অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

प्रदर

प्रदर


स्त्रियांच्या योनिमार्गातून येणाऱ्या अपसामान्य पांढऱ्या स्त्रावाला 'प्रदर' म्हणतात. सर्वसाधारण भाषेत स्त्रिया याचा 'अंगावर जाते' असा उल्लेख करतात. कधीकधी स्त्रीरोगात नेहमी आढळणाऱ्या या लक्षणाला 'श्वेत प्रदर' किंवा पांढरी धुपणी या संज्ञाही लावतात. सर्वसाधारणपणे प्रमाणापेक्षा जास्त श्लेष्मल (बुळबुळीत) किंवा पूयुक्त व योनिमार्गावाटे बाहेर पडणाऱ्या स्रावाला प्रदर म्हणतात.

प्रत्येक स्त्रीच्या जननमार्गाचे काही प्राकृतिक (स्वाभाविक) स्त्राव असतात. योनिमार्ग प्रकोष्ठावर (प्रवेशद्वाराजवळील पोकळीवर) असलेल्या बार्थोलिन ग्रंथीचा (सी. बार्थोलिन या डॅनिश शरीरविज्ञांच्या नावावरुन ओळखण्यात येणाऱ्या ग्रंथीचा) स्राव, गर्भाशयाच्या ग्रीवेतील (मानेसारख्या भागातील) ग्रंथींचा स्त्राव, योनिभित्तीतील ग्रंथींचा स्त्राव व गर्भाशय-भिंत्तीचा स्त्राव हे सर्व प्राकृतिक स्त्राव होत. त्यांचा उद्देश जननमार्ग ओलसर ठेवण्याचा असतो आणि त्यांची स्त्रीस जाणीवही नसते. गर्भाशय ग्रीवेच्या स्त्रावाचे प्रमाण निरनिराळे असते व प्रत्येक स्त्रीमध्ये ऋतुचक्राप्रमाणे त्यात बदल होतो. गर्भारपण, लैंगिक व मानसिक उद्दीपन आणि अंडमोचनाच्या (परिपक्व अंड म्हणजे प्रजोत्पत्तिक्षम पेशी अंडकोशातून बाहेर पडण्याच्या) वेळी स्त्रावाधिक्य आढळते. या शरीरक्रियात्मक स्त्रावामुळे योनिमार्गाच्या संमुख भित्तीचे पृष्ठभाग एकमेकांजवळ असूनही घर्षणविरहित राहतात. याशिवाय या स्त्रावाची अम्लता [pH मूल्य ४; ⟶ पीएच मूल्य] सूक्ष्मजंतूची वाढ रोखण्यास मदत करते. योनिमार्ग-भित्तीच्या उपकला अस्तराच्या (पातळ अस्तराच्या) कोशिकांचे (पेशींचे) सतत विशल्कन (झडून पडणे) चालू असते. या कोशिकांतील ग्लायकोजेनापासून योनिमार्गात नेहमी असणारे डीडरलीन सूक्ष्मजंतू (ए. डीडरलीन या जर्मन स्त्रीरोगतज्ञांच्या नावाने ओळखण्यात येणारे सूक्ष्मजंतू) लॅक्टीक अम्ल तयार करीत असतात. ही क्रिया रक्तातील ⇨ स्त्रीमदजन या हॉर्मोनामुळे (उत्तेजक स्त्रावामुळे) नियंत्रित केली जाते. लहान मुली व वयोवृद्ध स्त्रियांमध्ये लॅक्टिक अम्लाचे संरक्षण कमी पडल्यामुळे या वयोगटात योनिमार्गशोथाची (योनिमार्गाला दाहयुक्त सूज येण्याची) शक्यता अधिक असते.

कारणे

प्रदराच्या कारणांचा विचार करण्याकरिता तीन वयोगट पाडता येतात. (१) बालवय, (२) जननक्षम वय (ऋतुकालाच्या सुरुवातीपासून ऋतुनिवृत्तीपर्यत) आणि (३) वयोवृद्ध स्त्रिया.

बालवय

बालवयात योनिच्छदामुळे (योनीचे बाह्यछिद्र अंशतः वा पूर्णपणे घट्ट बंद ठेवणाऱ्या पातळ पटलयुक्त घडीमुळे) योनिमार्गाचे उत्तम संरक्षण होते. नवजात अर्भकातील अक्षोभक व अल्पकाल टिकणारा योनिमार्गाचा स्त्राव शरीरक्रियात्मक असतो. मातेच्या रक्तातील स्त्रीमदजन गर्भाच्या रक्तातही शिरते. त्याच्या प्रभावामुळे गर्भाच्या योनिमार्गातील कोशिकांचे विशल्कन होत नाही; परंतु जन्मल्याबरोबर अर्भकाच्या रक्तातील स्त्रीमदजनाचे प्रमाण घटते व कोशिका झडतात. कधीकधी हा स्त्राव रक्तमिश्रितही असतो. नवजात अर्भकातील स्त्रावाचे हे कारण मातेस समजावून सांगितल्यास तिची काळजी दूर होते.

