वंध्यत्वाच्या समस्येवर मात करण्यासाठी गेल्या काही वर्षात वैद्यकीय तंत्रज्ञानाने बरीच मजल मारली आहे. कारणाप्रमाणे योग्य तंत्रज्ञान वापरावे लागते. ही माहिती इथे थोडक्यात दिली आहे.
वंध्यत्वावर उपचार करताना कारणाचे निदान करून योग्य उपाययोजना करावी लागते. कारणाप्रमाणे उपचारांची रुपरेषा खाली थोडक्यात दिली आहे.
वीर्यात शुक्रपेशी कमी असण्याची अनेक कारणे आहेत. कुपोषण, मधुमेह,उतारवय, संप्रेरक बिघाड इ. विविध कारणे असू शकतात. योग्य जीवनशैली म्हणजे आहार विहार यामुळे काही कारणांमध्ये सुधारणा होऊ शकते. स्त्रीबीज निर्मितीचे चक्र लक्षात घेऊन दोन पाळयांच्या मधले दहा दिवस शरीरसंबंध केला तर दिवस राहण्याची शक्यता वाढते. विशेष करून स्त्रीबीज सुटण्याचे मधले दोन-तीन दिवस तपमान तक्ता किंवा शेंबटा तपासून शरीरसंबंध करण्याचे दिवस निवडले तर जास्त यश मिळू शकेल.
मात्र शुक्रपेशी कमी संख्येनेच असतील तर शेवटी खालीलपैकी एक पर्याय वापरला जातो.
गर्भाशयात वीर्याचे इंजेक्शन देणे. या तंत्रात त्या पुरुषाचे वीर्य प्रयोगशाळेत हस्तमैथुनाने जमा करून सिरींजमधून गर्भाशयात सोडले जाते. यातही शुक्रपेशी कमी असतील तल सेंट्रीफ्युज तंत्राने ते एकत्र करून इंजेक्शन दिले जाते. या तंत्राचा वापर अर्थातच स्त्रीबीज निर्मितीच्या वेळीच करतात. यासाठी सोनोग्राफी इ. तंत्रे वापरावी लागतात.
दुसरा पर्याय म्हणजे स्त्रीबीज परीक्षानळीत घेऊन शुक्रपेशी वापरून शरीराबाहेर फलन केले जाते. फलित स्त्रीबीज परत गर्भाशयात स्थापित केले जाते. यासाठीदेखील वारंवार तपासण्या कराव्या लागतात.
संप्रेरकांच्या असमतोलामुळे काही स्त्रियांमध्ये स्त्रीबीज निर्माण होत नाही. अशा स्त्रियांना संप्रेरक उपचार करून गुण येऊ शकतो.
क्लोमीफिन हे औषध स्त्रीबीज निर्मितीस चालना देऊ शकते. परंतु या औषधाचा धोका म्हणजे एका वेळी अनेक स्त्रीबीजे सुटतात. त्यामुळे एकापेक्षा जास्त गर्भ राहू शकतात. हे अर्थातच धोकादायक आहे.
गर्भाशय मुखातील चिकटयामुळे शुक्रपेशी अडून राहणे
स्त्रीबीज निर्मितीच्या वेळी गर्भाशयाच्या तोंडातील शेंबटा पारदर्शक आणि पातळ होतो. यामुळे शुक्रपेशी गर्भाशयात सहज प्रवेश करू शकते. काही स्त्रियांच्या बाबतीत गर्भाशयाच्या तोंडातील चिकटा कायमच घट्ट राहतो. याचे कारण जंतूदोष असू शकतो. यावर योग्य निदान करून जंतूविरोधी औषधे दिली जातात.
गर्भाशय नलिकेत अडथळा असेल तर स्त्रीबीज गर्भाशयात प्रवेश करू शकत नाही. अर्थात दोन्ही बाजूला गर्भनलिकांमध्ये अडथळे असल्यास स्त्रीबीज गर्भाशयात येणारच नाही. त्यामुळे गर्भाशयात गर्भ राहणे अवघड होते.(काही वेळा अशा स्त्रियांना गर्भनलिकेतच फलन झाल्याने अस्थानी गर्भधारणा होते.) काही वेळा गर्भनलिका दुरुस्त करून हा अडथळा काढून टाकता येतो. मात्र काही स्त्रियांच्या बाबतीत लॅपरॉस्कोपिक तंत्राने स्त्रीबीज बाहेर काढून कृत्रिम फलन करून गर्भाशयात ठेवता येते. यात अर्थातच पुष्कळ तपासण्या आणि पाठपुरावा लागतो.
काही वेळा गर्भाशयातच पडदा किंवा काही दोष असतात. अशा वेळी त्या त्या तपशिलाप्रमाणे उपचार करावे लागतात.
काही स्त्रियांना स्त्रीबीज निर्माणच होत नसल्याने अन्य स्त्री कडून स्त्रीबीज दान घेऊन गर्भधारणा करता येते. यासाठी कृत्रिम फलन करून गर्भाशयात रोपण करावे लागते.
काही जोडप्यांमध्ये गर्भाशयाच्या दोषामुळे गर्भधारणा शक्य नसते. मात्र स्त्रीबीज निर्माण होत असते. अशा बाबतीत हे स्त्रीबीज घेऊन, जोडप्यातील पुरुषाकडून कृत्रिम फलन करून अन्य स्त्रीच्या गर्भाशयात रोपण करता येते. भारतात अशी सोय सुरू झाली आहे. मात्र यात अनेक भावनिक, सामाजिक व कायदेशीर प्रश्न निर्माण होतात. दुसऱ्या स्त्रीच्या गर्भाशयात वाढलेला गर्भ जरी जैविकदृष्टया त्या जोडप्याचा असला तरी मातृत्व मात्र परक्या स्त्रीचे असते. म्हणजेच ही परस्त्री हीच त्या बालकाची शारीरिक व भावनिक माता असते. बाळंतपणानंतर असे मूल परत द्यायला ती स्त्री नकार देऊ शकते अशाही घटना घडलेल्या आहेत.
काही जोडप्यांमध्ये पुरुष शुक्रपेशी निर्माण करू शकत नसल्याने वंध्यत्व येते. अशा वेळी शुक्रबीज दान घेऊन कृत्रिम फलन करता येते. यासाठी आता शुक्रपेशी पेढीची सोय आहे. (स्पर्म बँक). या ठिकाणी वीर्याचे नमुने शीत कपाटात सुरक्षित ठेवलेले असतात. अर्थातच पुरुषाचे नाव त्या जोडप्याला कळू शकत नाही.
पूर्वीच्या काळी अशा बाबतीत वियोग विधीने गर्भ निर्माण केला जात असे. महाभारतात अशा अनेक कथा आहेत. खुद्द पांडवांचा जन्म कुंती आणि इतर दैवत पुरुषांचा संबंध येऊन झाल्याची कथा आहे. आधुनिक जगात वियोग विधी न करता अज्ञात पुरुषाची शुक्रपेशी वापरता येते. त्यामुळे त्या जोडप्यास सामाजिक किंवा कायदेशीर अडचणी राहत नाहीत.
कृत्रिम किंवा सहायित गर्भधारणा करण्यासाठी असे विविध उपाय उपलब्ध आहेत. यातील काही सोपे तर काही अवघड आहेत. काही उपचारांचा खर्च पुष्कळ असतो. यश येणे न येणे हे देखील अनिश्चित असते. त्या जोडप्याची व कुटुंबाची यात कसोटी लागते.
बरीच जोडपी या किचकट उपचार पध्दतीऐवजी दत्तक बालक घेतात. मात्र काही जोडप्यांना स्वत:ची जैविक संतती हवी असल्यास वर सांगितल्याप्रमाणे वैद्यकीय तंत्रज्ञान उपलब्ध आहे.
लेखक : डॉ. श्याम अष्टेकर (MBBS, MD community Medicine)
संदर्भ : आरोग्याविद्या
अंतिम सुधारित : 10/7/2020
बहुधा पन्नाशीनंतर दात पडायला सुरुवात होऊन 10-20वर्...
गाई-म्हशींमध्ये माज दाखवण्याची लक्षणे, प्रमाण आणि ...
शरीराच्या निकामी झालेल्या अवयवांचे कार्य करून घेण्...
दात व तत्संबंधी तोंडातील भाग, ह्यांचे रोग व त्यावर...