आज आपल्या देशाने २१ व्या शतकात प्रवेश करूनही आरोग्यावर पूर्णपणे ताबा मिळवू शकला नाही. आजही दवाखान्यामध्ये लहान बालके, महिला, तरुण वर्ग, प्रौढ व वृद्ध यांच्या रंग लागताना दिसत आहेत. असे विचित्र चित्र का आहे यावर मात्र कोणी विचार करत नाही. परंतु आता खऱ्या अर्थाने तो विचार करण्याची वेळ आली आहे. आपले आरोग्य बिघडू नये यासाठी प्रत्येक कुटुंबाने काळजी घेणे गरजेचे आहे. यामध्ये दात घासल्यापासून ते अंथरून पांघरुनापर्यंत स्वच्छ्ता ठेवणे गरजेचे आहे.
बऱ्याच खेड्यापाड्यांमध्ये आंघोळीचे, भांडी घासल्याचे खरकटे, सतत लिकेजचे पाणी उभ्या गल्ल्यांनी मोकाट सुटते. त्यामुळे अशा काही जागा सतत ओलसरपणा धारण करतात व त्यापासून डासांची उत्पत्ती होण्यास मदत होते. या सर्व कारणीभूत गोष्टींमुळे माणूस आजारांना प्रोत्साहन देतो. काही दिवसांनी या डासांचे प्रमाण इतके वाढते कि कॉइल लावून सुद्धा डास नियंत्रणात आणणे कठीण होते. मग त्यावेळी माणूस त्रस्त होतो आणि हिवताप, विषमज्वर, डेंग्यू अशा लहान मोठ्या आजारांना बळी पडून दवाखान्याचा रस्ता चालू लागतो.
सांडपाण्याची व्यवस्था लावण्यासाठी ग्रामपंचायत किंवा शासनाच्या कितीतरी योजना असतात. त्यांचा मात्र फायदा आपण करून घेतला पाहिजे. उदा. बंदिस्त गटारी, उकिरडा व्यवस्थापन, कॉंक्रेटीकरण अशा योजनांचा लाभ करून घेतल्याने आपण डासांपासून होणाऱ्या आजारांना आळा घालू शकतो. हे प्रत्येक नागरिकाने ठरविले पाहिजे. एक निरोगी व आरोग्य संपन्न ग्राम निर्माण करणे हे त्या गावातील लोकांच्या हातात आहे.
आशय लेखिका : फसाबाई साहेबराव कोंडार.
अंतिम सुधारित : 1/28/2020