अस्वच्छता, कुतूहल (बोटे घालणे वगैरे), बाह्य पदार्थ (उदा., पाटीपेन्सिलीचे किंवा काडीचे तुकडे) व घाण योनिमार्गात शिरणे जंतुसंक्रामणास कारणीभूत होतात. आंत्रमार्गातील (आतड्यातील) परोपजीवींची (जंत वगैरेंची) वाढ, रक्तक्षय (अ‍ॅनिमिया) आणि योनिमार्गाचा स्त्राव हे पुष्कळ वेळा एकाच वेळी आढळतात. यांशिवाय हस्तमैथुनाची सवय व आतून घालावयाच्या गलिच्छ चड्ड्या कारणीभूत असतात. विकृतिस्थान (रोगस्थान) बहुधा भग (जननेंद्रियाचा बाह्य भाग) हे असते. योनिच्छद अभंग असल्यास व बाह्य पदार्थाची शंका नसल्यास किंबहुना या वयातच जननेंद्रियाची प्रत्यक्ष तपासणी शक्य तो टाळावी.

जननक्षम वय

प्राकृतिक ओलसरपणा ज्या स्त्रावामुळे उत्पन्न होतो तो स्वच्छ किंवा मलईसारखा अपारदर्शी असतो. तो अक्षोभक असून त्याचा चिकटपणा बहुतांशी गर्भाशय ग्रीवेच्या स्त्रावामुळे बनलेला असतो. प्राकृतिक स्त्रावामध्ये विकृतिजन्य बदल होण्याची अनेक कारणे आहेत. विकृतिजन्य स्त्रावालाच 'प्रदर' ही संज्ञा वापरावी व प्राकृतिक स्त्रावांचा उल्लेख 'योनिमार्गाचा स्त्राव' असा करावा, असे काही स्त्रीरोगतज्ञांचे मत आहे. जननक्षम वयातील प्रदराच्या कारणांचे वर्गीकरण रोगस्थान प्रकार व उपप्रकार यांनुसार खाली दिले आहे.

(अ) योनिमार्ग : सूक्ष्मजंतु-संक्रामण : (१) अविशिष्ट सूक्ष्मजंतु-संक्रामण (स्टॅफिलोकोकाय, स्ट्रेप्टोकोकाय, एश्वेरिकिया कोलायइत्यादींमुळे होणारे संक्रामण), (२) गोनोकोकाय (परमा), (३) ट्रिकोमोनास व्हजायनॅलिस, (४) कॅन्डिडा अल्बिकान्स (मोनिलियासीस), (५) हीमोफायलस व्हजायनॅलिस, (६) उपदंशविरहित चामखीळ.

बाह्य पदार्थ : (१) पेसरी (नेहमीची जागा सोडून मागे झुकलेल्या गर्भाशयास पूर्वस्थितीत ठेवण्याकरिता वापरण्यात येणारे व्हल्कनाइटाचे बांगडीसारखे उपकरण), (२) कापसाचा किंवा चिंधीचा बोळा.

रसायनजन्य : (१) योनिमार्ग फवारण्याकरिता वापरलेली पूतिरोधक (सूक्ष्मजंतूची वाढ रोखणारी) औषधी द्रव्ये; (२) योनिमार्गात ठेवण्याची संततिप्रतिबंधक औषधे. अर्बुदजन्य (नवीन कोशिकांची अत्याधिक वाढ झाल्याने होणाऱ्या गाठीमुळे उत्पन्न होणारा) व्रण.

शस्त्रक्रियापश्च (शस्त्रक्रियेनंतर उत्पन्न होणारे) : कणोतक (जखम भरून आल्यानंतर तयार होणारा रक्तवाहिन्यायुक्त कोशिकासमूह).

(आ) गर्भाशय ग्रीवा : (१) ग्रैव अपक्षरण (गर्भाशयाच्या बाह्य मुखाभोवतील कोशिकारचना बदलल्यामुळे लाल दिसणारा भाग) (२) चिरकारी (दिर्घकालीन) ग्रीवाशोथ.

(इ) गर्भाशय : (१) गर्भपातानंतर आत राहिलेल्या गर्भधारणेचा अंश, (२) पूयगर्भाशय (गर्भाशयाच्या पोकळीत पूसंचय होणे), (३) कर्करोग.

(ई) सार्वदेहिक : अस्थिमार्दव (या विकृतीत प्रदर हे एक प्रमुख लक्षण असते.)

(उ) मनोनिर्मित : (१) वैवाहिक सलोख्याचा अभाव, (२) गर्भधारणेची भिती, (३) गुप्तरोगाची भीती, (४) कर्करोगाची भिती.

 

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate