অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

लैंगिक वैगुण्ये


प्राकृत (सर्वसाधारण) समागमासाठी निर्दोष रचना व कार्यक्षमता असलेली बाह्य जननेंद्रिय आवश्यक आहेत. बाह्य जननेंद्रियांच्या रचनेत, कार्यात व एकूण लैंगिक कार्यक्षमतेत योग्य तऱ्हेने प्राकृत समागम होऊ न शकण्यासारखा किंवा त्यात अडथळा येण्यासारखा दोष असेल, तर त्यास लैंगिक वैगुण्य म्हणता येईल.

मानवातील कामप्रवृत्ती मुख्यतः मानसिक पातळीवर असल्याने [⟶ लैंगिक वर्तन] येथे लैंगिक कार्यक्षमता हा शब्द केवळ बाह्य जननेंद्रियांचे तात्कालिन कार्य या अर्थाने वापरलेला नसून प्राकृत कामेच्छा, विरुद्ध लिंगी आकर्षण, समागमाची मानसिक व शारीरिक पूर्वतयारी, प्राकृत व आनंददायक−किमान त्रासदायक नसलेला–समागम व समागम पूर्तीचा आनंद (कामसंतृप्ती) या विस्तृत अर्थाने वापरलेला आहे. तसेच मानवामध्ये समागम केवळ प्रजोत्पादनासाठी होत नसून आनंद, जोडप्यातील सहभावना दृढ करणे, प्रेम व्यक्त करणे,मानसिक शांती व संतुलन, मानसिक ताण शिथिल करणे इ. अनेक मानसिक करणांसाठी होत असतो म्हणून प्रजोत्पादनाची गरज उरलेली नसतानाही प्राकृत समागम ही आवश्यकता ठरते. वंध्यत्व व लैंगिक वैगुण्य या वेगळ्या गोष्टी असून वंध्यत्वाच्या अनेक कारणांपैकी लैंगिक वैगुण्य हे फक्त एक कारण आहे व प्राकृत समागम होत असूनही वंध्यत्व असण्याची इतर अनेक कारणे आहेत [⟶ वंध्यत्व]. उलट अनेक परिस्थितींत वंध्यत्व हा प्रश्न नसतानादेखील लैंगिक वैगुण्य असू शकते व त्यावर शक्य ते उपाय करावे लागतात.

कारणे व त्यांचे वर्गीकरण

लैंगिक वैगुण्याची कारणे बहुधा एकमेकांत मिसळणारी व परस्परावलंबी असतात. त्यांचे खालील वर्गीकरण सोयीसाठी केले आहे.

(अ) शारीरिक कारणे : जननिक दोष; (२) शारीरिक विकासातील दोष; (३) ⇨हॉर्मोनांची (उत्तेजक स्त्रावांची) कमतरता किंवा त्यांचे असंतुलन; (४) रोग व अपघात; (५) कष्टसमागम : (क) पुरुषांतील कारणे, (ख) स्त्रियांतील कारणे.

(आ) मानसिक कारणे व अकार्यक्षमता : (क) पुरुषांतील कारणे : (१) काम-निरुत्साह व नपुसंकत्व (शिश्नोत्थान असमर्थता), (२)अकाल वीर्यस्खलन, (३) विलंबित वीर्यस्खलन व वीर्यस्खलनाचा अभाव, (४) लैंगिक अपमार्गण; (ख) स्त्रियांतील कारणे : (१)योनिसंकोच, (२) काम-निरुत्साह, (३) कामसंतृप्तीचा अभाव, (४) लैंगिक अपमार्गण.

शारीरिक कारणे

जननिक दोष : गर्भधारणा होण्याच्या क्षणीच X व Y या लिंग गुणसूत्रांच्या [⟶ आनुवंशिकी] अस्तित्वावरून गर्भाची लिंगनिश्चिती होते (XX–मुलगी व XY−मुलगा). लिंग गुणसूत्रांच्या (विशेषतः Y गुणसूत्राच्या) प्रभावामुळे जनन ग्रंथीचे रूपांतर स्त्री-ग्रंथीत होणार का पुरुष-ग्रंथीत होणार हे निश्चित होते. त्यानुसार पुढे लिंगविशिष्ट हॉर्मोनांची निर्मिती, लैंगिक अवयवांचा विकास व विशिष्ट मानसिक बैठक तयार होत असते. अंड (स्त्री-जनन कोशिका−पेशी) व शुक्राणू (पुं-जनन कोशिका) तयार होताना झालेल्या चुका, गर्भधारणा होताना झालेल्या चुका व गर्भधारेनंतर फलित कोशिकेचे समविभाजन [⟶कोशिका] होताना विभाजित कोशिकांत लिंग गुणसूत्रांचे वाटप योग्य प्रकारे न होणे यांमुळे जनन ग्रंथी अविकसित किंवा अर्धविकसित राहिल्यास किंवा अयोग्य प्रकारे विकसित झाल्यास अशा गर्भाचा शारीरिक आणि परिणामी पुढे मानसिक, भावनिक व सामाजिक लैंगिक विकास योग्य दिशेने होऊ शकत नाही. अशा व्यक्तीच्या लैंगिक जीवनात अनेक प्रकारे गुंतागुंतीचे प्रश्न उद्‌भवतात. याशिवाय अलिंग गुणसूत्रांमुळे ठरणाऱ्या काही गुणधर्मांचा प्रभावही व्यक्तीच्या विकासावर पडतो.

हॉर्मोनांची कमतरता किंवा त्यांचे असंतुलन : गर्भावस्थेत किंवा नंतर वाढीच्या वयात हॉर्मोनांच्या असंतुलित प्रभावामुळेही लैंगिक विकासावर, विशेषतः दुय्यम लैंगिक गुणधर्मांवर (उदा., स्तनवृद्धी, दाढीमिशा येणे इ.) विपरीत परिणाम होतात. पूर्ण लैंगिक वाढीनंतर मात्र सर्वसाधारपणपणे लिंगविशिष्ट हॉर्मोनांच्या रक्तातील कमी जास्त प्रमाणाचा व्यक्तीच्या लैंगिक जीवनावर विशेष परिणाम दिसत नाही (उदा., दोन्ह-स्त्री-ग्रंथी काढल्यावर किंवा ऋतुनिवृत्तीनंतरही म्हणजे मासिक पाळी कायमची थांबल्यावरही स्त्रीचे लैंगिक जीवन संपुष्टात येत नाही); परंतु सर्वसाधारपणपणे हॉर्मोनांच्या कमतरतेमुळे किंवा असंतुलनामुळे होणारा कोणताही मोठा रोग वा विकार (उदा., अवटू ग्रंथिस्त्राव न्यूनत्व किंवा आधिक्य [⟶ अवटू ग्रंथि], पोष ग्रंथिस्त्राव न्यूनत्व, कुशिंग लक्षणसमूह [⟶ पोष ग्रंथि], मधुमेह इ.) मात्र लैंगिक वैगुण्य निर्माण करू शकतात.

शारीरिक विकासातील दोष

लिंग गुणसूत्रांतील दोष आणि हॉर्मोनांचे असंतुलन यांबरोबरच इतर अनेक (कळणाऱ्या वा न कळणाऱ्या) बाह्य कारणांचा गर्भावस्थेत व वाढीच्या वयात विपरीत प्रभाव पडल्यास लैंगिक अवयवांच्या निर्मितीत व विकासात दोष उत्पन्न होऊन लैंगिक वैगुण्य संभवते. [उदा., पुरुषांत लहान शिश्न, अधश्छिद्रता (मूत्रमार्ग खालच्या बाजूस उघडणे), निरुद्धमणी (शिश्नमण्यावरील आच्छादक त्वचेच्या घडीचे छिद्र आवळलेले वा आकुंचित झाल्याने शिश्नमणी उघडा करणे अशक्य होणे) व परानिरुद्धमणी (शिश्नमण्यावरील त्वचेची घडी त्याच्या मागे आखडली जाऊन शिश्नमण्यावर ती पुन्हा आणता न येणे) आणि स्त्रियांत योनिच्छद (योनीचे छिद्र अंशतः वा पूर्णपणे बंद करणारी श्लेष्मल म्हणजे बुळबुळीत पटलाची घडी) जाड असण्यापासून योनिमार्ग नसण्यापर्यंतचे अनेक प्रकार]. तसेच बाह्य जननेंद्रियांत मोठा दोष असल्यास अंतस्थ जननेंद्रियात दोष असू शकतात व सहसा वंध्यत्व आढळते.

रोग व अपघात

अनेक रोगांमुळे व अपघातांमुळे तात्पुरते किंवा कायमचे लैंगिक वैगुण्य निर्माण होते. बाह्य जननेंद्रियांच्या रोगांत व अपघातांत हे उघडच आहे; परंतु इतर शारीरिक रोगांतही अशी परिस्थिती संभवते. याचा विचार पुढे केला आहे.

कष्ट-समागम : समागम अशक्य होणे व कष्ट-समागम म्हणजे समागम अवघड, अर्धवट किंवा वेदनादायक होणे या वेगवेगळ्या गोष्टी असल्या, तरी दोन्हीमधील फरक फक्त कमीजास्त प्रमाणाचा असून कारणे सहसा समान असल्याने ‘कष्ट-समागम’ हे एकच नाव बहुधा वापरले जाते. सहसा ही तक्रार स्त्रियांची असली, तर पुरुषांचीही असू शकते आणि त्याकरिता स्त्रियांना दोष देण्यात आला,तरी समागम त्रासदायक होण्यास कमीजास्त प्रमाणात दोघेही जबाबदार असतात. वेदनादायक समागमाचे कारण प्रथमतः एकात आढळले, तरी परिणामी जोडीदाराचे मानसिक स्वास्थ्य ढासळून त्याच्या कार्यक्षमतेवर विपरीत परिणाम होतो. कष्ट-समागमाची कारणे मुख्यतः कार्यक्षमतेवर विपरीत परिणाम होतो. कष्ट-समागमाची कारणे मुख्यतः शारीरिक असली, तरी समागम त्रासदायक होण्याने मानसिक स्वास्थ्य बिघडते व त्यामुळे मूळ तक्रार वाढविणाऱ्या मानसिक तक्रारी उद्‌भवतात. योनिसंकोच, कामनिरुत्साह,नपुसंकत्व या मुख्यतः मानसिक स्वरूपाच्या तक्रारी व कष्ट-समागम याचे जवळचे नाते आहे. कित्येक वेळा यांतील कार्यकारणभाव ठरविणे अवघड असते.

योनिमार्ग व शिश्नाच्या आकारमानातील वरवर दिसणारा फरक हे समागम अर्धवट किंवा न होण्याचे केवळ सैद्धांतिक कारण म्हणता येईल. कारण विशेष रचनात्मक दोष नसलेल्या योनिमार्गाची तननक्षमता (ताणले जाण्याची क्षमता) मोठी असते (प्रसूतीच्या वेळी बाळाच्या डोक्याला आकारमानाइतका तो ताणला जाऊ शकतो).


स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 5/6/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate