स्त्रीच्या गर्भाशयातून ठराविक काळानंतर योनिमार्गे जो रक्तस्राव होतो त्याला ऋतुस्राव रजोदर्शन अथवा मासिक पाळी असे म्हणतात.
ऋतुस्राव हे स्त्री वयात आल्ये व तिची जननेंद्रिय कार्यक्षण झाल्याचे प्रमुख लक्षण आहे. तिच्या प्रत्येक अंडकोशात जन्मतःच ज्या अंडकोशिका (अंड) असतात त्यातील एक दर महिन्याला परिपक्व होऊन अंडकोशाच्या पृष्ठभागाजवळ येते. त्या कोशिकांभोवती द्रवाने भरलेली आणि आतून कोशिकांचा (पेशींचा) थर असलेली एक पिशवी तयार होते. तिला अंडपुटक असे म्हणतात. अंडपुटक फुटून त्यातील पक्व अंड बाहेर पडते. या घटनेला अंडमोचन असे म्हणतात. ही घटना ऋतुचक्राच्या मध्यावर म्हणजे पुढल्या ऋतुस्रावकालापूर्वी १४ दिवस घडते. अंड बाहेर पडल्यावर ते L अंडवाहिनीमध्ये जाते, तेथे जर त्याचा शुक्रकोशिकेशी संयोग झाला नाही (म्हणजेच गर्भधारणा झाली नाही), तर ते अंड खाली गर्भाशयात उतरते. गर्भाशयात गर्भासाठी तयार झालेली गर्भशय्या वाया जाते व तीच रक्तस्रावाबरोबर मासिक स्रावरूपाने योनिमार्गे बाहेर पडते. गर्भधारणा झाली, तर गर्भ गर्भशय्येत रूतून बसतो व त्याची तेथे वाढ होऊ लागते. गर्भधारणा झाली, तर प्रसूती कालापर्यंत व पुढेही काही काल ऋतुस्राव बंद असतो.
ऋतुचक्राचे नियंत्रण अंडकोशामध्ये उत्पन्न होणाऱ्या दोन प्रवर्तकांमुळे (उत्तेजक स्रावांमुळे, हॉर्मोनांमुळे) होते. ती प्रर्वतके म्हणजे अंडपुटकात उत्पन्न होणारेðस्त्रीमदजन आणि पुढे त्या अंडपुटकाचे रूपांतर झालेल्या पीतपुटकात उत्पन्न होणारे ð प्रगर्भरक्षी, ही होत. ऋतुचक्राच्या पहिल्या १४ दिवसांत अंडकोशांतील अंडाची वाढ होत असते. त्याचे नियंत्रण स्त्रीमदजन या प्रवर्तकामुळे होते. जर गर्भधारणा झाली, तर प्रगर्भरक्षी प्रवर्तकामुळे निषेचित (फलन झालेल्या) अंडाची आणि गर्भशयाची वाढ होते. ही दोन्ही प्रवर्तके ð पोष ग्रंथीमध्ये उत्पन्न होणाऱ्या दोन तीन प्रवर्तकांच्या नियंत्रणाखाली असतात.
सर्व सस्तन प्राण्यांमध्ये असेच ऋतुचक्र असते. मात्र त्याचा कालावधी त्या त्या प्राण्याला विशिष्ट असा असतो.
ऋतुचक्र ऋतुस्रावाच्या पहिल्या दिवसापासून मोजले जाते. साधारणपणे ते २८ दिवसांत पूर्ण होते. कुटुंबनियोजनाच्या विविध उपायांमध्ये या गोष्टीला फार महत्त्व आहे
२८ दिवसांच्या ऋतुचक्रातील घटनाक्रम : (१) तयार होणारे अंडपुटक, (२) अंडमोचन, (३) स्त्रीमदजन, (४) अनिषेचित अंड, (५) पीतपुटक, (६) प्रगर्भरक्षी, (७) ऋतुस्त्राव, (८) अपकर्षी पीतपुटक, (९) रक्तकोशिका, स्त्राव व अधिस्तर निचरा, (१०) श्लेष्मल स्तर, (११) मोठ्या रोहिणीची शाखा.
ऋतुप्राप्ती होण्याची वयोमर्यादा बारा ते पंधरा वर्षांपर्यंत असते. क्वचित ती सतराव्या वर्षांपर्यंत पुढे जाते, परंतु त्यानंतर जर ऋतुप्राती झाली नाही, तर वैद्यकीय सल्ला घेणे आवश्य असते. पूर्ण वाढलेल्या निरोगी स्त्रीला एकदा ऋतुप्राप्ती झाली म्हणजे त्यानंतर या मासिक पाळ्या गर्भधारणेखेरीज न चुकता ठराविक वेळी होत राहतात. गंभीर आजाराच्यावेळी त्याच्या कालावधीत थोडाबहुत फरक पडतो. हे ऋतुचक्र स्त्रीच्या ðऋतुनिवृत्तिकालापर्यंत चालू असते. हा ऋतुनिवृत्तिकाल साधारणपणे वयाच्या ४५ ते ५० वर्षांपर्यंत येतो.
मासिक पाळी साधारणतः चार आठवड्यांची (२८ पासून ३० दिवसांपर्यंत) येते. ऋतुप्राप्तीनंतर पहिल्या काही पाळ्या अनियमित असतात. काही स्त्रियांमध्ये हे अंतर वाढून चार ते दहा महिनेपर्यंतही असू शकते, तर काही स्त्रियांत ते दोन किंवा तीन आठवडेही असू शकते. ऋतुस्राव साधारणपणे चार दिवस असतो. त्यातही पहिले दोन दिवस त्याचे प्रमाण अधिक असून नंतरच्या दोन दिवसांत ते कमी होत जाऊन पाचव्या दिवशी स्राव पूर्णपणे बंद होतो. स्राव किती जातो त्याचे प्रमाणे प्रत्येक स्त्रीत वेगळे असते. पण साधारणपणे ते १०० ते ३०० घ. सेंमी. असते. हा स्राव वेदना वगैरे काही त्रास न होता होतो. मासिक स्रावाला विशिष्ट वास येतो. त्याचा रंग पहिले दोन दिवस लालभडक असून पुढे तो काळसर लाल होतो. मासिक स्रावाच्या आधी व नंतर नेहमी पांढरा स्राव जातो.
ऋतुस्रावाचे प्रमाण नेहमीपेक्षा फार कमी अथवा फार जास्त झाले, त्याच्या नेहमीच्या लाल रंगात बदल झाला, त्याचा कालावधी बदलला, किंवा ऋतुस्रावाच्या वेळी ओटीपोटात दुखू लागले, प्रकृतीच्या इतर तक्रारी उत्पन्न झाल्या, तर काही विकृती झाली आहे हे जाणून योग्य वैद्यकीय सल्ला घ्यावा.
या विकृतीचे सामान्यतः पुढील सहा प्रमुख प्रकार मानलेले आहेत
(मासिक स्रावाचा संपूर्ण अभाव). हा निसर्गतः यौवनावस्थेपूर्वी, गरोदरपणी, मूल अंगावर पीत असेपर्यंतच्या कालात व ऋतुनिवृत्तीनंतर प्राकृतावस्थेतही असतो.
काही स्त्रियांत ऋतुप्राप्तीची वयोमर्यादा उलटून गेली तरी ऋतुप्राप्ती होत नाही, या विकृतीला प्राथमिक अनार्तव असे म्हणतता. या विकृतीचे कारण म्हणजे जननेंद्रियाच्या वाढीतच दोष असतो हे होय. गर्भाशय, अंडवाहिनी व अंडकोश यांची वाढ जन्मतःच खुंटलेली असते. गर्भाशय पूर्णपणे अविकसित असतो. हा प्रकार कोणत्याही उपायाने बरा होत नाही. मूळ कारणावर अवलंबून पोष ग्रंथी अथवा अंडकोश यांमध्ये उत्पन्न होणाऱ्या प्रवर्तकांचा काही प्रमाणात उपयोग होतो.
काही स्त्रियांमध्ये ऋतुप्राप्ती योग्य वेळी होते, मासिक पाळ्याही काही काळ नियमितपणे होऊन नंतर त्या बंद पडतात. अशा विकृतीला गौण (अथवा दुय्यम) अनार्तव असे म्हणतात.
ऋतुप्राप्ती होण्यासाठी आणि स्राव नियमितपणे होण्यासाठी, अंडकोश, अंडमोचन, गर्भाशय व त्याचा अंतःस्तर ही सर्व कार्यक्षम असावी लागतात, त्याशिवाय या सर्वांचे नियंत्रण करणारी पोष ग्रंथी आणि अवटू ग्रंथीही कार्यक्षम असाव्या लागतात. तशी ती नसली, तर स्त्रीमदजन आणि प्रगर्भरक्षी प्रवर्तकांचे प्रमाण कमी होऊन त्यांचा समतोल ढळतो, म्हणून अशावेळी त्या प्रवर्तकांचा चिकित्सेत समावेश करावा लागतो.
याखेरीज ही विकृती होण्याची कारणे म्हणजे तीव्र स्वरूपाची दुखणी, अशक्तपणा, पांडुरोग (रक्तातील तांबड्या पेशींचे, हीमोग्लोबिनाचे किंवा दोहोंचे प्रमाण अथवा रक्ताचे एकूण घनफळ कमी झाल्यामुळे होणारा रोग), क्षय, कर्करोग, उन्माद व मानसिक श्रम वा आघात ही होत
क्वचित ऋतुप्राप्ती होऊनही ऋतुस्राव होत नाही. या विकृतीत मासिक स्राव होतो परंतु योनिमुखावर उपजतच जाड पडदा असल्यामुळे स्राव बाहेर पडू शकत नाही. तो योनिमार्ग आणि गर्भाशय येथे साठून राहतो व गोठतो. ओटीपोटात दुखते, फुगवटी येते. ही लक्षणे दर महिन्याला जाणवतात. गोठलेल्या रक्ताची गाठ बनते. तपासणीच्या वेळी ही गाठ अचानकपणे लक्षात येते व त्यामुळे विकाराचे निदान होते. लहानशी शस्त्रक्रिया करून योनिमुखावरील पडद्याला भोक पाडले असता हा विकार बरा होतो.
या प्रकारात पाळी अनियमित असते परंतु स्राव अल्पप्रमाणात असतो. या विकाराची कारणे म्हणजे पोष ग्रंथीतील प्रवर्तकाची न्यूनता व गर्भाशयाच्या अंतःस्तराची अपुरी वाढ ही होत. या प्रकारात पोष ग्रंथी प्रवर्तक दिल्यास सुधारणा होते.
या प्रकारात पाळी नियमित असते परंतु स्राव पाचव्या दिवशी न थांबता ८ ते १० दिवसांपर्यंत होतो, त्यामुळे दोन पाळ्यांमधील अंतर १०-१५ दिवसच राहते. या विकाराला पुढील आहेत : (अ) अवटू ग्रंथीचा अंतःस्राव कमी प्रमाणात उत्पन्न झाला, तर अंडमोचनक्रिया बंद पडून प्रगर्भरक्षी प्रवर्तक कमी पडल्यामुळे स्राव होत राहतो. तरुण मुलींत हा विकार विशेष आढळतो. अवटू प्रवर्तक आणि प्रगर्भरक्षी प्रवर्तक योग्य प्रमाणात दिल्यास हा विकार नाहीसा होतो. (आ) प्रसूतीनंतर गर्भाशयात राहून गेलेल्या दोषांमुळेही आर्तवाधिक्य होते. गर्भाशयाच्या अंतःस्तराचा शोध (दाहयुक्त सूज) अथवा ग्रीवाव्रण (गर्भाशयाच्या तोंडापाशी जखम) यांमुळे हा प्रकार दिसतो. (इ) पूयप्रमेह (परमा), उपदंश इ. गुप्त रोगांत गर्भाशयाला विशेषतः अंडवाहिनीला शोथ येऊन तो अंडाशयात पसरल्यामुळे आर्तवाधिक्य हा विकार होतो. (ई) गर्भाशयाच्या ग्रीवेचा (गर्भाशयाच्या मानेसारख्या भागाचा) कर्करोग, गर्भाशयातील तंत्वार्बुद (तंतूची बनलेली गाठ), इतर काही मारक अर्बुद (पेशींच्या अतिरिक्त वाढीमुळे तयार झालेल्या गाठी), हृदरोगाचे काही प्रकार इ. रोगांत आर्तवाधिक्य होऊ शकते. बिंबाणुन्यूनताजन्य नीलारुणी रोगातही हा विकार दिसतो.
आर्तवाधिक्याचे मूळ कारण शोधून काढून त्यावर योग्य तो उपचार केल्यास विकार नाहीसा होतो. प्रौढ वयात प्रवर्तकाच्या प्रमाणाचा तोल बिघडल्यामुळे हा विकार झाल्यास, गर्भाशयाचा अंतःस्तर खरडून काढल्यास स्राव थांबतो;परंतु काही वेळा त्याचाही उपयोग न झाल्यास व विकार तीव्र बनत गेल्यास गर्भाशय काढून टाकणे हाच उपाय इष्ट ठरतो.
या विकारात पाळ्या नियमित असतात. स्रावही प्रमाणशीर असतो परंतु दोन पाळ्यांच्या मधल्या कालावधीत मधूनमधून स्राव होत राहतो. सांसर्गिक ज्वर, रक्तोत्पात्तीतील विकार, मनोविकृती, मूत्रपिंडाचे रोग व संततीनियमनासाठी वापरण्यात येणारी सदोष साधने या कारणांनी हा विकार होतो. कारण शोधून काढून योग्य उपचार केल्यास विकार नाहीसा होतो.
मासिक पाळीच्या वेळी ओटीपोटात अथवा कमरेत दुखणे, क्वचित गळल्यासारखे वाटणे या प्रकाराला कष्टार्तव म्हणतात. श्रमिक स्त्रियांमध्ये या व्यथेची तीव्रता विशेष आढळून येते. वास्तविक मासिक पाळीच्या वेदना हा मूलभूत विकार नसून, ऋतुस्रावाच्या विविध विकृतींत उद्भवणारे ते एक लक्षण आहे.
या विकाराचे दोन प्रकार आहेत : (अ) प्राथमिक कष्टार्तव आणि (आ) गौण कष्टार्तव.
(अ) प्राथमिक प्रकार:हा विकार सामान्यतः तरुण मुलींत-विशेषतः कुमारिका आणि मूल होण्यापूर्वी-विशेष प्रमाणात आढळतो. वेदनांची तीव्रता विशेष असते. त्या वेदना ओटीपोटात अगदी खोलवर असून, थांबून थांबून वेग आल्याप्रमाणे (प्रसूतिवेदनांसारख्या) येतात. या कळांबरोबर कित्येक वेळा घेरी येते, उलट्या होतात, वारंवार शौचास जावेसे वाटते. या प्रकारात बहुधा गर्भाशय ग्रीवा अरुंद असून तिचे बाहेरचे तोंड लहान असते, त्यामुळे स्राव सुलभतेने बाहेर पडू शकत नाही व त्यामुळे वेदना होतात. अशा वेळी कृत्रिम पद्धतीने ग्रीवेचे विस्तृतीकरण केल्यास हा त्रास कमी होतो.
स्त्रीमदजन आणि प्रगर्भरक्षी या दोन प्रवर्तकांचा समतोल ढळला, तर मासिक पाळीच्या वेळी वेदना होतात. काही वेळानंतर या दोन प्रवर्तकांचे प्रमाण आवश्यकतेपेक्षा वाढते व त्यामुळे गर्भाशयाचा अंतःस्तर जाड व काही अंशी कठीण बनतो. पाळीच्या वेळी तो संपूर्णपणे सुटू शकत नाही व तो निखळविण्यासाठी गर्भाशयाचे आकुंचन सुरू होते. त्यामुळेच या तीव्र वेदना होतात. या प्रकाराला कलायुक्त कष्टार्तव म्हणतात.
काही वेळा गर्भाशयाची वाढ अपुरी झालेली असल्यामुळे त्याचे स्नायू व तंत्रिका (मज्जातंतू) यांच्यात योग्य सहकार्य नसते. तेथील रक्तप्रवाहाला अडथळा निर्माण होतो त्यामुळे वेदना उद्भवतात.
या प्रकारच्या चिकित्सेत स्त्रीमदजन प्रवर्तक पुरेशा प्रमाणात (दर महिन्याला एकूण तीस मिग्रॅ.) याप्रमाणे कमीत कमी तीन महिने दिल्याने हा त्रास कमी होतो. ब जीवनसत्त्वाचाही चांगला उपयोग होतो.
गर्भाशयाची वाढ अपुरी असल्यास स्त्रीमदजन अत्यंत अल्प प्रमाणात (०.३ मिग्रॅ.) दीर्घकाल (कमीत कमी सहा महिने) दिल्याने गर्भाशयस्नायूंची वाढ होण्यास मदत होते, रक्तप्रवाह सुधारतो व वेदना नाहीशा होतात. या विकाराचे स्वरूप विशेष तीव्र नसेल, तर वेदनाशामक औषधांचा उपयोग होतो.
(आ) गौण प्रकार:प्रवर्तकांचा अथवा गर्भाशयवाढीचा अपुरेपणा याशिवाय अन्य कारणांनी उद्भवणाऱ्या विकाराला गौण प्रकार म्हणतात. ही कारणे म्हणजे गर्भाशय, अंडवाहिनी आणि अंडकोश यांचा शोथ, गर्भाशयाच्या स्नायूंत झालेली तंत्वार्बुदे वगैरे होत. बद्धकोष्ठ, मानसिक विकृती व ताण यांमुळेही मासिक पाळीच्या वेळी वेदना होतात.
गर्भाशय वाडका असणे अथवा होणे, तो मागे सरकलेला अथवा पुढे फार झुकलेला असणे यांमुळेही तीव्र वेदना होतात. गर्भाशय प्राकृत (स्वाभाविक) स्थितीला आणू बसविल्याने या वेदना नाहीशा होतात.
(६) काही वेळा दोन पाळ्यांच्या दरम्यान विशेषतः पाळीनंतर बाराव्या किंवा चौदाव्या दिवशी ओटीपोटात दुखते, त्याचे कारणे अंडमोचन झाल्यावर अंड अंडनलिकेतून पुढे गर्भाशयाकडे जात असताना अंडनलिकेचे तीव्र संकोचन हे होय. वेदना कमी करणारी औषधे दिल्यास उपयुक्त ठरतात.
लेखक : सुमति क्षेत्रमाडे
ऋतुविकार म्हणजे रजोविकार. रज म्हणजे पाळीच्या वेळी स्त्रीच्या जननेंद्रियातून जाणारे रक्त. आठ प्रकारांनी रजोदुष्टी होते. पृथक् दोषांनी तीन, दोन दोन दोषांनी तीन, तीनही दोषांनी युक्त एक आणि रक्तदुष्टीने युक्त एक असे आठ प्रकार होतात. ज्या ज्या दोषांचे आधिक्य असते त्या त्या दोषांच्या वेदना आणि रजाचा रंग यांमध्ये विशेषत्व उत्पन्न होते. रक्तज व द्वंद्वज हे चार प्रकार व त्रिदोषज हे पाच प्रकार असाध्य आहेत. पहिल्या तीन प्रकारांमध्ये रजःशुद्धी व्हावी म्हणून दोषाला अनुसरून स्नेहन, स्वेदन देऊन, वांती, रेचन व बस्ती हे द्यावे. त्याचप्रमाणे त्या त्या दोषाला अनुसरून योनी शुद्ध होण्याकरिता निरनिराळ्या औषधाच्या चटण्या व औषधात भिजवलेले बोळे योनीमध्ये ठेवावेत. त्या त्या औषधीच्या काढ्याने योनी धावन करावे.
रजामध्ये (वात-कफ दुष्ट) गाठी होत असतील तर पहाडमूळ, सुंठ, मिरी, पिंपळी, कुडा यांचा काढा द्यावा. रजाला (रक्त-पित्त-कफ दुष्ट) घाण येत असेल व पुवाप्रमाणे दिसत असेल तर पांढरे किंवा पिवळे चंदन याचा काढा द्यावा. या उपायांनी पुष्कळ बरे वाटेल. या उपचारांच्या बरोबरच वैषयिक वैगुण्य असेल तर शुक्रदोषनाशक व शुक्रवर्धक औषधांचा उपयोग करावा. आहारामध्ये साळीचा भात, जव, मद्य आणि पित्तवर्धक मांस यांचा उपयोग करावा. शुक्रक्षीणता असल्यास अश्वगंधा, शतावरी, भुई कोहळा व वेदना असल्यास चतुर्बीज द्रव्यांनी सिद्ध दूध, तूप किंवा काढा द्यावा. लोध्रासव वा दशमूलारिष्टही द्यावे. रक्तस्राव खूप होत असेल तर चंद्रकला द्यावी. मूळव्याधीत किंवा गुदमार्गाने रक्त पडत असताना करावयाचे सर्व उपाय करावेत.
लेखक : वेणीमाधवाशास्त्री जोशी
संदर्भ : 1.Baird, D. Ed.Combined Text Book of Obstetrics and Gynaecology, London,1962.
2. Best, C. H.; Taylor. N. B.The Physiological Basis of Medical Practice, Baltimore,1961.
स्त्रोत : मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 10/7/2020
योनिद्वारे रक्तस्रावाची कारणे अनेक आहेत. त्यांचे य...
कधीकधी बीजांडास जंतुदोष होऊ शकतो. अशा वेळी खूप वेद...
[⟶ अंडकोश] स्रवणाऱ्या एका हॉर्मोनास [सरळ रक्तात मि...
मधुमेह असेल तर ब-याच वेळा शिश्नाचा पुढचा भाग सुजले...