावे लागते.

पाणी टंचाईमुळे मिळेल ते पाणी वापरावे लागते. अयोग्य वापराने असणारे साठे अशुद्ध होतात त्यामुळे शुद्ध पाणी मिळण्याची शक्यता कमी होते.

अशुद्ध पाणी व कमी पाणी या दोन्हींचे आरोग्यावर होणारे परिणाम घातक आहेत. आपल्याकडचे निम्मे आजार अशुद्ध पाणी आणि अस्वच्छतेमुळे होतात.

पटकी, गास्ट्रो, पोलियो, कावीळ, हगवण, जंत, त्वचारोग, विषमज्वर इत्यादी अनेक आजार अशुद्ध पाणी व अस्वच्छता यामुळेच होतात.

शुद्ध पाण्याची आवश्यकता का?

जस अन्न ताज खाव, अस आपण म्हणतो, तसच पिण्यासाठी व स्वयंपाका साठी पाणी हे नेहमी शुद्ध केलेलंच असाव. जर अशुद्ध पाणी वापरल तर त्यामुळे अनेक आजार होतात. हे आजर होऊ नयेत म्हणून पाणी शुद्ब करण आवश्यक आहे. शुद्ध पाणी म्हणजे केवळ स्वच्छ पाणी नव्हे तर जंतूविरहीत किंवा निर्जंतुक केलेले पाणी.

 

स्त्रोत : सुरक्षित पिण्याचे पाणी, माहिती व शिक्षण मार्गदर्शक पुस्तिका, वॉटरशेड ऑगनायझेशन ट्रस्ट

अंतिम सुधारित : 3/1/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate