অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

कुटुंब नियोजनाच्या पद्धती

पाळणा कशासाठी लांबवावा

  • जास्त मुले असल्याने जोडप्याचे व पर्यायाने कुटुंबाचे बरेच तोटे होतात.
  • मुलांची आई लागोपाठ येणाऱ्या सारख्या गरोदरपणामुळे अशक्त होत जाते.
  • तिला प्रत्येक मुलाची काळजी घेण्यासाठी वेळ, पैसा व शक्ति कमी पडते.
  • मोठया कुटुंबात पोषण, मुलांचे शिक्षण, अन्न, निवारा या गोष्टी फार खर्चिक असतात.
  • गरोदरपणाच्या ताणामुळे आलेला अशक्तपणा भरून निघण्याआधीच पुन्हा दिवस गेल्याने आईला फारच त्रास होतो व तिचा अशक्तपणा भरून येत नाही.
  • दुसरे मुल जर लवकर झाले नाही तर, पहिले मुल चांगल्या पद्धतीने वाढविता येते. त्याची चांगली काळजी घेता येते.

पाळणा कुणी लांबवावा

१५ ते ४० वयोगटातील स्त्रियांनी पाळणा लांबवण्याचा प्रयत्न अवश्य करावा. नवीन लग्न झालेल्या, एक मुल असलेल्या, दोन किंवा अधिक मुल असलेल्या अशा सर्व जोडप्यांनी पाळणा लांबवणे योग्य आहे.

पाळणा लांबविण्याच्या पद्धती

पाळणा लांबविण्याच्या अनेक पद्धती आहेत. दोन मुलांमध्ये निदान तीन वर्षांचे तरी अंतर ठेवण्यासाठी सर्व जोडप्यांनी पाळणा लांबवण्याचा विचार करावा. या करिता खालील पद्धतीचा अवलंब करता येऊ शकतो.

निरोध/कंडोम, तांबी/कॉपर टी, संतती प्रतिबंधक गोळ्या/पाळणा लांबवण्याच्या गोळ्या/गर्भनिरोधक गोळ्या इ.

कंडोम / निरोध

हा वापरण्यास सोपा असतो. पण बऱ्याच पुरुषांना तो वापरण्यास आवडत नाही. कारण कधी कधी तो फाटतो. त्यामुळे फारसा सुरक्षितपणे वाटत नाही. तो फाटल्यास वीर्यातील शुक्रजंतू स्त्रीच्या योनीत प्रवेश करतात. कंडोम सहजपणे बाजारात मिळू शकतो. याचा उपयोग कुटुंब नियोजानाकरिता त्याचप्रमाणे लैंगिक संसर्गाचा प्रतिबंध करण्याकरिता देखील होतो.

तांबी / कॉपर टी

हे पाळणा लांबविण्याचे साधन स्त्रीच्या योनी मार्गात बसवतात. त्यासाठी डॉक्टर किंवा नर्सची जरुरी असते. परंतू एकदा बसविल्यावर ते फारसा त्रास देत नाही. कधी कधी सुरुवातीला थोडा त्रास होऊ शकतो. थोडेसे दुखते व मासिक पाळीच्या वेळी जास्त रक्तस्त्राव होण्याची शक्यता असते. नंतर ह्या तक्रारी कमी होतात. तांबी बसविलेल्या स्त्रीची एक महिन्याने भेट घेवून तिला काही त्रास होत नसेल तर पुन्हा तीन ते सहा महिन्यांनी भेटावे. जर तांबी आपोआप बाहेर आली असेल तर तिला कुटुंब कल्याण केंद्रावर जावून दुसरी बसवून घेण्यास सांगावे. जर, ती मासिक पाळीच्या वेळी अधिक रक्तस्त्राव होतो अशी तक्रार करत असेल तर तो लवकर कमी होईल असे तिला समजावून सांगावे. एक-दोन महिन्यात तिच्या ह्या रक्तस्त्रावाच्या किंवा इतर तक्रारी कमी झाल्या नाहीत तर तिला पुन्हा कुटुंब कल्याण केंद्रातील डॉक्टरांकडे पाठवावे.

संतती प्रतिबंधक गोळ्या

या गोळ्या घेणे फार सोपे आहे पण गोळ्या घ्यायला विसरणेही फार जोखमीचे आहे. म्हणून नियमित गोळ्यांचे सेवन करणे आवश्यक आहे. या गोळ्यांमुळे रक्त गोठण्याची शक्यता असते. त्यामुळे पायांवर सूज येवून ते दुखू शकतात. काही वेळा रक्तदाब वाढतो. यासाठी नियमित तपासणी करणे आवश्यक असते. कुटुंब कल्याण केंद्राकडून जर गोळ्या आणल्या असतील तर एक महिन्यानंतर प्रत कुटुंब कल्याण केंद्रात जावून यावे. जर काही तक्रारी असतील तर डॉक्टर किंवा आरोग्यसेविका यांच्याशी सल्ला मसलत करणे गरजेचे आहे. जर या गोळ्यांमुळे थकवा किंवा थोडया रक्तस्त्रावाची तक्रार असेल तर ती तक्रार थोड्याच दिवसात कमी होईल असे सांगावे. परंतु, दोन महिन्यानंतरही तिच्या ह्या तक्रारी थांबल्या नसतील व तशाच चालू असतील तर परत केंद्रातील डॉक्टरांना पुन्हा भेटावे. जर डोकेदुखीची तक्रार असेल किंवा एखादा पाय सुजला असेल किंवा दुखत असेल तरीसुद्धा कुटुंब कल्याण केंद्राकडे जावे.

प्रत्येक पद्धतीचे फायदे व तोटे

संतती प्रतिबंध गोळ्या (तोंडाने घेण्याच्या )

फायदे :
नियमितपणे व वेळच्या वेळी घेतल्यास परिणामकारक ठरतात आणि थोडया काळासाठी घेतल्यास खर्चही फारसा येत नाही.

तोटे :
३५ वर्षांवरील व धुम्रपान करणाऱ्या स्त्रियांनी तोंडाने घेण्याच्या गोळ्या घेवू  नयेत. अधिक कालावधीत गोळ्या घेतल्यास प्रकृतीस अपाय होण्याचा संभव असतो आणि कायमचा उपाय करणे स्वस्तही पडते. जास्त गोळ्या घेणे महाग पडते. त्याऐवजी कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करून घेणे जास्त चांगले आहे.

योनीमार्गात ठेवण्याची साधने

फायदे :-
परिणामकारक व रोजच्या रोज वापरावी लागत नाही.

तोटे :-
मासिक पाळीत जास्त रक्तस्त्राव होऊ शकतो. पाठीत किंवा पोटात खालच्या बाजूस दुखू शकते. कधी कधी गंभीर घोटाळे निर्माण होऊ शकतात. तुलनेने ही पद्धत स्वस्त आहे. पण ह्या साधनांचे शिक्षण, पुरवठा व मोहीम राबविणे खर्चिक होऊन बसते. गर्भाशयात जंतूसंसर्ग झाला आणि त्याकडे लक्ष ण दिल्यास गंभीर, दाह करणारे दुखणे होऊ शकते.  तेव्हा ही साधने वापरताना बसवताना जंतुसंसर्ग झालेला नसावा.

 

स्त्रोत : कुटुंब नियोजन, माहिती व शिक्षण मार्गदर्शक पुस्तिका, वॉटरशेड ऑगनायझेशन ट्रस्ट

अंतिम सुधारित : 7/10/2020© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate