অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

हागणदारीची समस्या

'हागणदारी मुक्त' धोरण

शहरी आणि ग्रामीण महाराष्ट्रात उघडयावर मलविसर्जन-हागणदारीची समस्या आहे. ग्रामीण भागात सुमारे 70-80% कुटुंबांकडे संडासची सोय नाही. काही ठिकाणी कधीकाळी बांधलेले संडास आता नादुरुस्त अवस्थेत आहेत. त्यामुळे अजूनही उघडयावर मलविसर्जन केले जाते. स्त्रियांना लाजेकाजेस्तव पहाटे किंवा रात्री संडासला जावे लागते. लहान मुले तर रस्त्यावर किंवा घराजवळच बसतात. शहरी भागात झोपडपट्टया किंवा अनधिकृत वस्त्यांमध्ये जागेची समस्या असल्याने संडास नाहीत. अशा ठिकाणी सार्वजनिक संडास बांधलेले आहेत, पण त्यांचा वापर नीट होत नाही. लोकसंख्येच्या मानाने ते पुरत नाहीत. महाराष्ट्राच्या 'हागणदारी मुक्त' धोरणानुसार अनेक ग्रामपंचायती उघडयावर संडासला बसणा-यांविरुध्द कारवाई करीत आहेत. उघडयावर संडासला बसणा-यांना दंड केला जातो. याचबरोबर संडास बांधकामासाठी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सक्ती केली जात आहे.

हागणदारीने रोगराई

उघडयावर मलविसर्जनाची प्रथा अडाणीपणाची आहे. आरोग्याच्या दृष्टीने हागणदारीचे अनेक दुष्परिणाम होतात. हागणदारीचा मैला पावसाळयात वाहून जाऊन पाणीसाठे प्रदूषित होतात. उघडयावर मैला पडल्याने मानवी वस्तीचा आणि मळाचा संपर्क निरनिराळया प्रकारे होतो. यामुळे त्यातले जीवजंतू मानवी अन्नसाखळीत फिरत राहतात. हात, पाय, पाणी, भाजीपाला, माशा या सर्वांमधून रोगराई घराघरात पसरते. पटकी, कावीळ, अतिसार,जंत, विषमज्वर, आव या आजारांचा भारतात सर्वत्र कमीजास्त प्रमाणात प्रभाव आहे. या आजारांमुळे बालपणापासून कुपोषणाची समस्या मागे लागते. यामुळे भूक कमी लागणे, पचन कमी होणे, खाल्लेले अंगी न लागणे असे दुष्परिणाम होतात. कुपोषणामुळे शिक्षण आणि उत्पादकता कमी होतात. आजार आणि रोगराईमुळे आर्थिक तोटाही होतो. कुटुंबाचा तोटा आणि देशाचाही तोटा होतो. स्त्रिया, मुले, वृध्द माणसे यांना हागणदारीमुळे हाल सोसावे लागतात.

ही सर्व समस्या आरोग्यसंवादातून कुटुंबा-कुटुंबांना नीट समजावून सांगायला पाहिजे. लोकांनी समजून उमजून स्वच्छता अभियानात सामील व्हायला पाहिजे. अशा सामाजिक सुधारणा कायद्याने करण्यापेक्षा प्रबोधनानेच नीट होतील.

 

लेखक : डॉ. श्याम अष्टेकर

(MBBS, MD community Medicine)

संदर्भ : आरोग्याविद्या

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate